भाग – 33
राम आणि सिया घराजववळ पोहचले होते आणि जसं आरूने वर्णन केलेलं अगदी तसंच इथे सगळे जमा झाले होते… नवरा-नवरीला पाहायला! गर्दी बघून तर सियाला पुन्हा अवघडल्यासारखं झालं, कारण सगळे तिच्याकडेच पाहात होते आणि तिने नजर खाली करून घेतली होती… रामच्या हे लक्षात आल्याने तिचा हात हातात धरला तसं तिला आधार जाणवला, पण हृदयावरचं दडपण काही कमी झालं नव्हतं.
“रा… राम, ही सगळी लोक इथे पण आलीत. म्हणजे मंदिरात पण होती…” सिया जरासी चाचरत पण हळू आवाजात रामसोबत चालत त्याच्या दिशेने सरकून म्हणाली.
“सिया, हे गाव आहे. इथे सगळ्यांना नव्या नवरीचं कौतुक आणि उत्सुकता असते तिला पाहण्याची! त्यासाठीच सगळे जमलेत…” राम चालता चालता तिच्या कानापाशी कुजबूजला.
“अय रामा… अर् लागला का लगीच बायकूसोबत गुलूगुलू करायला! ये की पुढं जरा बिगी बिगी…” एका म्हाताऱ्या आजीचा आवाज आला आणि सियाने आधी समोर आणि मग रामकडे पाहिलं. तर, राम गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, “चल जरा फास्ट… हे असेच बोलतात, तू नको लक्ष देऊ. दोन दिवस असतील आपल्या आसपास… नंतर निघून जातील सगळे.”
सिया यापूर्वीही इथे आलेली, पण आजचं येणं वेगळं होतं! आता ती या गावाची सून आणि रामची पत्नी म्हणून आलेली… एक असं स्वप्न जे कधीच पूर्ण होणारं नाही, हे मनाला पटवून दिलं होतं तिने… पण ते स्वप्न आज पूर्ण झालं होतं. तिचे डोळे पाणावले होते…
रामने तिच्या खांद्यावर हात ठेवला… तसं तिने त्याच्याकडे पाहिलं.. त्याने तोच हात खांद्यावर आश्वासकपणए दाबत तिला पुढे चालण्याचा इशारा केला. तिनेही डोळ्यांची उघडझाप करत सहमती दर्शवली आणि पुढे झाली…
दारात कलावती, सरू आत्या तसेच गावातील इतर महिला उभ्या होत्या.
दाराजवळ बाहेर काही भांडी सरळ रेषेत ठेवलेली होती… काही पराती, तांबे, ग्लास, पाण्याचा हंडा, वाट्या… ते पाहून राम आणि सिया त्याच्या बाजूने पुढे येऊ लागले तसं कलावतीने त्या दोघांना थांबवलं, “अगं थांब… त्याला वलांडून नगं येऊस पुढं.”
तस सिया आणि राम जागेवरच थांबले. सियाने पुन्हा गोंधळून समोर आणि नंतर रामकडे पाहिलं कारण दारापासून ते बरेच अंतरावर उभे होते. गृहप्रवेश दरवाजातून केला जातो सियाला माहीत होतं. मग आपल्याला इथे थांबवलं? तिला प्रश्न पडला.
समोर भांडी पाहून तिच्या चेहऱ्यावर उमटलेला प्रश्न जाणून राम काही बोलणार तेवढ्यात –
“ते भांडे तुझ्या उजव्या पायाने असे पुढे पुढे ठोकरत इथपर्यंत ये…” सरू आत्या म्हणाली.
“आं…” सिया प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली.
“असं का करायचं दी… आय मीन, एक तर भांड्यांचा आवाज होईल आणि दीच्या पायाला लागलं तर…”. आत्तापर्यंत आजुबाजूचं निरीक्षण करत राम आणि सियाच्या मागे चालणारी पूर्वी काळजीने म्हणाली.
हेही वाचा – आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!
“बराबर हाय बगं पोरी तुझं… तुझ्या ताईचा पाय लई नाजूक दिसतूया… पर ही रीत हाय. तुझी ताय तिच्या नाजूक पायांनी जवा हे बासन (भांडे) ठोकरीत घराच्या दिशेन आनन… त्याचा आसा आर्थ होतूया की, हितून पुढं घरमंदी जो काय वाद लाहान मोठी कुरकुर होईल ती उंबऱ्याच्या भाईर जाऊ देणार न्हाई… ही सून म्हणून माझी जिम्मेदारी असल…” एक आजी तिला समजावत म्हणाल्या.
