डॉ. किशोर महाबळ
विज्ञानाचे काही शिक्षक काही प्रमाणात तरी संगणकाचा उपयोग करताना दिसतात. मात्र अनेक शाळा महाविद्यालयांत भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र यासारखे विषय आणि वेगवेगळ्या भाषा शिकविणारे शिक्षक मात्र संगणकाचा उपयोग करताना दिसत नाहीत. असे का व्हावे?
विज्ञानातील गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांतील काही विषय शालेय स्तरावर शिकविले जातात. या विषयांसंबधी खूप माहिती इंटरनेटवर सहजगत्या मिळू शकते. त्याशिवाय, विविध प्रकारच्या आकृत्या, विविध रंगांची रसायने, विविध आकाराच्या आणि रंगांच्या वनस्पती, वृक्ष, पशू, पक्षी, पदार्थ यांची असंख्य चित्रे, फोटो उपलब्ध आहेत. तसेच, विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील विविध संकल्पना स्पष्ट करणाऱ्या चित्रफिती आहेत. या संकल्पना कशा शिकवाव्या, हे शिक्षकांना शिकविणाऱ्या चित्रफितीही आहेत. त्याचबरोबर असंख्य माहितीपट, चित्रफीती आणि विज्ञानविषयक संकल्पनांची, विषयांची, शास्त्रज्ञांची, संशोधन प्रकल्पांची तसेच त्यातून मिळालेल्या निष्कर्षांची माहिती देणाऱ्या वेबसाइट्स आहेत. हे सर्व साहित्य अत्यंत आकर्षकरित्या आणि रंजकपणे सादर केलेले असते.
नामवंत शास्त्रज्ञ तसेच नामवंत प्राध्यापकांच्या मुलाखती आणि त्यांची व्याख्यानेही युट्यूबवर पहाता, ऐकता येऊ शकतात. विज्ञानाचे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हा ज्ञानाचा खजिना आता सहजगत्या उपलब्ध झाला आहे. त्यामुळे विज्ञानाचे अध्यापन करण्यात इंटरनेट आणि संगणकाचा खूप उपयोग होतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. मात्र, अन्य विषयांच्या अध्यापनातही इंटरनेट आणि संगणकाचा भरपूर उपयोग करता येतो, याची बहुतांश शिक्षकांना अजूनही माहिती नाही, असे दिसते.
हेही वाचा – सर्व विद्यार्थ्यांना निसर्गाचा अभ्यास करू द्या!
भाषाशिक्षण (Language learning)
सहजगत्या, रंजकतेने, कोणतीही भाषा कशी शिकायची किंवा शिकवायची, हे सांगणाऱ्या असंख्य वेबसाइट्स उपलब्ध आहेत. प्रत्येक भाषेचा कमीतकमी एक शब्दकोश आणि इंग्रजीचे असंख्य शब्दकोश इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करून शब्दांचा योग्य उपयोग तसेच शब्दांचा योग्य उच्चार कसा करायचा, याचीही माहिती मिळते. बहुतांश भाषांतील उत्तम दर्जाचे साहित्य, कथा, निबंध, कादंबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इंटरनेटवर भाषांतर स्वरुपात वाचायला मिळू शकतात. कविता, व्याकरण शिकणे सोपे जावे म्हणून नामवंत भाषातज्ज्ञांनी तयार केलेले साहित्यही सहजगत्या मिळू शकते. भाषा शिक्षण हे सोपे व्हावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोड्यांसारखे खेळही या माहितीच्या महाजालात उपलब्ध आहेत. वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग कसा करावा, अचूक आणि अर्थपूर्ण वाक्यरचना कशी करावी, हे शिकणे आता कठीण राहिलेले नाही. नामवंत लेखकांच्या मुलाखती, काव्यवाचन, चर्चाही इंटरनेटवर ऐकता येतात.
भूगोलाच्या शिक्षकांसाठीही अशीच खूप प्रकारची माहिती उपलब्ध आहे. जगातील विविध खंड, देश, प्रदेश, जिल्हा, प्रांत, गाव यांचे नकाशे विकिमॅपिया सारख्या माहिती स्थळांवरून सहजगत्या मिळू शकतात. जगभरातील जमिनींचे प्रकार, उद्याने, जंगले, बर्फाळ प्रदेश, धबधबे, तलाव, खाड्या, नद्या, समुद्र, महासागर, वाळवंट, पठार, डोंगर, तसेच सह्याद्री, सातपुडा आणि हिमालयासारख्या जगभरातील पर्वतराजी, पृथ्वी अशा भूगोलासंबंधी असंख्य विषयांवर असंख्य फोटो, चित्रफिती आणि माहिती देणाऱ्या वेबसाइट्स आज उपलब्ध आहेत. या सर्व साधनांचा उपयोग केल्यास भूगोल हा विषय अतिशय उत्तमरित्या शिकविता येऊ शकतो.
