दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 23 सप्टेंबर 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 01 आश्विन शके 1948; तिथि : व्दादशी 22:49; नक्षत्र : श्रवण 09:08;
- योग : सुकर्मा 16:25; करण : बव 10:21;
- सूर्य : कन्या; चंद्र : मकर 21:56; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:36;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वामन जयंती
विषुवदिन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
समाजसेवक डॉ. अभय बंग
टीम अवांतर
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा जन्म 23 सप्टेंबर 1950 रोजी वर्धा येथे झाला. त्यांचे वडील गांधीजींच्या प्रेरणेने खेड्यांमध्ये कार्यरत होते. त्यामुळे अभय यांचे शिक्षण वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात नयी तालीम पद्धतीने झाले. त्यामुळे त्यांच्या विचारांवर महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाचा मोठा पगडा आहे.
पुढे त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पदवी तीन सुवर्णपदकांसह मिळवली. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पी.जी.आय.) येथे काम केले. सार्वजनिक आरोग्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, अमेरिका येथून 1984 मध्ये मास्टर्स इन पब्लिक हेल्थ (एम.पी.एच.) पदवी 99 टक्के गुणांसह प्रथम क्रमांकाने मिळवली. तिथं कार्ल टेलर यांच्याकडून त्यांनी सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले.
हेही वाचा – टिपिकल
1984 साली ते भारतात परतले तेव्हा आरोग्याच्या सर्वाधिक समस्या या खेड्यांमध्ये आहेत, याची बंग यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी खेड्यांमध्ये काम करण्याचा निर्धार केला आणि त्याला त्यांच्या डॉक्टर पत्नीचीही साथ मिळाली. त्याच निर्धारातून 1986 साली ‘सर्च’ अर्थात ‘सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँण्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’ या सेवाभावी संस्थेचा जन्म झाला आणि त्या संस्थेने आदिवासी बांधवांच्या आयुष्याला नवसंजीवनी दिली. गडचिरोलीपासून 17 किलोमीटर अंतरावर ‘शोधग्राम’ आकारास आलं. आदिवासींच्या लोकभावनेचा आदर करत त्यांच्याच आग्रहावरून रुग्णालयाचं ‘माँ दंतेश्वरी दवाखाना’ असं नामकरण करण्यात आलं आणि तेथून त्यांच्या वैद्यकीय सेवेचा प्रारंभ झाला.
आरोग्याच्या प्रश्नांवर काम करताना स्थानिक महिलांना सामान्य आजारासोबतच स्त्रीरोगाच्या मोठ्या समस्या असल्याचे बंग यांना जाणवले. त्यामुळे बंग दाम्पत्याने ‘वसा’ आणि ‘अमिर्झा’ या दोन गावात संशोधन केलं. त्यात आढळलं की, 92 टक्के महिलांना स्त्रीरोगाची समस्या आहे. हेच संशोधन 1989 साली ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले.
विकसनशील देशांतील स्त्रियांच्या आरोग्याविषयीचं हे या दशकातील महत्वाचं संशोधन आहे, अशा शब्दात अमेरिकेतील तज्ज्ञांनी त्याचा गौरव केला. स्त्री आरोग्याच्या समस्यांना या संशोधनामुळे पुरावा मिळाला. त्यामुळेच 1994 साली कैरोमध्ये जागतिक लोकसंख्या नीती बदलून ‘महिलांचे प्रजोत्पादनातील आरोग्य’ यावर भर देणारी नवी नीती तयार करण्यात आली.
पुढे बंग दाम्पत्याने बालमृत्युवरही काम सुरू केलं. सुरुवातीला अर्भक मृत्युदर 121 टक्क्यांपेक्षा जास्त होता. त्यातील 40 टक्के बालकांचे मृत्यू हे केवळ न्यूमोनिया या आजारानं होतात, असं त्यांना आढळलं. त्यामुळे गावातच एक आरोग्यदूत तयार करायचा आणि त्याला न्युमोनियाचं निदान करायला शिकवायचं हा प्रयोग करण्यात आला.
गावातील एका व्यक्तीला आरोग्यदूत म्हणून प्रशिक्षित करून उपचार करायला शिकवल्याने 1988 ते 1990 या दोन वर्षांत न्युमोनियामुळे होणारे मृत्यू 74 टक्क्यांनी, तर अर्भक मृत्यूदर 25 टक्क्यांनी कमी झाला. हे अध्ययनही ‘लॅन्सेट’मध्ये 1990 मध्ये प्रसिद्ध झाले. जागतिक आरोग्य संघटना आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने हे या विषयावरचं सर्वोत्कृष्ट अध्ययन असल्याचं घोषित केले. तसेच 1991 मध्ये वॉशिंग्टनमध्ये श्वसन रोग आणि न्युमोमिया नियंत्रणाविषयी भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्चनं राबवलेला उपक्रम पथदर्शी ठरवला गेला. आजही भारतासह 77 देशांमध्ये ही पद्धत वापरली जाते.
याशिवाय 1988 पासून व्यसन मुक्ती चळवळ त्यांनी उभारली. याच प्रयत्नातून 1993 साली गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी आणि सोबतच तंबाखुमुक्ती साध्य करण्यासाठी ‘सर्च’द्वारे आखलेला ‘मुक्तिपथ’ हा उपक्रम देखील फारच प्रभावी ठरला.
वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातल्या विविध अनुभवांवर डॉ.अभय बंग यांची ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ आणि ‘सेवाग्राम ते शोधग्राम’ अशी पुस्तके लिहिली आहेत. कुपोषणामुळे होणार्या बालमृत्यूचे वास्तव किती प्रखर, भीषण आहे, हे पटवून देण्यासाठी त्यांनी ‘कोवळी पानगळ’ हा अहवाल प्रसिध्द केला, ज्याची दखल बीबीसी सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने सुध्दा घेतली.
