Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    October 3, 2026

    फिट्टमफाट

    October 3, 2026

    टेंशन घेताय? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!
    ललित

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करOctober 3, 2026No Comments10 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रदीप केळुस्कर, लेखक प्रदीप केळुसकर, सुमनताई, सुमनताईंचा पत्रिकेवर विश्वास, सचिनचे लग्न, सचिनची पत्रिका, सचिनचे प्रेम, सचिन नीला, नीलाची पत्रिका, ज्योतिषी महादेवशास्त्री, सचिनचे दु:ख, नीलाचे लग्न, बत्तीस गुण जुळणारी पत्रिका
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आज सचिनचा वाढदिवस. त्याचे बाबा पेपर वाचत होते, आई चहा गाळत होती. एवढ्यात फोन वाजला. सचिनच्या बाबांनी म्हणजे जयंतरावांनी फोन उचलला. सचिनची मामी फोनवर होती…

    “आज सचिनचा वाढदिवस ना… म्हणून फोन केला, कितवा वाढदिवस?”

    “अग, अठ्ठवीस संपली, आजपासून एकूणतीसावे सुरू.”

    “मग ताईंना म्हणावे, आता वाट कसली बघताय… सून आणा म्हणावं…”

    “हो, आता आणणारच. एक काम कर, तिच्याशीच बोल! सुमन… फोन घे.”

    चहाचे तीन कप भरून टेबलावर ठेवून सुमनताईने फोन कानाला लावला.

    “हो गं जया… ऐकते आहे मी. आता लग्नाचे पहायलाच हवे, तू पण लक्ष ठेव…”

    “नोकरीवालीच हवी का?”

    “तसं काही नाही. नोकरीवाल्या केल्या की, त्त्यांचं संसाराकडे आणि नवऱ्याकडे दुर्लक्ष… मला घरंदाज सून हवी… मोठ्या माणसांचा आदर ठेवणारी हवी…”

    “मग मी बघू का?”

    “होSS पण मुलीची पत्रिका जुळायला हवी, बाबांना दाखवणार दोन्ही पत्रिका! बाबांनी सिग्नल दिल्याशिवाय पुढे जाणार नाही…”

    “अच्छा,” म्हणून मामीने फोन ठेवला.

    चहाचा कप ओठांना लावत असलेले जयंतराव मधेच म्हणाले,

    “पत्रिकेचे काय हे खुळ? पत्रिका जुळत नाहीत म्हणून लग्ने जमत नाहीत, चांगल्या मुली…”

    “तुम्ही गप्प बसता का? मी महादेवशात्रींची मुलगी आहे… माझ्या माहेरी, माझ्या बाबांनी पत्रिका पाहून मान डोलवल्याशिवाय कोण लग्न करण्याचे धाडस करत नाही. आपलं लग्नसुद्धा बाबांनी दोघांच्या पत्रिका बघूनच झाले, हे विसरू नका.”

    एवढा वेळ शांतपणे चहा पित असलेला सचिन चाचरत चाचारत बोलला…

    “आई, मी एक मुलगी बघितली आहे, माझ्याच ब्रँचमध्ये आहे ती…”

    “काय? मुलगी बघितलीस सुद्धा?”

    “म्हणजे आमचं एकमेकांवर प्रेम…”

    “पण आपल्यातलीच आहे का? नाहीतर खालच्या…”

    “नाही… नाही आई, आपल्यातलीच आहे. हा बघ तिचा फोटो…”

    सचिनने आपल्या मोबाइलमधील मुलीचा फोटो दाखवला.

    “छान आहे की रे… नाव काय तिचे?” बाबा म्हणाले.

    “मुलगी छान आहे, सुशीलही असेल… पण पत्रिका?”

    “अगं पण, मुलगी छान दिसते आहे… सचिनला आवडली आहे… मग हे पत्रिकेचे काय?”

    “आहे… पत्रिकेला खूप महत्त्व आहे! जन्मवेळेला ग्रह कोणत्या स्थितीत होते, हे पत्रिकेमुळेच कळते… शिवाय गोत्र, नाडी वगैरे सर्व महत्त्वाचे असते.”

    “पूर्वीच्या काळी हे ठीक होते, पण आजच्या काळात लग्नाला मुली मिळत नाहीत. आजकाल मुली खूप शिकतात, त्यांना पाच आकडी पगार घेणारा आणि घरात आईबाबा नसणारा नवरा हवा असतो… आपला सचिन जेमतेम ग्रॅज्युएट झालेला आणि माझ्या ओळखीने म्हणून या सहकारी बँकेत चिकटला!”

