Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    मोहोर

    September 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चव्हाण आणि कुलकर्णी…
    ललित

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    दीपक तांबोळीBy दीपक तांबोळीSeptember 30, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, दीपक तांबोळी, लेखक दीपक तांबोळी, चव्हाणांचा एकटेपणा, चव्हाणांचे शेजारी, चव्हाण आणि कुलकर्णी, चव्हाण कुलकर्णी, चव्हाणांना गर्व, चव्हाणांची श्रीमंती, कुलकर्णींचा साधेपणा, सुग्रण मंजू
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 1

    “कुलकर्णी, अहो कुलकर्णी…”

    चव्हाणांनी गेटवर उभं राहून हाक मारली, तसं कुलकर्णींनी दार उघडलं.

    “या या चव्हाण काका. कसं काय येणं केलंत?”

    “अहो, तुमच्या ओळखीचा कुणी घरगुती मेसवाला आहे, जो घरी डबा पाठवू शकेल?”

    “माझ्या परीचयाचा तर कुणी नाही, पण मंजूला माहीत असेल. ती आता आंघोळीला गेलीये. तुम्ही या ना… आत बसा. येण्यातच आहे ती…”

    चव्हाण आत जाऊन बसले. कुलकर्णी आणि त्यांचा पंधरा वर्षांचा शेजार. पण आज ते पहिल्यांदाच त्यांच्या घरात बसले होते. त्यांनी घरभर नजर टाकली. त्यांच्या दोन मजली बंगल्याच्या मानाने खूप लहान घर असलं तरी चांगलं स्वच्छ आणि नीटनेटकं दिसत होतं.

    “का तुमचा डबेवाला आज येणार नाहीये का?” कुलकर्णींनी विचारलं.

    “अहो आज सकाळीच त्याचा फोन आला होता… त्याचा भाऊ वारला, गावी जातोय. त्यामुळे 13 दिवस डबा बंद राहील, असं म्हंणाला.”

    तेवढ्यात कुलकर्णींची बायको, मंजू बाहेर आली. कुलकर्णींनी चव्हाणांची अडचण सांगितली.

    “माझ्या ओळखीचा आहे, पण तो रविवारी डबे देत नाही.”

    “अरे रामा!”

    “काका असं करा ना,” कुलकर्णी म्हणाले, “आज आमच्याकडेच जेवायला या. अनायसे आज मी पण घरीच आहे. सोबतच जेवू!”

    “नको नको…” चव्हाण घाईघाईने म्हणाले. कुलकर्ण्यांच्या घरात जेवायच्या कल्पनेने त्यांच्या अंगावर काटा आला… “उगीच कशाला तुम्हाला त्रास. मी जाईन हॉटेलमध्ये जेवायला.”

    “अहो काका, त्यात त्रास कसला?” मंजू म्हणाली, “आमच्यासाठी मी स्वयंपाक करणारच आहे. असंही जास्तीच्या एक-दोन माणसांचा स्वयंपाक आपण करतोच की! त्यामुळे तुमच्यासाठी वेगळं असं काही करावंच लागणार नाही.”

    “हो काका. एवढ्या वर्षांत आमच्याकडे तुम्ही पहिल्यांदाच येताय तर, याच जेवण करायला…” कुलकर्णी आग्रहाने म्हणाले; तसे चव्हाण क्षणभर चूप बसले. त्यांना नकार कसा द्यावा सुचेना… मग अनिच्छेनेच म्हणाले,

    “बरं ठीक आहे… येतो मी बारा-साडेबाराला. पण रात्री मी हॉटेललाच जाईन. आज रविवार ना… आज आमचा वेगळा प्रोग्राम असतो!”

    तो प्रोग्राम काय असतो, हे ओळखून कुलकर्णी हसले.

    चव्हाण घरी आले ते मनाशी चरफडतच. खरंतर, आज ते दुपारी मस्त दारू पिऊन, नॉनव्हेजचं जेवण करून संध्याकाळपर्यंत ताणून देणार होते. पण या डबेवाल्याने दगा दिला. त्यात कुलकर्ण्यांकडे जेवावं लागणार! रविवारची सगळी मजाच किरकिरी झाली होती.

