होळी झाली की, वातावरणामध्ये बदल होतो. दिवसाचे तापमान हळूहळू वाढायला सुरुवात होते. मार्चअखेर त्यामध्ये चांगलीच वाढ झालेली असते. वातावरणातील बदलासारखेच निसर्गामध्ये वसंतोत्सवाची तयारी दिसायला लागते. पळस, पांगीरा, बहावा, गुलमोहर, बोगनवेलीया, करंज, काटेसावर आपापले देखणे रंग लेवून आपल्या हृदयात वसंत फुलवतात… “हृदयी वसंत फुलतांना प्रेमास रंग यावे…” असे तर स्वतःशीच म्हणत नसतील ना? कारण झाडांना भावना असतात, असं लहानपणापासून ऐकिवात आहे, ते काही असू दे पण निसर्ग मात्र आपल्या मुक्त हस्ताने रंगांची उधळण, या उत्सवात करत असतो, हे मात्र खरे आहे. प्रत्येक ऋतुमध्ये निसर्ग आपल्या मनमोहक अदाकारीने मानवाला भुरळ पाडतो. निसर्गातील हे ऋतुचक्र एकमेकांच्या हातात हात घालून अनादी काळापासून असेच सुरू आहे.
ग्रीष्माची चाहूल लागली की, पळसाला फुलोरा यायला सुरुवात होते. मला पळसाप्रमाणेच या ऋतूत फुलणारी बहावा, गुलमोहर, काटेसांवर, करंज, बोगनवेलीया, चाफा, मोगरा अशी अनेक मनमोहक झाडे खूप आवडतात. या झाडांचे वैशिष्ट्यच हे आहे की, ग्रीष्मातल्या कडक उन्हातही यांच्या अंगीभूत असलेल्या सुगंधाने आणि आकर्षक रंगाने ते आपल्याला शीतलता देत असतात तसेच, आपल्या गुणांनी वातावरण आल्हाददायक आणि सुसह्य करत असतात. कडक उन्हात या झाडांकडे नजर गेली तरी, मनाला एक वेगळेच समाधान मिळत असते. खरंच, निसर्गाचे हे चमत्कार अनाकलनीय आहेत. माणसाला निसर्ग समजायला कितीतरी जन्म घ्यावे लागतील, तेव्हा कुठे पूर्णतः तर नाहीच, पण थोडेफार नैसर्गिक गूढ उकलण्यात मानव यशस्वी होऊ शकेल. मानवाने निसर्गनिर्मित ज्या गोष्टी आहेत, त्या आहे तशाच राहू दिल्या तर, किती बरं होईल? विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाची खूप मोठी हानी करतो आहे. हे दुष्टचक्र थांबले तर… निसर्ग पाहा मानवाला आपल्या सहस्त्र हातांनी किती भरभरून दान देतो फक्त मनुष्याने या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला नको!
गुढीपाडवा झाल्यावर जंगलात गेल्यास अख्खं जंगल पळसाच्या अग्निशिखांनी भगवे झालेले आपल्याला दिसते. असंख्य ऋषिमुनी, संन्यासी आपल्या भगव्या वेशभूषेने सुसज्ज होऊन तिथे कुठल्या तरी, अधिष्ठानासाठी एकत्र जमले आहेत, अस वाटतं. आकाशात तळपणारा सूर्य आणि खाली त्यालाच साथ देणारे हे यज्ञकुंडासारखे केशरी रंगाचे उभे ठाकलेले अनेक पलाशवृक्ष पाहिले की, अचंबित व्हायला होत. मला खरंच पळसाचे झाड एखाद्या संन्याशासारखे वाटतं. वर्षभर निद्रीस्त असलेला हा संन्यासी या वसंत ऋतूत आपले खरे रूप दाखवायला सुरू करतो…
हेही वाचा – मनात बहरलेला गुलमोहर!
आता हा इतका सुंदर संन्यासी पाहिल्यावर त्याला वश करून घेण्याकरिता निसर्गातील इतर फुलझाडेदेखील स्वतःचे सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करत असावेत, असं असावं बहुतेक! पाहा नं, मनमोहक बहावा आपल्या पिवळ्याधम्मक सोनसळी फुलांनी लदबदलेल्या आपल्या फांदीरूपी हाताने या भगव्या रंगाने नटलेल्या पळसाला आपल्या बाहुत घेण्याचा प्रयत्न करत असताना ‘आम्रपाली’ सिनेमातील मीना कुमारीप्रमाणे त्या पळसाला म्हणत असावा का?
संसार से भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे?