    “ते काही नाही… मी एका ज्योतिषाची मुलगी आहे. लहानपणापासून मी त्या संस्कारात वाढले. बाबा दोन्ही पत्रिका बघतील आणि गुण जुळले तरच पुढे… तिची पत्रिका आहे काय?”

    “नाही… म्हणजे मी विचारले नाही…”

    “ती रहाते कुठे?”

    “राजारामपुरीत… चौथी गल्ली, खांडेकरांच्या बंगल्याच्या बाजूला.”

    “ठीक, मी बघते…”

    ती चर्चा तिथेच थांबली. सचिनला माहीत होते, आपली आई तिला हवे तसेच करणार… आणि बाबा तिच्यापुढे जास्त बोलू शकणार नाहीत. त्यात आपण रहातो ती जागा पण आईच्या नावावर! तिच्या वडिलांची, म्हणजे थोर ज्योतिषी महादेवशात्री यांची ही जागा. जागा घेण्याएवढी बाबांची परिस्थिती कधीच नव्हती आणि आपली पण नाही! त्यामुळे आईला विरोध करून चालणार नाही.

    सचिन तणावात बँकेत गेला. त्याची प्रेयसी नीला आधीच आलेली होती. रोज तो आपल्या जागेवर बसताना तिला हात दाखवे आणि मग खुर्चीवर बसे… आज त्याने तिला हात दाखवला नाही. त्याने रुमाल बाहेर काढला आणि नीलाकडे न पहाता घाम पुसत खुर्चीवर बसला. नीलाला थोडे आश्यर्य वाटले… पण कधीकधी माणूस आपल्या विचारात असतो, असे समजून ती गप्प बसली.

    0000

    सुमनताई भर दुपारीच बाहेर पडल्या. शाहूपुरीत त्या बसमध्ये बसल्या आणि राजारामपुरीत उतरल्या. चालत चालत ती चौथ्या गल्लीतील खांडेकरांच्या बंगल्याकडे पोहोचल्या. त्याशेजारीच नीलाचे घर, असे तिला सचिनने सांगितलेले… त्यांनी घराचा दरवाजा वाजवला. तशी एक अंदाजे पन्नास वर्षांची स्त्री बाहेर आली.

    “तुम्ही नीलाच्या आई काय?”

    “होय. आपण?”

    “मी सचिनची आई. सचिन आणि तुमची नीला एका ब्रँचमध्ये आहेत.”

    “होय होय, नीला म्हणाली मला…”

    “ती दोघे लग्न करण्याचे म्हणत आहेत, माहीत आहे का तुम्हाला?”

    “होय… आम्ही पण तुमच्याचपैकीच…”

    “ते आहेच, पण दुसरे महत्त्वाचे म्हणजे मी प्रसिद्ध ज्योतिषी महादेवशात्री यांची मुलगी…”

    “होय काय?”

    “हो. नीलाची पत्रिका असेल ना?”

    “होय आहे ना! पण…”

    “पत्रिका द्या… पत्रिका चांगल्या गुणांनी जुळल्याशिवाय लग्न होणार नाही.”

    “अहो पण त्यांचे प्रेम आहे ना एकमेकांवर?”

    “प्रेम हे तात्पुरते हो… आयुष्य काढायचे असते… त्यासाठी ग्रह, नक्षत्र यांची साथ हवीच. त्याशिवाय…”

    नीलाच्या आईने मुलीची पत्रिका आणून दिली.

    “तुमचा फोन नंबर सांगा… पत्रिका जुळते किंवा नाही हे कळवते आणि पत्रिका चांगल्या गुणांनी जुळत नसेल, तर हे लग्न होणार नाही, हे लक्षात ठेवा.”

    सुमनताई बाहेर पडल्या… परत बस पकडली आणि त्या भवानी मंडपात उतरल्या. बाबांना दोन्ही पत्रिका दाखविल्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हती. चालत चालत त्या मंगळवार पेठेतील आपल्या माहेरी आल्या. दुपारच्या वेळी सर्वजण जेवण करून वामकुक्षी घेत होते. त्यांना पाहाताच त्यांची वहिनी जया बाहेर आली…

    “वन्स… भर दुपारीच?”

    “हो गं… तू सकाळी फोनवर म्हणालीस ना, सचिनचा लग्नाचे बघा म्हणून…”

    “मग बघायला आजपासून सुरुवात की काय?”

    “सुरुवात कुठली? सच्याने एक मुलगी बघितली सुद्धा!”

    “काय म्हणता? छानच झाले. आजकाल मुलीच नाही हो मिळत! मुलींच्या आणि त्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा खूपच वाढल्यात. त्यात त्यांना सासूसासरे नकोत… सचिनने हे बरं केलं. आपल्यातलीच आहे ना?”

