अलीकडेच मस्त गंमत झाली. तसे घोळ, गमतीजमती माझ्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत, त्यातलीच ही एक नवीन कडी. शनिवारी पुण्याला येण्यासाठी म्हणून ठाण्याहून प्रगती एक्स्प्रेस पकडली, मी पाच वाजता आणि आठच्या सुमारास पुणे स्थानकात उतरलो. अगदी वेळेवर आली गाडी, म्हणून जाम हायसं वाटलं.
भाऊ राहतो कर्वेनगरला… त्याच्याकडे जाऊन मग पुढे एका नातेवाईकांकडे जेवायला जायचं होतं. शनिवार असून सुद्धा ऑफिसला गेलो होतो, दिवसभर काम करून जाम दमायला झालं होतं, पण जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. ‘कितीही उशीर झाला तरी, तुला यायचंच आहे;’ हे आधीच बजावण्यात आलं होतं, त्यामुळे तशी मनाची तयारी होतीच झालेली!
पुण्यनगरीत उतरल्यावर, प्रवासाचा पुढचा टप्पा होता ‘पुणे मेट्रो’. ही एक छान सोय झालीय हल्ली. पूर्वी ज्या प्रवासात अनंत अडचणी यायच्या, तो प्रवास हल्ली फार म्हणजे फारच झटपट आणि सुखकारक झालाय. पण मागे एकदा असाच प्रवास केला होता, तेव्हा तिकिटाच्या रांगेत जवळपास अर्ध्या तासाची खोटी झाली होती, एवढी गर्दी होती. यावेळी मात्र मी फोनमध्ये ‘पुणे मेट्रो’ ॲप घेतलं आणि ‘पुणे स्थानक’ ते ‘नळ स्टॉप’ हे वीस रुपयांचं तिकीट, सवलतीच्या दरात फक्त चौदा रुपयांना खरेदी करून निश्चिंत झालो. आता रांग लावावी लागणार नव्हती, त्यामुळे बराच वेळ वाचणार होता.
मजल दरमजल करत, फलाटावर पोहोचलो. तीनच मिनिटांत गाडी आली वनाझकडे जाणारी… गर्दी नव्हती, त्यामुळे चक्क बसायला जागा मिळाली आणि मी सुखावलो. येणाऱ्या प्रत्येक स्थानकाची उद्घोषणा होत होती. नळ स्टॉपची घोषणा झाली की, उठायचं, असं ठरवलं होतं. डोळे मोबाइलमध्ये आणि कान उद्घोषणेकडे, असं काहीसं सुरू होतं माझं.
स्थानकं येत होती आणि जात होती. पोरं, पोरी, बायका, पुरुष चढत होते आणि उतरत होते. अशी बरीच स्थानकं आली आणि गेली, पण नळ स्टॉपची घोषणा काही होईना! मी आपला वाट बघत बसलो होतो… भिडस्त स्वभाव, त्यामुळे तोंड उचकटून कोणाला तरी विचारावं, हे पण सुधरलं नाही आणि बसून राहिलो निवांत…
हेही वाचा – पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…
‘पौड रोड’ नावाचं स्थानक आलं आणि गेलं. त्यानंतर ‘आनंद नगर’ची घोषणा झाली आणि मला जाणवलं की, ‘कुछ तो गडबड है दया…’ काहीतरी गंडलं होतं नक्कीच!
आता धीर एकवटून, मी शेजारी कानात बोळे खुपसून बसलेल्या एका मुलाला विचारलं, “नळ स्टॉप कधी येईल?”
माझा प्रश्न त्याला ऐकूच गेला नसावा बहुतेक, हे त्याच्या कोऱ्या करकरीत चेहेऱ्याकडे बघून मला कळलं. मी ढोसलं त्याला आणि परत विचारलं, “नळ स्टॉप कधी येईल?”
त्याने एका कानातलं बुच काढलं आणि त्रासिक चर्या करून ‘काय?’ असं हातानं खूण करून विचारलं. मी तिसऱ्यांदा तोच प्रश्न विचारला आणि तो म्हणाला, “काय काका, गेलं की नळ स्टॉप मागेच. तुम्ही पुढे आलात दोन स्टेशनं!”
च्या मारी गंडेरी, हे कधी गेलं? मी तर ऐकलं नाही आणि बघितलं पण नाही. मी आपला केविलवाणा…
शेजारी एक समवयस्क गृहस्थ बसले होते, ते म्हणाले, “अहो, नळ स्टॉप आता इतिहासजमा झाला. आता नाव बदलून SNDT केलंय. गेलं ते मागं, कधीच… काय राव तुम्ही! आता तुम्ही इथे उतरा, पलिकडची गाडी पकडा आणि मग SNDT ला उतरा. तोच नळ स्टॉप.”
हाय रे कर्मा! आधीच गांजलेला मी आणखीनच वैतागलो. बायकोला फोन करून, आता वनाझला उतरून थेट वारज्याला घरी जाऊन पथारी पसरतो, असं सांगावं असं मनात आलं, पण आवरलं स्वतःला. तेवढ्यात तिचाच फोन आला – “कुठवर पोहोचली स्वारी?”
सांगावं का नं सांगावं, विचार करत असतानाच, न राहवून ही नवी कहाणी ऐकवली तिला, आणि पलीकडे तिने कपाळावर मारलेल्या हाताचा आवाज ऐकू आला मला स्पष्टपणे. आता जे घडलं त्यात माझा दोष काय? पण ती ऐकून घेईल तर शपथ.