    त्यांच्या आँफिसमधल्या कुलकर्ण्यांकडे एकदा ते जेवायला गेले होते. कसलं मिळमिळीत आणि बेचव जेवण ते! तेव्हापासून कुलकर्णी आडनावाच्या माणसाकडचं काहीही खायचं नाही, हे त्यांनी ठरवून टाकलं होतं. शेजारच्या कुलकर्णींचे बरेच नवनवीन पदार्थ घरी यायचे. त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई त्यांना “अहो खूप छान आहे. खाऊन तर पाहा…” असे नेहमी म्हणायच्या पण चव्हाण साफ नकार द्यायचे.

    चव्हाण असेही एकलकोंड्या स्वभावाचे. आपण बरे आणि आपलं काम बरं, अशी त्यांची पॉलिसी. तसे ते पिढीजात श्रीमंत… त्यात एका मोठ्या बँकेच्या जनरल मँनेजरपदावरुन ते निवृत्त झालेले… मानमरातब आणि पैसा दोन्हींनी ते सम्रुद्ध होते. कॉलनीतील सर्वात आलिशान बंगला त्यांचाच होता. दोन्ही जुळी मुलं इंजिनीअर झालेली. एक अमेरिकेत होता, तर एक नेदरलँडमध्ये. दोन्ही सुनाही इंजिनीअर, त्याही नोकरी करीत होत्या. चव्हाणांची पाचही बोटं तुपात होती. त्यांना या सर्व गोष्टींचा गर्व होता. कॉलनीतल्या लोकांना ते तुच्छ समजत. अर्थातच, कुणाच्याही घरी स्वतःहून जाणं त्यांना अपमानास्पद वाटायचं.

    त्याउलट सरस्वतीबाई होत्या. शेजारीपाजारी, कॉलनीत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात त्या सहभागी होत. अडीअडचणीला नातेवाईक नाही, तर शेजारीच कामास येतात, असं त्यांचं म्हणणं होतं. याउलट, पैसा फेकला की, सगळ्या अडचणी दूर होतात, सुखं पायाशी लोळण घेतात… असं चव्हाणांचं ठाम मत होतं. मात्र मागच्या वर्षी सरस्वतीबाई कॅन्सरने वारल्या आणि चव्हाणांच्या या मताला भगदाडं पडली. पैसा देऊनही स्वयंपाकाला आणि घरकामाला बाई मिळेना. घरातली छोटी-छोटी कामं जी सरस्वतीबाई शेजारपाजारच्या मुलांना सांगून फुकटात करून घ्यायच्या, त्यासाठी पैसे देऊनही माणसं मिळेनात. चव्हाणांचा माणूसघाणा स्वभाव माहीत असल्याने शेजारपाजारचे त्यांच्याकडे फिरकत नसतं. आधीच एकलकोंडे असलेले चव्हाण आता तर जणू अज्ञातवासातच गेले होते!

    साडेबारा झाले तसा चव्हाणांचा मोबाईल वाजला… ‘जेवण तयार आहे. या जेवायला’ कुलकर्णींनी सांगितलं. घराला कुलूप लावून चव्हाण निघाले खरे पण त्यांच्या अतिशय जीवावर आलं होतं. कुठून ‘हो’ म्हटलं, असं त्यांना झालं होतं. डायनिंग टेबलवर बसतानाही ते नाराजच होते. ताटामधल्या पदार्थांवर त्यांनी नजर टाकली. वाट्यांमधल्या कमी तेलाच्या भाज्या पाहून त्यांना सरस्वतीबाईंच्या मसालेदार, तेलाचा भरपूर तवंग असलेल्या भाज्यांची आठवण झाली आणि त्यांना त्या जेवणाचा तिटकारा वाटू लागला.

    “करा काका सुरुवात,” कुलकर्णी म्हणाले तसा त्यांनी अनिच्छेनेच घास घेतला. त्यांना चव कळली नाही म्हणून त्यांनी दुसरा घास घेतला… मग तिसरा आणि त्यांना भाजीची चव अप्रतिम असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी दुसऱ्या भाजीचीही चव घेतली. तिचीही चव सुरेख होती. पोळ्या तर इतक्या छान होत्या की, त्यांच्याकडे पाहूनच भूक वाढत होती. कितीतरी महिन्यांनी चव्हाणांना असं घरगुती ताजं जेवण मिळत होतं. स्वतःच्या नकळत ते जेवणावर तुटून पडले.

    हेही वाचा – प्रदीप नक्की कोण होता?