    “आपल्यातलीच आहे गं… पण पत्रिका नको का जुळायला?”

    “ते आहेच. पत्रिकेचे काय ते तुमचे बाबा सांगतील. पण चांगली मुलगी असेल तर, सोडू नका हो!”

    “बाबांना विचारते. बाबा म्हणतील तसे होईल… कुठे गेले बाबा?”

    “आज सकाळपासून खूप गर्दी होती. त्यांना चहा घ्यायला पण वेळ मिळेना. शेवटी काहीजणांना ‘उद्या या’ असे सांगून, दोन घास खाऊन खोलीत पडलेत आत्ताच… मी सांगते त्यांना तुम्ही आल्याचे…”

    तेवढ्यात सुमनताईंचा आवाज ऐकून महादेवशात्री बाहेर आले.

    “सुमन, भर दुपारची आलीस? जेवलीस का? नाहीतर दोन घास खाऊन घे… जया…”

    “नको हो बाबा… मी जेवूनच बाहेर पडले. सचिनने लग्न जमवलेय… आपल्याच बँकेतील मुलीशी!”

    “हो का? आपल्यातलीच आहे का?”

    “हो, आपल्यातलीच आहे.”

    “मग पत्रिका बघितली का?”

    “दोघांच्या पत्रिका आणल्यात मी, तुम्हाला दाखवायला… तुम्ही ‘हो’ म्हटल्याशिवाय पुढे कशी जाईन मी?”

    “बरे बरे… आण त्या पत्रिका.”

    सुमनताईंनी सचिन आणि नीलाची पत्रिका पुढे केली आणि महादेवशात्री त्यांचा अभ्यास करू लागले. दहा मिनिटे महादेवशात्री पत्रिकांचा अभ्यास करत होते… गणिते मांडत होते… शेवटी त्यांचे समाधान झाल्यावर ते म्हणाले,

    “’सुमन, या पत्रिका जुळत नाहीत. परस्परविरोधी पत्रिका आहेत. या मुलीच्या पत्रिकेत संतानयोग नाही. ही मुलगी गर्विष्ठ आहे, तिचे तिच्या सासूसासऱ्याशी जमणार नाही. ही नवऱ्याला पण सुख देणारी नाही… जेमतेम 15 गुण जमतात!”

    “म्हणजे बाबा यांचे लग्न होणे योग्य नाही…”

    “होय. ही मुलगी ज्या घरात जाईल तेथे दुःखच देईल… सबब हे लग्न होणे उचित नाही.”

    “बरं बाबा… तुमच्या विद्येवार माझा विश्वास आहे. मी आजच त्यांना ‘नाही’ म्हणून कळविते.”

    “पण वन्स… दोघांचे प्रेम आहे ना एकमेकांवर?”

    “अगं प्रेम कसलं? ती त्याच्या बँकेत आहे, रोज भेट होते म्हणून प्रेम! ही सोडून दुसरी मुलगी असती तर तिच्यावर प्रेम!!”

    “पण वन्स… सचिन दुखावला जाईल ना यामुळे?”

    “थोडं त्याला वाईट वाटेल, पण दुसरी मुलगी मिळाली की, हिला विसरेल… चल मी निघते… त्यांच्या घरी निरोप द्यायचाय मला.”

    भवानीमंडपात बस पकडून सुमनताई आपल्या घरी परतल्या. आल्या आल्या नवऱ्याला म्हणाल्या…

    “बाबा नको म्हणाले या मुलीबरोबर लग्न… ही नवऱ्याला, सासूसासऱ्यांना सुख देणारी नाही आणि मुळात या मुलीला संतान योग पण नाही!”

    “सुमन, जग कुठे चालले आहे… या ग्रहताऱ्यांवर माणूस वस्ती करणार आहे… तू आणि तुझे बाबा अजून ग्रह, नाडी यातच अडकत आहात. मला हे योग्य वाटतं नाही!”

    “पण माझा यावर विश्वास आहे ना? लहानपणापासून बाबांकडे रोज शेकडो लोक येत असतात. अहो, तुम्ही हे विज्ञान युग म्हणता, पण युनिव्हर्सिटीतले बहुतेक प्रोफेसर, इंजिनीअर्स, डॉक्टर्स गाडी घ्यायची असेल तर मुहूर्त विचारतात… कुठल्या रंगाची गाडी घेऊ हे विचारायला येतात…”

    “कमाल आहे! शेवटी तू काही ऐकणार नाहीस… पण सचिनचा काही विचार?”

