“विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते,” ती सुनबाईला म्हणाली.
“आज कशाला जाता? एकादशीची फार गर्दी असेल.”
“अगं, पंढरपूरला जायचं नशिबात नाही. इथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते. देऊळ जवळ तर आहे…”
सासूबाईंचं म्हणणं ऐकून ती म्हणाली, “बरं, या जाऊन.”
“आजे मी येणार…”
बारका नातू मागे लागला.
“अरे, तुला कुठे गर्दीत सांभाळू?”
तस नातवानं भोकांडच पसरलं…
“मला पण विठ्ठलाला यायचंय…”
तशी सुनबाई म्हणाली, “एवढं रडतंय तर न्या की… हे घ्या अकरा रुपये, ठेवा देवाला. या दोघं दर्शन करून…”
पोरगं खूश झालं… खिदळायला लागलं…
देवळात ही गर्दी होती! लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोरगं आनंदात होतं… नाचत होतं…. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तसं पोरग थोड्या वेळानंतर कंटाळलं…
“आजे कधी दिसणार तुझा विठ्ठल?”
“थोड्या वेळानं दिसेल हं… आता जवळ आलो आपण. लगेच दर्शन होईल…”
तिने नातवाची समजूत काढली. जरा वेळानं पोरगं म्हणालं, “आजे गोष्ट सांग ना…”
हेही वाचा – संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!
“अरे इथे कुठे? घरी गेल्यावर सांगते.”
“इथचं सांग.”
तिच्या लक्षात आलं, पोराला काहीतरी सांगून नादी लावायला हवं… म्हणून तिने जनीची गोष्ट सांगायला सुरुवात केली…
जनी दळण दळायला बसते. एकटीनं दळताना तिला थकायला होते… मग ती विठूरायाला म्हणते, ‘अरे, एवढं काम करून मी दमून गेले आहे… ये की रे माझ्या मदतीला…’ आणि खरोखरच प्रत्यक्ष विठूराया येऊन तिला दळायला मदत करतो… दोघं मिळून काम करतात.
ती छोटी गोष्ट तिने सांगितली…
“आजे, विठ्ठल तुझ्या घरी आला होता का? तुला दिसला का कधी तुझा विठ्ठल?”
“माझं कुठलं बाबा एवढं भाग्य! मला कुठला दिसायला…” ती म्हणाली.
“असं कसं झालं…. विठ्ठल तुला कधीच कसा दिसला नाही?”
त्याच्या निरागस प्रश्नाला काय उत्तर द्यावं तिला कळेना… ‘तेवढी पुण्यवान नाही रे मी…’ असं ती मनाशीच म्हणाली.
इतक्यात गोळ्या विकणारा मुलगा तिथे आला. नातू लगेच म्हणाला, “आजे मला गोळ्या घे की…”
“गप रे… पैसे नाहीत…”
“ए आजे, घे की…”
पोरग ऐकेच ना… देवाचे पैसे, अकरा रुपये तेवढे होते. दुसरे आणलेच नव्हते… पण पोरगं आलंय खरं आणि बराच वेळ झालाय कंटाळलय… जाऊ दे, लहान लेकरू आहे… दर्शन मिळायला अजून अवकाश आहे… हा विचार करून तिने दहा रुपयांचं गोळ्यांच पाकीट घेतलं. पोरगं जरा रमलं… पुढच्या दोन बारक्या पोरींनाही त्यांनी गोळ्या दिल्या… तशा त्या पोरीही खूश झाल्या.
“आजे तुला घे की गोळ्या…”
“नको रे राजा, खा तू…”
आजीचं लक्ष विठ्ठलाकडे…
बऱ्याच वेळाने नंबर जवळ आला. तसं आजीने पोराला कडेवर घेतलं.
“हा घे रुपया जवळ गेलं की, त्या पेटीत टाक… आज दुसरं काहीच आणलं नाही देवा… परत येईन तेव्हा आणीन रे…” हात जोडून तिने विनवणी केली.
समोर विठ्ठलाला पाहिलं… आज इथे का होईना, त्याचं दर्शन झालं… ते सावळं रूप समोर दिसलं… पिवळा पितांबर, भरजरीचा लाल शेला, गळ्यात तुळशीचे-फुलांचे हार, कपाळाला बुक्का भक्तीभावाने आजीने दर्शन घेतलं. आपल्याबरोबर नातवाचंही डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवलं…
पोरगं हसलं….
पुजाऱ्यानं पोराच्या कपाळाला बुक्का लावला… विठ्ठलाचा हार पोराच्या गळ्यात घातला…
पोरगं हरखूनच गेलं…
आजी बघायला लागली… गर्दीतून बाहेर आली. नातू गळ्यातला हार काढू देईना…
“मी नाही काढणार,” म्हणत पळायला लागला… तशीच घरी आली. आता पोरगं जाम खूश होतं. नाचत होतं. दारातच सुनबाई उभी होती, म्हणाली,
“झालं का दर्शन? आणि याच्या गळ्यात हार कोणी घातला?”
“अगं, दर्शन झालं आणि लगेच पुजाऱ्याने याच्या गळ्यात हार कधी घातला मलाही कळलं नाही!”
“बसा पाणी देते. पोरानं त्रास नाही ना दिला…”
तसं पोरगं आईवर रागवलं. कमरेवर हात ठेवून आईकडे बघायला लागलं…
“बघा सासूबाई ध्यान कसं दिसतंय…”
आईने असं म्हटल्यावर पोरगं हसायला लागलं…
आजी बघायला लागली…
कमरेवर हात, कपाळाला बुक्का आणि गळ्यात तुळशीचा हार घातलेला नातू तिच्याकडे बघून गोड हसत होता…
हेही वाचा – वारी पंढरीची… जीवनाचे तत्वज्ञान शिकवते!
काय झालं कळलंच नाही… पण नातवाचा चेहरा तिला आत्ता या क्षणी वेगळाच दिसायला लागला… तिचे डोळे भरून आले… क्षणभर काही समजेच ना… नातवाच्या जागी विठ्ठल ऊभा आहे, असा भास तिला झाला… साक्षात्कार झाल्यासारखंच झालं…
नातू हसत होता…
ती निरखून बघायला लागली… नातवाने मगाशी विचारलेलं… “आजे तुला दिसला का गं, तुझा विठ्ठल?” हे तिला आठवलं… तिच्या मनात आनंदाची एक लहर उठली होती…
हसत हसत… नातू एकदम धूम पळाला… सुनबाई खिचडी करायला आत गेली…
आतून तिला लख्खपणे काहीतरी जाणवलं… भरल्या गळ्यानं आजी म्हणाली, “इतका वेळ जवळ होतास का… आम्हाला अजूनही समजायला उशीर होतोय! धन्य आहे रे बाबा तुझी… जनाबाईची दळणं तू दळायला गेलाच असशील… पटलं बाबा मला आज!”
एकादशीला पंढरपूरला जायला मिळालं नाही, याचं दुःख कुठल्या कुठे पळालं… विठ्ठलाने नातवाच्या रूपात स्वतः येऊन क्षणभर का होईना… आपल्याला दर्शन दिलं असंच मनोमन तिला वाटलं.
त्याला कशा रूपात बघायचं, हेही तिला आज नीट उमगलं…
आपल्याही आसपास असेलचं विठ्ठल… जरा नीट बघू आपण… प्रयत्न केला की हळूहळू येईल ती दृष्टी… आपल्यालाही दिसेल मग कुठल्या न कुठल्या रूपात… आपला विठूराया…


