रामनामृतपानेन, यस्य चित्तं प्रसीदति।
तस्य रक्षा स्वयं रामः, कुरुते भवसागरे॥
– गीताव्रत
ज्यांचे चित्त रामनामाच्या अमृतात न्हाऊन निघते आणि राम स्मरणामुळे प्रसन्न होते, त्याच्या जीवनाचे रक्षण या भवसागरात साक्षात प्रभू श्रीराम करतात.
‘श्रीरामरक्षा स्तोत्र’ हे अगदी बालपणापासून आपल्या मनावर कोरले गेलेले स्तोत्र. आपल्या सामर्थ्य देणाऱ्या भावविश्वाचा ते एक अविभाज्य भाग बनले आहे. साक्षात श्रीरामांनी आपले रक्षण करावे, त्यांनी आपल्या आयुष्याचे सारथ्य करावे आणि आपण आपले जीवन ध्येय पूर्ण करावे. आपण अनेक प्रकारच्या चिंता, भीती आणि असुरक्षिततेच्या भावनांनी वेढलेले असतो. वादळी भवसागराच्या संघर्षमय लाटांविरुद्ध मार्गक्रमण करताना अनेकदा आपले मन सैरभैर होते. अशावेळी आपल्याला रामनामाच्या भक्कम आधाराची आवश्यकता असते. हा आधार मानसिकही असतो आणि आध्यात्मिकही असतो!
श्रीरामरक्षा स्तोत्र हे अशाच एका आध्यात्मिक सुरक्षेचे, एका अभेद्य चिलखताचे काम करते. बाह्य संकटांपासून आपले रक्षण गरजेचे असले तरीही आधी आपल्याच मनातील नकारात्मक विचारांपासून, षड्-रिपूंपासून आपले रक्षण व्हावे, याची खूप अधिक गरज असते.
रामरक्षा हे स्तोत्र प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी बुधकौशिक ऋषी यांना स्वप्नात सांगितले आणि पहाटे जाग आल्यावर ऋषींनी ते शब्दबद्धही केले. रामरक्षा केवळ मानवी प्रज्ञेचा आविष्कार नाही, तर ती एक ईश्वरीय देणगी आहे. प्रत्यक्ष शिवशंकरालाही प्रभू श्रीरामाचे नाम प्रिय आहे.
हेही वाचा – हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन
ध्यान करणे म्हणजे, त्या देवतेचे रूप आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभे करणे. रामरक्षेच्या सुरुवातीलाच श्रीरामांचे अत्यंत सुंदर आणि सगुण रूप आपल्यासमोर उभे केले आहे.
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं
बद्धपद्मासनस्थं।
पीतं वासो वसानं नवकमलदल
स्पर्धिनेत्रं प्रसन्नम्॥
श्रीरामांचे बाहू आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत पोहोचणारे आहेत, ज्यांनी हातात धनुष्यबाण धारण केले आहे. प्रभू श्रीराम पद्मासनात बसले आहेत, श्रीरामांनी पीतांबर नेसलेला आहे आणि त्यांचे डोळे नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीसारखे सुंदर आणि प्रसन्न आहेत. श्रीराम हे एक महान योद्धे असून, हातात धनुष्यबाण आहे आणि ते पद्मासनात स्थिर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण प्रसन्नता आहे. हे आपल्या जीवनातील आदर्श स्थितीचे प्रतीक आहे. आपल्या हातातही योद्धा म्हणून कर्तव्याचे, जबाबदाऱ्यांचे धनुष्यबाण असायला हवे, आपण जगात वावरताना पूर्णतः सावध आणि सुसज्ज असायला हवे, पण त्याचवेळी आपले अंतरंग पद्मासनासारखे स्थिर आणि कमळासारखे प्रसन्न असायला हवे. बाहेर कितीही मोठे युद्ध सुरू असले, तरी आतून आपण शांत आणि अविचल असायला हवे, हीच शिकवण आपण या सुंदर श्रीराम ध्यानातून घेतो.
देहाच्या आणि मनाच्या अभेद्य रक्षणासाठी हे श्रीराम ‘कवच’ किंवा ‘अंगन्यास’ रामरक्षा सहाय्यभूत ठरते. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामांनी करावे, अशी आपण प्रार्थना करतो.
शिरो मे राघवः पातु
भालं दशरथात्मजः।
कौसल्येयो दृशौ पातु
विश्वामित्रप्रियः श्रुती॥
यामध्ये आपण प्रभू श्रीरामांना विनंती करतो की, “राघवाने माझ्या मस्तकाचे रक्षण करावे, दशरथपुत्राने माझ्या कपाळाचे रक्षण करावे, कौसल्यानंदनाने माझ्या डोळ्यांचे आणि विश्वामित्रांच्या प्रिय शिष्याने माझ्या कानांचे रक्षण करावे.” आपण असे पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाचे रक्षण मागतो.
