राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या अभिनयाने सजलेला ‘हाथी मेरे साथी’ हा सिनेमा आमच्या पिढीतील जवळजवळ प्रत्येकानेच पाहिला असेल. लहानपणी हा सिनेमा पाहताना त्यातील हत्तींच्या करामती पाहून जशी मजा वाटायची, तसेच हीरो राजेश खन्ना आणि ‘रामू’ नावाच्या हत्तीमधील जिव्हाळ्याचे नाते पाहून हत्तींबद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. सिनेमातील रामू हत्ती जेव्हा मरतो आणि राजेश खन्ना आर्त स्वरात, आतून काही तुटल्यासारखे “नफरत की दुनिया को छोडके प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार…” हे गाणे पडद्यावर साकारायचा; तेव्हा चित्रपटगृहातील प्रत्येक व्यक्ती हमसून हमसून रडायची. खरं ना?
हत्ती आणि मानव यांचा संबंध असा पुरातन काळापासून अबाधित आहे. पृथ्वीवरील या विशालकाय जीवाने आपल्या अंगीकृत गुणांनी वनसंपदा आणि तिथल्या इतर प्राण्यांचे संवर्धन केले आहे. “हत्ती कधीच काही विसरत नाही…” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण या एका वाक्यामागे निसर्गाचे किती मोठे रहस्य, इतिहास आणि किती गाढ संवेदना दडलेल्या आहेत, याचा विचार आपण कधी केला आहे का?
हत्तींच्या अथांग स्मरणशक्तीचा सर्वात मोठा उपयोग त्यांच्या जगण्यासाठी होतो. कळपाची प्रमुख मादी (मॅट्रियार्क) शेकडो किलोमीटर दूर असलेले पाण्याचे साठे, अन्नाची ठिकाणे आणि सुरक्षित मार्ग कित्येक दशकांनंतरही अचूक लक्षात ठेवते. अगदी 50 वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात आपल्या आईसोबत कुठे पाणी मिळाले होते, हे ती वृद्ध झाल्यावरही आठवून कळपाला तिथे घेऊन जाते.
हत्ती आपल्या आयुष्यात शेकडो इतर हत्तींना भेटतात. ते प्रत्येक हत्तीचा आवाज, गंध आणि चेहरा अनेक वर्षांनंतरही ओळखू शकतात. कुठे दलदल आहे, कोणत्या भागात शिकारी असतात किंवा कुठल्या मार्गावर विजेच्या तारा आहेत, या भूतकाळातील नैसर्गिक धोक्यांची नोंद त्यांच्या स्मरणात पक्की बसलेली असते. हत्ती वाईट घटना आणि त्यांना इजा पोहोचवणाऱ्या माणसाला किंवा विशिष्ट समूहाला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतात आणि त्यानुसारच प्रतिक्रिया देतात. केनियामध्ये केलेल्या एका प्रसिद्ध वैज्ञानिक अभ्यासात असे दिसून आले की, हत्ती ‘मासाई’ (Maasai) जमातीच्या लोकांच्या कपड्यांचा रंग आणि गंध पाहून लगेच आक्रमक किंवा सावध होतात; कारण मासाई भाल्याने हत्तींची शिकार करायचे. याउलट, तिथल्याच ‘कम्बा’ (Kamba) जमातीच्या लोकांपासून हत्ती घाबरत नाहीत, कारण ते शेतकरी असून हत्तींना इजा करत नाहीत.
शास्त्रज्ञांनी जेव्हा या दोन जमातींच्या लोकांचे रेकॉर्ड केलेले आवाज हत्तींना ऐकवले, तेव्हा मासाई लोकांचा आवाज ऐकताच हत्ती संरक्षणात्मक पवित्रा घेऊन पळून गेले किंवा आक्रमक झाले. हत्तींमध्ये मानवासारखाच ‘पोस्ट-ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ म्हणजे मानसिक आघाताचा परिणाम दिसून येतो. लहानपणी जर एखाद्या हत्तीच्या समोर त्याच्या आईची शिकार झाली असेल, किंवा एखाद्या माणसाने/ माहुताने त्याला क्रूरपणे मारहाण केली असेल, तर तो हत्ती त्या घटनेचा आणि माणसाचा राग मनात धरून ठेवतो. मोठा झाल्यावर तो माणूस समोर आल्यास हत्ती त्याच्यावर प्राणघातक हल्ला करू शकतो. एखाद्या विशिष्ट भागात जर मानवाकडून हत्तींशी गैरवर्तन झाले असेल, तर ती भीती आणि राग कळपातील ज्येष्ठ मादी आपल्या लहान पिल्लांमध्येही संक्रमित करते. त्यामुळे ती पिल्ले मोठी झाल्यावर मानवाला पाहताच आपोआप आक्रमक होतात, जरी त्यांनी स्वतः तो अत्याचार अनुभवला नसला तरीही.
