रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मसालेभात, पुलाव, सोया चंक्स असलेली रस्सा भाजी, कटाची आमटी बनविताना या टिप्स वापरून पाहा.
- मोठ्या प्रमाणावर, पंधरा माणसांचा वगैरे मसालेभात करताना फोडणीसाठी तेल तापत ठेवतो, तेव्हाच निम्मे साजूक तूप आणि निम्मे तेल असे एकत्र तापवून नेहमीप्रमाणे फोडणी करून तांदूळ आणि भाज्या परतून मसालेभात करावा. त्यामुळे भात मोकळा चवीला जास्त चांगला लागतो. नंतर दही अगर वरून तूप सोडावे लागत नाही.
- पुलाव करताना गरम (ताजा) मसाला (धणे, जिरे, दालचिनी, लवंग, मिरी) कोरडा भाजून घेऊन मिक्सरमधून अर्धवट कुटून घ्यावा. तो पाण्यात बराच वेळ उकळून ते उकळलेले पाणी गाळून घेऊन त्या पाण्यात पुलाव शिजविल्यास सौम्य मसाल्याचा पुलाव होतो आणि गाळणीतले मिश्रण पुन्हा आमटीचा मसाला म्हणून वापरता येते.
हेही वाचा – Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…
- बाजारात सोया चंक्स मिळतात. ते पंधरा मिनिटे गरम पाण्यात मीठ घालून ठेवावेत. वांगी, कांदा, बटाटा, अशा कुठल्याही रस्सा भाजीत, गवार आणि इतर शेंगांच्या भाजीत ते घालावेत. एग करी आणि फ्राइड राईसमध्येही ते घालता येतात. त्यामुळे चव छान येते. एक वेगळा प्रकारही होतो. सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण सोयाबिनमध्ये असल्याने ते पौष्टिकही असतात.
- कटाची आमटी करताना आपण फोडणीला कढीलिंब टाकतो आणि आमटी खाताना तो बाजूला काढून ठेवला जातो; पण तसे न करता आपण इतर मसाल्यांबरोबर कढीलिंब वाटून आमटीला लावल्यास आमटीला रंगही छान येतो आणि चवही छान येते, तसेच कढीलिंब आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. कुठल्याही आमटीला तसे केल्यास तेवढाच चवीत बदल होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : दुधीची कोफ्ता करी, मेथी-पालक पुरी अन् खारी गवार करताना…
- मसालेभात, भाज्या आणि पुलाव यात ताजे मटार वापरताना त्यांना थोडासा तेलाचा हात लावावा. मटारचा हिरवा रंग आणि ताजेपणा कायम राहतो. शिवाय तेलामुळे मटार लवकर शिजतात.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