“अच्छा असंय तर…!” पूर्वी तिला समजलं आहे, असे भाव चेहऱ्यावर आणून म्हणाली.
“हो पण पूर्वी ही जबाबदारी फक्त सूनेची नाही, सासूने पण सूनेला सगळ्या गोष्टी प्रेमाने समजून सांगितल्या तर, घरात वादच होणार नाहीत आणि भांड्याचा कर्कश आवाज न होता, हळूवार मधुर नाद घुमेल… आणि त्याचे सूर बाहेरही गेले तरी चालतील…” आत्ता यावेळी आजीबाईंचं बोलण ऐकून त्यावर आरू काय बोलली असती, याचा विचार करून राम हासतच, स्वागतासाठी दारात उभ्या असलेल्या बायका आणि आपल्या आईकडे नजर टाकत पूर्वीला म्हणाला.
“बोलला का! त्या आरू आपली जागा तुला देऊन गेली व्हय रं?” आजी नाक मुरडत म्हणाल्या.
आरूचं आणि त्या आजीचं असं बोलण्यावरून नेहमीच वाजत आलेलं.
“आजी मी तर फक्त एवढंच म्हणत होतो की, ती या घरात नवीन असणार आहे, तर आपणच समजून घ्यायला पाहिजे…” – राम.
“बरं बरं कळलं बाबा, तुम्हा बाप्या माणसांना काय कळणार बायांमधल्या गोष्टी! कले चल आवर दुपार सरायच्या आत सुनेला माप वलांडून आत घी… आजून बाकीची बी खेळ खेळायच्याती… अन् ये पोरी ये गं हळू हळू ते भांडे आत ढकलत…”
आजीबाई आधी कलावती यांना, मग सियाला म्हणाल्या.
“अं… हो…” … अचानक आजी चा आवाज वाढला तसं रामचं बोलण ऐकून विचारात असलेली सिया भानावर येत म्हणाली. रामने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्याकडे पाहिले… सियाही मनातले विचार बाजूला सारून हलकं हसत म्हणाली, “काही नाही … असंच…”
“मागच्या गोष्टी नाही आठवायच्या सिया… नशिबाने तुझं प्रेम तुला परत मिळालं आहे… आता फक्त आणि फक्त पुढे येणाऱ्या आयुष्याचा आणि रामचा विचार करायचा…” मनाशीच म्हणत तिने सगळे विचार झटकले…. पुढचं आयुष्य फक्त राम आणि त्याच्या फॅमिलीचं सुख, तेच आपल सुख असा विचार करत तिने पुढे पाऊल टाकलं आणि हळूवारपणे त्या भांड्यांना पुढे पुढे सरकवू लागली… भांड्यांचा कर्कश आवाज न होऊ देता! मधूर नाद घुमेल असेच भांडे पुढे सरकवले सियाने.
राम आणि सिया दारात आले तसं रामच्या चुलत वहिनीने दोघांवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला आणि दोघांच्या पायावर पाणी टाकून पाय धुतले आणि “आल्यागेल्याची, भुताखेताची नजर उतरू दे ग बाई…” असं म्हणतं दोघांची नजर काढली. मग सियाचे हात कुंकवात बुडवून दाराच्या भिंतीवर ठसे उमटलले.
“पऱ्यागा, ववाळून दोघास्नी आत आण…” कलावती आरतीचं ताट आपल्या लहान जावेसमोर धरत म्हणाली.
“ये कले, लेकाच्या लगीनघाईत तुझी आक्कल आणि ध्यान कुठं इसरून आलीस व्हय!” ती आजी अतिशय रागात वरच्या आवाजात कलावती यांच्यावर ओरडली. सिया आणि पूर्वीसोबत तिथले इतर लोक पण दचकून त्या आजीकडे पाहू लागले.
सिया तर घाबरूनच गेली त्यांचा अवतार बघून… तिने रामचा हात घट्ट धरुन ठेवला. रामला पण कळलं नाही नेमकं काय झालं ते!
पण कलावतीला अचानक लक्षात आलx आणि पऱ्यागा काकू पण कळून पुढे आलेल्या मागे सरकल्या… पण त्यांना वाईट वाटलं. त्यांना जेव्हा कलावती यांनी औक्षण करण्यासाठी पुढे बोलावलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आलेली चमक सियाने नोटीस केली होती आणि आता त्यांचा पडलेला चेहरा पाहून सियाला विचित्र वाटलं.
