सतीश बर्वे
अलीकडेच, 1 ऑक्टोबरला सकाळी मार्केटला चाललो होतो, तेव्हा अचानक मागून आवाज आला,
“ओ दादा…”
मी मागे वळून पाहिले तर, एक चिमुरडी हातात झेंडूच्या फुलांचे तोरण घेऊन उभी होती… जमिनीवर ठेवलेल्या तिच्या टोपलीत झेंडूच्या फुलांची बरीच तोरणं व्यवस्थितपणे ठेवलेली होती.
“ले लो ना दादा…” तिचा आर्जवी स्वर… “आपका डान्स भी देखती हूं मै रोज!”
तिचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो… मला एकदम आठवलं, आमच्या नवरात्र मंडपाच्या पुढच्याच चौकात आंध्र प्रदेशातून आलेली बरीच कुटुंब रस्त्याच्या कडेला चादर अंथरून त्यावर झेंडूच्या फुलांची मोठी रास ओतून तोरणं करत असतात दिवसरात्र. चिल्लीपिल्ली मुलं देखील मोठ्या माणसांना जमेल तशी मदत करत असतात…
हेही वाचा – माणुसकीचे शिल्प…
दरवर्षी फक्त नवरात्रीच्या दिवसांत ही कुटुंबे तिथे बसलेली असतात. ही छोटी मुलगी बहुतेक त्या कुटुंबापैकी एका कुटुंबातील असावी. आम्ही रस्त्यावरच गरबा खेळतो आणि तो बघायला बऱ्यापैकी गर्दी असते ज्यात ही मुलगी पण येत असावी.
“दादा ले लो ना… सिर्फ साठ रुपये का है एक!”
कुठूनतरी तोरण घ्यायचं होतंच मला. किमतीबद्दल त्या छोट्या मुलीसोबत घासाघीस करायला माझ्या जीवावर आलं होतं. कमरेच्या डाव्या बाजूला तिच्या इवल्याश्या हातांनी तिने तिच्या लहान भावाला पकडून ठेवले होते आणि उजव्या हातात झेंडूचे तोरण होते…
“ठीक है, एक दे मला…,” असं म्हणून खिशातून साठ रुपये काढून मी तिला दिले आणि तिने कागदात गुंडाळून दिलेलं तोरण मी माझ्या जवळच्या कापडी पिशवीत ठेवले आणि तिला सहज विचारलं, “तू पढाई करती हैं या नहीं?” माझ्या प्रश्नावर तिने मान हलवून खुणेनेच ‘नाही’ असं उत्तर दिलं… “दो दिन बाद हम वापस अपने गांव चले जाएंगे… मां और बाबूजी खेतों में काम करते हैं और मैं छोटे भाई, बहन को संभालती हूं…”
हेही वाचा – फुलपाखरू… 40 वर्षांपूर्वीच्या आठवणी
दोऱ्यात भरगच्चपणे ओवलेल्या त्या झेंडूच्या तोरणापेक्षा तिच्या कोवळ्या चेहऱ्यावरचे निरागसतेचे तोरण मला अधिक शोभिवंत वाटले… अन् खरे पण! तिच्या खडतर आयुष्याच्या दरवाजावर सुखाचं तोरण कधीतरी लागेल की नाही, हा विचार मात्र मला विनाकारण सतावून गेला.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


