दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 25 जुलै 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 03 श्रावण शके 1948; तिथि : एकादशी 11:33; नक्षत्र : ज्येष्ठा अहोरात्र ;
- योग : ब्रह्मा 21:07; करण : बव 24:45;
- सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:17;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
देवशयनी आषाढी एकादशी
पंढरपूर यात्रा
चातुर्मास्यारंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी
टीम अवांतर
एकोणिसाव्या शतकातील सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म 9 एप्रिल 1834 रोजी सातारा येथे झाला. सार्वजनिक काका या नावाने ते नंतर ओळखले जाऊ लागले. त्यांचे इंग्रजी सातवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथे झाले.
नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले आणि तिथल्या न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले. मात्र अंतर्गत मतभेदांमुळे त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. पुढे त्यांनी वकिलीची परीक्षा दिली आणि पुण्यातच ते वकिली करू लागले. वकिलीच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी सार्वजनिक कामात रस घेतला. अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळविला. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना. अशा वेळी त्यांनी फडके यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस दाखविले होते.
हेही वाचा – दर्शन विठ्ठलाचे
सार्वजनिक काकांच्या समाजसेवेत सार्वजनिक सभेचा त्यांनी वाहिलेला कार्यभार आणि सभेचे स्थान महत्त्वाचे आहे. बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात ‘सार्वजनिक सभे’ची स्थापना करण्यात आली. ही सनदशीर मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संस्था होती. तिचे मुख्य सूत्रधार आणि पहिले चिटणीस गणेश जोशी होते.
लवकरच या संस्थेला सामाजिक आणि राजकीय असे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. पुढे न्यायमूर्ती रानडे यांच्या सहभागामुळे राष्ट्रीय पातळीवर तिचे नाव झाले. जोशी आणि रानडे यांनी मिळून आर्थिक, औद्योगिक आणि राजकीय स्वरुपांची अनेक कामे हातात घेतली, जनतेला जागृत आणि संघटित करण्याचे मौलिक काम केले. शिवाय जनतेची गाऱ्हाणी तसेच अडचणी सरकारदरबारी मांडण्याचे प्रयत्न या संस्थेमार्फत सार्वजनिक काकांनी केले.
सार्वजनिक काकांनी 1872 मध्ये स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला. याच वर्षी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली आणि ती आयुष्यभर पाळली. खादीचा वापर आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले देशभक्त होते. याशिवाय देशी व्यापारोत्तेजक मंडळ’ या संस्थेची स्थापना करून शाई, साबण, मेणबत्त्या, छत्र्या यांसारख्या स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यासाठी स्वतः आर्थिक झीज सोसली. त्या मालाच्या विक्रीसाठी सहकारी तत्त्वावर पुणे, सातारा, नागपूर, मुंबई, सुरत आदी ठिकाणी दुकाने काढण्यास लोकांना प्रोत्साहित केले. स्वदेशी वस्तूंची प्रदर्शने भरविली, व्याख्याने दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आग्रा येथे ‘कॉटन मिल्स’ सुरू करण्यात आली.
1876-77 मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळात त्यांनी दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या. स्वस्त धान्याची दुकाने उघडली. सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठे साहाय्य केले. तसेच सरकारने ‘पब्लिक वर्क्स’ खात्यामार्फत दुष्काळग्रस्तांसाठी कामे सुरू करावीत म्हणून त्यांनी लढा दिला. ब्रिटिशांच्या वेळखाऊ व खर्चिक न्यायालयांना पर्याय म्हणून त्यांनी स्वदेशी लवाद न्यायालयाची कल्पना मांडली आणि त्यांच्या प्रयत्नानेच पुणे येथे त्या सुमारास लवाद न्यायालयाची स्थापना झाली.
व्हाइसरॉय लॉर्ड लिटन याच्या मुद्रणस्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कायद्यालाही जोशी यांनी कडाडून विरोध केला. या कृतीचा निषेध करण्यासाठी इंदुप्रकाशचे संपादक जनार्दन सुंदरजी कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रकारांचे एक संमेलन 1878 रोजी मुंबई येथे भरविले. शिवाय कलकत्ता येथील त्याच वर्षीच्या अशाच प्रकारच्या अन्य संमेलनांस ते आवर्जून उपस्थित राहिले.