इतिहास
इतिहास शिकविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे खूप सारे साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे. जगभरातील ऐतिहासिक घटना, त्या घटनांमागची कारणे आणि परिणाम, त्या घटना जिथे घडल्या ती ठिकाणे, त्या ठिकाणांचे नकाशे, घटनांवर प्रभाव पाडणारे स्त्री-पुरूष, त्या घटनांतील सहभागी व्यक्ती अशासारख्या असंख्य ऐतिहासिक विषयांबद्दल हवी तेवढी माहिती, चित्रे, चित्रफिती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. युद्धे, क्रांत्या, विविध देशांचे इतिहास, किल्ले, वेगवेगळ्या कालखंडातील नाणी, वस्त्रप्रावरणे आणि राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती अशा इतिहासाशी संबंधित विषयांवरही खूप सारे साहित्य आज उपलब्ध आहे. याशिवाय, जगभरातील सर्व महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांची भरपूर माहिती, फोटो, चित्रे, चित्रफिती, माहितीपट या विविध प्रकारांत इंटरनेटवर उपलब्ध आहे.
राज्यशास्त्र (Political Science)
नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी खूप सारे साहित्य आज उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटना, मानवी हक्क, मूलभूत हक्क, संसदेची माहिती, संसदेतील कामकाजाची माहिती देणाऱ्या वेबसाइटस आहेत. विविध देशांच्या राज्यघटना, त्या देशांतील राज्यव्यवस्था, देशांचे ध्वज, संयुक्त राष्ट्राच्या कार्याची माहिती देणाऱ्या असंख्य वेबसाइट्स आहेत. यामुळे जगभरातील विविध समस्यांची, प्रश्नांची, आव्हानांची माहिती मिळू शकते. जगभरातील हजारो वर्तमानपत्रे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या असंख्य घटनांची भरपूर माहिती घरबसल्या मिळवता येऊ शकते.
हेही वाचा – Education : शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक हवा
शैक्षणिक मानसशास्त्र (Educational Psychology)
विविध विषय उत्तमरित्या, सर्जनशीलपणे, रंजकतेने कसे शिकवायचे, अध्यापन करताना कोणती काळजी घ्यावी. वर्गात कसे बोलावे, कसे शिकवावे, वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा, दृकश्राव्य माध्यमांचा कसा उपयोग करावा, शैक्षणिक उपक्रम कसे घ्यावेत, विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवावा, प्रोत्साहन कसे द्यावे यासारख्या तसेच शैक्षणिक तत्वज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक तंत्रज्ञान अशा विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या अक्षरश: असंख्य चित्रफिती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. विविध विषयांतील नामवंत प्राध्यापक, संशोधक यांनी या विषयांवर आपले अनुभव या चित्रफितीतून मांडले आहेत. याविषयांवरील संशोधनातून आढळलेले निष्कर्षही वेबसाइटवर उपलब्ध आहेत. त्यापैकी काही चित्रफिती जरी शिक्षकांनी नीट बघितल्या तरी त्यांना चांगले अध्यापन करण्याबद्दल उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल.
इंटरनेटवरील सर्वच माहिती काही आपण विद्यार्थ्यांना सांगणे अपेक्षित नाही आणि ते शक्यही नाही. मग इंटरनेटचा उपयोग का करायचा? असा प्रश्न पडू शकेल. ही माहिती वाचण्याने तसेच चित्रफिती बघण्याने शिक्षकांना आपल्या विषयाचे अद्ययावत ज्ञान मिळविणे शक्य होईल. नव्या संदर्भात आपला विषय कसा शिकवायचा, हेही कळेल. आपल्याला आपल्या विषयाचे सर्वच कळते, असा अहंकार अनेक शिक्षक आणि प्राध्यापकांमध्ये बघायला मिळतो. त्यामुळे त्यांचा अभ्यासही थांबतो आणि विकासही थांबतो. इंटरनेटवरील माहिती आणि संशोधनपर मजकूर वाचनाची सवय लागली, तर आपण स्वतःला बौद्धिक अहंकारापासून मुक्त ठेवू शकू आणि चांगले अध्यापन करण्यात यशस्वी होऊ शकू… तेच तर आपले मुख्य ध्येय असायला हवे नाही का?