    “काका व्यवस्थित होऊ द्या,” कुलकर्णी म्हणाले, पण चव्हाणांचं लक्ष होतं कुठे! नेहमी ते दोन पोळ्या खायचे. आज पाच पोळ्या खाऊनही त्यांचं समाधान होईना. वरणभात, अळूच्या वड्या खाऊन त्यांनी श्रीखंडाची वाटी हातात घेतली. एक चमचा तोंडात टाकल्याबरोबर त्यांच्या तोंडातून “अप्रतिम” शब्द बाहेर निघून गेला.

    “कुठून आणलंय श्रीखंड, मंजूताई?”

    “कुठूनच नाही… घरी बनवलंय,” मंजूने हसत सांगितलं.

    “काय? अशक्य! इतकं छान श्रीखंड घरी बनूच शकत नाही. मी माझ्या अख्ख्या आयुष्यात इतकं स्वादिष्ट श्रीखंड खाल्लेलं नाही!”

    “अहो खरंच, घरी बनवलंय. बरं जाऊ द्या. कसं वाटलं जेवण?” कुलकर्णींनी विचारलं.

    “अप्रतिम! काहो मंजूताई कमी तेल, तिखट, मसाला वापरूनही तुमच्या भाज्या इतक्या टेस्टी होतात कशा?” हा प्रश्न आहे की कॉम्प्लिमेंट, या गोंधळात मंजू फक्त हसली.

    बैठकीत बसल्यावर पंधरा मिनिटांनी कुलकर्णीच्या मुलीने ग्लास भरुन ताक आणलं. व्वा! काय चविष्ट ताक होतं!! चव्हाणांनी परत एक ग्लास मागून घेतलं.

    “काका संध्याकाळीही या ना इथेच जेवायला…”

    “नको नको. संध्याकाळी माझ्या एका मित्रासोबत हॉटेलमध्ये जायचा बेत आहे. त्याने नाही म्हटलं तर जरूर येईन.”

    “हो बरोबर… तुमचा ‘तो’ स्पेशल प्रोग्राम असतो नाही का!” कुलकर्णी हसत म्हणाले.

    चव्हाणांनी घरी येऊन मस्त झोप काढली.उठल्यावर चहा करुन घेतल्यावर त्यांना संध्याकाळच्या जेवणाची आठवण आली…’ उगीचच आपण कुलकर्ण्यांना रात्री हॉटेलमध्ये जाणार असल्याची थाप मारली. चांगले आग्रह करत होते आपल्याला’. चरफडत त्यांनी मोबाईल काढला… सगळ्या मित्रांना फोन केले, पण एकही जण तयार झाला नाही किंवा कुणीही त्यांना जेवायचं फेरनिमंत्रण दिलं नाही… त्यांनी स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहिली.

    खरंतर, सरस्वतीबाई गेल्यापासून या एवढ्या मोठ्या बंगल्यात एकट्याने रहाणं, जेवणं आणि झोपणं त्यांना अजिबात आवडत नव्हतं. पण काही इलाज नव्हता. मुलं अशी परदेशी जाऊन बसलेली. लहानपणापासूनच शिक्षणासाठी दूर राहिल्यामुळे त्यांना घराबद्दल कधीच ओढ वाटली नाही. त्यातच चव्हाणांच्या रुक्ष, माणूसघाण्या स्वभावामुळे बापाबद्दल त्यांना कधीही प्रेम वाटलं नाही. सातत्याने बाहेर असल्याने चव्हाणांच्या कोणत्याही कामास ती आली नाही. चव्हाणांनी आपलं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं, पण मुलांना त्यांच्या कर्तव्याची कधी जाणीव झाली नाही. मुलं म्हणजे म्हातारपणीच्या काठ्या, असं सगळे म्हणत. पण चव्हाणांच्या या काठ्या इतक्या दूर जाऊन बसल्या होत्या की, त्यांच्यापर्यंत हात पोहोचणं अशक्य होतं.

    सरस्वतीबाई वारल्यावर चार दिवसांनी मुलं आली. तोपर्यंत सगळे क्रियाकर्म चव्हाणांनाच करावे लागले. पंधरा दिवसांनी सगळे विधी झाल्यावर चव्हाणांनी दोन्ही मुलांना विनंती केली की, ‘नोकऱ्या सोडून भारतात या. पुण्यामुंबईत तुम्हाला नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी माझी. म्हातारपणात  नातवंडांचं सुख तुमच्या आईला मिळालं नाही, मला तरी मिळू द्या!’ पण मुलांना आता आपला देश आवडेनासा झाला होता. इथली गर्दी, घाणेरडेपणा, भ्रष्टाचार यांचा त्यांना तिटकारा वाटत होता. त्यांनी चव्हाणांना सपशेल नकार दिला.

