हिमाली मुदखेडकर
भाग – 3
याचिका दाखल होऊन आता जवळपास तीन महिने उलटले होते. या तीन महिन्यांत अनिकेतचं आयुष्य पुन्हा एकदा बदललं होतं. पूर्वीची निराशा… मरगळ… जाऊन बर्यापैकी त्याच्यात ध्येयासक्ती दिसून येत होती. दोन वर्षापासून जगण्याचं कारण शोधणारा तो आता कोर्टाच्या पायऱ्या चढत, उतरत होता. त्याला मिळालेल्या आशेच्या किरणांसाठी त्याला संपूर्ण व्यवस्थेशी लढावं लागणार होतं
0000
त्या सकाळी न्यायालयाच्या इमारतीसमोर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. वकील, पक्षकार सगळ्यांची लगबग सुरू होती. कोर्टाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या अनिकेतच्या हातात फाइल होती. हात किंचित थरथरत होते. आयुष्यात पहिल्यांदाच तो कोर्ट-कचेरीचा अनुभव घेत होता.
“घाबरलात?” ॲड. विभा शेलारांनी विचारलं.
“खरंतर हो… याआधी कधीच मी…”
“काळजी वाटणे साहजिक आहे,” विभा म्हणाल्या.
“परिस्थितीचे गांभीर्य समजणार्या कोणाला ही भीती वाटूच शकते.”
अनिकेत काही बोलला नाही. त्याची नजर समोरच्या इमारतीवर स्थिरावली होती.
हेही वाचा – संकर्षण… राखेतून उरलेला श्वास
0000
कोर्टरूममध्ये न्यायमूर्ती अरविंद प्रधान यांच्यासमोर केस पुकारण्यात आली…
“अनिकेत पुरंदरे विरुद्ध राष्ट्रीय सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान प्राधिकरण.”
त्याचं नाव कोर्टात घुमलं…
विरोधी पक्षाकडून वरिष्ठ सरकारी वकील ॲडव्होकेट राघव आपटे उपस्थित होते… पन्नाशीतील, अनुभवी, करारी आणि निष्णात वकील. मनातील विचारांचा कोणालाही थांग लागणार नाही, अशी भावनाशून्य मुद्रा… त्यांच्यासाठी ही फक्त एक केस होती.
न्यायालयासमोर केसच्या मांडणीची पहिली संधी ॲड. विभांना देण्यात आली. विभा उभ्या राहिल्या… न्यायासनाला वंदन करून ठाम आवाजात त्यांनी सुरूवात केली…
“माय लॉर्ड, याचिकाकर्ता अनिकेत पुरंदरे हे एका गोठवून ठेवलेल्या भ्रूणाचे जैविक पिता आहेत. त्या भ्रूणाची निर्मिती त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या संमतीने झाली होती. दुर्दैवाने पत्नीचा अपघाती मृत्यू झाला असून आज याचिकाकर्ता, त्या भ्रूणाला जन्म देण्याची परवानगी मागत आहेत.”
विभा पुढे म्हणाल्या, “ही केस केवळ वैद्यकीय नसून ही एका अजन्मीत बालकाच्या जन्म घेण्याच्या अधिकाराची तसेच त्याच्या जैविक पित्याच्या जन्माला घालण्याच्या अधिकाराची केस आहे. माझ्या अशिलाला त्याच्या जैविक अपत्याच्या जन्मासाठी कायदेशीर मार्ग खुला करून द्यावा, एवढीच आमची विनंती आहे.”
त्यांची मांडणी संपली… कोर्टात काही क्षण शांतता पसरली.
0000
न्यायासनाने प्रतिपक्षास त्यांची बाजू मांडण्याचा आदेश दिला.
ॲड. राघव आपटे उभे राहिले. नेहमीच्या रुक्ष सरकारी औपचारिक स्वरात त्यांनी सुरुवात केली…
“माय लॉर्ड, ही केस प्रथमदर्शनी भावनिक वाटू शकते. पण न्यायालयाकडून भावना नाही, कायदा पाहिला जातो.”
आपटे पुढे म्हणाले, “याचिकाकर्त्याची पत्नी आता हयात नसून त्यांची संमती मिळवणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत भ्रूणाचा वापर करण्याची परवानगी देणे म्हणजे भविष्यात धोकादायक उदाहरण निर्माण करण्यासारखे होईल.”
