हिमाली मुदखेडकर
भाग – 4
पहिल्या सुनावणीनंतर जवळपास दोन महिने उलटले होते. मध्यंतरीच्या काळात आणखी दोन सुनावण्या होऊन गेल्या होत्या. त्या दिवशी ॲड. विभा शेलार यांनी अनिकेत पुरंदरेला आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. टेबलावर अनेक फाइल्स, कागदपत्रं आणि नोट्स पडल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा अधिक गंभीर भाव होते…
“आपल्याला आणखीन जास्त विस्तृत स्वरूपात मांडावा लागेल आपला मुद्दा, त्याकरिता आणखी पुरावे लागतील. सानिकाच्या मनात नेमके काय चालले होते, ते तर आता सांगू शकत नाही. म्हणूनच तिच्या आठवणींना साक्षीदार बनवायचं आहे,” त्या म्हणाल्या.
अनिकेत शांतपणे ऐकत होता.
विभा पुढे म्हणाल्या, “तिची पर्सनल डायरी… डॉक्टरांशी संवादाचे ई-मेल्स… अगदी व्हॉटसॲपवरील त्यासंदर्भातील चॅटिंग सुद्धा! एकूणच जुन्या नोंदी, तिने लिहिलेली प्रत्येक गोष्ट. तिच्या वैयक्तिक नोंदींपैकी तुम्हाला घरात जे जे काही सापडेल, ते सगळे गोळा करून आणा… अगदी लहानसा कागदाचा तुकडा सुद्धा, ज्यावर तिने काही लिहिले असेल! तपासून पहा… आपल्याला दाखवावं लागेल की, हे अपत्य तिच्यासाठी किती महत्त्वाचं होतं. त्या लेकराच्या जन्मासाठी ती किती उत्सुक होती!”
0000
अनिकेत घरी आला… त्या दिवसापासून त्याने घराचा कानाकोपरा शोधायला सुरुवात केली. कपाटातील वरच्या कप्प्यात तिने ठेवलेल्या जुन्या फाइल्स त्याने चाळल्या. तिच्या लॅपटॉपमध्ये आणखी काही फाइल्स होत्या, त्या तपासल्या. प्रत्येक वस्तू उघडताना एखादी आठवण जागी होत होती… आणि प्रत्येक आठवण काळजावर नवीन जखम करून जात होती!
एका जुन्या डायरीमध्ये त्याला सानिकाचं हस्तलिखित दिसलं. त्याने हळूच ते पान उघडलं… वर तारीख होती. खाली सानिकाने लिहिलं होतं,
“आज सृष्टीचा फोटो अल्बम पाहत बसले होते. ती किती लवकर मोठी होते आहे… देवाकडे एकच मागणं आहे… तिला एक भाऊ किंवा बहीण मिळू दे.”
हेही वाचा – संकर्षण… आशेची पहिली परीक्षा
अनिकेतचे डोळे पाणावले. त्याने पुढचं पान उघडलं…
“लोक म्हणतात एक मुल पुरेसं असतं. पण मला तसं वाटत नाही. घरात मुलांचा आवाज जितका जास्त, तितकं घर जास्त जिवंत वाटतं.”
तो बराच वेळ तेच वाचत बसला. जणू सानिका त्याच्याशी बोलत होती.
स्टोअररूममधील बॉक्सेसमध्ये काही रद्दी होती, ती तपासताना तिच्या मोबाइलचे बिल त्याच्या हाती लागले आणि अचानक त्याच्या लक्षात आले की, तिच्या मोबाइलचा बॅकअप घेता आला तर, काही गोष्टी हाती लागू शकतात!
लॅपटॉपमध्ये त्याला एक जुना ई-मेल सापडला…. IVF प्रक्रियेच्या सुरुवातीच्या काळातील. सानिकाने डॉक्टरांना लिहिलं होतं —
“हा प्रवास कठीण आहे, हे माहिती आहे. पण आम्ही हार मानणार नाही. कारण, मला पुन्हा एकदा आई व्हायचं आहे.”