मनातल्या मनात, स्थानकाचं नाव बदलणारे आणि ते नीटसपणे सगळीकडे बदलून पूर्णत्वाला न नेणारे जे कोणी असतील, त्यांना शिव्यांची लाखोली व्हायली आणि चरफडत आनंदनगरला उतरलो. आता परत तिकीट काढावं म्हणून मोबाइल उघडला आणि तिथल्या एका कर्मचाऱ्याला विचारलं, तर तो म्हणाला, ‘चालतंय तेच तिकीट. जावा तुम्ही बिनघोर.’ बरं वाटलं अगदी, सरळसोट उत्तर मिळालं म्हणून!
परतीची गाडी तब्बल दहा मिनिटांनी होती. तेवढ्यात बायकोचे चार फोन येऊन गेले. किती वैतागलो असेन, विचार करा!
परतीच्या प्रवासात मात्र अगदी खणखणीत ‘नळ स्टॉप’ अशी घोषणा झाली…! हे गौडबंगाल काही उलगडलंच नाही मला. च्यायला, नाव बदललं तर ते ॲपमध्ये का दिसतंय, काही गाड्यांमध्ये दिसतंय तर काहींमध्ये नाही, असं कसं? हा प्रश्नच पडला मला.
उतरल्यावर तिरमिरीत तिथल्या तिकीट खिडकीपाशी गेलो आणि त्यांना हे विचारायचा क्षीण प्रयत्न केला, पण मेट्रोचे ते कर्मचारी ताकास तूर लागू देईनात. शेवटी तो निष्फळ प्रयत्न सोडून, स्वतःच्याच नशिबाला बोल लावून निघालो.
मागे माझा एक मित्र, वनाझहून पुणे स्थानकाकडे जाताना, ‘RTO, पुणे स्थानक’ अशी उद्घोषणा ऐकून तिथेच उतरला होता, याची आठवण झाली. फसगत होणारा मी काही एकटाच नव्हतो, ही एक सुखाची जाणीव, त्यातल्या त्यात…
हा नळ स्टॉप म्हणजे ‘कोई बंदर नही है फिरभी नाम बांद्रा, चर्च का गेट है चर्च है लापता…’ याची पुणेरी आवृत्ती आहे. ना नळ आहे, ना स्टॉप आहे, तरी ‘नळ स्टॉप’! बच्चनने असं काही गाणं पुढे मागे केलं पुण्यावर, तर डझनभर मारूती आणि विठोबांसोबत या विस्मयजनक नळ स्टॉपचा उल्लेख नक्कीच होईल हे मात्र निश्चित!
दुर्दैवाचे दशावतार तिथेच संपले नव्हते. आता पाळी होती रिक्षाची. अगदी आगीतून फुफाट्यात अशी गत. माझं ठिकाण सांगितल्यावर, ‘दोनशे रुपये होतील साहेब,’ असं कान, नाहीतर दात कोरत, गुटखा चघळत, निर्विकारपणे सांगणाऱ्या त्या महामहिम रिक्षेवाल्यांनाही लाखोली वाहावी असं खूप वाटत होतं, पण शेवटी ‘अडला हरी’ अशातली गत.
एक जण शंभर रुपयांवर तयार झाला, अगदी उपकारच माझ्यावर. बसलो रिक्षात आणि त्याला म्हणालो, “मीटर टाक. मी कबूल केलेले पैसे देईन तुला, पण टाक.” छद्मी का काय ते हसत, त्याने खटकन् मीटर टाकलं आणि मी एकदाचा मार्गाला लागलो. उतरताना मीटरवर झाले होते फक्त अठ्ठावन्न रुपये.
मी कबूल केल्याप्रमाणे शंभर दिले आणि मग तो स्वतःहूनच म्हणाला, “रिटर्न भाडं भेटत नाय साहेब.” कसले साहेब आणि कसलं काय? पामर आम्ही, तुमच्या दावणीला बांधलेले! कर्वेनगरसारख्या भागातून कुठे परतीचं भाडं कोणास ठाऊक? जाऊद्या, काय बोलणार, गरजवंताला अक्कल नसते, हेच खरं.
सकाळी सात वाजता डोंबिवलीहून प्रस्थान केलेला मी, अशा रीतीने रात्री नऊ वाजता भावाच्या घरी पोहोचलो. जरा तोंडावर पाण्याचे सपकारे मारून, तेवढ्यापुरता फ्रेश का काय ते होऊन, मग जेवायला निघालो, सिंहगड रोडला.
हेही वाचा – मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!
उपास चालेल एकवेळ, पण आता प्रवास नको, असं झालं होतं, पण जाणं भाग होतं. वास्तूशांत होती आणि नवं घर, नवी सजावट बघणं, कौतुक करणं आवश्यकच होतं.
भावाची गाडी होती आता, त्यामुळे परत रिक्षेवाल्यांची मनधरणी करणं, ओला, उबरवर त्यांची वाट बघत बसणं आवश्यक नव्हतं.
छान जेवण झालं तिकडे. जरा वेळ बसलो, घर बघितलं, अभिनंदन केलं मनापासून आणि रात्री अकरा वाजता वारज्यात जाऊन, अंथरूणाला पाठ टेकली.
अशा रितीने एक अनोखा दिवस, टक्के टोणपे खात, नव्या अनुभवांना काखोटीला मारत, संपुष्टात आला. आता यापुढे पुणे मेट्रोने प्रवास करताना, श्रीमती ना. दा. ठाकरसी कायम लक्षात राहणार होत्या, नळ स्टॉप सोबतच!
असंच असतं आयुष्य. त्यातच आनंद शोधत जगायचं असतं माणसानं. कण्हत, कुथत जगण्यात काय हशील?


