अध्याय तेरावा
आतां ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगों गा अवधारीं । चतुरनाथा ॥368॥ आघवियांचि दैवां । जन्मभूमि हे सेवा । जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातें ॥369॥ हें आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती । बैसों दे एकपांती । अवधानाची ॥370॥ तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा रिगाली उदधी । कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली ॥371॥ नाना वेंटाळूनि जीवितें । गुणागुण उखितें । प्राणनाथा उचितें । दिधलें प्रिया ॥372॥ तैसें सबाह्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें । आपणपें केलें । भक्तीचें घर ॥373॥ गुरुगृह जिये देशीं । तो देशुचि वसे मानसीं । विरहिणी कां जैसी । वल्लभातें ॥374॥ तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा । आड पडे म्हणे घरा । बीजें कीजो ॥375॥ साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली । जीवु थानपती करूनि घाली । गुरुगृहीं जो ॥376॥ परी गुरुआज्ञा धरिलें । देह गांवीं असे एकलें । वांसरुवा लाविलें । दावें जैसें ॥377॥ म्हणे कैं हें बिरडें फिटेल । कैं तो स्वामी भेटेल । युगाहिहूनि वडिल । निमिष मानी ॥378॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें
अर्थ
आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा, तो तू ऐक. ॥368॥ ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते ॥369॥ ती गुरुभक्ति आता तुला स्पष्ट सांगितली जाईल. (मात्र) तू तिकडे एकवटून लक्ष दे. ॥370॥ तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते, अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात, ॥371॥ अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगच्या गुणावगुणांसह सरसकट आपल्या स्वत:ला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले, ॥372॥ त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर, मनादिक व बाह्य इंद्रियांदिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहे, ॥373॥ ज्याप्रमाणे विरहिणीच्या चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशांत गुरूचे घर असते, तो देश ज्याच्या मनामधे असतो ॥374॥ गुरूच्या देशाकडून जो वारा येत असेल, त्या वार्याला पाहून त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, “आपण माझ्या घरी यावे” ॥375॥ सद्गुरूविषयीच्या खर्या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरूच्या घरात मिरासदार करून ठेवतो. ॥376॥ परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गाईकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही, त्याप्रमाणे गुरूची आज्ञा हेच कोणी एक दावे, त्याने देहास बांधून टाकल्यामुळे, त्याला एकट्याला आपल्या गावी राहावे लागून गुरूच्या गावाकडे धाव घेता येत नाही. ॥377॥ जो म्हणतो, ही गुरुआज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो स्वामी भेटेल ? तो (गुरूच्या वियोगात जाणार्या) निमिषाला युगाहून मोठे मानतो. ॥378॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वारियाची धांव, तैसे सरळ भाव