    “त्याचा काही विचार नको… दोन दिवस गप्प राहील, तोपर्यंत मी त्याच्यासाठी दुसरी मुलगी, पत्रिका जुळणारी पाहाते की नाही ते पाहा… बाबांनाच सांगते, तुमच्याकडे अनेक मुलीचे बाप मुलीची पत्रिका दाखवायला येतात… त्यातील, पण आपल्या जातीतील मुलगी पाहा…”

    जयंतराव गप्प राहिले, त्यांना आपल्या मुलाची काळजी वाटू लागली.

    सुमनताईंनी नीलाच्या घरी फोन करून सचिन आणि नीलाच्या पत्रिका जमत नाहीत, त्यामुळे हे लग्न होणार नाही, तसेच मी सचिनसाठी दुसरी मुलगी पाहात असल्याचे कळविले.

    संध्याकाळी सचिन घरी आला, त्याला चहा दिल्यावर त्याची आई म्हणाली,

    “सचिन… मी आज नीलाच्या घरी जाऊन तिची पत्रिका घेतली, मग बाबांकडे जाऊन तुझी आणि नीलाची पत्रिका दाखवली. बाबा म्हणाले, या पत्रिका जुळत नाहीत. या मुलीला संतानयोग नाही. हिचे नवऱ्याशी, त्याच्या घरच्याशी जमणार नाही. अगदी कमी गुण जमतात… सबब हे लग्न नको.”

    सचिनला धक्का बसला… “अगं आई, पण ती मला आवडते… मला तिच्याशीच लग्न करायचे आहे… मी तिला शब्द दिला आहे…”

    “तू शब्द देताना मला विचारले होतेस का? तुला माहीत आहे, आपल्या आणि माझ्या माहेरच्या घरात चांगल्या गुणांनी पत्रिका जुळल्याशिवाय लग्न ठरत नाही. मी नीलाच्या आईला फोन करून सर्व सांगितले आहे आणि मी सचिनसाठी दुसरी मुलगी पहात असल्याचे पण सांगितले आहे!”

    “अगं काय केलंस आई तू?”

    सचिन उठून बाहेर गेला आणि एका झाडाखाली बसला. रात्री सचिन जेवला नाही. रात्री या कुशीवरून त्या कुशीवर करत राहिला… सकाळी पण सचिनने नाश्ता केला नाही… आईने भरलेला डबा नेला नाही…

    तो बँकेत गेला, तेव्हा नीला आलेली होती. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. तो तिच्याशी बोलायला गेला, पण ती तिथून उठून गेली.

    0000

    नीलाच्या घरी तिच्यासाठी स्थळ बघणे सुरू झाले आणि महिन्याभरात तिचे सांगलीच्या मुलाशी लग्न झाले सुद्धा! तिच्या नवऱ्याचा मिरजमध्ये पशुखाद्याचा कारखाना होता, विश्रामबागमध्ये बंगला होता. दोन गाड्या होत्या…

    सुमनताई सचिनसाठी मुलगी पहात होत्या. चांगल्या मुली सांगून येत होत्या… पण पत्रिका जुळत नव्हती. कुणाचे वीस गुण, कुणाचे पंचवीस गुण… महादेवशात्रींना सचिनच्या पत्रिकेला जुळणारी पत्रिका दिसत नव्हती.

    सचिन नर्व्हस होऊन नोकरी करत होता, रोज बँकेत आला की, त्याची नजर नीला बसायची त्या खुर्चीकडे जायची आणि तो उदास व्हायचा…

    नीलाच्या लग्नाला एक वर्षं झाले असेल, एक दिवस बँकेसमोर एक गाडी थांबली. त्यातून नीला आणि तिचा नवरा, आपल्या एक महिन्याच्या बाळाला घेऊन उतरली. नीलाने सर्व स्टाफला आपला मुलगा दाखवला आणि पेढे वाटले.

    सचिन आणखी खट्टू झाला. नीलाला एका वर्षात मुलगा झाल्याचे आईला सांगायचे, असे त्याने ठरविले. तो घरी आला, आईला नीलाचे सांगणार तोच आई म्हणाली,

    ‘सचिन, तुझ्यासाठी बाबांनी ही मुलगी पाठवली आहे. हिचे आईवडील मुलीच्या लग्नाबद्दल विचारायला आले होते… बाबांनी तिची पत्रिका पाहिली मात्र, त्यांना तुझी पत्रिका आठवली. बत्तीस गुण जमणारी पत्रिका! बाबा खूश झाले… त्या मुलीच्या आईबाबांना सांगून तुझे लग्न तिच्याशी ठरवून पण टाकले!!

    “अगं आई, पण मी तिला बघितले पण नाही!”

