श्री. ना. पेंडसे लिखित ‘गारंबीचा बापू’ 1950च्या आसपासची प्रादेशिक कादंबरी. कोकणातल्या निसर्गाचे वर्णन यात सतत येत राहते. मुखपृष्ठावर नारळाच्या हिरव्यागार झावळ्या आहेत. कोकण म्हणजे नारळाचे, सुपारीचे झाड, नद्या, डोंगर, हिरवाई! या कादंबरीत निसर्गाचे वर्णन एखाद्या व्यक्तीचे वर्णन असावे, इतक्या बारकाव्यानिशी आले असल्याने परिसर डोळ्यासमोर उभा राहतो; परिणामी कथानक उमजते. पण काही शब्द जसे साकव, बोंडली… कोकणातल्या लोकांना सोडून इतरांना समजणे थोडे कठीण जाईल. ते विशिष्ट प्रांतातले शब्द असतात.
ही कथा गारंबी गावातल्या अफाट बापू नावाच्या महानायकाची आहे. गारंबी लहानसे गाव. निसर्गाचा वरदहस्त असलेले, कष्टाळू माणसांचे गाव. गावात सोने-नाणे भरपूर असूनसुद्धा कंजूसपणा करून जगणारी माणसे, त्यातली काही नीतिमत्ता आणि विवेक नसलेली माणसे… त्यांचे वाद कोर्टापर्यंत गेले होते. पाटाच्या पाण्यावरून गुरव आणि ब्राह्मण यांच्यात सतत वाद, मारामाऱ्या होत.
गावात अफाट बापू आणि सपाट बापू नावाच्या दोन व्यक्ती आहेत. सपाट बापू पाताळयंत्री माणूस, अण्णा खोतांचा घरजावई अफाट बापूचा द्वेष करत असतो. अफाट बापू हा अण्णा खोतांकडचा नोकर विठ्ठल सामलचा मुलगा आहे. विठ्ठलला ढोर मेहनत करण्याची सवय आहे. तो स्वभावानेही गरीब, सालस, भित्रा असून सर्वांना मदत करणारा आहे. गोड बोलून लोक त्याच्याकडून काम करून घेत. त्याची बायको ऐशी (यशोदा) दिसायला सुंदर. घरात गरिबी असूनही महाग साड्या नेसते, नथ घालते असे कसे? बापूला हा प्रश्न लहान असताना पडलेला असतो. वाचकाला ‘असे कसे?’ याचा अंदाज येतो, पण ‘कर्ता कोण?’ हे रहस्य उलगडायला पुस्तक शेवटपर्यंत वाचावे लागते. विठोबाची खरी संपत्ती त्याचा मुलगा बापू, ज्याच्यावर तो जीवापाड प्रेम करतो.
हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’
बापूला आपल्या मानहानीचे, अपमानाचे कारण गरिबी आहे, हे लहानपणीच समजलेले असते. तशा गरीबीतही तो अण्णा खोत, मूसा शेठ वगैरे समाजात वजन असलेल्या बलवान लोकांना तडफदार उत्तरे देतो, कोणाचीही भीड ठेवत नाही. तो वडिलांना विठोबा असे एकेरी संबोधतो. तो ब्राह्मण असून सुद्धा केस राखतो, मळकट कपडे घालतो, जानवे घालत नाही, सामिष खातो, मुसलमानाकडचे खातो, दारू पितो, गांजा ओढतो, लग्नाशिवाय विधवा प्रेमिकेबरोबर राहतो, ब्राह्मण असून गुरव स्त्रीला पत्नी मानतो. थोडक्यात, जे जे अमान्य, अनैतिक मानले गेले, ते ते सर्व करतो. गावाच्या मते तो वाया गेलेला असतो.