इस लोक को भी अपना न सके, उस लोक में भी पछताओगे…
दुसरीकडे फॉरेनची जरी असली तरी आता भारतीय झालेली बोगनवेलीया सुद्धा आपला आकर्षक रंगांचा नटवेपणा दाखवून याला मोहात पाडण्यास उत्सुक असते. ती बोगनवेलसुद्धा त्याला आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी त्याचे आराधना करत असताना म्हणत असेल
मुझको अपने गले लगा लो, ऐ मेरे हमराही
तुम को क्या बतलाऊँ मैं के तुमसे कितना प्यार है…
गुलमोहराचे मात्र वेगळेच काहीतरी सुरू असतं. हा आपल्या परदेशी नियमानुसार सतत पलाश वृक्षाशी तुलना करताना दिसतो. पळसाप्रमाणेच गुलमोहर आपल्या केशरी आणि लालभडक रंगाने आकर्षणाचे केंद्र होण्याचा प्रयत्न करत असतो… परंतु पळसाची बातच काही न्यारी आहे.
काटेसांवर आपल्या मोठ्या आणि लालसर गुलाबी रंगाने पळसासमोर मीपण काही कमी नाही हे दाखवत असतो, परंतु वसंत ॠतुमधला मानांकित मात्र पलाशच (पळस)! पुराणांमध्ये नाही का एखाद्या ऋषींची तपस्या भंग करण्याकरता मेनका, अप्सरा, रंभा, उर्वशी आपले सौंदर्य पणास लावायच्या, तशा प्रकारेच या भगव्या रंगधारी संन्यासी पळस वृक्षाला आपल्या रुपाची आणि रंगाची मोहिनी घालण्याचा बहावा, काटेसांवर, बोगनवेलीया अशा सुंदर अप्सरा, मेनकारूपी झाडांचा प्रयत्न असावा. हे असं दरवर्षीच चाललेले असतं, परंतु हा आपला भगवा रंग ल्यालेला सुंदर पलाशरूपी संन्यासी यांना काही दाद देत नाही. आजपर्यंत तरी याची तपस्या निसर्गातील कोणतेही अप्सरारूपी झाड भंग करू शकले नाही.
पळसाला फक्त संन्यस्त राहून आपल्या अंगीभूत असलेल्या गुणांनी इतरांना आपले औषधीयुक्त दान देऊन सुखी करणे इतकेच माहीत असतं. तो सहसा मोहपाशात अडकत नाही म्हणून तर तो इतरांपेक्षा वेगळा दिसतो. ‘पळसाला पाने तीनच’, ही म्हणसुद्धा या झाडाच्या हटवादीपणाला धरुनच असावी. हा वृक्ष खरच एखाद्या निष्काम कर्मयोग्यासारखा वाटतो. संन्यस्त राहून आपल्या शरीरावर फक्त तीन तीन पानांची वस्त्रे धारण करून वर्षभर समाधीस्थ व्हायचं आणि वसंतॠतू येताच, आपल्या भावसमाधीतून जागं होऊन आपल्या तपस्येने प्राप्त केलेले बल जगाच्या कल्याणाकरिता दान करायचे. या ऋतूमध्ये पळसाच्या झाडाकडे पाहिले की, अशा अनेक गोष्टी माझ्या मनात रुंजी घालू लागतात, म्हणून तर “रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा…” असा हा पलाश वृक्ष वाटतो.
हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!
तो भगवा, केशरी आहे, पण आकर्षक आहे. आपल्या रूपाने मनमोहीत करणारा आहे, डौलदार आहे… संन्यस्त वाटत असला तरी अनेकांना भुरळ पाडणारा आहे. आपल्या रंगाने तेजोमय असलेला हा पलाश स्वरक्षणासाठी सिद्ध असलेल्या एखाद्या योद्धा संन्याशासारखा आहे. या वृक्षाला पाहिले की, माझ्या कल्पनेचा वारू चौखूर उधळू लागतो. याच्या सौंदर्याकडे पाहिले की, तो दग्ध दिसत असला तरी मनःशांती देणारा शीतल गुणधर्माचा आहे. हा रूक्ष वाटत असला तरी, त्याच्या केशरी फुलांच्या दांड्यांना स्पर्श केलात तर मायेच्या मऊ हातासारखा आहे. तो खरंच वैरागी वाटत असला तरी आपल्या वैराग्याच्या रंगात सगळ्यांना रंगवणारा आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये आपल्याजवळचे जे असेल ते समर्पण करायचे आणि भविष्यातल्या एका नव्या संकल्प सिद्धीकरता ध्यानस्थ व्हायचे, अशा वैराग्याचा अनोखा नजारा पेश करत आपले वेगळेपण जपणारा हा पलाशवृक्ष खरंच संन्यस्त आहे.


