“हाय ब्रोडा कसा आहेस?”… ही हल्लीची पिढी फार मजेशीर आहे. मैत्रीला अगदी चटकन समान पातळीवर आणून मोकळे होतात. ब्रोडा, ब्रो, बॉस, बच्ची, ब्रदर अशी ‘ब’ची बिरुदावली जोडतात, माझ्याशी गप्पा मारताना आणि सुरुवातच एकदम झकास करतात!
“कसा वाटतोय तुला?” – मी.
“फूल टू कूल आहेस तू…”
“हे फूल टू कूल म्हणजे नक्की काय रे?” माझा सहज प्रश्न.
“तू ज्या पद्धतीने आयुष्य जगतोस नं तोच हॉट टॉपिक असतो, आमच्या ग्रुपमध्ये आजकाल! आणि यू नो मी तुझा जवळचा मित्र म्हणून माझा भाव वाढलाय आजकाल.”
“आईच्या गावात हे बरंय तुझं. जगतोय मी आणि किंमत तुझी वाढते आहे,” – मी.
“ऑफ कोर्स यार. बट स्टिल आय ऑलवेज वंडर की, तू एकटा असूनही कसं काय जमतं तुला हे आनंदी रहायला. माझ्याकडे बघ ना यार. आईची रोज किटकिट सुरू असते. जरा कुठे इंस्टाग्रामवर रेंगाळत बसलो की, ती हातावरचं घड्याळ माझ्या डोळ्यांसमोर आणून मी दिवसाच्या कुठच्या प्रहरात (हा तिचा खास आवडता शब्द आहे) आहे, याची मला सतत जाणीव करून देते ती”.
“तुम्ही आजकालची पोरं ना घरच्यांना गृहीत धरता. तुमचं तुमच्या मनांसारखं जगणं आणि घराचं घरपण, तिथल्या सवयी आणि परंपरा यात समतोल राखण्यासाठी तुमची इच्छाही नसते किंवा तसा प्रयत्न करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, हाच तुमचा प्रॉब्लेम आहे खरा! कधीतरी आईबाबांच्या जागी तुला ठेवून बघ, मग बरेच प्रश्न आपोआप सुटतील.”
हेही वाचा – दोन शब्द पुरे जगण्याला…
“जस्ट चील मार यार. तू आलास परत लेक्चररच्या भूमिकेत,” असं बोलून हा पठ्ठ्या मला पुढचं बोलूनच देत नाही. अर्थात, कधीतरी कान टोचले मी तरी पालथ्या घड्यावर पाणी हे मला माहीत असतं. पण याच्यासोबत नेहमीच माझा वेळ छान जातो.
“तुला आईबाबांच्या आजारपणाच्या आठवणी नाही का रे येत कधी? तू किती वर्षे सेवा केली होतीस त्यांची दिवसरात्र?” त्याच्या आकस्मिक प्रश्नाने मला धक्का बसला.
“येतात ना. पण त्यापेक्षा चांगल्या आठवणी खूप जास्त आहेत. अशाच आठवणी मी पुन्हा पुन्हा आठवत रहातो, ज्या मला जगण्याची ताकद देतात. ऊर्जा देतात. मला अधिकाधिक तरुण आणि आनंदी रहाण्यासाठी खूप मदत करतात. माझ्या एकटेपणावर हे रामबाण औषध आहे. शेवटी इथे येणारा कधी ना कधी जाणार असतोच. म्हणूनच आपल्या माणसांसोबतच्या आनंदी आठवणी आपण नेहमी जागवायला पाहिजेत, जेणेकरून आपण त्या काळात सहज रमून जातो आणि त्या दिवसांतील गोडवा आपल्या आयुष्याचे रंग अधिक तरूण आणि टवटवीत करतात.” – मी.
“एक लक्षात ठेव मित्रा, सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवल्या की, आपण नावडत्या गोष्टींना बिलकुल निमंत्रण देत नाही. हा साधा नियम कायम लक्षात ठेव. मग बघ तुला आयुष्य अधिक उत्साहाने जगता येईल. तुझी लोकप्रियता आणखी वाढेल. तुमच्या ग्रुपमध्ये तुझं वजन वाढेल.”
हेही वाचा – गुलामगिरीच्या जोखडात अडकलेले…
“माझ्या सगळ्या म्हणजे तुला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या सवयींबद्दल तू मला दुखणार नाही, पण चिमटा बसेल अशा शब्दांत पटवून देतोस ना, हेच मला जास्त आवडतं. दॅट्स व्हाय यु आर माय यंगेस्ट आणि मोस्ट मोस्ट लव्हेबल फ्रेंड.”
“तुमच्या भाषेत सांगायचे तर एखाद्याची सुमडीत… बरोबर ना?“ – मी
माझ्या या खुलाशावर आम्ही दोघेही पोट दुखेस्तोवर हसलो आणि त्याच्यासोबत रात्रीच्या पार्टीला घालण्यासाठी हटके कपडे काढायला म्हणून मी माझा वॉर्डरोब उघडला…


