‘राम रामेति रामेति… सुखी जगण्याचा क्रॅश कोर्स गीतरामायण’ हे लेखक डॉ. राहुल देशपांडे यांचे पुस्तक. नावात सांगितल्याप्रमाणे गीतरामायणातून सुखी जगण्याचा मंत्र विषद करणारे, हे पुस्तक आहे. हाताच्या पंजात मावेल इतका आकार असल्याने सहज घेऊन जाता येते. मीही प्रवासातल्या दोन तासांत वाचले. सुखी जगण्याचा क्रॅशकोर्स म्हणजे हे सेल्फ हेल्प आणि त्यात गीतरामायण… त्यामुळे मला कुतूहल वाटले. मराठीत सेल्फ हेल्पची पुस्तकं फारशी नाहीत, असली तर गाजलेली तरी नाहीत. इंग्रजीमध्ये अशी असंख्य पुस्तकं आहेत. थोड्या थोड्या दिवसांनी एक येत असते आणि नवी पिढी वाचताना दिसते. ‘हाऊ टू विन फ्रेंड्स’ या पुस्तकापासून ते सध्याच्या ‘Atomic habbits’पर्यंत! खरेतर, आपल्याकडे तत्वज्ञान, महाकाव्य आणि संत साहित्याची एवढी समृद्ध परंपरा असताना ही पाश्चात्य विचारसरणीची पुस्तकं आपल्या नव्या पिढीला का वाचावीशी वाटावीत? कारण त्यांना आपल्या या अमूल्य ठेव्याची नीट ओळख करून दिलेली नाही… हेच काम ‘राम रामेति रामेति’ या पुस्तकाने केले आहे.
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ हे समर्थ रामदासांनी विचारल्यापासून या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच आहे, हे आपण मनात गृहीत धरलेले असते. मग सुखी जगण्याचा क्रॅशकोर्स, म्हणजे सुखी होता येते? हा प्रश्न अगदी भुवया उंचावून मनात उभा राहतो. मलाही असेच वाटले. गीतरामायण आपण असंख्य वेळा ऐकले आहे, पण हे पुस्तक वाचल्यावर जाणवते की, खरंच नीट ऐकले का? अर्थ समजून घेतला का? लेखकाने गीतरामायणाचा अर्थ उलगडून सांगताना रामचरित्रात दडलेला सुखी होण्याचा मार्ग विषद केला आहे.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रकाशक म्हणतात की, हे पुस्तक रामाला दैवत म्हणून मांडत नाही. येथे राम एक मानवी व्यक्तिमत्व म्हणून उभा राहतो – वेदना अनुभवणारा, कर्तव्य पार पाडणारा, नात्यांमध्ये गुंतलेला आणि संकटात स्वतःचा तोल ढळू न देणारा… सुरुवातीलाच हे पुस्तक कोणी आणि का वाचावे, हे सांगितले आहे. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला चार ओळींची कविता आहे आणि भागाच्या शेवटी सारांश दिलेला आहे. वेदना, कर्तव्य, विश्वास, नाते, राजाचा राजधर्म, राम सीतेचे नाते असे या गीतांतील रामायणाचे वेगवेगळे पदर हळूहळू दृष्टिगत होऊ लागतात.
हेही वाचा – स्मृतिचित्रे… लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मवृत्त!
आचार्य विनोबा भावे यांना एका तरुण मुलाने एकदा विचारले की, तुम्ही रामाला एवढे आदर्श मानता, पण त्याने तर सीतेचा त्याग, अग्निपरीक्षा, वालीवध… वगैरे वगैरे. मग कोणत्या कसोटीवर आदर्श मानता? आता हे प्रश्न ज्यांना अल्पवयीन मुलं आहेत, त्यांनी ऐकले असतीलच (मी सुद्धा)! तेव्हा ते म्हणाले, “तुमच्या मनात जो राम आहे, त्यापेक्षा आमच्या मनात असलेला राम फार वेगळा आहे, फार मोठा आहे.’’ हेच ‘रामतत्व’ लेखकाने समजावून सांगितले आहे.
