मयुरेश गोखले
आज तिच्या घरी सकाळपासून सारखे लोकांचे येणे सुरू होते. सहा वर्षांची मुलगी आलेल्या सगळ्यांना सकाळचा न्यूजपेपर दाखवत होती. आज तिच्या आईचा फोटो आणि बातमी आली होती पेपरमध्ये! तेवढ्यात कोणी तरी विचारलं की, “कधी येणार आहे ‘ती’?” तर, लगेच उत्साहात तिच्या मुलीने उत्तर दिले की, “बाबा गेले आहेत तिला आणायला 1 वाजेपर्यंत येतील…” सगळे आलेले तिच्या आईची वाट पाहत होते आणि शेवटी तिची आई आली. काहीच बोलत नव्हती तिची आई! तिच्या बाबांनी आईला हॉलमध्ये आणले. मुलीच्या हातात पेपर तसाच होता. मी त्या मुलीला कडेवर घेतले आणि बाहेर आलो. तिच्या हातातला पेपर पाहिला आणि मन सुन्न झालं…
हेही वाचा – जब मनाएंगे वो…
ती लहान पोरं सकाळपासून आलेल्या सगळ्या लोकांना आपल्या आईची बातमी दाखवत होती, ती बातमी निधनवार्ता होती… तिच्या आईने आत्महत्या केली होती! शवविच्छेदन होऊन तिच्या आईची बॉडी आली होती घरी आणि तिची मुलगी निरागसपणे ती बातमी सगळ्यांना दाखवत होती!!
उद्या मोठी होऊन कदाचित ती निरागस मुलगी हे दुःख विसरेलसुद्धा, पण तिच्या प्रश्नाचं उत्तर तिची आई कधी देऊ शकेल का की, “आई तू मला का सोडून गेलीस? तू असं का केलंस?”
इतका सुंदर मांडलेला डाव अर्ध्यावर सोडून जाताना नवऱ्याची काय अवस्था होईल, याचासुद्धा तिने विचार केला नसेल का?
हेही वाचा – मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…
आज या घटनेला दोन-तीन वर्षं झाली. अजूनही ते चित्र डोळ्यासमोर आहे. आताही हे लिहिताना मन भरून आलं आहे. खरंच, हा निर्णय का घेतात काही जण? आयुष्यात संकट, चिंता येतच असतात… कोणीच सुटलेलं नाही त्यातून! पण आत्महत्या हा मार्ग म्हणजे पळपुटेपणा आहे. मनाच्या कोपऱ्यात असा बारीकसा जरी विचार आला तर, लगेच आपल्या आप्त-स्वकियांशी, मित्र-मैत्रिणींशी थोडं मोकळेपणाने बोला, बरेच प्रश्न सुटतील… आपल्या गोष्टी, गंमतीजमती, सुख-दुःख शेअर करा. कामाच्या व्यापात नाही भेटता आलं तर, निदान फोन करून तरी संवाद साधा.
…आणि परत कधीच कुठल्या मुलीला हा प्रश्न पडायला नको की, “आई, तू असं का केलंस?”
मोबाइल – 9423100151
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