पण आपण खरोखरच केवळ या भौतिक शरीराच्या रक्षणाची मागणी करत आहोत का, तर नक्कीच नाही. रामाने माझ्या डोळ्यांचे रक्षण करावे, “हे प्रभू, माझ्या डोळ्यांना केवळ शुभ, पवित्र आणि सात्विक गोष्टीच दिसू देत. माझ्या दृष्टीत कधीही पाप किंवा वाईट विचार दिसू नयेत.” जेव्हा कानांच्या रक्षणाची प्रार्थना होते, तेव्हा “माझ्या कानांवर केवळ चांगले विचार आणि तुझेच गुणगान पडावे. निंदा किंवा असत्य ऐकण्यापासून माझे कान सुरक्षित राहावेत.”
आपले शरीर हे एक मंदिर आहे आणि आपले मन हे त्या मंदिरातील गाभारा आहे. आपल्या पंचज्ञानेंद्रियांतूनच जगातील बरे-वाईट विचार आपल्या मनात प्रवेश करतात. त्यामुळे या सर्व ‘प्रवेशद्वारांवर’ आपण श्रीरामाच्या सात्त्विकतेचा जणू पहारा बसवत आहोत. आपले विचार, आपले शब्द, आपले कर्म हे सर्व राममय व्हावे, हेच या अंगन्यासाचे खरे मर्म आहे.
हृदये यस्य रामस्तु, वाणी राममयी तथा।
तस्य सर्वार्थसिद्धिः स्यात्, रक्ष्यते स निरन्तरम्॥
– गीताव्रत
ज्याच्या हृदयात प्रभू श्रीराम आहेत आणि ज्याची वाणी राममय आहे, त्याला सर्वार्थाची प्राप्ती होते आणि त्याचे निरंतर रक्षण होते. राम हा उच्चार हाच ‘तारक मंत्र’ आहे.
रामेति रामभद्रेति
रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै
र्भुक्तिं मुक्तिं च विन्दति॥
जो मनुष्य राम, रामभद्र, रामचंद्र या नावांचे सतत स्मरण करतो, तो कधीही पापांनी लिप्त होऊ शकत नाही. त्याला या जगात सर्व भौतिक सुखे मिळतात आणि अंतिमतः त्याला मोक्ष – मुक्ती प्राप्त होते.
आपले मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात सतत भरकटत असते. रामनामाचे स्मरण हे आपल्याला ‘वर्तमानकाळा’त आणते. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने ‘राम’ या दोन अक्षरी मंत्राचा उच्चार करू, तेव्हा आपल्या मनातील सर्व कोलाहल शांत होतो. हे रामनाम असा हितकारक अग्नी आहे, ज्यामध्ये आपले सर्व संशय, भीती आणि नैराश्य भस्मसात होऊन जाते.
रामनामाची ताकद अशी की, या नाम-कवचाने आच्छादलेला मनुष्य जगात कोणत्याही शक्तीला घाबरत नाही.
पातालभूतलव्योमचारिण
श्छद्मचारिणः।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः॥
पाताळ, पृथ्वी किंवा आकाशात वावरणारी कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा छळ करणारी प्रवृत्ती, रामनामाने रक्षित असलेल्या व्यक्तीकडे दुष्ट हेतूने पाहूही शकणार नाही. आपल्याला मनातील नैराश्य, मत्सर, क्रोध आणि न्यूनगंड यासारख्या वृत्तींपासून अधिक संरक्षणाची आवश्यकता असते. रामनामाने मन प्रसन्न, पवित्र आणि सक्षम, शक्तीसंपन्न राहते.
श्रीरामरक्षा स्तोत्राची रचना ही दिव्य आहे. व्याकरणाच्या पातळीवरही अत्यंत श्रेष्ठ आहे. यातील एकेक श्लोक तर संस्कृत साहित्यातील एक अद्भुत अलंकार मानला जातो.
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः॥
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलयः सदा भवतु मे
भो राम मामुद्धर॥
या एकाच श्लोकाचे बारकाईने निरीक्षण केले, तर आपल्याला दिसेल की, यात ‘राम’ या शब्दाच्या व्याकरणातील आठही विभक्तींचा म्हणजे प्रथमा ते संबोधन असा खूप कौशल्याने वापर केला आहे.
प्रथमा – रामो राजमणिः
राजांमध्ये श्रेष्ठ असलेला राम विजय पावतो.
द्वितीया – रामं रमेशं भजे
त्या रामाला मी भजतो.
