डॉ. किशोर महाबळ
शालेय विद्यार्थ्यांच्या मनात विविध विषयांबद्दल असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. त्यात त्यांच्या अभ्यासाचे विषय, आजूबाजूच्या घटना, सृष्टीत घडून येणारे विविध भौतिक बदल, त्यांच्या शरीरात होणारे बदल, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मोठ्या माणसांचे अनाकलनीय वर्तन, सामाजिक प्रथा-परंपरा, दारिद्र्य आणि त्या ओघाने आर्थिक प्रश्न, चांगले-वाईट आणि योग्य-अयोग्य कशावरून ठरवायचे… अशा असंख्य विषयांबद्दलचे असंख्य प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे त्यांना हवीच असतात; कारण या सर्व विषयांबद्दल त्यांच्या मनात कमालीची उत्सुकता असते.
ही लहान मुले मग आई-वडिलांना, आजी-आजोबांना किंवा जवळच्या नातेवाईकांना प्रश्न विचारू लागतात. आई, वडील सुशिक्षित असतील, त्यांना बालमानसशास्त्राचे ज्ञान असेल, तर ते प्रश्नांची आवर्जून उत्तरे देतात. ज्या प्रश्नांची उत्तरे माहीत नसतील त्या प्रश्नांची उत्तरे शोधून ती आपल्या पाल्यांना सांगतात. उत्तरे माहीत नसतील तर, तसे स्पष्टपणे सांगून प्रश्नांची उत्तरे तुझ्या शिक्षकांना विचार, असे सुचवितात. मात्र, असंख्य पालकांना हे सारे करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे वाटते. ते काही प्रश्नांची उत्तरे देतात, काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळतात, कारण त्यांनाच त्या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत. तर, काही प्रश्नांना फालतू प्रश्न मानून उत्तरे देत नाहीत. अनेकदा सारखे सारखे प्रश्न विचारल्याबद्दल रागावतात आणि सांगितले तेवढे नीट कर, प्रश्न विचारू नकोस असे सांगतात.
विद्यार्थ्यांना शाळेत येणारा अनुभवही यापेक्षा काही वेगळा नसतो. विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नांना उत्तरे देत गेलो तर, अपेक्षित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करता येणार नाही, असे म्हणत काही शिक्षक प्रश्नांची उत्तरे देणे टाळतात. अज्ञान आणि अपुऱ्या अभ्यासामुळे काही शिक्षकांना प्रश्नांची उत्तरेच येत नाहीत आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अभ्यास करण्याची तयारी नसते. आपल्याला उत्तर येत नाहीत, हे स्पष्टपणे सांगण्याचे धाडस नसते. असे शिक्षक मग प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना टाळतात. त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्नच कसे चुकीचे आहेत, हे सांगतात किंवा वारंवार प्रश्न विचारल्याबद्दल इतरांसमोर या विद्यार्थ्यांवर टीका करून त्यांचा अपमान करतात आणि त्यांना गप्प बसायला सांगतात. घरात आणि शाळेत वारंवार असा अनुभव आला तर, शेवटी विद्यार्थी प्रश्न विचारणे सोडून देतात.
बालवयात असंख्य प्रश्न पडणे, ही खरेतर अत्यंत नैसर्गिक अशी गोष्ट आहे. स्वतःच अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे कशी मिळवायची, हे या लहान मुलामुलींना माहीत नसल्याने आई-वडील, शिक्षक किंवा त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीला आपले प्रश्न विचारण्याशिवाय या मुलामुलींना पर्यायच नसतो, हे लक्षातच घेतले जात नाही.
हेही वाचा – ‘वेगळ्या’ चित्रकारांचा शोध
खरेतर, प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करायला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्न हे त्यांच्यातील तीव्र जिज्ञासेचे लक्षण असते. जे विद्यार्थी अभ्यास करतात, विचार करतात, परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करतात… अशावेळी ज्यांना काही गोष्टींचा उलगडा होत नाही, त्यांनाच प्रश्न पडतात. हे विद्यार्थी आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इतर विद्यार्थ्यांपेक्षा हौसेने तसेच उत्साहाने जास्त अभ्यास करतात अन् समाधानकारक उत्तर मिळेस्तोवर आपला अभ्यास सुरूच ठेवतात. या अभ्यासातून त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतातच, पण या निमित्ताने अभ्यासाच्या विषयासंबंधीचे आकलन वाढते. उत्सुकतेने अभ्यास करून उत्तर शोधल्यामुळे ते उत्तर आणि तो विषय दीर्घकाळ लक्षात राहतो. प्रश्नांमुळे उत्सुकता वाढते व उत्तरे शोधण्याची आपोआप सवय लागते आणि अध्ययन चांगले होते. विचारशक्ती, तर्कशक्ती, ग्रहणशक्ती विकसित होते. स्वयंअध्ययन करण्याची सवय लागते. ही सवय आयुष्यभर उपयोगी पडते.