दुसऱ्या ई-मेलमध्ये तिने लिहिलं होतं —
“जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर, सृष्टीला भावंड मिळेल, सोबती मिळेल. आपलं सख्खं भावंड ही भावनाच काही और असते. बहीण – भाऊ किंवा बहिणी – बहिणी एकमेकांना आयुष्यभर मानसिक आधार देतील. आपलं हक्काचं कुणीतरी, ही जाणीव मी सृष्टीला देऊ इच्छिते.”
त्या ओळी वाचताना अनिकेतला भावना अनावर झाल्या. तो हमसून हमसून रडू लागला.
0000
काही दिवसांनी विभा शेलार यांच्या कार्यालयात सगळे पुरावे जमा झाले. डायरीची पानं… ई-मेल्स… मेसेजेस… डॉक्टरांशी झालेला पत्रव्यवहार… सगळं!
विभा बारकाईने प्रत्येक गोष्ट वाचत होत्या.
“हे महत्त्वाचं आहे. यातून तिची मुलांबद्दलची भावना स्पष्ट दिसते,” त्या म्हणाल्या.
अनिकेतने मान डोलावली. पहिल्यांदाच त्याला वाटलं की, कदाचित आता त्यांची बाजू मजबूत झाली आहे.
0000
पुढच्या सुनावणीत विरोधी पक्षाने वेगळाच डाव टाकला. कोर्टात सर्व पुरावे सादर झाल्यानंतर ॲडव्होकेट राघव आपटे उभे राहिले. त्यांनी काही क्षण कागदपत्रं चाळली. मग शांतपणे बोलायला सुरुवात केली…
“माय लॉर्ड, आम्ही हे मान्य करतो की, सानिका पुरंदरे यांना मातृत्वाची, विशेषतः या होऊ घातलेल्या अपत्याची प्रचंड ओढ होती. या डायरीतील प्रत्येक ओळ त्याची साक्ष देते…”
क्षणभर ते थांबले. मग ते म्हणाले, “परंतु, एका स्त्रीची तिच्या हयातीत असलेली इच्छा आणि तिच्या मृत्यूनंतर त्या भ्रूणाबाबत घेतला जाणारा निर्णय यांना समान समजता येणार नाही.”
विभा शेलार यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
आपटे पुढे बोलत राहिले, “एखाद्या स्त्रीला मूल हवं असणं, ही एक गोष्ट आहे… परंतु मृत्यूनंतर तिचा अंश असणारं भ्रूण वापरण्यास तिची सहमती असती, असा निष्कर्ष काढणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टींची सरमिसळ करता येणार नाही.”
त्यांच्या या युक्तिवादामुळे कोर्टात पुन्हा खळबळ उडाली.
0000
विभा शेलार लगेच उभ्या राहिल्या. त्यांचा आवाज नेहमीप्रमाणे शांत होता… पण त्यात एक वेगळीच ताकद होती.
“माय लॉर्ड, विरोधी पक्ष पुन्हा एकदा चुकीच्या दिशेने हा मुद्दा नेत आहे.”
न्यायाधीशांनी त्यांना पुढे बोलण्याची परवानगी दिली.
“या प्रकरणाचा केंद्रबिंदू सानिका पुरंदरे यांच्या मृत्यूनंतरच्या काल्पनिक इच्छेचा नाही. या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे — अनिकेत पुरंदरे यांचा अधिकार.”
विभा पुढे म्हणाल्या, “आपल्याकडे एक स्त्री स्वतःच्या इच्छेने सिंगल पेरेंट बनू शकते. कायद्याने तिला तो अधिकार दिला आहे. मग एक पुरुष सिंगल पेरेंट का बनू शकत नाही?”
हा प्रश्न कोर्टरूममध्ये घुमला. काही क्षण कोणीच बोललं नाही.
“जर समाज आणि कायदा एका स्त्रीला एकट्याने मूल वाढवण्याचा अधिकार देत असेल, तर त्याच समाजाने आणि त्याच कायद्याने एका पुरुषालाही तोच अधिकार द्यायला हवा. लिंगावर आधारित वेगळे निकष लावणे योग्य कसे ठरेल?”
