दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 16 एप्रिल 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 26 चैत्र शके 1948; तिथि : चतुर्दशी 20:11; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 13:58;
- योग : ऐंद्र 10:37; करण : विष्टि 09:25;
- सूर्य : मेष; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:55;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
अमावस्या प्रारंभ रात्री 08:11
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस
टीम अवांतर
श्रेष्ठ भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1883 रोजी बिहारमधील खरगपूर या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पूर्णचंद्र आणि आईचे नाव क्षेत्रमणी होते. देवीचे मुखवटे, खेळणी, कंथा (प्रसिद्ध बंगाली भरतकाम) इत्यादी हस्तकलांत क्षेत्रमणी कुशल होत्या. आईपासून प्रेरणा घेत दुर्गा, काली वगैरेंच्या मूर्ती नंदलाल तयार करीत. शालेय शिक्षणानंतर त्यांनी कलकत्त्याच्या सरकारी कला विद्यालयातून चित्रकलेचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नंतर जोडासाँको येथील अवनींद्रनाथ टागोरांच्या घरी उमेदवारी केली. तेथील सुप्रसिद्ध ‘टागोर संग्रहा’तील वस्तूंची सूची तयार करण्यात त्यांची फार मदत झाली.
बऱ्याच रेखाचित्रांच्या त्यांनी प्रतिकृती तयार केल्या आणि टागोर परिवारातील मुलांचे कलाशिक्षक म्हणून ते काम पाहू लागले. 1907मध्ये भारतीय प्राच्यकला संस्थेने आयोजित केलेल प्रदर्शनात नंदलाल बोस यांच्या शिवसती या चित्रास पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश आणि दक्षिणेकडील काही प्रमुख स्थळांना भेटी दिल्या. 1911मध्ये काही महिने अजिंठ्याला राहून तेथील चित्रांच्या प्रतिकृती त्यांनी तयार केल्या. सर्वसामान्य माणसाला चित्रांची गोडी लागावी, म्हणून 1913 साली त्यांनी स्वतः काढलेली अनेक पटचित्रे प्रत्येकी फक्त 25 पैसे या किमतीस विकली. 1919मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘विश्वभारती’च्या ‘कला भवन’ शाखेचे प्रमुख म्हणून नंदलाल यांची नेमणूक करण्यात आली. तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी शांतिनिकेतनमध्ये अध्यापन केले आणि अनेक चित्रकार तयार केले.
हेही वाचा – …तेच मातीने माखलेले पाय!
नंदलाल बोस हे अवनींद्रनाथ टागोरांच्या शिष्यपरंपरेतील होते. रवींद्रनाथांचाही त्यांच्यावर प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कलात्मक निर्मितीत स्थूलमानाने प्राचीन भारतीय परंपरा, राष्ट्रीय विचारसरणी आणि आधुनिक तांत्रिक प्रयोगशीलता हे तीन प्रवाह दिसून येतात. त्यांच्या मनाला असलेली प्राचीन भारतीय संस्कृतीची आणि परंपरेची ओढ प्रामुख्याने रामायण, महाभारत यावर आधारलेली चित्रे- अग्नी, नल-दमयंती, कुरुक्षेत्र, अर्जुन, स्वर्णकुंभ इत्यादी चित्रांतून दिसते.
याच सुमारास त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली आणि त्यांच्या प्रभावातून राष्ट्रीयत्वाची एक प्रबळ प्रेरणा त्यांच्या निर्मितीस लाभली. बहुजन समाजास आकृष्ट करू शकतील, अशी चित्रेही त्यांनी काढली. ‘हरिपूर पोस्टर्स’ या नावाने ओळखली जाणारी सुमारे 60 चित्रे या प्रकारची आहेत. भारतीय लोकजीवनातील अत्यंत साध्यासुध्या घटकांना त्यांनी चित्ररूप दिले.
नटीर पूजा, शांतिनिकेतनच्या चिनी भवनातील भित्तिलेपचित्रे ही त्यांच्या शैलीच्या प्रगल्भतेची साक्ष देतात. चित्रणसाधनांचा कमीत कमी वापर आणि भारतीय चित्रकलेच्या परंपरेची निदर्शक अशी शैलीची आलंकारिकता ही त्यांची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होत. त्यांची चित्रे कलकत्ता येथील ‘इंडियन म्यूझियम’, ‘अशुतोष म्यूझियम ऑफ इंडियन आर्ट’, ‘शांतिनिकेतन’, म्हैसूरच्या जगमोहन प्रासादातील चित्रवीथी इत्यादी ठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत. 16 एप्रिल 1966 रोजी शांतिनिकेतन येथेच त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आज कामाच्या ठिकाणी संघर्ष करावा लागू शकतो. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. कालांतराने परिस्थिती अनुकूल होईल. महत्त्वाच्या कामांमध्ये काळजीपूर्वक निर्णय घ्या. आज आर्थिक बाबींमध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावे लागू शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतात. पण पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करा. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही.