    उलट, एक मुलगा त्यांना अमेरिकेत घेऊन गेला. पण एका आठवड्यातच चव्हाण कंटाळले. समृद्धी आहे, पण जीवाभावाची माणसं कुठे आहेत? मुलगा, सून कामावर निघून गेल्यावर ते एकटेच बंगल्यात असायचे. आजूबाजूच्या बंगल्यात जणू रोबोट बसले आहेत, असंच त्यांना वाटायचं. एक महिना कसाबसा काढल्यावर ते दुसऱ्या मुलाकडे नेदरलँडला गेले. एक महिना युरोप दौरा केल्यावर ते कंटाळून भारतात आले. इथेही त्यांचं एकसुरी आयुष्य सुरू झालं. कधीतरी नातेवाईकांच्या साखरपुडा, लग्नाला ते जायचे. तिथे ते रमायचे. त्यांना रहावंसं वाटायचं. पण बिनाबायकोच्या माणसाला अशा समारंभात काहीच किंमत नसते, हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

    एकदा त्यांच्या आँफिसच्या शिपायाच्या एकसष्ठीला त्यांना बोलावण्यात आलं होतं. शिपायाच्या मुलांनीच हा कार्यक्रम आयोजित केला होता. चव्हाण कार्यक्रमस्थळी पोहोचले. शिपायाची मुलंमुली, सुना, जावई आणि नातवंडं यांचं गोकुळ पाहून चव्हाणांचे डोळे भरून आले. शिपायाच्या नशीबाबद्दल त्यांना असुया तर वाटलीच, पण त्यापेक्षाही जास्त स्वतःची कीव आली.

    विमनस्क अवस्थेत ते घरी आले. मुलं आणि त्यांच्या परीवारासाठी त्यांचं एवढं मोठं बांधलेलं घर आता त्यांना भूतबंगला वाटू लागलं. मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. डॉक्टरांनी मना केलेलं असतानाही त्यांनी दारूची बाटली काढली आणि 15 मिनिटांत संपवली. रात्री एक वाजता त्यांना जाग आली, ती जीव घाबराघुबरा झाल्याने! छातीत डाव्या बाजूला जीवघेण्या कळा येत होत्या. एसी सुरू असतानाही अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. आपण आता मरणार हे त्यांना कळून चुकलं. कसाबसा त्यांनी फोन उचलला. नशिबाने त्यांच्या मित्राने तो ताबडतोब उचलला… “मी मरतोय. लगेच ये…” एवढंच कसंबसं बोलून ते बेशुद्ध पडले.

    सकाळी जाग आली तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते. मित्र आणि त्याचा मुलगा शेजारी उभे होते –

    “बरं झालं आम्ही लवकर पोहोचलो. तुला हार्ट अटॅक आला होता. मिलिंदने ताबडतोब हालचाल करून तुला ॲडमिट केलं. तो स्वतःही डॉक्टर असल्याने इथल्या डॉक्टरांनी लगेच ॲक्शन घेतली. नाऊ यु आर आऊट ऑफ डेंजर”

    मित्र त्याच्या मुलाकडे अभिमानाने पहात म्हणाला. चव्हाणांनी हात जोडून त्याला नमस्कार केला.

    तेव्हापासून चव्हाणांवर आहारविहाराची बंधनं आली. सुरुवातीला त्यांनी ती पाळली. पण जगून तरी काय करायचंय? आयुष्याचे उरलेले दिवस मजा मारून घेऊया, विचाराने त्यांनी ती बंधन धुडकावून लावली.

    विचाराविचारात आठ कधी वाजले ते त्यांना कळलं नाही. जड अतःकरणाने ते उठले. कुठेतरी जाऊन दोन घास पोटात टाकावे लागणार होते. लाइट बंद करून त्यांनी दार लावलं, तेवढ्यात फोन वाजला.

    “काका, मग तुम्ही मित्राबरोबर जाताय का जेवायला?” कुलकर्णी विचारत होते.

    “नाही ते कॅन्सल झालं. मी एकटाच…”

    “अहो, मग या ना इकडे. काही नाही फक्त खिचडी केलीये. या मी वाट बघतो…”

    “बरं आलोच,” आनंदाने चव्हाणांच्या हातातला मोबाइल पडता पडता वाचला.