समदु:खी व्यक्ती भेटल्यावर माणसाचे दुख हलके होते. श्रीरामांनी तर कल्पनातीत दु:ख आणि वेदना भोगल्या आहेत. रामायणाने ‘कर्तव्य’ या शब्दाच्या अर्थाचा परिचय वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून करून दिला. जटायूसारखा पक्षी सुद्धा आपले कर्तव्य करतो. कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानले आहे. वालीवधाबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याचेही सयुक्तिक उत्तर लेखकाने दिले आहे. कर्तव्याइतकीच महत्त्वाची भावना विश्वासाची. एकमेकांवर असलेला प्रगाढ विश्वास, हाही सेतूच आहे. मन मोकळ करावं, इतका विश्वास ठेवण्यासारखं कुणी नाही, हे वाक्य आपण ऐकत असतो. कदाचित अनुभवाचे बोल असतो… सध्या WHOनुसार नैराश्य हा सर्वात वेगाने पसरलेला रोग आहे. या रोगासाठी जबाबदार हाच व्हायरस आहे. माणूस प्रगत झाला तो सहकार्यामुळे, विश्वासामुळे. विश्वास ठेवायला शिकलो तर सुखी होऊ!
प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।नात्मप्रियं हितं राज्ञः प्रजानां तु प्रियं हितम्॥
प्रजेच्या सुखात सुख मानणारा, राजधर्म पाळणारा राजा राम आणि दशरथ सुद्धा! प्रजेचे हित सर्वतोपरी मानणारा राजा असल्यामुळे रावणावर विजय मिळवण्यासारखी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य झाली. ‘शेवटचा करी विचार फिरून एकदा’ या गीतात रावणाला स्पष्ट आणि मोजक्या शब्दात निरोप दिला आहे. मुद्देसूद निरोप कसा द्यायचा असतो, याचीच शिकवण यातून दिली आहे. हे लेखकाने उलगडून दाखवले आहे.
सतत काही नवीन शिकण्याची वृत्ती आणि अफाट निरीक्षणशक्ती हे श्रीरामाचे दोन महत्त्वाचे गुण. रामांनी वनात फिरताना वेगवेगळ्या ऋषीमुनींबरोबर चर्चा केली. त्यामुळे व्यक्तिमत्व घडत गेले… हेही रामायण वाचताना लक्षात आले नव्हते.
हेही वाचा – डॉ. आनंदीबाई जोशी… जीवनाचे सापडलेले ध्येय!
‘सुग्रीवा, हे साहस कसले?’ या गीतात राजधर्माची शिकवण रामांनी सुग्रीवाला दिली आहे. या गीतात भगवद्गीतेतले तत्वज्ञान दडलेले आहे. भरतभेटीचा प्रसंग, सुमंताला निरोप देण्याचा प्रसंग, लक्ष्मणाला भरताचे सैन्य दिसते तो प्रसंग किंवा सीतेचा अशोकवनातील रावणाला खडसावून उत्तर देण्याचा प्रसंग यातून प्रत्येकाने केलेली आपापल्या नात्याची जपणूक दिसते. लेखक लिहितात, ‘काय कौतुक यशाचे, जर करपली नाती…’
शेवटच्या भागात रामसेतू, लक्ष्मणरेषा, मर्यादा पुरुषोत्तम या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करताना लेखकाने वाचकाला विनंती केली आहे की, या समृद्ध वारशाला, पूर्वग्रह न ठेवता, नव्या वैज्ञानिक, चिकित्सक दृष्टीने, श्रद्धेने मर्यादा सांभाळत जाणून घ्यावे; विचारी मनाने शोधून पहावे. हाच सुखी जगण्याचा क्रॅशकोर्स आहे.
तीन खंडांच्या संचाचे हे पहिले पुस्तक. पुढच्या दोन खंडाबद्दल उत्सुकता आहे. रामायणाबद्दल मनात असलेले सगळे किंतु, परंतु बाजूला ठेवून हे पुस्तक वाचायला हवे, मुलांना वाचायला द्यायला हवे.