तृतीया – रामेणाभिहता…
रामाने राक्षसांचा नाश केला.
चतुर्थी – रामाय तस्मै नमः
त्या रामाला माझा नमस्कार असो.
पंचमी – रामान्नास्ति परायणं…
रामाहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही परायण किंवा आश्रयस्थान नाही.
षष्ठी – रामस्य दासोऽस्म्यहम्
मी रामाचा दास आहे.
सप्तमी – रामे चित्तलयः
माझे चित्त सदैव रामाच्या ठायी लीन असावे.
संबोधन – भो राम मामुद्धर
तो राम, माझा उद्धार करेल! हे रामा, तू माझा उद्धार कर!
भक्ती आणि प्रेम जेव्हा परमोच्च शिखर गाठते तेव्हा शब्द आणि व्याकरणही भक्तीच्या चरणी कसे लीन होतात पहा! श्लोक म्हणताना पूर्णपणे श्रीरामांशी एकरूप होत जावे. “हे प्रभू, मी तुझा दास आहे आणि माझे मन सदैव तुझ्यातच लीन रहावे.”
या स्तोत्राची सांगता अत्यंत गोड आणि भावपूर्ण अशा शिव-पार्वती संवादाने होते. माता पार्वती भगवान शिवांना विचारतात की, “विद्वान लोक या विष्णू सहस्रनामाचा, विष्णूच्या एक हजार नावांचा पाठ कसा करतात?
त्यावर भगवान शंकर अत्यंत मार्मिक आणि सोपे उत्तर देतात,
राम रामेति रामेति
रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं
रामनाम वरानने॥
भगवान शिव म्हणतात, “हे देवी पार्वती, मी ‘राम राम राम’ असे म्हणत त्या मनोरम रामाच्या ठिकाणीच रममाण होतो. हे एकटे ‘राम’ नाम, हे श्रीविष्णूंच्या हजार नावांच्या, विष्णूसहस्रनामाच्या बरोबरीचे आहे.”
रामनाम सोबत असताना आपल्याला कोणत्याही कठीण अशा कर्मकांडांची वा लांबलचक पाठांची कधीच गरज पडू नये. आपले मन शुद्ध असेल आणि आपण अत्यंत प्रेमाने आणि एकाग्रतेने जर फक्त प्रभूंचे ‘राम’ एवढेच नाव घेतले, तरीही ते हजार नावांच्या बरोबरीचे पुण्य देते.
‘राम’ या शब्दामध्ये ‘रा’ म्हणजे प्रकाश आणि ‘म’ म्हणजे तो प्रकाश स्वतःच्या आत सामावून घेणे. रामनाम घेणे म्हणजे त्या परम ईश्वरीय प्रकाशाला आपल्या अंतःकरणात सामावून घेणे होय. नामस्मरण करीत असता राममय नाम तल्लीनता लाभणे ही पूर्ण ध्यानावस्था ठरते! तर रामरक्षा उच्चारण हे वाणी आणि उच्चार स्पष्ट करायला फारफार मदत करते. यातून वाणी हमखास शुद्ध होते.
हेही वाचा – कान्होपात्रेचे समर्पण
सायंकाळी रामरक्षा म्हणावी. ती आपली भारतीय आध्यात्मिक जीवनपद्धती आहे. रामरक्षा मनशुद्धी, मनशक्तीसाठी आणि मन:शांतीसाठी आश्वासक उपचार करते. रामरक्षा आणि नामस्मरण हे स्वतःसाठी आणि त्या परमतत्वासाठी करीत जावे.
जेव्हा आपण अर्थ समजून घेऊन रामरक्षेचे पठण करू, तेव्हा हळूहळू शौर्य वाढीस लागते. अनेक संकटात आपली कृती राममय होऊ लागते. प्रभू श्रीरामांचे जीवन हे मर्यादा, संयम, कर्तव्य, सत्य आणि प्रेमनिष्ठेचे प्रतीक आहे. रामरक्षा नकळतपणे रामाचे हे सगळे सद्गुण आपल्या आयुष्यात उतरवण्याची तयारी करत राहते. रामरक्षेमुळे मन स्थिर होते, आपली दृष्टी सात्त्विक होते आणि आपल्या वाणीमध्ये मृदुता येते. नंतर जगातली कोणतीही शक्ती अशा शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्तीचे नुकसान करू शकत नाही.
श्रीरामरक्षा ही श्रीरामांशी आंतरिक संवादाच्या भावनेने म्हणू या. स्वतःला विसरून त्या रामस्मरणात एकरूप होऊ या! हा अयोध्येचा राजा राम, आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात विराजमान आहे, ही जाणीव आपल्याला निरंतर आनंद आणि शांती देत राहील.


