जोशी काकांबरोबर आम्ही अनेक सहली केल्या. काका एकदम वेगळे होते. सहल जिथे ठरली असेल तिथे जातच होतो, पण त्याबरोबर त्याच्या पलीकडचं असं काहीतरी आम्हाला दाखवायचे… मला तर तेच जास्त आवडायचं.
काका अतिशय शांतपणे, मुख्य म्हणजे गोड, मृदु आवाजात बोलायचे. त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकावं असंच वाटायचं.
एकदा काकांबरोबर दोन दिवसांच्या ट्रिपला गेलो होतो. प्रवास सुरू झाला. दीड तास झाल्यानंतर काकांनी मधेच गाडी थांबवायला सांगितली. काका म्हणाले, “शेतातल्या पायवाटेने थोडं तुम्हाला चालावं लागेल. चला… जरा वेगळी गंमत दाखवतो… तुम्ही कधी पाहिली नसेल….”
थोडं पुढे गेलो, लांबून अनेक उंच झाडं दिसायला लागली….
कशाची आहेत ते ओळखता येईना… जवळ जाऊन बघितलं तर डोंगरी आवळ्यांची असंख्य झाडं तिथं होती. झाडावर आवळ्यांचे अक्षरशः घोसच्या घोस लगडलेले होते. टपोरे फिकट हिरवटसर आवळे इतके सुंदर दिसत होते… त्यांचा मंद, मधुर, थोडा आंबटसर असा वास आसमंतात पसरला होता… वाऱ्याबरोबर दरवळत होता… बघताना खूप मजा वाटत होती… नेत्रसुख घेत कितीतरी वेळ आम्ही उभे होतो… अशी आवळ्यांची शेती आम्ही पहिल्यांदाच बघितली. काकांनी सांगितले की, “आयुर्वेदीक औषध बनवण्यासाठी हे आवळे वापरले जातात.”
ते टपोरे आवळे, ती झाडं अजूनही स्मरणात आहेत… काकांनी हे एक निराळंच काहीतरी आम्हाला दाखवलं.
ते म्हणाले, “आपण ज्या झाडाखाली उभे आहोत, ते झाड कशाचे आहे माहीत आहे का? ”
आम्हाला ओळखता येईना. मग काकांनी सांगितले,
“हा कदंब वृक्ष आहे. या वृक्षाची माहिती आहे का?”
आम्हाला कोणाला काही माहिती नव्हती. कदंब वृक्षाचा संबंध कृष्णाशी आहे, हे मात्र माहीत होते. काकांनी त्या वृक्षाची पूर्ण माहिती दिली. झाडाच्या फांद्यांची रचना कशी आहे… श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी त्याच्यावर कसे बसत असतील… याचे रसभरीत वर्णन काकांनी केले, आणि विचारले,
“कोणाला ‘श्रीकृष्ण अष्टकम्’ येते का?”
बहीण, मी आणि अजून दोघीजणी पुढे आलो. काका म्हणाले, “चला हात जोडा, आपण म्हणू या.”
त्या कदंब वृक्षा खाली उभं राहून आम्ही –
“भजे व्रजेक मंडनम्
समस्त पाप खंण्डनम्
स्वभक्त चित्तरंजनम्
सदैव नंद नंदनम्”
हे श्रीकृष्ण अष्टकम् म्हटले.
आताही घरी ते म्हणताना कदंब वृक्ष आणि काका आठवतात…
तिथून निघताना काका म्हणाले,
“रात्री तुम्हाला आणखी एक गंमत दाखवणार आहे….”
हेही वाचा – आठवणींची पेटी… वाट शाळेची!
आता रात्री काका काय दाखवणार आहेत, याची मला उत्सुकता लागली. आपण एका छोट्या खेड्यात राहणार आहोत, असं त्यांनी आधीच सांगितलं होतं. तिथे आटोपशीर छान छोट्या, छोट्या खोल्या होत्या. साधंसं चवदार जेवण झालं. आता रूमवर जायचं… झोपायचं… काका गंमत विसरले असं वाटलं… इतक्यात काका म्हणाले,
“चला आता गंमत बघायला.”