डॉ.बंग यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, अमेरिकेच्या टाईम मॅगझिनचा ‘ग्लोबल हेल्थ हिरोज’, जागतिक आरोग्य संघटनेचा ‘पब्लिक हेल्थ चॅम्पियन्स’, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचा ‘सोसायटी ऑफ स्कॉलर’, मॅकऑर्थर फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीचा ‘बा आणि बापू’ पुरस्कार तसेच मानद डी.एससी व डी.लिट या पदव्यांनीही सन्मानित करण्यात आलं आहे.
याशिवाय डॉ.अभय बंग हे भारत सरकारच्या ‘आदिवासींचे आरोग्य’ यावरील तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या संतुलित विकास अर्थात डॉ.केळकर समितीचे सदस्य, बालमृत्यू व कुपोषण विषयक समितीचे अध्यक्ष तसेच अमेरिकेतील राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या वैद्यकीय समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
आजचे राशिभविष्य
मेष – कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळू शकते. दीर्घकाळापासून चालत आलेल्या आजारातून, कर्जातून किंवा शत्रूंशी संबंधित समस्यांमधून मुक्ती मिळेल. फक्त त्यासाठी सकारात्मक राहा. कुटुंबात एखाद्या शुभ घटनेमुळे आनंदाचे वातावरण असेल. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहील. नफ्याचे प्रमाण सरासरी इतके असेल.
वृषभ – आजचा दिवस कामाच्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने सकारात्मक ठरू शकतो. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या पाठिंब्याने तुम्ही एक महत्त्वाचे काम पूर्ण करू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. व्यवसायात एखादा महत्त्वाचा करार मिळेल ज्यामुळे इतरांचा तुमच्याबद्दल दृष्टीकोन बदलेल.
मिथुन – उपजीविकेच्या साधनांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. बऱ्याच काळापासून उधार दिलेली रक्कम अचानकपणे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल. कपडे, दागिने किंवा इतर एखादी मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सक्रिय असाल. व्यावसायिकांनी भागीदारीच्या संदर्भात विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
कर्क – आज धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात असे कार्य करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. एखादी महत्त्वाची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. नोकरदार जातकांसाठी करिअरमध्ये बदल शक्य आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मात्र त्या पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळणे देखील आवश्यक असेल. व्यावसायिकांना आज बाजारात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
सिंह – राग, आवेश आणि अधीरता या भावना आज वाढू शकतात, म्हणून बोलण्यावर नियंत्रण ठेवा. एखाद्या लहानशा गोष्टीमुळे वाद निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम बाळगा. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा, कारण दुखापत होण्याचा धोका असतो. व्यावसायिकांनी हितशत्रूंपासून लांब राहणेच योग्य ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची शिस्त पाळणे आवश्यक आहे.
कन्या – नोकरदार जातकांची बदली होणे किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. आर्थिक लाभाचेही संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि जबाबदारीचे कौतुक होऊ शकते. कुटुंबात शांततापूर्ण आणि आनंदी वातावरण राहील. जुन्या ओळखीच्या व्यक्तीसोबत एखादा उपयुक्त व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार केला जाईल.
तुळ – मुलाचे लग्न किंवा इतर शुभ प्रसंग यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होईल. व्यावसायिकांना कुटुंब आणि मित्रांकडून मोठा पाठिंबा मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे, तसेच नवीन संधी निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखणे महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल कौतुकाची थाप मिळेल.
वृश्चिक – संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाच्या परिस्थितीत सुधारणेची चिन्हे दिसत आहेत, त्यातून समाधानकारक आर्थिक लाभ होऊ शकतो. पूर्वीच्या व्यावसायिक प्रयत्नांचे आज सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नोकरदार व्यक्तींनाही कामाच्या ठिकाणी काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र आज स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा दाखवू नका. पोटाशी निगडीत आजारांचा त्रास होऊ शकतो.
हेही वाचा – जीएसबी गणपतीची भव्यता अन्…
धनु – एखादे इच्छित कार्य आज यशस्वी होऊ शकते. संतती शी निगडीत महत्त्वाची बातमी आनंद घेऊन येईल. तुमच्या विरोधकांवर विजय मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या जुन्या प्रयत्नांचे परिणाम अनुकूल असू शकतात. आपल्या अवतीभोवती असलेल्यांपैकी आपले कोण आणि हितशत्रू कोण हे ओळखून त्यानुसार तुमचे वर्तन ठेवा.
मकर – आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. आजारपण, कर्ज आणि शत्रूंशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आज संधी मिळेल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित परिस्थिती हळूहळू अनुकूल होऊ शकते.
कुंभ – शारीरिक आरोग्याच्या समस्या आणि मानसिक तणाव दोन्हींचा आज त्रास जाणवू शकतो. जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांच्या तऱ्हेवाईक वागण्याने तुम्हाला भावनिक मनस्ताप होऊ शकतो. अशा वेळी संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कठोर परिश्रम आणि प्रयत्नांमुळे आवश्यक कामे पूर्ण करण्यात यश मिळेल.
मीन – आरोग्य आणि मानसिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रदीर्घ काळापासून वाट बघत असलेला निधी आज अचानक मिळेल. यामुळे आर्थिक दिलासा मिळू शकतो. वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरी किंवा व्यवसायाबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरी मिळण्याची शक्यता आहे.