    साधीच खिचडी पण अप्रतिम चव होती. सोबत कढी आणि तळलेले पापड.

    “मंजूताई फार छान स्वयंपाक करता तुम्ही. असं वाटतं माझ्या डबेवाल्याला बंद करून  तुमचाच डबा सुरू करावा,” चव्हाण हसताहसता मनातलं बोलून गेले.

    “चालेल ना काका. मला काही प्रॉब्लेम नाही,” मंजू हसत म्हणाली.

    “पण तुम्हाला त्याचे पैसे घ्यावे लागतील…”

    “अहो काका, तुमचं जेवण ते काय! नको नको… काही पैसे द्यायची गरज नाही,” मंजू निग्रहाने म्हणाली.

    “अहो, मी माझ्या डबेवाल्याला देतोच ना! तेवढेच तुम्हाला देत जाईन. हिशोबाला क्लिअर असावं… त्याने संबंध चांगले रहातात. काय हो कुलकर्णी?”

    “काका तुमच्या समाधानासाठी द्या. आम्ही तुमच्याकडे कधी मागणार नाही,” कुलकर्णी म्हणाले.

    जेवण झाल्यावर चव्हाण म्हणाले.

    “चला जेवण छान झालं. आता माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना आइस्क्रीम. चला व्हा तयार…”

    “अहो, आजोबा मी आता चिकू शेक करणार होते,” कुलकर्ण्यांची मुलगी म्हणाली.

    “राहू दे बेटा तो… चला माझ्या गाडीत बसा.”

    रात्री चव्हाण परतले ते खूप तृप्त आणि समाधानी होऊन! आज त्यांना लगेच खूप शांत झोप लागली.

    हेही वाचा – …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    सकाळी ते उठले ताजेतवाने होऊन. त्यांना एकदम आठवलं त्यांनी रात्री रोजच्याप्रमाणे ॲसिडिटीची गोळी घेतली नव्हती. विशेष म्हणजे, त्यांना काहीच त्रास होत नव्हता. कुलकर्णीबाईंचा डबा लावून घ्यायचा निर्णय घेतला, ते छानच झालं, याचा त्यांना आनंद वाटला.

    सात आठ दिवसांनी कुलकर्णी चव्हाणांना भेटायला आले…

    ‌”काका, आमच्या गावची दोन मुलं युपीएससीच्या कोर्सेससाठी इथे येताहेत. त्यांना शांत जागा हवी आहे. मी माझ्याच घरी ठेवून घेणार होतो, पण माझं घर पडतं लहान आणि त्यांच्यासाठी वेगळी रूम नाहीये माझ्याकडे. तुमच्या बंगल्यातील एखादी रुम देऊ शकाल का त्यांना? आमच्याच समाजाची मुलं आहेत. तुम्हाला त्रास देणार नाहीत, याची जबाबदारी माझी. त्रास झाला तर सांगा, मी त्यांची दुसरीकडे व्यवस्था करेन आणि हो तुम्हाला ते भाडं पण देतील. वाटल्यास तसा करार करून घेऊ…”

    क्रमश:

    (ही कथा माझ्या ‘हा खेळ भावनांचा’ या पुस्तकातील आहे.)

    Avatar photo
    दीपक तांबोळी

    निवृत्त रेल्वे अभियंता. 2018पासून लेखनास सुरुवात केली. आतापर्यंत 6 कथासंग्रह आणि 1 संपादित कथासंग्रह प्रकाशित. 8वा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्य संस्थांचे 35 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    Related Posts

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026 ललित

    मोहोर

    September 30, 2026 ललित

    नकारातून साकार

    September 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    राधाची कबुली अन् मी…

    By डॉ. विवेक वैद्यSeptember 30, 2026

    मी मुंबईत विंग्ज (Wings) या खासगी हॉस्पिटलला आरएमओ (निवासी वैद्यकीय अधिकारी) म्हणून लागलो. कामाचा अनुभव…

    मोहोर

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    मोहोर

    September 30, 2026

    घरातील देवघरात पूजा करताना तोंड कोणत्या दिशेला असावे?

    September 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना तयापरी, सरली द्वैताची वारी 

    September 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 454
    • अवांतर 214
    • आरोग्य 152
    • पंचांग आणि भविष्य 606
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 961
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    मोहोर

    September 30, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.