दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 19 एप्रिल 2026; वार : रविवार
भारतीय सौर : 29 चैत्र शके 1948; तिथि : द्वितीया 10:49; नक्षत्र : भरणी 07:09, कृत्तिका 28:35;
योग : आयुष्मान 20:02; करण : तैतिल 21:08;
सूर्य : मेष; चंद्र : मेष 12:31; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 18:56;
पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
अक्षय्य तृतीया
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक
टीम अवांतर
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक यांचा जन्म 19 एप्रिल 1892 रोजी मुंबईत झाला. ताराबाई या चाकणच्या (जि. पुणे) केळकर घराण्यातील होत्या. महाविद्यालयीन शिक्षणकाळात मुंबई येथे ताराबाईंची कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी ओळख होऊन पुढे त्यांचा नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह झाला (१९९५). त्यास दोन्ही घरच्या लोकांचा विरोध होता. कृष्णा मोडक अमरावती येथे वकिली करीत. त्यांना एक मुलगी होती. पुढे ताराबाईचे भावनगर, राजकोट, अमरावती, विकासवाडी इत्यादी ठिकाणी स्थलांतर झालेले आढळते.
सुमारे 1921 मध्ये गिजुभाई बधेका यांच्या सहाय्याने भावनगर येथे माँटेसरीच्या तत्वांवर आधारलेली ‘गीता शिक्षण पद्धती’ त्यांनी निश्चित केली. हाच ताराबाईंच्या बालशिक्षण कार्याचा प्रारंभ होय. 1936 साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. पुढे बालशिक्षणाचे हे लोण महाराष्ट्रात पसरले. मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी शिशूविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले (1936-48). या संस्थेने पुढे पूर्वप्राथमिक अध्यापन मंदिर सुरू केले, यातून मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांच्या हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले.
हेही वाचा – पाऊस असा रुणझुणता…
गिजुभाईंच्या मृत्यूनंतर पुढील 12 वर्षे नूतन बालशिक्षणसंघाची धुरा ताराबाईंनी वाहिली. ग्रामीण भागात बालशिक्षणाचा प्रसार करणे हे या संघाचे काम होय. ताराबाईंनी नंतर बोर्डी येथे ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापन केले. या संस्थेतूनच ग्रामीण बालवाडी आणि ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या. आदिवासी मुलांसाठी कुरणशाळा, रात्रीची शाळा, व्यवसाय शिक्षण हे पूरक प्रकार प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आले. त्यांना राज्य सरकारची मान्यता लाभली आहे.
ताराबाई ग्राम बालशिक्षण संघाच्या चिटणीस होत्या. यादरम्यान त्यांनी शिक्षण पत्रिका मासिक (मराठी, गुजराती, हिंदी) संपादन केले. महाराष्ट्र विधानसभेच्या त्या सभासदही होत्या. आदिवासी मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी ताराबाईंनी आपले आयुष्य वेचले. गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे 105 पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यात बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादींचा अंतर्भाव आहे. 1952मध्ये त्यांना शासनाने पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले. 31 ऑगस्ट 1973 मुंबई येथे त्यांचे निधन झाले.


