दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 24 जून 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 03 आषाढ शके 1948; तिथि : दशमी 18:11; नक्षत्र : चित्रा 13:58;
- योग : परिघ 10:22 ; करण : वणिज अहोरात्र;
- सूर्य : मिथुन; चंद्र : तुळ ; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:18;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे
टीम अवांतर
रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म 24 जून 1892 रोजी नागपूर येथे झाला. मुंबई विद्यापीठातून ते बी. ए. आणि एम्. एस्सी. झाले. पुढे व्यवसायाने प्राध्यापक तसेच शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. रानडे यांच्या पत्नी मनोरमाबाई रानडे या देखील रविकिरण मंडळात होत्या. दोघांनीही आपली काव्यरचना 1912 च्या आसपास सुरू केली होती. मराठीतील पहिली विज्ञानकथा समजली जाणारी कथा त्यांनी 1915 साली लिहिली होती. पाश्चात्य साहित्यावरून प्रेरणा घेऊन त्यांनी लिखाण केले. मूलतः वनस्पती शास्त्रज्ञ असल्याने ढेकूण, डास, झुरळ असे विविध किटक त्यांच्या काव्याचे विषय बनले. त्यांच्यातील शास्त्रज्ञ हा त्यांच्यातील कवीवर मात करणारा होता, असे समीक्षकांचे मत होते.
हेही वाचा – असेच कानावर पडलेले संवाद…
कॉलऱ्याने आजारी असताना बालपणापासूनच्या अनेक आठवणी, स्वप्ने रानडे यांच्या डोळ्यांसमोरून गेली. आपण मरण पावलो असून देहातीत अवस्थेत गेल्याचे भासही त्यांना झाले. त्यांच्या या सर्व मनःस्थितीचे दर्शन त्यांच्या ‘काळाच्या दाढेतून’ या खंडकाव्यातून घडते. मृत्यूच्या दारात जाऊन परत आल्यासारखा अनुभव या आजारात त्यांनी घेतला होता. हे खंडकाव्य सुमारे 805 पंक्तींचे असून त्यातील 2 पंक्ती केशवसुतांच्या आहेत. हे खंडकाव्य 1915 साली प्रसिद्ध झाले.
त्यांच्या स्फुट कवितांची संख्या पाऊणशेच्या आसपास असून ती श्री -मनोरमा या संग्रहात अंतर्भूत आहे. त्यांच्या आणि मनोरमाबाईंच्या कवितांचा हा संग्रह असून त्यात मनोरमाबाईंच्या 92 कविताही समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मनोरमाबाईंच्या काव्यरचनेत आत्मलेखनपर कविता सर्वाधिक आहे.
श्रीधर बाळकृष्ण रानडे आणि मनोरमाबाई रानडे हे दाम्पत्य रविकिरण मंडळाच्या काव्यात्म जीवनाचे आधारस्तंभ होते. ‘माधुकरी’, ‘लेझिम’ या श्रीधर बाळकृष्ण रानडे यांच्या कविता लक्षणीय ठरल्या तरी त्यांनी पुढे मुख्यतः काव्यरसिकाचीच भूमिका घेतली. आपल्या पत्नीच्या वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी झालेल्या अकाली निधनानंतर श्रीधर रानडेंनी काव्यलेखन सोडले. मात्र पुढे वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी ‘मृत्यूच्या दाढेतून’ ही गाजलेली कविता लिहिली.
महाराष्ट्र रसवंती (भाग 1 ते 3) या अर्वाचीन कवितांच्या संग्रहांचे तसेच मराठी गद्यवैभव (भाग 1 ते 3) या पुस्तकांचे संपादन त्यांनी गं. दे. खानोलकर यांच्यासह केले. मराठी साहित्याचा वाचकांना परिचय व्हावा या हेतूने त्यांनी नवयुग वाचनमाला (पुस्तक पाचवे, सहावे, सातवे भाग अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा) संपादित केली. दिवाळीची डाली (प्रहसन), कुंपणावरून (छायानाट्य) असे नाट्यलेखनही त्यांनी केले आहे. तिंबूनानांचा रेडिओ या त्यांच्या पुस्तकात रेडिओवरील गोष्टी-गाणी यांसारख्या मनोरंजक कार्यक्रमाचे लेखन समाविष्ट आहे. 21 मार्च 1984 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – यशाचा मार्ग नेहमीच सोपा नसतो. जबाबदाऱ्यांचे ओझं आज जरा जास्तच प्रचंड वाटेल. विरोधकही तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. मात्र तुमची मेहनत आणि दूरदृष्टी प्रत्येक आव्हानाला संधीत बदलू शकते. जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. वेळेवर लक्ष दिल्यास मोठे आजार टाळता येतील.
