दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 26 जुलै 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 04 श्रावण शके 1948; तिथि : व्दादशी 13:57; नक्षत्र : ज्येष्ठा 07:34 ;
- योग : ऐंद्र 22:04; करण : कौलव 27:07;
- सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक 07:34; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वामन पूजन
प्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
मानसशास्त्रज्ञ, मानसचिकित्सक कार्ल युंग
टीम अवांतर
स्विस मानसशास्त्रज्ञ, मानसचिकित्सक आणि विश्लेषणात्मक मानसशास्त्राचे प्रवर्तक कार्ल युंग यांचा जन्म 26 जुलै 1875 रोजी स्वित्झर्लंडमधील केसव्हिल या गावी झाला. 1900 मध्ये बाझेल विद्यापीठाची वैद्यकीय पदवी त्यांनी प्राप्त केली. 1902 साली झुरिक विद्यापीठाची एम्.डी. पदवी मिळवली आणि तेथेच मानसोपचार विषयाचा व्याख्याता म्हणून त्यांनी काम सुरू केले. 1905 मध्ये पॅरिसमधील सालपित्रे रुग्णालयात प्येअर झाने या फ्रेंच मानसोपचार तज्ज्ञाबरोबर त्यांचा परिचय होऊन त्यांच्या हाताखाली अध्ययन सुरू केले.
1913 सालापासून व्याख्यात्या पद सोडून स्वतंत्र व्यवसाय आणि संशोधन यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. 1906 मध्ये प्रथमच फ्रॉइड यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला आणि 1907 मध्ये व्हिएन्नात फ्रॉइड यांची प्रत्यक्ष भेट झाली. फ्रॉइड यांच्या कामाविषयी युंग यांना आदर आणि आकर्षण होते. वैद्यकीय तसेच मनोविश्लेषणाला वाहिलेल्या नियतकालिकात या दोघांनी एकत्र लिखाण केले. फ्रॉइड यांचा एक निकट, प्रतिभावान सहकारी म्हणून युंग यांचा नावलौकिक झाला आणि फ्रॉइडही आपला वैचारिक अनुयायी म्हणून त्यांच्याकडे पाहू लागले.
हेही वाचा – विठ्ठल विठ्ठल… दोन बहिणींची पंढरीची वारी
यानंतरच्या काळात मात्र फ्रॉइड आणि युंग यांच्यात वैचारिक अंतर पडू लागले. फ्रॉइड यांच्या सर्वच संकल्पना युंग यांना अमान्य होऊ लागल्या. विशेषतः, फ्रॉइडच्या मानसशास्त्रीय प्रणालीच्या गाभ्याशी असलेला ‘लिबिडो’ हा सिद्धांत युंग यांना जसाच्या तसा अमान्य होता. त्यातील लैंगिक प्रेरणेला अवास्तव दिलेले महत्त्व युंग यांनी नाकारले. 1913 च्या सुमारास स्वतंत्रपणे, युंग यांनी ‘विश्लेषणात्मक मानसशास्त्र’ असा संप्रदाय स्थापला. ब्लॉइलरबरोबर केलेल्या दीर्घ संशोधनावर आधारित ‘शाब्दिक साहचर्य’ या कसोटीची आखणी केली. ‘शाब्दिक साहचर्य’ या कसोटीची उपयुक्तता मनोविश्लेषण आणि प्रायोगिक मानसशास्त्रात महत्त्वाची मानली जाते. मनोरुग्णांच्या रोगनिदानात आणि उपचारपद्धतीत या कसोटीचा वापर होऊ लागला. तिचे महत्त्व आजही कायम आहे.
युंग यांच्या मानसशास्त्रीय संकल्पना आता सर्रास वापरल्या जातात. त्यांच्या गंड (कॉम्प्लेक्स), सामूहिक अबोध (कलेक्टिव्ह अनकॉन्शस), मूलबंध वा मूलाकृती (आर्केटाइप्स), अंतर्मुखी (इन्ट्रोव्हर्ट) आणि बहिर्मुखी (एक्स्ट्रोव्हर्ट) अशी व्यक्तिमत्त्वाची विभागणी अशा अनेक संकल्पना नेहमीच्या भाषेत डोकावतात.
मानवी मनाच्या शोधासाठी युंग यांनी फार परिश्रम घेतले. फ्रॉइडच्याही एक पाऊल अधिक पुढे जाऊन सामूहिक अबोधाच्या सिद्धांताबरोबर मनाच्या अज्ञात भागावर नवा प्रकाश टाकला. युंग यांच्या मते मानवी मनाचा शोध हेच उद्याचे खरे विज्ञान आहे आणि हे असे विज्ञान आहे, की ज्याची आपणांस नितांत गरज आहे. आता हळूहळू असे प्रत्ययास येत आहे, की माणसाला सर्वांत मोठा धोका कशापासून असेल तर तो दुष्काळ, भूकंप, सूक्ष्मजंतू किंवा कॅन्सर यांपासून नव्हे, तर तो त्याच्या स्वतःपासूनच आहे.
हेही वाचा – चातुर्मास आमचा-तुमचा… आपल्या सर्वांचा
युंग यांचे दीर्घ अध्ययन, संशोधन आणि विपुल लेखन यामुळे त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. अमेरिकेतील क्लार्क, येल, हार्व्हर्ड, फॉरधॅम, कलकत्ता, बनारस, अलाहाबाद, जिनीव्हा आणि झुरिक येथील विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या. 1932 साली ‘झुरिक लिटरेचर प्राइझ’ त्यांना मिळाले. या शिवाय इंग्लंडमधील ‘रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन’ या संस्थेचे मानद सदस्यत्व, ‘स्विस ॲकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ने देखील त्यांना सदस्यत्व देऊन त्यांचा सन्मान केला. जर्मन मेडिकल सोसायटी फॉर सायकोथेरपी या संस्थेचे अध्यक्षपद आणि त्या संस्थेच्या मानसोपचारविषयक मुखपत्राचे संपादकपद अशी मानाची पदे त्यांनी भूषविली. ‘स्विस सोसायटी फॉर प्रॅक्टिकल सायकॉलॉजी’ या संस्थेचे ते अखेरपर्यंत अध्यक्ष होते. 1948 मध्ये झुरिक येथे मानसचिकित्सालय सुरू करून, त्यांनी जर्मन आणि इंग्रजी भाषांमधून त्या ठिकाणी प्रशिक्षणाची आणि संशोधनाची व्यवस्था केली. झुरिकजवळील कूशनाख्त येथे 6 जून 1961 रोजी त्यांचे निधन झाले.