इतक्या रात्री त्या खेड्यात काय बघायचं?…. तरी निघालो…
गाडी पुढे चालली होती… नुसता अंधार आणि अंधारच होता… तिथे काय बघायचं? पुढे काय असेल? आम्हाला कोणाला काही कल्पना येईना… आमचे तर्क सुरू झाले…
“काजवे…” कोणीतरी म्हटलं..
“या दिवसात नाही दिसत.”
“आदिवासींचा नाच?”
“इथे कुठले आदिवासी…”
“काका भूत तर नाही ना?” कोणीतरी घाबरून विचारलं.
कसला अंदाज येईना…
नाही म्हटलं तरी, मनात भीती दाटून आली…. काका शांत होते. आमच्या कोणत्याच प्रश्नांना ते उत्तर देत नव्हते… नुसते गालातल्या गालात हसत होते…
एका जुनाट मोठ्या अशा देवळासमोर गाडी थांबली. गाडीच्या लाइटच्या उजेडात आम्हाला दिसले… समोर लांबलचक पायऱ्या होत्या. काकांनी आम्हाला त्या पायऱ्यांवर बसायला सांगितले. काकांच्या हातात मोठा टॉर्च होता. काकांनी तो बंद केला. गाडीचा लाइटही बंद झाला होता. पूर्ण अंधार होता…
आता इथे काय पाहायचं?
काका म्हणाले, “आभाळ!”
“आभाळात काय बघायचे?”
आम्ही वर बघायला लागलो…
आणि… शहराच्या उजेडात कधी न बघायला मिळालेले, असंख्य चांदण्यांनी भरलेले आभाळ आम्हाला दिसले… त्या गडद अंधारात चांदण्या चमचमत होत्या… चंद्र आणि शुक्राची चांदणी गोड दिसत होती… सप्तर्षी दिसले… खूप वर्षानंतर आम्ही ते बघितले….
निसर्गाचं एक अलौकिक असं रूप आम्हाला दिसत होतं…
आभाळात इतक्या चांदण्या असतात. हे ही आम्ही विसरलो होतो. आता अंधाराला डोळे सरावले.
काका म्हणाले, “जरा इकडे तिकडे बघा.”
तेव्हा लक्षात आलं की आमच्या आसपास चांदणं पसरलेले आहे… त्या चांदण्याखाली आपण बसलेलो आहोत, हे आम्ही अनुभवले… सगळे नि:शब्द झालो होतो… नीरव शांतता… असा चांदण्याचा अनुभव आम्ही आधी कधी घेतला नव्हता… परमानंद झाला होता!
हेही वाचा – आठवणींची पेटी… आकाशफुले
मी घरी गॅलरीत उभी होते आणि हा प्रसंग आठवला… काय, कुठे आणि कसं बघायचं हे सांगणारे, अंधारातलं सौंदर्य दाखवणारे, जोशी काका आठवले…
विचार करताना लक्षात आलं की, आपणही जरा बाहेर बघितलं तर, हे पसरलेलं सुखाचं चांदणं दिसेल… पण आपण ते बघत नाही… कृत्रिम लाFटच्या झगमगाटात हा दैवी नैसर्गिक प्रकाश आजकाल आम्हाला दिसत नाही. निरनिराळ्या ट्रिपला जाऊन काय काय पाहायच्या नादात हा हाताशी असलेला आभाळभर आनंद बघायचा राहून जातो की काय?
एक सांगू…
बघा ना कधीतरी तुम्ही पण तुमचं तुमचं आभाळ… बाहेर न भरकटता अंतरंगात डोकावून… प्रकाश दिसतोच! कारण हे परमेश्वराचे दिवे आहेत अव्याहत चालणारे…
आताशा मी बघत असते… चांदण्यांबरोबर अजूनही काही काही दिसते… कल्पनेच्या पलीकडलं… अद्भुत असं… आपल्याला मनातून शांत करणारं!
कधीतरी वर आभाळात गेलेलेही दिसतात… बोलता येत त्यांच्याशी… मनातल्या मनात… आपलं सुख-दुःख सांगता येतं… मन त्यात रमून जातं…
आयुष्याच्या वळणावर असे जोशी काका भेटले… त्यांच्या अनुभवांनी, ज्ञानाने त्यांनी माझं आयुष्य अधिक समृद्ध केलं. त्यांच्यामुळे जगणं… बघणं… आणि त्यावर विचार करणं अधिक सुंदर झालं…