वृषभ – घरात आनंदाचे वातावरण असेल. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. भूतकाळातील एखादी चूक एक महत्त्वाचा धडा शिकवेल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा दृढनिश्चय करावा लागेल. वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगा. जीवनशैलीतील सकारात्मक बदलांमुळे आत्मविश्वास वाढेल.
मिथुन – आज सभोवताली सकारात्मक ऊर्जा असेल. वरिष्ठांकडून मोठा पाठिंबा मिळेल. ज्यांना करिअरमध्ये बदल हवा आहे, त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. कामात व्यस्तता असेल, पण कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्याने मनःशांती मिळेल. विद्यार्थ्यांनाही आजचा दिवस चांगला जाईल.
कर्क – आज तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल. लोक तुमच्या कल्पना आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. सरकारी योजना गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतात, परंतु कोणत्याही नवीन भागीदारीत प्रवेश करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. घाई टाळा, कारण आज घेतलेला एक चुकीचा निर्णय दीर्घकाळ परिणाम करू शकतो.
सिंह – जीवनात संतुलन कसे साधावे हे आजचा दिवस शिकवेल. कुटुंबीयांसोबत हास्य आणि आनंदाचे क्षण अनुभवाल. एखादा रखडलेला सामाजिक किंवा राजकीय प्रश्न सुटू शकतो. एखाद्या शुभ प्रसंगाला उपस्थित राहिल्याने यजमानांना आनंद होईल. खर्च वाढू शकतो, पण तो तुमच्या इच्छा आणि आनंदाशी संबंधित असेल, त्यामुळे समाधानही मिळेल.
कन्या – नशीबाची मोठी साथ तुम्हाला असेल. दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. दिलेली वचने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रगतीतील अडथळे हळूहळू दूर होतील. संतती शिक्षण किंवा करिअरमध्ये महत्त्वपूर्ण पाऊले उचलू शकतात.
तुळ – आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करू शकतात. नवीन लोकांशी ओळख होणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. सासरच्या मंडळींकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात लग्न किंवा इतर शुभ प्रसंगांबद्दलच्या चर्चांमुळे घरात आनंदाचे वातावरण असेल.
वृश्चिक – स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे आज महत्त्वाचे ठरेल. बऱ्याच काळापासून सतावणारी एखादी समस्या असेल, तर त्यावर हळूहळू उपाय सापडेल. आत्मपरीक्षण तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. मनोरंजनात सहभागी होऊन किंवा एखाद्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून तुम्ही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. किरकोळ वाद होऊ शकतात, मात्र नातेसंबंध अधिक दृढ होतील.
हेही वाचा – दहावी नापास
धनु – आर्थिक बाबतीत विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जोखमीचे निर्णय टाळणे शहाणपणाचे ठरेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या महत्त्वाच्या चर्चांमुळे भविष्यासाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती भविष्यात महत्त्वपूर्ण लाभ मिळवून देऊ शकते. रखडलेल्या योजनांना गती मिळेल.
मकर – आज कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन राखले जाईल. विद्यार्थ्यांनी पूर्ण एकाग्रता राखल्यास हा त्यांच्यासाठी यशाचा काळ आहे. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. परदेशात शिक्षण किंवा करिअर करण्याची योजना आखणाऱ्या जातकांना चांगली बातमी मिळू शकते.
कुंभ – खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. दिखावा करण्यासाठी खर्च करू नका. संततीच्या भविष्यासंबंधी एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सासरच्या मंडळींकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत नवीन वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा दाखवा.
मीन – आजचा दिवस शुभ बातम्या आणि सकारात्मक संधींनी भरलेला असेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सलोखा टिकून राहील. कायदेशीर बाबतीत यश मिळण्याचे संकेत आहेत. नवीन काम मिळ्याल्याने उत्साह वाढेल. आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण करण्यात आई-वडील आणि भावंडांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरेल.