आजीने काहीतरी आठवण करून दिल्याचे जाणवून त्या स्वतः मागे हटल्या होत्या… ते काय याचा सियाच्या मनात विचार आला… तिने रामकडे पाहिलं तोही काही म्हणाला नाही.
सिया विचारात होती… “दी समोर बघ ना…” पूर्वी म्हणाली. कारण, पुढे कलावती यांनी हातात ताट घेऊन तिला कुंकू लावण्यासाठी बोट पुढं केलेलं, पण विचारात असलेल्या सियाचं लक्षच नव्हतं.
“अं… हो…” तिने डोक्यावरचा पदर व्यवस्थित करून डोकं पुढे केलं. मग कलावती यांनी त्या दोघांचं औक्षण केलं. मग सरू आत्यानेही ओवाळून घेतलं.
“उजव्या पायाने आत लोट हे…” सरू आत्या म्हणाली.
माप ओलांडून सिया आत पाऊल टाकणार तोच एकीचा आवाज आला…
“थांबा थांबा वहिनी! तुम्ही आत येऊ शकत नाहीत,” रामची कोणी बहीण असावी.
“ए मीनल काय झालं?” पवनने विचारलं.
“ओ दाजी अस काय करताय? नाव नको का घ्यायला वहिनीने!” मीनल पवनकडे पाहून लाजत म्हणाली.
“हो ना! दादा, वहिनी तुम्हा दोघांना नाव घ्यायलाच लागतंय…” पवनने तिच्या लाजण्याकडे न लक्ष देता हसत तिला दुजोरा दिला. पण तिचं लाजणं आणि पवनचं हसत बोलण पाहून पूर्वीच्या मात्र भुवया उंचावल्या… आणि रागात त्याच्याकडे पाहिलं.
त्याच वेळी पवनची नजर तिच्यावर पडली आणि पूर्वीने रागातच नाक मुरडत नजर फिरवून घेतली.
“हिला काय झालं? माझ्यावर रागावली का?” कपाळ आठ्या आणत तो स्वतःशीच म्हणाला आणि खांदे उडवून पुढे आला. आता दाराच्या आत मीनलच्या शेजारीच जाऊन तो ऊभा राहिला… म्हणून मीनलचा चेहरा फुलला, उगाच केस कानामागे करत ती लाजली.
इकडे पूर्वीचा राग शिगेला गेला. “काहीही बोलू… कोणा शेजारीही उभा राहू… तसाच खड्ड्यात जा! मला काय करायचंय,” चरफडत पूर्वीने त्याच्या वरची नजर हटवली. पण तरीही राग मनात खदखदत होता… असं का होतंय ते मात्र तिला कळलं नाही.
“चला चला, सिया वहिनी पटकन नाव घ्या दादाचं…” पवन म्हणाला.
सगळ्यांचं लक्ष आता राम आणि सियाकडेच होतं. सियाला अवघडून आलेलं… राम पण तिच्याकडेच पाहात होता. आतून त्यालाही एक्साइटमेंट होती, तिने आपलं नाव घ्यावं याची. असं तर कित्येकदा त्याने तिच्या तोंडून स्वतःच नाव ऐकलेलं… पण हक्काने त्याचं नाव घेणार होती ती! तो एकटक तिच्याकडे पाहात होता. तिने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि तिच्या नजरेतला भाव ओळखून क्षणात रामचा चेहरा पडला. कारण तिच्या नजरेत ते भावच नव्हते, जे कधी काळी तिच्या नजरेत झळकायचे…
तिचं लाजणं… तोंडाने ‘नाही’ म्हणणं अन् डोळ्यातून सांगणं… “मी तुझंच नाव घेणारं…” रामला त्यांचे जुने दिवस आठवले. पण आज तिला त्याचं नाव नव्हतं घ्यायचं… की काही जुनं आठवल होतं… तिचे मनच जाणो.
आता नजरेनेच तिने त्याला “मला नाही जमणार…” म्हटलं आणि रामचा मूड तर गेलाच होता… तिला वेळ देण गरजेचं होतं, तो हे जाणून होताच. पण त्याची फॅमिली, गावातील लोक… सगळ्यांचे विचार वेगळे होते. एकदा लग्न झालं की, त्या मुलीने मागचं सगळं विसरून आपल्या संसाराकडे, नवऱ्याच्या इच्छा, सासू सासऱ्याची जबाबदारी याकडे लक्ष द्यायचं. हसतमुखाने सगळं काही चुपचाप करायचं… असंच काहीसे विचार त्यांचे होते. एवढंच काय तर, लग्नानंतर वर्षभरात घरात बाळ यायला हवं आणि ही सुद्धा त्या मुलीचीच जबाबदारी!