हत्ती जशी वाईट घटना लक्षात ठेवतात, तसेच प्रेम आणि आपुलकीही ते कधीच विसरत नाहीत. अनेक वर्षांपूर्वी त्यांना वाचवणाऱ्या रेस्क्यूअरला किंवा प्रेम देणाऱ्या माहुताला हत्ती 10-20 वर्षांनंतर भेटल्यावरही ओळखतात, त्यांच्याजवळ जाऊन सोंडेने स्पर्श करतात आणि आनंद व्यक्त करतात. थोडक्यात सांगायचे तर, हत्तीचा मेंदू हा एखाद्या डायरीसारखा असतो. त्यात नोंदवलेली प्रत्येक चांगली आणि वाईट घटना तो आयुष्यभर जपून ठेवतो आणि त्यानुसारच मानवाशी व्यवहार करतो.
आपल्या संस्कृतीत हत्तीला नेहमीच आदराचे आणि श्रद्धेचे स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव तर जगप्रसिद्ध आहेच. भारतातील कुठल्याही धार्मिक विधीचा शुभारंभ गणपतीची पूजा केल्याशिवाय होत नाही. हत्तीचे मुख असलेला तो ‘गजानन’ आपल्या सर्वांचा प्रिय आहे. आपले विघ्न हरतो म्हणून आपण त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणतो. परंतु, या विश्वासामध्ये आणि श्रद्धेमध्ये कमालीचा विरोधाभास दडला आहे. आपल्या समाजात गणपती आगमनाची तयारी आपण किती उत्साहात, थाटामाटात आणि आनंदात करतो! पण त्याच गणेशाचे विसर्जन झाल्यावर चौपाट्यांवर किंवा तलावाकाठी हात-पाय तुटलेल्या, उघड्यावर पडलेल्या मातीच्या मूर्ती पाहून मन हेलावून जाते. मानवी स्वभाव किती स्वार्थी आणि हावरट असावा नाही? मानवाला बाप्पाकडून बळ, बुद्धी, समृद्धी आणि संपत्ती सर्वकाही हवे असते; त्याचा आशीर्वाद हवा असतो. पण त्याला केवळ ‘कामापुरता’ वापरून नंतर त्याचा असा अनादर केला जातो.
हेही वाचा – रणरणत्या उन्हातील संन्यस्त पलाश…
दुर्दैवाने जिवंत हत्तींच्या बाबतीतही हेच घडत आहे. मातीच्या तुटलेल्या मूर्ती पाहून ज्या माणसाचे मन दुःखाने भरून येते, त्याच माणसाचे मन गाडीच्या धडकेत किंवा शिकारीत तडफडून मरणाऱ्या ‘जिवंत’ हत्तीला पाहून कसे बरे द्रवत नाही? हत्तींच्या दुर्दैवाने मानवाच्या हावरटपणाला कधीच सीमा उरली नाही. याचे सर्वात भयानक उदाहरण म्हणजे वीरप्पन! दक्षिण भारतातील जंगलांवर अनेक दशके राज्य करणाऱ्या या कुख्यात तस्कराने केवळ स्वतःच्या संपत्ती आणि लालसेपायी 2 हजारांहून अधिक हत्तींची निघृण हत्या केली. हत्तींचे ते सुंदर, नैसर्गिक हस्तिदंत (Ivory) हेच त्यांचे वैरी बनले. केवळ शोभेच्या वस्तू, दागिने आणि मानवी प्रतिष्ठा जपण्यासाठी हत्तींच्या भल्यामोठ्या दाढा आणि दात क्रुरपणे उपटून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात तडफडून मारले गेले. प्रसिद्ध ब्रिटिश पर्यावरणतज्ज्ञ डॉ. इयान डग्लस-हॅमिल्टन यांनी म्हणूनच मानवाला हादरवून टाकणारा इशारा दिला होता — “Elephants cannot be manufactured. Once they are gone, nothing can replace them.”
दुसरीकडे, दक्षिण भारतातील (तमिळनाडू, केरळ, कर्नाटक) भव्य मंदिरांमध्ये हत्तीला ‘गजराजाचे’ रूप म्हणून पूजले जाते. केरळमधील त्रिसूर पूरमसारख्या सणांमध्ये किंवा मंदिरांमधील विधींमध्ये त्याला मानाचे स्थान दिले जाते. परंतु, याच श्रद्धेच्या किंवा वापराच्या नावाखाली मानवाने हत्तीला लोखंडी साखळदंडांत बांधून ‘गुलाम’ बनवले. त्याची ताकद आणि बुद्धिमत्ता मोडून काढण्यासाठी त्याला लहानपणापासून क्रूरपणे निष्प्रभ केले जाते. सफारी किंवा पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्तींचे वास्तव तर आणखीच विषण्ण करणारे आहे. पर्यटनाच्या ठिकाणी हत्तीने माहुताचे ऐकले नाही, तर त्याला ‘शिस्तीचा किंवा ट्रेनिंगचा भाग’ म्हणून कित्येक तास अन्नापासून वंचित ठेवले जाते! ज्या प्राण्याला एका दिवसाला शेकडो किलो अन्नाची गरज असते, त्याला केवळ माणसाच्या तालावर नाचवण्यासाठी उपाशी ठेवणे हे कसले ‘ट्रेनिंग’? भीती आणि भुकेचा वापर करून हत्तींचा स्वाभिमान मोडून काढणे, ही मानवी क्रूरतेचीचं एक सुसंस्कृत आवृत्ती आहे. हत्ती हा माणसाचा गुलाम किंवा मनोरंजनाचे साधन नसून निसर्गाचा एक स्वतंत्र आणि स्वाभिमानी घटक आहे. निसर्गाने त्याला दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्याला बेड्यांमध्ये अडकवणे ही मानवी संस्कृतीला शोभणारी गोष्ट नाही.