हे सर्व लाभ लक्षात घेऊन पालक आणि शिक्षकांनी प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि जे विद्यार्थी प्रश्न विचारीत नाहीत त्यांच्यातील जिज्ञासा कशी वाढविता येईल, यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.
आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची, याचा विचार करूया. गणिताचे एक शिक्षक वर्गात आल्यावर एक एक गणित फळ्यावर लिहीत आणि ते स्वत:च सोडवून दाखवित असत. खरेतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देणे बरोबर नाही. कारण त्यामुळे उत्तरासाठी कायम शिक्षकांवर अवलंबून राहण्याची त्यांना सवय लागते. ही सवय त्यांच्या बौद्धिक विकासातील मोठाच अडथळा ठरेल. याउलट विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मार्गदर्शन करणे, उत्तर शोधून काढण्यासाठी कसा विचार करावा, कोणत्या विषयांचा सखोल अभ्यास करावा, पाठ्यपुस्तकात किंवा संदर्भग्रंथांत उत्तरे कशी आणि कुठे शोधायची, हे सुचविणे… हे पालकांचे आणि शिक्षकांचे खरे काम आहे. यामुळे आपण विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्याचे प्रशिक्षण देऊ शकू. तसेच पालकांना तसेच शिक्षकांना सर्वच विषयांवरील सर्वच प्रश्नांची उत्तरे देता येतील, हा त्यांच्या मनातील गैरसमजही दूर करता येईल.
पालक आणि शिक्षकांनीही आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे येतात, असे समजू नये. आपणही विद्यार्थीच आहोत, ही विनम्रतेची भूमिका घ्यावी. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर शिक्षकांनी तसे स्पष्टपणे सांगण्यात कोणताच कमीपणा मानण्याची गरज नाही. मात्र होता होईतो अधिक अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र केलाच पाहिजे. ते अगदीच अशक्य असले तर त्या विषयाच्या तज्ज्ञांशी विद्यार्थ्यांची भेट घालून देणे, हे उपयुक्त ठरेल. कोणत्याही कारणाने प्रश्न विचारण्यापासून विद्यार्थी परावृत्त होणार नाहीत, हे बघितले पाहिजे.
हेही वाचा – सर्व विद्यार्थ्यांना निसर्गाचा अभ्यास करू द्या!
मानवी सभ्यतेचा, विज्ञानाचा विकास हा वेळोवेळी संशोधकांनी, विद्वानांनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी, वैज्ञानिकांनी प्रश्न विचारण्यातूनच झाला आहे, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. का, कधी, कसे, कुठे, केव्हा यासारखे प्रश्न गेल्या हजारो वर्षांत लक्षावधी संशोधकांनी वेगवेगळ्या संदर्भात उपस्थित केले आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळेच नवनवीन शोध लागले. मनुष्यजीवनातील अनेक प्रश्न सुटले आणि मानवी जीवन अधिक सुकर तसेच सुखकारक होत गेले. आज प्रश्न विचारणारे विद्यार्थी हे या पिढीतले संशोधक आहेत, असे आपण मानले पाहिजे आणि त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीस प्रोत्साहन दिले पाहिजे, तरच या पिढीसमोरचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला नवे संशोधक, वैज्ञानिक मिळतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आपण महत्त्व दिले पाहिजे.
कोणताही प्रश्न हा फालतू, चूक आणि बिनकामाचा नसतो. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळविण्याची संधी आणि त्यासाठी मार्गदर्शन हे मिळालेच पाहिजे. प्रश्न मनात जिज्ञासा निर्माण करतात. जिज्ञासेतूनच कृतिप्रवणता येते. कृतिप्रवणता ही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात अत्यंत उपयुक्त ठरते. प्रश्नांची उत्तरे ही व्यक्तीची जाण आणि ज्ञान वाढवितात. कोणाही विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्याची भीती वाटणार नाही, प्रश्न विचारल्याबद्दल कोणाही विद्यार्थ्यांचा अपमान होणार नाही, असे वातावरण शाळेतील प्रत्येक वर्गात निर्माण झाले पाहिजे. चांगले प्रश्न विचारल्याबद्दल विद्यार्थ्याचे अभिनंदन केले गेले पाहिजे आणि त्याला त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मार्गदर्शन केले गेले पाहिजे; कारण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला मोठीच मदत होणार आहे.