न्यायाधीश विचारमग्न झाले.
विरोधी पक्षही काही क्षण गप्प राहिला.
0000
सुनावणी संपल्यानंतर मात्र सोशल मीडियावर वादळ उठलं. केस आता फक्त कोर्टाच्या चार भिंतींत न राहता ती वृत्तपत्रांतून, न्यूज चॅनेलवरून, सोशल मीडियावरून सर्वसामान्यांच्या चर्चेत आली होती. काही लोक विभांच्या युक्तिवादाचं समर्थन करत होते. तर, काही जण संतापले होते.
“हे निसर्गाविरुद्ध आहे.”
“मुलाला आईची गरज असते.”
“हा फक्त स्वार्थ आहे.”
असे हजारो बिनशेंड्या बुडख्याचे संदेश फिरू लागले होते.
काही जणांनी अनिकेतकरिता सहानुभूती दर्शविली तर काहींनी त्याची थेट खिल्ली उडवली होती. अशा पद्धतीचे काही मेसेजेस, काही पोस्ट्सवरील रिकामटेकड्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचून तो जरा डळमळीत झाला. त्याला क्षणभर वाटून गेलं की कदाचित विरोधी पक्ष बरोबर असेल… कदाचित तो चुकीचा हट्ट करत असेल… कदाचित ही लढाई सुद्धा निरर्थक असेल.
0000
त्या रात्री तो बराच वेळ सानिकाच्या फोटोसमोर बसून राहिला. घरात पूर्ण शांतता होती. भिंतीवरचं घड्याळ टिक टिक करत होतं… कधी झोप लागली त्याचं त्यालाच कळलं नाही.
“अनि… ए अनि…” सानिकाचा आवाज…
“मी थकलोय, सानू… खूप थकलोय…” तो पुटपुटला.
तो एका हिरव्यागार माळरानावर उभा होता… दूरवर सृष्टी धावत होती… खळखळून हसत आणि तिच्या मागे सानिका उभी होती… अगदी तशीच… जशी ती शेवटची आठवत होती. ती त्याच्याकडे पाहात त्याला आवाज देऊन बोलावत होती. अनिकेत तिच्याकडे धावत गेला.
“सानू…”
त्याचा आवाज भरून आला. ती काही बोलली नाही. फक्त त्याचा हात हातात घेतला.
“मी हरतोय… माझ्यात ताकद उरलेली नाही.”
हेही वाचा – संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली
सानिकाने त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि हळूवार आवाजात म्हणाली —
“तू हरत नाहीयस अनि! “तू लढतो आहेस.”
तो हताशपणे म्हणाला, “कशासाठी?”
ती निश्चयाने म्हणाली — “माझ्या बाळाला या जगात आणून… तू मलाच अंशरूपाने पुन्हा जगण्याची संधी देतो आहेस.”
अनिकेत स्तब्ध झाला.
“मी गेले आहे. पण माझं प्रेम… माझं अस्तित्व अजून संपलेलं नाही, ते तुझ्यासोबत आहे. आपल्या बाळाच्या स्वरूपात!”
ती हळूहळू दूर जाऊ लागली.
“लढत राहा अनिकेत. अजून प्रवास बाकी आहे. अनिSSS”
0000
अनिकेत दचकून जागा झाला. उजाडलं होतं. खिडकीतून सूर्याची पहिली किरणं आत येत होती… लढाई अजून संपलेली नव्हती… उलट ती अधिक गुंतागुंतीची होत चालली होती. पण आता त्याला पुन्हा एकदा उभं राहण्याचं कारण मिळालं होतं… त्या स्वप्नाने त्याला जाणीव करून दिली होती की…
ही त्या दोघांच्या प्रेमाच्या अपूर्ण राहिलेल्या वचनाची पूर्तता होती.
क्रमश:
(Disclaimer : ही कथा काल्पनिक असून याचा कोणत्याही घटना अथवा व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)