“धोकादायक कसं?” न्यायाधीशांनी विचारलं.
ॲड. आपटे तयारीत होते…
“कारण, मग मृत व्यक्तीच्या पुनरुत्पादन अधिकारांबाबत अनिश्चितता निर्माण होईल. मृत व्यक्तीच्या इच्छेचं प्रतिनिधित्व कोण करणार? सीमा कुठे आखायची?”
त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहिले.
0000
प्रतिवाद करण्यास विभा शेलार लगेच उभ्या राहिल्या.
“माय लॉर्ड, विरोधी पक्ष मुद्दाम चुकीचा प्रश्न विचारत आहे. ही केस मृत व्यक्तीच्या अधिकारांबद्दल नसून जिवंत असलेल्या व्यक्तीच्या अधिकारांबद्दल आहे.”
काही क्षण शांततेत गेले…
“याचिकाकर्ता त्या बालकाचा जैविक पिता आहे. तो त्या मुलाचं संपूर्ण पालकत्व स्वीकारण्यास तयार आणि सगळ्या दृष्टीने सक्षम आहे. तो कोणाच्याही अधिकारावर अतिक्रमण करत नसून तो फक्त त्याच्या स्वतःच्या अपत्याला जन्माला घालण्याची संधी मागत आहे.”
न्यायाधीश विचारमग्न झाले.
0000
पहिल्या सुनावणीचा उर्वरित वेळ कायदेशीर मुद्द्यांवर गेला… पूर्वीच्या काही परदेशी निर्णयांचा उल्लेख झाला… वैद्यकीय नियमावली सादर करण्यात आली… काही तांत्रिक बाबींवर चर्चा झाली…
अनिकेतला त्यातलं फारसं काही समजत नव्हतं. त्याच्या कानात फक्त दोन शब्द घुमत होते
‘परवानगी’ आणि ‘नकार’!
जणू संपूर्ण केस या दोन शब्दांमध्ये अडकली होती.
0000
दुपारी सुनावणी संपत आली. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून घेतले. मग त्यांनी आदेश दिला…
“प्रकरण गुंतागुंतीचं आहे. दोन्ही पक्षांनी अधिक सविस्तर लेखी मांडणी सादर करावी. पुढील सुनावणीची तारीख सहा आठवड्यांनंतर.”
लाकडी हातोड्याचा आवाज झाला… पहिली सुनावणी संपली.
0000
अनिकेत विभा मॅडमसोबत गाडीतून निघाला. गाडीत बसल्यानंतर बराच वेळ कोणीच कुणाशी बोललं नाही. त्याच्या मनावरचा ताण लक्षात घेऊन मग विभा मॅडमनी बोलण्यास सुरुवात केली,
“आजचा दिवस वाईट नव्हता.”
“खरंच?” – अनिकेतने विचारलं.
“हो. किमान न्यायालयाने केस गंभीरपणे घेतली आहे.”
“पण आपण जिंकू का?”
हेही वाचा – संकर्षण… आशेची पहिली परीक्षा
विभा काही क्षण विचारात पडल्या… “माहीत नाही. पण आज मला एक महत्वाची गोष्ट लक्षात आली.”
“कोणती?”
“या केसमधील मुख्य मेख – प्रतिपक्ष ही केस भावना विरुद्ध कायदा अशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
आणि…” विभा खिडकीबाहेर पाहात म्हणाल्या, “आपल्याला केस अधिकार विरुद्ध निर्बंध अशी सिद्ध करावी लागणार आहे.”
अनिकेतला त्या वाक्यांचा नीटसा अर्थ कळला नाही. पण त्याला आत कुठेतरी जाणवलं होतं की, ही लढाई खूप मोठी आहे. तो फक्त एका भ्रूणाच्या अस्तित्वात येण्यासाठी लढत नसून तो एका प्रश्नासाठी लढत होता…
एका पित्याला त्याच्या स्वतःच्या अपत्याच्या जन्माचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का?
पहिली सुनावणी संपली होती. पण खरी लढाई आता सुरू झाली होती.
क्रमश:
(Disclaimer : ही कथा काल्पनिक असून याचा कोणत्याही घटना अथवा व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)


