10 मे — कवी ग्रेस यांचा जन्मदिवस. दरवर्षी या दिवशी त्यांच्याबद्दल लिहावंसं वाटतं. पण मग हात थबकतात. ज्यांच्या कवितेला आपण पूर्णपणे समजून घेऊ शकलो नाही, त्यांच्याबद्दल नेमकं लिहायचं तरी काय? कधी कधी ग्रेस यांच्या कविता मला हम्पीच्या भग्न देवळांसारख्या वाटतात. हम्पीला लोक फक्त देव पाहायला जात नाहीत. ते तिथे जातात त्या जागेचं शांत सौंदर्य अनुभवायला, त्या मोडकळीस आलेल्या दगडांच्या शांततेत हरवून जायला, त्या जागेच्या नि:शब्द इतिहासात आणि वेदनेत काहीतरी शोधायला.
ग्रेस यांच्या कवितांचंही तसंच आहे. त्यांच्या कवितेचा अर्थ पहिल्याच वाचनात उमगत नाही. कधी कधी तर कविता पूर्ण समजलीच नाही, असं वाटतं. पण तरीही आपण त्या कवितांमध्ये रमतो. कारण तिथे केवळ अर्थ नसतो; तिथे एक भावना असते… एक वेदना असते… एक खोल, उदास शांतता असते.
हम्पीच्या भग्न देवळांकडे पाहताना जसं वाटतं की, इथे कधीतरी खूप काही सुंदर, जिवंत आणि भव्य असावं… तसंच ग्रेस यांच्या कवितांमध्येही एखाद्या आतून तुटलेल्या मनाचा नि:शब्द आवाज सतत ऐकू येत राहतो.
“वणव्यामध्ये उभा तरी मी वाळत नाही घाव…”
हेही वाचा – प्रतीक्षेचा उत्सव साजरा करणारं ‘सिमसिम’!
स्वतःबद्दल इतक्या निर्विकारपणे लिहिणारा हा कवी मला कलियुगातील अश्वत्थामाच वाटतो. दोघांच्याही वाट्याला आली ती अंतहीन अस्वस्थता! एक जखम कपाळावर घेऊन जगला, तर दुसरा शब्दांच्या जखमा घेऊन कवितांतून जगत राहिला. त्यांच्या कवितांचं सौंदर्य हे त्यातील अर्थ न उमगण्यातही आहे…
“ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता…”
या कवितेच्या पहिल्या कडव्यात ती एखाद्या प्रेयसीवरील कविता वाटते. पण पुढे अचानक ते म्हणतात —
“ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो…”
आणि क्षणात कवितेचा अर्थ बदलतो. शेवटच्या कडव्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला वाटलेले दोन्ही अर्थ अपुरे भासू लागतात. मग आपण त्या कवितेचा अर्थ शोधत राहतो… आणि कदाचित हाच त्या कवितेचा खरा जादुई भाग आहे.
“तुला पाहिले मी नदीच्या किनारी…”
या कवितेची सुरुवात एखाद्या चित्रकवितेसारखी वाटते. मोकळे केस, नदीकिनारा, एक सुंदर दृश्य… पण लगेच ते लिहितात —
पुढे का उभी तू? तुझे दुःख झरते,
जसे संचिताचे ऋतू कोवळे…
आणि त्या क्षणी कविता केवळ सौंदर्यापुरती रहात नाही; ती वेदनेकडे वळते. जर ही फक्त देहिक आकर्षणाची कविता असती, तर त्यात दुःखाचा हा रंग का असता? अशा अनेक प्रश्नांच्या शोधात आपण भटकत राहतो. आणि कदाचित इथूनच एक मोठा प्रश्न सुरू होतो — माणसाला दुःख इतकं जवळचं का वाटतं?
कारण कदाचित, दुःख माणसाला स्वतःशी प्रामाणिक बनवतं. आनंदात आपण जग विसरतो; पण वेदनेत आपण स्वतःला भेटतो. जे आपण कुणालाच सांगू शकत नाही, ते एखादा कवी दोन ओळीत सांगून जातो… आणि मग माणसाला वाटतं —
“ही वेदना फक्त माझी नाही.”
म्हणूनच या कविता आपल्याला आपल्या आतल्या एखाद्या शांत, जखमी भागाशी भेट घडवतात. म्हणूनच ग्रेस यांचं लेखन लोकांना इतकं जवळचं वाटतं.
दुःख माणसाला तोडतंही… पण संवेदनशीलही बनवतं.
थोडक्यात सांगायचं तर —
“माणसाला दुःख आवडत नाही; पण दुःखातून मिळणारी स्वतःची ओळख आवडते.”
किंवा कदाचित असंही असेल —
आपल्या छोट्याशा जखमेपेक्षा समोरच्याच्या काळजातली मोठी जखम दिसली की, आपली वेदना थोडी हलकी वाटू लागते…
हेही वाचा – …तेच मातीने माखलेले पाय!
जखम
नसेन अश्वत्थामा परि प्राक्तन
तरी जखमा कुणाला टळल्या नाही
भाळावरली जरी जगास दिसली
हृदयावरल्या कुणास कळल्या नाही
काही जखमा फक्त हुळहुळल्या
फार कधी ठसठसल्या नाहीत
काळाने लाख मलम लाविले
पण पूर्णपणे त्या सुकल्या नाहीत
काही जखमा वेदनेत भिजल्या
सुखातही विरघळल्या नाहीत
काही जखमा अमृत प्याल्या
सरणावरही जळल्या नाहीत
काही जखमा व्यक्त न होता
स्वतःशीच पुटपुटल्या काही
काही जखमा कविता झाल्या
लेखणीत अश्रूंची शाई


