प्रदीप केळुस्कर
गोरेगावच्या सत्कार हॉटेलमध्ये अनंता जेवायला बसला होता. समोर मस्त सरांग्याचे ताट होते. चपाती आमटीत बुडवून तोंडात घालताना त्याला जयंत आतमध्ये येताना दिसला. आपल्या वर्गातील जया दिसताच अनंताला आनंद झाला. त्याने हाक मारली…
“जयाSS”
जयंतने चमकून बघितले. अनंताला पहाताच जया त्याच्या टेबलाकडे आला आणि समोर बसला.
“अरे, तू हय कसो? वैनी भावाकडे गेली की काय?” जयंतचा प्रश्न.
“अरे पुण्याक गेलीया. तिची भाची असता थय, तिचा डोहाळे जेवण… तिच्या माहेरची सगळीच गेलीत…”
“पण तू हय कसो काय?” अनंताने विचारलं.
“अरे, माझो झील अमेरिकेक आसता ना, तेना गोगटेवाडीत प्लॅट घेतल्यानं. बिल्डिंगचा काम सुरू आसा… ता काम कितपत इला ता बघुक इल्लाय. गोरेगावात इलंय की, गाववाल्याच्या हॉटेलात जेवण…”
“मी सरांगा जेवण मागवलंय.. तू काय घेतस?”
“हयले तिसरे माका आवडतत… मी तिसरे जेवण मागवताय…”
अनंताने वेटरला हाक मारून जयासाठी तिसरे जेवण मागवले. दोघेही सत्कारमधील मासेजेवण चवीने जेऊ लागले.
जेवता जेवता अनंता त्याची चौकशी करू लागला…
“झील केव्हा गेलो अमेरिकेक?”
“चार वर्षा झाली… तेची बायको पण तिकडचीच!”
“म्हणजे, तेची बायको अमेरिकन आसा की काय?”
“मेक्सिकन…” जया विषादाने म्हणाला.
“तुझ्या सुनेक आपली भाषा येना नसतली…”
“कशी येतली? मालवणी नायच, पण भारतातली खयचीच भाषा येना नाय…”
“मग, तुमी दोघा सुनेबरोबर कसे बोलतात?”
“खय बोलतव? तेंका आमच्याबरोबर बोलाक वेळ खय आसता? झील रविवारी फोन करता… तेवा तेची आई बोलता… मग मी बोलतंय…”
डोळे पुसत जया म्हणाला.
“जाऊदे… नको तो विषय. तू आपलो जेव बघू…”
दोघे शांतपणे जेवायला लागले.
जेवण आटोपून दोघे मित्र खाली उतरले. अनंताची पाऊले पानवाल्याच्या ठेल्याकडे वळली. अनंता पानवाल्याला म्हणाला..
“दो साधा पान… बिगर तमाकू.”
एक पान जयंताला देऊन अनंता म्हणाला…
“गावाक गेल्लस काय रे…”
“नाय रे… गावाक कोण आसा आमचा?”
“अरे, तुजो पुतण्यो आसा ना… तेची बायको, मुला?”
“आसत… पण माका कोण इचारता?”
“विचारणत नाय… असा कसा?”
“अरे, आता गाववाले बदलले… पूर्वीसारखे रवले नाय बाबा, कोकण रेल्वे इली, विमानतळ झालो, मोबाइल इले… सगेसोयरे बदलले… तू जातं गावाक?”
“मी वरसातून चार वेळा जातंय…”
“काय म्हणतं? वरसातून चार वेळा? आणि तुझे घरचे बरे वागतत?”
“होय… माका सोडणत नाय. मी मुंबईक जाऊक निघालंय का, सगळ्यांच्या डोळ्याक पाणी येता…”
“नशीबवान आसस…”
“आता गोकुळाष्टमीस मी जातलंय… तो गणपती अकरा दिवस करून येतलंय…”
“माका खरा वाटणा नाय…”
हेही वाचा – चॅलेंज.. अहंकार मोडून काढणारं!
“तू येतंस माझ्याबरोबर?”
“मी?”
“दोघांय येवा… माझी बायको पण आसा… जाऊया चौघेजण… गणपती करून येवया… म्हदी दोन दिवस तुज्या घराक जाऊन ये…”
“पण तुजो पुतनो काय म्हनात? तेची घरवाली…”
“तू फक्त चल माझ्याबरोबर. तुका कंटाळो इलो तर रेल्वेचा तिकीट काढून देतंय…”
“बरा… मी मोहिनीक विचारतंय आणि तुका फोन करतंय…”
घरी गेल्यावर जयंतने पत्नीला विचारले… ती पण तयार झाली. जयंतने अनंताला फोन केला आणि अनंताने कोकण रेल्वेची चार तिकिटे घेतली.