आज हत्ती अस्तित्वाच्या भीषण संघर्षाशी झगडत आहे. आसामसारख्या समृद्ध वन्यप्रदेशात हत्तींचे पारंपरिक स्थलांतराचे मार्ग (Elephant Corridors) कापून तिथून रेल्वे धावू लागली आहे. अंधाऱ्या रात्री अन्नाच्या किंवा पाण्याच्या शोधात रुळ ओलांडणारा हत्तींचा कळप जेव्हा ताशी 100 किमी वेगाने येणाऱ्या लोखंडी आगगाडीच्या धडकेत येतो, तेव्हा होणारा विनाश थरकाप उडवणारा असतो. आसाममध्ये रेल्वेच्या धडकेने मृत पावलेले हत्ती किंवा त्यांच्या निष्पाप पिल्लांचे छिन्नविच्छिन्न झालेले देह ही मानवी ‘विकास’ आणि निसर्गातील संघर्षाची सर्वात क्रूर चित्रे आहेत.
जंगले तोडली गेली, त्यांच्या पारंपरिक मार्गांवर काँक्रीटची जंगले उभारली गेली. मूळचा शांत आणि समजूतदार असलेला हा प्राणी आज स्वतःच्या अन्नासाठी आणि पिल्लांच्या रक्षणासाठी आक्रमक झालेला दिसतो. ही आक्रमकता त्याची प्रवृत्ती नसून मानवाने त्याच्या अस्तित्वावर आणलेल्या संकटाची ती एक असहाय्य प्रतिक्रिया आहे.
या भीषण संघर्षावर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने देशभरात हत्तींच्या सुरक्षित स्थलांतरासाठी 100हून अधिक ‘एलिफंट कॉरिडॉर्स’ (Elephant Corridors) चिन्हित केले आहेत. या विशेष मार्गांवर वाहनांचा वेग नियंत्रित करणे, अंडरपास किंवा ओव्हरब्रिज उभारणे आणि रेल्वे रुळांजवळ एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित ‘गजराज’ सारख्या अर्ली वॉर्निंग सिस्टिम्स बसवणे यांसारखे प्रयत्न सुरू आहेत. पण हे मार्ग पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करणे आणि कागदावरील कॉरिडॉर्स प्रत्यक्षात सुरक्षित करणे, हे अजूनही मोठे आव्हान आहे.
हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!
हत्ती ही निसर्गाची केवळ एक भव्य निर्मिती नाही; सुमारे 70 वर्षांचे समृद्ध आयुष्य लाभलेला हा प्राणी आपल्या वसुंधरेचा खरा ‘इकोसिस्टीम इंजिनीअर’ (Ecosystem Engineer) म्हणजे ‘परिसंस्थेचा शिल्पकार’ आहे. हत्ती जेव्हा जंगलातून चालतात, तेव्हा ते स्वतःच्या अवाढव्य शरीराने घनदाट झाडीत रस्ते तयार करतात, ज्याचा वापर इतर अनेक लहान प्राण्यांना प्रवासासाठी होतो. उन्हाळ्यात जेव्हा नद्या सुकतात, तेव्हा हत्ती आपल्या सोंडेने आणि पायांनी जमिनीत खड्डे खोदून पाणी शोधतात; या पाण्यामुळे जंगलातील शेकडो इतर वन्यजीवांची तहान भागते. हत्ती दिवसाकाठी शेकडो किलो वनस्पती खातात आणि मैलोन्मैल फिरतात. त्यांच्या लीदीतून (विष्ठा) हजारो झाडांच्या बियांचे रोपण होते. अनेक दुर्मीळ वृक्षांच्या बिया तर हत्तीच्या पचनसंस्थेतून गेल्याशिवाय अंकुरितच होऊ शकत नाहीत!
थोडक्यात सांगायचे तर, हत्ती टिकला तरच जंगल टिकेल, आणि जंगल टिकले तरच आपली मानवजात टिकेल!
हत्तींच्या अथांग स्मरणशक्तीत मानवी क्रूरतेच्या काळ्या आठवणी राहाव्यात की, आपल्या प्रेमाची आणि संरक्षणाची निगा, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. शेवटी माणसाने आपली हावरट वृत्ती सोडून हत्तींशी पुन्हा मैत्री करणे आणि त्यांच्या मनात मानवाबद्दलचा विश्वास निर्माण करणे आज सर्वाधिक गरजेचे आहे.