वृषभ – आज आरोग्याशी संबंधित समस्या जाणवतील. पोटदुखी आणि डोळ्यांशी संबंधित आजाराची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय उपचार करून घ्या. कार्यालयात कामाचा ताण असेल, पण कामाचा उरक चांगला राहील. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली जाईल. सरकारी कामे मार्गी लागतील. नवीन करार झाल्यामुळे तुमचे पद आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल.
मिथुन – मालमत्तेशी संबंधित कामासाठी तुम्हाला जास्त धावपळ करावी लागू शकते. कौटुंबिक कारणास्तव जास्त पैसे खर्च होतील. कुटुंबात आराम आणि सोयींवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. मुलांकडून खूशखबर मिळेल, तसेच भूतकाळातील एखादा आर्थिक व्यवहार आज पूर्णत्वास जाईल. आजूबाजूला सकारात्मक वातावरण असेल त्यामुळे उत्साहाने काम कराल.
कर्क – व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता असून मान, प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाचा योग असून ज्या कामासाठी प्रवास करणार त्यात यश मिळेल. घरात जास्ती जास्त वेळ दिल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये अपेक्षित यश मिळेल. खास मित्रांना भेटल्यानंतर ताणतणाव कमी होतील. मित्रांसोबत पर्यटन स्थळी जाऊ शकता. तब्येतीची काळजी घ्या, पथ्ये सांभाळा.
सिंह – आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार सुरू करा. कामाच्या ठिकाणी ताण टाळण्याचा प्रयत्न करा. बाहेरचे, पचनास जड अन्न टाळावे. प्रवास करताना अनोळखी व्यक्तीशी बोलताना सावधगिरी बाळगा, व्यक्तिगत बाबी उघड करू नका. व्यावसायिकांना कामात उत्तम यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना काही प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी फार धावपळ करावी लागेल.
कन्या – आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने कामातील अडचणी कमी होतील. समाजातील उच्चपदस्थ आणि प्रतिष्ठित लोकांशी संपर्क वाढतील. स्वतःवर विश्वास ठेवा. व्यवसायात एखादे डील झाले नाही म्हणून व्यवसायिकांनी नाराज होऊ नये, येणारा काळ तुमचा असून चांगली प्रगती होईल. नोकरदार जातक त्यांचे काम उत्साहाने पूर्ण करतील.
तुळ – आज आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईघाईत भांडवल गुंतवू नका. मालमत्तेशी संबंधित कामे सहजपणे होणार नाहीत. काही अडचणी येतील, पण त्या मार्गी लागतील. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही शत्रूचा पराभव कराल. अकारण ताण घेऊ नका तसेच वाईट सवयीपासून दूर राहा.
वृश्चिक – कौटुंबिक जीवनात तुम्हाला अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. संयम ठेवा. एखादा व्यावसायिक व्यवहार तुमच्या बाजूने निश्चित होईल आणि लाभाची संधी मिळेल. तुमचे म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. ऑफिसमध्ये वरिष्ठ देखील तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते.
धनु – आज आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवतील. स्वतःला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कामात यश मिळणार असून तुमच्या इच्छा काही प्रमाणात पूर्ण होतील. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे अधिक आनंदी असाल.कुटुंबात वातावरण सुखासमाधानाचे असेल. तथापि, घर असो वा कार्यालय बोलण्यावर ताबा ठेवा, तुमच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो.
हेही वाचा – बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…
मकर – जुन्या मित्राकडून चांगली बातमी मिळेल. नोकरदारांना एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. नोकरीत कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा आनंद वाढेल. तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम पार पाडावे लागेल. व्यवसायात नवीन भागीदार मिळतील. जमीन, संपत्ती याच्याशी संबंधित वाद सोडवण्यात वरिष्ठ अधिकारी मदत करतील. जे काही काम हाती घेणार ते व्यवस्थित पूर्ण करा.
कुंभ – आज मुलांच्या मदतीने व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. नोकरीतील तुमचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि अचूक निर्णय यामुळे तुमच्या संपत्तीत आणि सन्मानात वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक निधी मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. नोकरदारांच्या कामात प्रगती होणार असून त्याचे कौतुक होईल, सोबतच जास्तीचे प्रोजेक्ट देखील मिळतील.
मीन – आज आर्थिक क्षेत्रातील कोणताही महत्त्वाचा निर्णय काळजीपूर्वक विचार करून घ्या. व्यवसायात काही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. नवीन योजनांचा नक्की विचार करा, तसेच त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वेळ उत्तम आहे. विरोधक षडयंत्र रचणार आहेत, तेव्हा सावध राहावे लागेल.