पण राम सियाला या सगळ्यापासून दूर ठेवणार होता. घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना तो तिला पुरेपूर साथ देणार होता. कारण प्रेम होत त्याचं… आताही तिला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती तो करणारं नव्हता आणि कोणाला करू ही देणार नव्हता!
“आई ते सगळ आत आल्यावर पण होऊ शकतं. आता ती किंवा मी कुठेही जाणार नाहीत. पण आत्ता मी लई दमलो आहे. अजून जास्त वेळ मला इथं थांबलं जाणार नाही… पटकन आत येऊदे आम्हाला…” राम तिला डोळ्यांनी दिलासा देत आईला म्हणाला.
सियानेही समोर पाहिलं आता काय म्हणतात म्हणून… साडीच्या पदराला घट्ट धरून ती श्वास रोखून त्यांच्याकडे पाहात होती.
“ये पोरांनो खर हाय त्याचं. दमले असत्याल लांबचा प्रवास करून… नंतर काय ते खेळत तुम्ही… आता येऊद्या त्यानला आतमंदी…” आजी म्हणाली.
तेव्हा सियाने मोकळा श्वास सोडला, पण पुढच्या क्षणी तिच्या हाताला रामच्या हाताचा स्पर्श झाला. तसं तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. तर, तो डोळ्यांची उघडझाप करत तिला सांगत होता… ‘मी आहे तुझ्यासोबत’. तिनेही डोळ्यांची उघडझाप करत त्याला प्रतिसाद दिला आणि त्याची हातावरची पकड घट्ट झाली.
त्याच्या स्पर्शाने सियाच्या अंगावर शहारा आला. त्याने धरलेल्या हातात स्पार्क जाणवत होते तिला… हृदयाची धडधड वाढली होती.
रामने तिचा हात धरूनच घरात प्रवेश केला. त्यांच्या मागे पवन, पूर्वी पण आले. सिया आणि पूर्वी घर पाहात होत्या. हॉलमध्ये उभे होते. तिथेच बाजूला दिसेल असं किचन होतं. त्याच्या बाजूला दोन रूम होत्या… छोटंसच घर होतं ते. सिया आणि पूर्वीसाठी तर खूपचं छोटं होतं.
पूर्वी कपाळावर आठ्या पाडूनच घर पाहात होती. सियाच्या आजूबाजूला बराच गोतावळा जमला होता. रामने अजूनही तिचा हात सोडला नव्हता.
“पोरांनो देवघरात जाऊन देवाच्या पाया पडा आणि इथल्या सगळ्यांच्या पण पाया पडा. ही समदी आपली भावकी हाय… तवा समद्यास्नी मानानं बोलायचं…” कलावती म्हणाल्या.
हेही वाचा – आरूच्या मनात शिवबद्दल कसली होती भीती?
सियाने मान हलवून ‘हो’ म्हटलं आणि राम तिला घेऊन देवघरात गेला.
सियाने देव घरात दिवा पेटवून हळद-कुंकू वाहिलं आणि हात जोडले रामने देखील हात जोडले. सिया डोळे मिटून हात जोडून उभी होती. रामने डोळे उघडले आणि बाजूला पाहिलं तर ती अजूनही डोळे मिटूनच उभी होती.
त्या साध्याशा साडीत गळ्यात फक्त लांब मणी-मंगळसूत्र… कानात झुमके… केसांची सैलसर घातलेली वेणी… कपाळी कुंकू… साधासाच मेकअप… पण तरीही खूप सुंदर दिसत होती ती! डोक्यावर पदर… लक्ष्मीचं रूपच जणू…
तो ज्या रूपात तिला नेहमी इमॅजिन करायचा आज तीच मूर्ती त्याच्यासमोर, त्याच्याच घरातील देवासमोर हात जोडून उभी होती. “हे आपलं स्वप्न तर नाही ना!” एका क्षणासाठी त्याच्या मनात विचारही आला… पण नाही ती खरंच होती त्याच्यासमोर, त्याच्या शेजारी त्याची बायको म्हणून हक्काने उभी होती. त्या घरची खरी लक्ष्मी… तो एकटक तिच्याकडे पाहात होता… नजर न हटवता!
क्रमश:
काय झाल असेल? का अडवलं असेल कलावती यांना त्या आजीने? पऱ्यागा काकू का मागे सरकल्या? पाहूया पुढील भागात –


