भाग – 10
अचानक आकाशात वीज काडाडली आणि जुईली भानावर आली. घाबरलीच ती… थरथरली… पाऊस अचानक धो धो बरसू लागला… गडबडून बावरून गेलेल्या जुईलीला काहीच सुचले नाही. त्याने तिच्याकडे धावत जाऊन तिच्या हातातली छत्री घेतली आणि उघडली. आधी तिला जवळ ओढून छत्रीत घेतलं. तिच्या खांद्यावरचा हात तसाच ठेऊन तिचा खांदा दाबत तिला भानावर आणत तो म्हणाला, “ओय वेडू, मी आलोय!”
“अरे, काय हे!!”
एवढंच काय ते ती बोलू शकली आणि… वरचा पाऊस आणि डोळ्यातला पाऊस यांची चुरस सुरू झाली.
“अरे वेडू, काय असं हे! चल आधी गाडीत बसुयात की, इथेच भिजत राहायचंय?”
त्याने तिला गाडीपाशी आणलं. ड्राइव्हरच्या बाजूच्या सीटचं दार उघडून त्याने तिला भिजू न देता अलगद आत बसवलं. आपण छत्री घेऊन ड्राइव्हर सीटचं दार उघडून त्याने छत्री बंद करून घेतली आणि आत ड्रायव्हर सीटवर बसून त्याने दार बंद केलं. मागच्या बकेटमध्ये भिजलेली छत्री ठेऊन त्याने गाडीचं स्टार्ट बटण दाबलं. एसी लावून फॅन मंद केला. जुईलीचे डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते.
“ए वेडाबाई, आलो ना मी आता… शांत हो बघू.” तिला जवळ ओढत त्याने तिचे डोळे पुसले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत डोळे मिटून घेऊन त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं… काही वेळ दोघेही असेच शांत राहिले. त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला काही वेळ त्याने शांततेत राहू दिलं आणि त्याने बोलायला सुरुवात केली,
हेही वाचा – प्रियकराकडून चौकशी… पण कोरडीच!
“काय मग मॅडम, कसं वाटलं सरप्राइज? क्यों? सिर घुमा दिया ना!!!”
“अरे काय हे श्री… मला जरा सुद्धा वाटलं नाही, तू येशील असं. काय बोलू मला समजतच नाहीये अजून. अतिशय म्हणजे अतिशय वाईट्ट आहेस! काय बोलू मी रे तुला!!”
“काही, काह्ही बोलू नकोस वेडू! रहा अशीच. खांद्यावर डोकं ठेऊन…”
तिला अजून जवळ ओढून तो गुणगुणायला लागला…
“जीवनात ही घडी अशीच राहू दे…”
“हं, काय रे असा…”
“ए गप गं… गाणं काय तुझ्या सलीलनेच गायचं? गपं! चोम्बडी कुठली!”
“हहह वेडू…! गा गा…”
“हं… जीवनात ही घडी अशीच राहू दे… प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे… माझ्या प्रीतीच्या फुला… कशी आहेस? माझी आठवण आली का तुला? आणि आलीच चुकूनमाकून माझी आठवण तर किती आली?”
“गप्प रे! आठवण काय विचारतोयस… हे विचार तुझ्याशिवाय कशी जगतेय मी. काय रे असा. काय रे वागतोस तू अगदी दगडासारखा! मेसेज केला तर रिप्लाय नाही, फोन केला तर तो उचलायचा नाही… मी काय इकडे वाटच बघत बसायची तुझी? दिवसदिवसभर आणि रात्रभर? काय काय विचार येतात माहीत आहे?”
“काय विचार येतात माझ्या प्रीतीच्या फुला?”
“मार देईन आता तुला!”
“बघ, लांब असलो की, वाट बघायची माझी, आणि जवळ आलो की मला मारायच्या गोष्टी!”
तिने त्याच्या गालावर हळूच ओठ टेकवले. “नाही रे माझ्या गुलाबजामा! पण तू वाईट्ट आहेस हे मात्र खरं! अगदी 101 टक्के खरं.”
“बरं माझी फुलू! सगळ्यात आधी तुला एक सांगतो. मी कुठेही असलो, काहीही करत असलो तरी मी तुझा तुझा तुझ्झाच आहे, असणार आणि राहणार… आणि तू माझ्झीच राहणार हे 101 टक्के खरंय? दुसरी गोष्ट, जाम कामं चाललीयेत गं… नवीन प्रोजेक्ट्स, इमरजन्सीज्, इंटरनॅशनल लेव्हलचं काम असल्यामुळे त्यांच्या वेळा आणि आमच्या वेळा कधीकधी जुळत नाहीत, त्यामुळे सतत एक ताण राहतोय. झोप, खाणं, मेंटल हेल्थ… सगळ्याचेच जाम लागलेयत! तुला काय सांगू यार…”
“मग म्हणून काय एवढं बिझी? मी आठवत पण नाही? मला पूर्ण विसरून जातोस?”
“अरे, कोण म्हणतंय असं? तुला आठवयला तुला मी विसरलो तरी पाहिजे ना!”
“अहाहा… काय पण डायलॉग! विसरतोस हे खरं. विसरतोस! विसरतोस!! विसरतोस!!”
“नाही गं बाई… नाही विसरत तुला मी. अज्जिबात नाही. बरं एक काम कर पटकन. मी काका-काकूंना फोन लावून मघाशीच सांगितलंय की, मी आलोय इथे. तू पण सांग. भेट झाली. आणि हेही सांग, आता रात्री जेवायलाच घरी येतोय. तोपर्यंत तू आणि मी. त्याव्यतिरिक्त अजून काही नाही आणि कुणी नाही!”
हेही वाचा – किती फाटतो जीव सगळ्यात यात…
“बरं बाबा… करते फोन… आणि काय रे, आई-बाबांना सुद्धा केलास फोन आणि इकडे मलाच काही माहीत नव्हतं. असं करतात?? दुष्ट!”
“अगं, असं केलं म्हणून ही भेट आठवणीत उरेल ना? कर बघू तू फोन.”
“होय, होय… करते!” हसतच जुईलीने बाबांना फोन लावला.
“हो, हो… कळलं… कळलं…” बाबांनी फोन घेताच हसून तिला चिडवलं.
“काय हो बाबा… येतो आम्ही जेवायला.”
“कळलं… कळलं… कळलं…” बाबांनी पुन्हा एकदा तिला चिडवलं.
“बाबा!” एवढं म्हणून लटकेच चिडून तिने फोन कट केला.
“हं… ऐकलं ऐकलं मी… कळलं… कळलं… कळलं…” श्रीनेसुद्धा तिला चिडवलं त्याबरोबर तिने त्याला दंडाला एक बारीक चिमटा काढला.
“ओय ओय… जुईली मुंगी!”
“ओय ओय श्री डोंबळ्या!”
“चल, पाऊस काही थांबत नाहीये इतक्यात. आता जाऊयात का आपल्या जगात?”
“चल माझ्या स्वप्नातल्या राजकुमारा…”
श्रीने म्युझिक सिस्टिम ऑन केली. जुईलीसमोर हात धरला. जुईलीने त्याच्या हातावर आपला मोबाइल ठेवला… श्रीने तो कारच्या ब्लूटूथला कनेक्ट केला आणि गाणं लावलं… तिच्या आवडत्या सलीलचं…
पाऊस असा रुणझुणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहुल विरत गेलेली
पाऊस असा रुणझुणता…