    “अरे, हा फोटो बघ… त्या नीलापेक्षा किती सुंदर आहे बघ.”

    सचिनने आईने पुढे केलेला फोटो पाहिला. खरोखरच मुलगी कमालीची सुंदर होती.

    “बाबांनी दोघांच्या पत्रिका जुळवून पाहिल्या. बाबा म्हणाले, सुमन, होते ते चांगल्यासाठीच. या मुलीने सचिनसाठीच जन्म घेतला होता. दोघे एकमेकांना अनुरूप आहेत. या मुलीला दोन मुलगे होतील, हे पण बाबांनी सांगितलं. शिवाय, लग्न ती मंडळी लावून देणार आहेत… दागिने घालून!”

    “पण आई, बाबांना सांगितलंस काय?”

    “हो तर! आपल्याला उद्या त्यांच्याकडे जायचे आहे. उद्याची रजा घे. तुझ्या मित्राची गाडी बघ उद्यासाठी. चांगले कपडे घाल आणि चांगले कपडे नसतील, तर रेडिमेड विकत घे. अरे, एवढ्या देखण्या मुलीला तू शोभयला हवास…”

    “होय आई…”

    सचिन उद्याच्या तयारीला लागला. नाहीतरी नीला लग्न करून गेलीच होती. आता ही मुलगी… सुंदर आहे हे निर्विवाद! पण ही मंडळी आपल्यासारख्या सर्वसामान्य मुलाला आपली मुलगी का देत आहेत, हे त्याला कळेना.

    रात्री सुमनताईंनी त्या मुलीच्या वडिलांना फोन करून ‘आम्ही सकाळी दहापर्यंत येतो आहोत,’ असा निरोप दिला.

    त्या रात्री सुमनताई समाधानाने झोपल्या. आपल्या मुलाला त्याच्या प्रेमिकेपासून आपण लांब केले, याची त्यांना रुखरुख वाटत होतीच… पण शेवटी आपल्या मनासारखी बत्तीस गुण जमणारी पत्रिकाही मिळालीच! बाबा म्हणाले ते खरे, या मुलीने सचिनसाठीच जन्म घेतला होता. शेवटी लग्नाच्या गाठी या स्वर्गात ठरतात, हे खरेच!

    सुमनताई लवकर उठल्या. त्यांनी आंघोळ, देवपूजा आटोपली. सचिनला आणि नवऱ्याला उठवले. सचिन उठून बाथरूममध्ये गेला… त्यांचा नवरा बाहेर फुले काढायला गेला. इतक्यात फोनची बेल वाजली. सुमनताईंनी रेसिव्हार कानाला लावला. पलीकडे कुणीतरी रडत होते. कोण हे त्याना कळेना…

    “कोण रडतंय?”

    “मी बोलतोय… मी मुलीचा बाप… तुम्ही आज येऊ नका!”

    “का? काय झालंय? तुम्ही रडता का?”

    “काय सांगू सुमनताई, माझी मुलगी कोपऱ्यावरच्या रिक्षावाल्याबरोबर पळून गेली हो…”

    “काय? पळून गेली… रिक्षावाल्याबरोबर? असं कसं शक्य आहे… शक्यच नाही हो!” रडवेल्या होत सुमनताई ओरडल्या.

    “आत्ता सकाळी वाडीला जाऊन लग्न केले… तिने फोटो पाठवले लग्नाचे… आम्हाला फसवले हो… तुम्ही आज येऊ नको…”

    त्यांचे रडणे, आक्रोश करणे हे सुमनताई कुठे ऐकत होत्या… त्या केव्हाच बेशुद्ध पडल्या होत्या!

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    फिट्टमफाट

    October 3, 2026 ललित

    तीन मित्र

    October 3, 2026 ललित

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    फिट्टमफाट

    By पराग गोडबोलेOctober 3, 2026

    माझी बायको मला वेंधळा म्हणते, हे तर सर्वश्रुत आणि जगजाहीर आहे… आणि मी आहे तसा,…

    तीन मित्र

    October 3, 2026

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    October 3, 2026

    फिट्टमफाट

    October 3, 2026

    टेंशन घेताय? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026

    तीन मित्र

    October 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : रुखाचा आवांका, जैसी बीजकणिका

    October 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑक्टोबर 2026

    October 3, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 458
    • अवांतर 215
    • आरोग्य 154
    • पंचांग आणि भविष्य 610
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 968
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बत्तीस गुण जुळणारी पत्रिका!

    October 3, 2026

    फिट्टमफाट

    October 3, 2026

    टेंशन घेताय? मग शुगर तपासून घ्या!

    October 3, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.