कोकण रेल्वेच्या मांडवी एक्स्प्रेसने अनंता, त्याची बायको आनंदी, जयंत आणि त्याची बायको मालती चौघे कुडाळला जाण्यासाठी निघाली. आनंदीने वाटेत खाण्यासाठी आंबोळ्या, काळ्या वाटण्याची उसळ घेतली होती. मोहिनीने पण घावणे आणि चटणी सोबत घेतली. गप्पा मारत, मधेच डुलकी काढत आणि सोबत आणलेले खाणे खात मजेत प्रवास सुरू होता. जयंताच्या मनात धाकधूक होतीच… अनंताचा पुतण्या आणि सून आपले कसे स्वागत करतात? कारण त्याचा पुतण्या तर ते गेल्यावर धड बोलत नव्हता की, घरी थांबत होता. पुतण्याची बायको… एवढेच काय, त्यांची मुलगी सुद्धा त्यांना जास्त किंमत देत नव्हती.
सायंकाळी चारच्या सुमारास गाडी कुडाळ स्टेशनला पोहोचली आणि जयंतला आश्यर्य वाटले, कारण अनंताचा पुतण्या सुधीर कुणाची तरी गाडी घेऊन स्टेशनवर उभा होता… त्याने पटकन त्यांचे सामान आपल्या हातात घेतले आणि गाडीच्या डिकीत ठेवले अन् स्वतः गाडी चालवायला बसला. जया हे बघत राहिला, कारण गेल्या दहा वर्षांत त्याचा पुतण्या कधी स्टेशनवर आला नव्हता! गाडी सुरू झाली आणि सुधीर काकांना म्हणाला…
“पाव्हणे ओळखीचे वाटतात, पण नाव लक्षात येना नाय…”
“अरे, हे मांजरेकर… किल्लेनिवतीचे. त्यांचा घर आसा तिकडे… माझो लहानपणाचो मित्र, मीच तेका म्हटलंय.. चल चारआठ दिवस आमच्या घरी…”
“बरा केलात… आमचा घर मोठ्ठा आसा… आणि काय कमी नाय…”
जया ऐकतच राहिला.
गाडी पाट, परुळे करत भोगव्याला पोहोचली, तेव्हा सुधीरची बायको आणि दहा वर्षांचा मुलगा बाहेरच वाट पाहात होते.
सुधीरची बायको पुढे झाली आणि तिने अनंतकाकाच्या हातातील बॅग आणि मोहिनीकाकीच्या हातातील पिशवी आपल्या हातात घेतली. सुधीरने जयाकाकाच्या हातातील बॅग आणि आनंदीकाकीच्या हातातील पिशवी हातात घेतली आणि पाहुण्यांच्या खोलीत नेऊन ठेवली. सुधीरने पाहुण्यांना हातपाय धुवायला गरम पाणी आणून दिले. हातात टॉवेल आणून दिला. तोपर्यंत मालतीने गरम चहाचे कप त्यांच्या हातात दिले.
जया आणि मोहिनी पाहात होती… आपले पुतणे, सून असे स्वागत का करत नाहीत? आपले काही चुकते काय?
गरम पाण्याच्या आंघॊळी झाल्यावर गप्पा सुरू झाल्या. सुधीर आजूबाजूच्या भागातील गजाली सांगत होता… काही गमतीजमती काका-काकूंना सांगत होता आणि सर्वांना हसवत होता. रात्री बांगड्याचे तिखले आणि भात असा साधा मालवणी बेत… पण जयंत आणि मोहिनी पोटभर जेवली आणि गाढ झोपली.
गाईच्या हंबरण्याने सर्वांना जाग आली. सुधीरची बायको मालती गाईचे दूध काढत होती… मग तिने वासराला लुचायला सोडले आणि ती चहा करायला गेली… चहा आणि गरमगरम नाचणीची भाकरी तिने सर्वासमोर ठेवली. चहा देता देता दोन्ही काकींशी गप्पा मारत होती. आपल्या माहेरच्या गोष्टी सांगत होती… हे प्रेमाचे वातावरण बघून जयंतला आनंद होत होता. असे आपल्या घरी वातावरण असते, तर आपण पण घरी जाऊन आठदहा दिवस राहिलो असतो.
सुधीरने नदीचे ताजे मासे आणले. मग दुपारचे मस्त जेवण झाल्यावर वामकुक्षी करून अनंता आणि जयंत संध्याकाळी भोगव्याच्या समुद्रावर फिरायला गेले. समुद्राच्या पाण्यात पाय सोडून दोघे एका खडकावर बसले… कालपासून विचारायचे मनात होते… ते जयंताने विचारले,
“अनंता… कालपासून मी पाहातो आहे, तुझे एवढे स्वागत कसे काय होते? सध्या कोण कुणाला नको, अशी परिस्थिती असताना! माझ्या घरी माझा पुतण्या, सून जेवढ्यास तेवढे बोलतात, पण फारशी दखल घेत नाहीत… म्हणून विचारले..”