सार्वजनिक सभेच्या कार्याला त्यांनी स्थापनेपासून अखेरपर्यंत वाहून घेतले होते. त्यामुळे सार्वजनिक सभा म्हणजे गणेश वासुदेव असे समीकरण झाले होते. त्यांच्या या समर्पित जीवनामुळे त्यांना सार्वजनिक काका हे नामाभिधान प्राप्त झाले. 25 जुलै 1880 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – कामाचा भार आज निश्चितपणे वाढेल, परंतु तुम्ही मेहनतही तेवढीच कराल. नोकरीत बदल इच्छिणाऱ्या जातकांना सकारात्मक परिणाम मिळेल. मालमत्तेसंबंधीचे निर्णयदेखील तुमच्या बाजूने लागू शकतात. एखाद्या सहकाऱ्याच्या बोलण्याने तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणेच तुम्हाला योग्य वाटेल.
वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी दिलासा आणि आनंद घेऊन येणारा असेल. खर्च नियंत्रणात ठेवल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. तुमची मेहनत आणि कार्यपद्धती तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करेल. नवीन लोकांना भेटल्याने तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. जोडीदारासोबतचा सध्याचा तणावही आज निवळू शकेल.
मिथुन – नशीबाची तुम्हाला आज मोठी साथ मिळणार आहे. तुमच्या सामाजिक कार्यामुळे तुमची ओळख वाढेल आणि तुम्हाला महत्त्वाच्या लोकांना भेटण्याची संधीही मिळू शकते. तुमच्या आजूबाजूचे काही लोक तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून सावध रहा. घरातल्या अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.
कर्क – तुमच्या बुद्धिमत्तेमुळे प्रत्येक कार्य आज सोपे होईल. तुमची दूरदृष्टी तुम्हाला व्यवसायात पुढे नेईल आणि नवीन उपक्रम सुरू करण्याचे धैर्य तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांसाठी कठोर परिश्रम हे यशाची गुरुकिल्ली असेल. संततीकडून आलेली आनंदाची बातमी तुमचा दिवस उजळवून टाकेल.
सिंह – आत्मविश्वासात आज वाढ होईल. तुमच्या व्यावसायिक योजना, विशेषतः व्यवसायात, तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकतात. तुमच्या कामाचा भार आज वाढेल. तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सुधारणा करण्याची गरज वाटेल. काम पुढे ढकलण्याच्या सवयीमुळे तुम्हाला फटका बसू शकतो, म्हणून सावध रहा.
कन्या – गुंतवणुकीचे आज घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. कामाच्या निमित्ताने प्रवासही करावा लागू शकतो, जो दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे नाही. भावंडांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. रखडलेला एखादा व्यवहार अखेर पूर्ण होऊ शकतो. एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी सहकाऱ्यांची मदत घेतील.
तुळ – आर्थिक परिस्थितीत आज सुधारणा होईल. नवीन व्यावसायिक भागीदारीच्या संधी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवीन मार्ग खुले होतील. एखादी आनंदाची बातमी मनाला आनंदित करेल. उसने दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीतील बढतीची बातमी देखील तुम्हाला उत्साहित करू शकते.
वृश्चिक – आजचा दिवस यश आणि समाधानाने भरलेला असेल. तुम्ही प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जाल. आज संपत्तीत आणि समृद्धीत वाढ होईल. तुम्ही इतरांना दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. तुमच्या प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देणे कमी करावे.
हेही वाचा – चातुर्मास आमचा-तुमचा… आपल्या सर्वांचा
धनु – आज कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. व्यवसायातही तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाप्रतीची तुमची निष्ठा तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. कोणाच्यातरी शब्दांमुळे तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याकडे दुर्लक्ष करणे उत्तम.
मकर – आज, तुम्ही घेणार असलेल्या प्रत्येक निर्णयाचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. अति घाई केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. व्यवसायात बदल करणे टाळा, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. कठीण परिस्थितीत संयम हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. मदत मागितल्याने निश्चितच आधार मिळेल, परंतु काही कामे बिघडू शकतात, म्हणून सावध रहा.
कुंभ – आजचा दिवस सामान्य असेल. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नशीब तुम्हाला साथ देईल, पण आळसामुळे कामे रखडण्याची शक्यता आहे. स्वतःच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. उधार दिलेले काही पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमची एखाद्या जुन्या मित्राशी किंवा मैत्रिणीची भेट होईल, पण त्याच्या उणिवांवर लक्ष केंद्रित करणे टाळा.
मीन – आज तुम्हाला जुन्या शारीरिक समस्यांपासून दिलासा मिळेल. एखादा विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो, मात्र तुम्ही त्यावर मात कराल. काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा तुम्हाला भारून टाकेल. आज अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, जिथे तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागेल, म्हणून तयार रहा. सरकारी कामे वेळेवर पूर्ण करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.


