आयुष्याचा खरा प्रवास कधी सुरू होतो, हे कळतच नाही. पण जेव्हा एखादा जुना फोटो हातात येतो, तेव्हा जाणवतं – आपण किती दूर आलो आहोत! लग्नाचे फोटो, मुलाच्या बारशाचे फोटो, त्याच्या जावळाचे फोटो… आणि कुटुंबातल्या विविध समारंभांचे फोटो – प्रत्येक क्षणात आठवणी रुजलेल्या असतात. फोटो बघताना, त्या आठवणी नकळत मनाच्या कपाटातून बाहेर येतात आणि आपण क्षणभर भूतकाळात हरवून जातो.
आज माझ्यासमोर दोन फोटो आहेत – ‘एक माझ्या लग्नाचा आणि दुसरा माझ्या मुलीच्या लग्नाचा!’
दोन्ही फोटो सारखेच वाटतात – पारंपरिक साडी… नऊवारी… वधू-वर… वधूने केसात माळलेला गजरा… मखराचं शुभचिन्ह… फुलांनी सजवलेली मांडवाची पार्श्वभूमी… आणि डोळ्यांत लपलेला हर्षवायू…
पण तरी एक फरक स्पष्ट जाणवतो – काळाचा.
माझ्या पत्रिकेत मोबाइल नंबर नव्हता – कारण त्यावेळी मोबाइलच नव्हता. डिझाइनसुद्धा साधे, सोपे… फक्त एक पत्ता – तोही मंगल कार्यालयाचा!
हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!
ऑनलाइन सेवा नव्हत्या. सगळी कामं स्वतः जाऊन करावी लागायची. टू-व्हीलर सगळ्यांकडे नव्हते. हातरिक्षा किंवा ऑटोने एकेक करून निमंत्रणपत्रिका वाटायचो… मंडपाची चौकशी, जेवणाचा मेन्यू, बँडवाल्याशी बोलणं – सगळं स्वतः करायचं.
तेव्हा पंगत असायची – एकरंगी पण समाधानदायक! आता बुफे – डझनभर डिशेश्, चटपटीत नावं आणि फोटोसाठी खास साज.
आता काही पाहुणे बदलले… काही नव्या सुखसोयी आल्या… पण बदललं नाही ते – मेहंदीचा हिरवागार रंग, हळदीचा सोनेरी स्पर्श, मंगलाष्टकांची गूंज, मंगळसूत्राच्या ताऱ्यांचा आश्वासक भार, गजऱ्याचा सुगंध, सुलग्नाचं औक्षण, सप्तपदीच्या प्रत्येक पावलामागचं एक वचन, विहिणींच्या हास्यकल्लोळातली पंगत… आणि शेवटी ओलावलेल्या डोळ्यांनी होणारी मुलीची पाठवणी – या साऱ्या गोष्टींमध्ये अजूनही काहीच बदल झालेला नाही.
काळ बदलतो, तंत्रज्ञान पुढे जातं, पण या परंपरा… त्या मात्र काळाच्या पलीकडे जाऊनही तशाच राहतात – जिवंत, जपून ठेवलेल्या आणि पुन्हा पुन्हा नव्यानं अनुभवण्यासारख्या! आजही कन्यादानाच्या क्षणी वडिलांचे डोळे पाणावतात, आणि सप्तपदीच्या प्रत्येक पावलात नवदाम्पत्याच्या मनात नव्या वाटांची भीती आणि आशा मिसळलेली असते.
हेही वाचा – साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…
परंपरा – त्या बदलत नाहीतच… आणि त्यातच त्यांच्या अस्तित्वाचं खरं सौंदर्य आहे. किती अद्भुत असतं ना हे आकर्षण! कितीही आधुनिक झालो, तरी या परंपरांकडे आपण चुंबकासारखे ओढले जातो. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या रूढी – आजही नव्या पिढीला ऊर्जा, समाधान आणि एक ओळख देतात.
या जुन्या फोटोंमध्ये फक्त चेहऱ्यांची मांडणी नाही, त्या प्रत्येकात आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब असतं. ते फोटो काळाला सांगतात – “आम्ही होतो, आहोत आणि राहू.”
आपल्या परंपरा आपल्याला जपतात, आणि आपण त्यांना. हाच आपला वारसा आहे – अभिमानास्पद, जिवाभावाचा, आणि अतूट! कारण परंपरा ही फक्त विधी नसते – ती भावना असते, आपलेपणाची, मायेची, आणि माणुसकीची.
आज हे सगळं मागे वळून पाहताना लक्षात येतं – वेळ बदलतो, साधनं बदलतात, अगदी लग्नपत्रिकेपासून ते जेवणाच्या पद्धतीपर्यंत सगळं नव्याने घडतं. पण ज्यांचं मूळ आपल्याच्या संस्कृतीत खोल रुतलेलं आहे – अशा आपल्या परंपरा मात्र काळाच्या कोणत्याही वादळात हलत नाहीत. त्या जशा आहेत तशाच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात – अजून जपून, अजून जिव्हाळ्याने…
आणि म्हणूनच, या जुन्या फोटोंकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते –
“परंपरा केवळ कार्यक्रम नसतात… त्या आपल्या आयुष्याच्या आठवणी जपणाऱ्या साक्षीदार असतात.”
त्या साक्षीदारांना आपण जपतो आणि त्या आपल्याला पुन्हा पुन्हा त्या सोनेऱ्या क्षणांत घेऊन जातात. आठवणींच्या या क्षणचित्रांनी एकच शिकवण दिली – ‘काळ बदलतो, सोयी बदलतात, पण नात्यांचा गंध, परंपरेचा सुगंध, तोच राहतो… परंपरा फॅशन नाही, ती आपली ओळख असते… आणि ओळख कधीच बदलत नाही.’


