अध्याय पंधरावा
अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंतु ययासि नाहीं । माजीं स्थिती आभासे कांहीं । परी टवाळ तें गा ॥237॥ ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे । तरी माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ॥238॥ तेसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं । परि लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥239॥ नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥240॥ ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥241॥ आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां । तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय ॥242॥ स्वप्नींही मानिलें लटिकें । तरी निर्वाहो कां एकसारिखें । तेवीं आभासु हा क्षणिकें । रीतीचा गा ॥243॥ देखतां आहे आवडें । घेऊं जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडें । जळामाजीं ॥244॥ तरंगभंगु सांडीं पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणें पाडें । होणें जाणें गा ॥245॥ जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठीमोरा । तैसी स्थिती नाहीं तरुवरा । भवरूपा यया ॥246॥ एवं आदि ना अंत स्थिती । ना रूप ययासि आथी । आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥247॥ आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी । तरी आतां आत्माज्ञानाचेनि लोटीं । खांडेनि गा ॥248॥ वांचूणि ज्ञानेवीण ऐकें । उपाय करिसी जितुके । तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये ॥249॥ मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक् ज्ञानें ॥250॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आम्हीं सांगितली जे परी, मूळडाळांची उजरी
अर्थ
अर्जुना, याप्रमाणे पहा की, या संसारवृक्षाला आदि व अंत नाही, मध्ये स्थितिकाली तो काही भासतो, पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे. ॥237॥ ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि (शेवटी) खरोखर समुद्रांतही मिळत नाही, तरी मध्येच जसे मिथ्या मृगजळ दिसते ॥238॥ त्याप्रमाणे अर्जुना, संसारवृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही. परंतु खोटेपणाची नवलाई अशी आहे की, तो नसून भासतो. ॥239॥ ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते, त्याप्रमाणे अज्ञान्याला हा संसारवृक्ष आहे असे भासते. ॥240॥ अशा रीतीने स्थितिकाली हा संसारवृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो. तो कसा तर जसा बहुरूपी हा कफनी धारण करून (सोंग आणून) लोकांना फसवतो तसा. ॥241॥ आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो, तसा दिसेना का? तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते. ॥242॥ स्वप्नांतील खोटे पदार्थ वस्तुत: नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी ते एकसारखे टिकतात का? तशा क्षणिक भासणार्या पद्धतीचा हा संसारवृक्षाचा आभास आहे. ॥243॥ पाण्यात दिसणारे आपले प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे, (तरी पण ते प्रतिबिंब त्यास सापडत नाही) त्याप्रमाणे हा संसारवृक्षाचा भास पाहिला असता, आहे असा वाटतो आणि त्यास धरावयास गेले तर (म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर) तो सापडत नाही. ॥244॥ बा अर्जुना, लाटांचे होणे व जाणे (ह्या संसारभासाच्या होण्या-जाण्याच्या उपमेला) कमी पडते. (विजेचा उदयास्त जरी अति त्वरित असतो तरी ती वीजदेखील याच्या बरोबरीला येत नाही, तितक्या मानाने (त्वरेने) संसारभासाचे होणेजाणे आहे. ॥245॥ ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो की पाठीमागून वहातो, हे कळत नाही (त्याची स्थिती जशी एकच नसते) ज्याप्रमाणे या संसाररूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितिकाली एकच अवस्था नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते. (म्हणजे संसाराला स्थितीही नाही). ॥246॥ याप्रमाणे संसारवृक्षाला आदि, अंत व स्थिति ही नाहीत व याला रूपही नाही. आता (असे जर आहे तर) अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रम ते काय? ॥247॥ अर्जुना, हा नसलेला संसारवृक्ष (केवळ) आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे. तर आता (त्याला) आत्मज्ञानरूपी दुधारी तलवारीने नाहीसा कर. ॥248॥ नाहीतर एका ज्ञानावाचून (त्याच्या नाशाकरिता) जितके उपाय तू करशील, त्यांच्या (त्या उपायांच्या) योगाने तू या संसारवृक्षात अधिक अडकशील. ॥249॥ मग (त्या संसारवृक्षाच्या) फांद्या-फांद्यांनी खाली व वर किती फिरावे? म्हणून या संसारवृक्षाचे अज्ञानरूपी मूळच यथार्थज्ञानाने तोडून टाक. ॥250॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वाजतें वारें निवांत, जंव न राहे जेथिंचें तेथ