पण बापू मनाने निर्मळ आहे, सच्चा आहे. तो प्रेमळ आहे, खरा मित्र आहे. त्याच्यात माणुसकी आहे, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची क्षमता आहे, महत्वाकांक्षा आहे. विठोबाचा अकाली मृत्यू त्याला चटका लावून जातो. तो बापूला दर्शन देऊन सांगतो, ‘तू इतका मोठा माणूस हो की, तुला त्रास देणारे तुझ्यासमोर बच्चे वाटले पाहिजेत.’ त्यासाठी बापूला मोठे व्हायचे असते, म्हणजे श्रीमंत व्हायचे, बंगला बांधायचा आणि सरपंच व्हायचे, असे तो ठरवतो. लहानपणी त्याच्यावर जो गलिच्छ आरोप होतो, तेव्हाच त्याने अन्यायाशी लढायचा निश्चय केलेला असतो. त्याची प्रेमिका राधा अतिशय सुंदर, प्रेमळ, गुणी स्त्री असते. ती म्हणते, ‘नीतीच्या, माणुसकीच्या गोष्टी, भूक लागली नाही तोपर्यंत असतात. भरल्या पोटी नीतीच्या गप्पा मारण्यासारखं सोपं जगात काही नाही. उपाशी माणसाने चोरून खावं की नाही हा प्रश्नच येत नाही, तो खाणारच.’ तिची मते साधीसरळ पण काळाच्या फार पुढची आहेत. ‘कुठल्याही स्त्रीच्या चारित्र्यावर मी तुला शिंतोडे उडवू देणार नाही,’ असे ती बापूला तो त्याच्या आईची निंदा करत असताना म्हणते. ‘अख्ख्या गारंबीत परक्या स्त्री, पुरुषाबद्दल कधीच आकर्षण निर्माण झाले नाही, अशी एकही व्यक्ती मिळणार नाही,’ असे बापू म्हणतो.
दिनकर आणि बापू घनिष्ठ मित्र आहेत. दिनकर भिक्षुकी करणारा, समाजाला घाबरून राहणारा पण बापूवर प्रेम करणारा. बापूची दोन जीवाभावाची माणसे – दिनकर आणि भूतवाडीची मावशी. तिच्यातले निडर असण्याचे गुण बापूत आले.
हेही वाचा – एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!
बापू बंगला बांधतो, अफाट पैसा कमावतो – खर्च करतो, समाजात वजन निर्माण करतो. प्रतिष्ठित माणसे त्याच्याकडे पाहुणचार घ्यायला येतात. त्याच्याकडे पायाभरणीसाठी यायला दिनकर नकार देतो, पण इतर ब्राह्मण दक्षिणेच्या मिषाने येतात. राधेची पैठणी, हिऱ्याचे दागिने हा गारंबीत चघळला जाणारा विषय असतो.
या कादंबरीचा नायक काळाच्या फार पुढचा आहे. तो लग्न न करता राधेबरोबर राहतो, पण तिला बायको म्हणतो, ठेवलेली बाई नाही. त्याला लग्न म्हणजे लोकांना जेवणावळी घालणे असे वाटत असते, निरर्थक वाटत असते. तो प्रेम खुल्या मनाने करतो आणि द्वेषही! मैत्री निभावतो, तशी दुष्मनी सुद्धा. त्याच्या मुलाला सपाट बापू अक्करमाशा म्हणतो, तेव्हा तो त्याला चांगलाच प्रसाद देतो. तो जातपात मानत नाही. राधा त्याला एकेरीच संबोधते. ज्या गारंबीतले लोक त्याला त्रास देतात, त्यांच्यासाठी तो विहीर बांधतो, पूल दुरुस्त करतो. तो नेहमी खरा चेहरा घेऊन वावरतो, मुखवटे घालत नाही. कादंबरीच्या शेवटी काही खुलासे होतात. पण बापूची आई अशी का वागली, हे स्पष्ट होत नाही. वाचकांवर काही धागे सोडून दिले आहेत. बापू सरपंच होतो का? याबद्दल शेवटपर्यंत उत्सुकता वाटत राहते.
ही कादंबरी लोकप्रिय झाली. त्यावर सिनेमा, नाटक झाले. यातली पात्र इतकी सशक्त आहेत की, यातल्या दोन स्त्रीपात्रांवर राधा आणि यशोदावर लेखकाने स्वतंत्र कादंबऱ्या लिहिल्या. बापू महानायक आहे, पण अवास्तव, larger than life मात्र नाही. तो आपल्या इतकंच हाडामासाचा माणूस आहे, तरी असामान्य आहे. असा एक बंडखोर बापू प्रत्येकाच्या मनात असतो, पण बापूसारखे बेदरकारपणे मात्र वागता येत नाही. हेही ही कादंबरी लोकप्रिय होण्यामागचे एक कारण असावे.
संवादाच्या रुपात कथानक पुढे सरकत जाते, आपल्याला बांधून ठेवते आणि कादंबरी वाचून झाल्यावरच आपण पुस्तक खाली ठेवतो.