“यासाठी आपणसुद्धा त्यांच्यातले व्हावे लागते… म्हणजे त्यांच्या अडचणी म्हणजे आपल्याच असे वागावे… तसाच माझो पुतण्यो जेवा मुंबईत येता, तेवा तेचा पण स्वागत आमी करूक होया… तेव्हा माका वेळ नाय असा सांगता नये. मागे मालतीचे तब्येतीचे तक्रारी होते, तेव्हा मी तेका घेऊन मुंबईक इलंय आणि तेची सर्व ट्रीटमेंट करून घेतलंय… त्यासाठी दहा दिवस रजा घेतलंय… आंनदीने तेका घरात हात लावूक देऊक नाय… असा तुमी करतास?”
जयाने ‘नाही’ म्हणून मान डोलावली.
“दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा… एकदा आपण गाव सोडला आणि शहर पकडला की, परत मागच्या प्रॉपर्टीचो स्वार्थ धरायचो नाय!”
“काय? अरे पण आपलो हक्क?”
“हक्क असाच… पण गावातल्या आपल्याच रक्ताच्या माणसाने, जो आपली जमीन, घर, देव सांभाळता तेना काय करायचा? तेना आपलो संसार कसो करायचो? आणि आपल्या कोकणात जमीन कितीशी असता? पंधरा नायतर वीस गुंठे! त्याच्यात आपण हक्क सांगितलो… तर गावातील माणूस कसो जगात? आणि आपला बरा आसा ना… शहरात स्वतःचा घर आसा… मुला चांगली शिकली… चांगलो पगार मिळवतात… म्हणजे आपणाक काय कमी नाय. मग ज्याका गरज आसा… तेका ता देऊन टाकायचा! स्वार्थ ठेवायचो नाय… जर सगेसोयरे होयेत तर काही गोष्टींचो त्याग पण करूक होयो?”
“म्हणजे तू काय केलंस?”
“मी चार गुंठ्यात माजा नाव ठेवलंय… कित्या आपला नाव गावात होया म्हणून आणि बाकी जमीन सुधराक हक्कसोड करून दिलाय. अशी आमची जमीन कितीशी आसा… सगळी मिळून पंचवीस गुंठे. ती पण चार ठिकाणी वेगवेगळी क्षेत्रा… ती सांभाळणा सोपी गोष्ट नाय. सुधीर धडपडो आसा, म्हणून तेना आंब्याची कलमा लावलीत, नारळी लावलेत… आपण तेका आशीर्वाद देऊक होयो… दरवर्षी दोन पेटी आंबे पाठवता… इल्या पावठीक दहा नारळ देता. आणि आमका काय होया? तसेच, आमची मुला येतली इकडे? नाय येवची… तेका एकदा शहराची सवय झाली की ती गावात येऊक बघित नाय… आपले देव आसतात… मूळघरात सण असतात… ते करूक होये. सोप्या नाय ह्या?”
हेही वाचा – पूल पडला… मुकादमला दणका
“अनंता, तू पुतण्याक सगळी जमीन दिलास?”
“फक्त चार गुंठेत माजा नाव ठेवलंय, बाकी सगळा तेका दिलय. म्हणून मी हक्काने वर्षातून चार वेळा येताय… मस्त रवतंय. सगळ्यांका आमी घरातले वाटतंव. असा प्रेम ठेवूचा असता बाबा… सगेसोयरी होईच आपणाक?”
“अनंता, मी… मी म्हणजे माझ्या पुतण्याक कायच देऊक नाय.”
“मग देऊन टाक. देण्यात पण समाधान आसता. तुझो मुलगो अमेरिकेत… सुन मेक्सिकन… ती इकडे येतली, असा वाटता तुका? आणि तुझ्या पश्चात तुजो झील लागतलो सातबाऱ्यावर… तो अमेरिकेत… मग तुझ्या पुतण्यानं तेका खय शोधायचा? म्हणून जोपर्यंत तुझे हातपाय हलतात… तोपर्यंत निर्णय घे…”
“खरा आसा अनंता… माका पण सगेसोयरे होयेत… माका पण गावात येन असा वाटता. पण घरात, तुझ्या घरासारख्या वातावरण होया… माझ्या मुलाक गावातल्या जमिनीत कसलोच इंटरेस्ट नाय… तेव्हा माकाच निर्णय घेऊक होयो…”


