Wednesday, February 18, 2026

banner 468x60

Homeललितऋचा… आयुष्याच्या नव्या डावाची सिद्धता!

ऋचा… आयुष्याच्या नव्या डावाची सिद्धता!

पराग गोडबोले

ऋचा…  छानशी, चुणचुणीत मुलगी. एकुलती एक. छान शिकली, सवरली आणि एका खासगी कंपनीत नोकरीही लागली तिला. यथावकाश नाव नोंदवलं एका संस्थेत आणि वर संशोधनाला सुरुवात झाली. फार काही अपेक्षा नव्हत्याच तिच्या! बऱ्याच मुलांमधून प्रथमेश आवडला तिला. त्याचे आईवडील चिपळूणजवळच्या एका छोट्याश्या गावात स्थायिक. तिथे स्वतःचं टुमदार घर, थोडी शेती आणि सासऱ्यांची शिक्षकाची नोकरी. खाऊनपिऊन सुखी कुटुंब.

तो, चिंचवडला एका प्रसिद्ध कंपनीत नोकरीला. BE झालेला. भाड्याचा 1 BHK फ्लॅट, चिंचवडमध्येच… कार नव्हती, पण बाइक होती स्वतःची. ऋचाला पुरेसं होतं एवढं.

एका शांत हॉटेलमध्ये दोन तास गप्पागोष्टी झाल्या आणि आपलं जमेल असं वाटून गेलं त्यांना. Vibes match झाल्या त्यांच्या… हल्ली म्हणतात तसं! नंतर आणखी दोन – तीनदा भेटली दोघं आणि पुढे जायला हरकत नाही, असा कौल दोघांच्याही मनाने दिला…

घरच्यांच्या भेटीगाठी झाल्या, मान्यता मिळाली, लगोलग साखरपुडा पार पडला आणि दोघं हिंडायला लागली. ते मोरपंखी दिवस ती समरसून अनुभवायला लागली… एकदा असंच भेटल्यावर त्याने सिगरेट शिलगावली. ऋचा चपापली थोडी! “अगं, रोज नाही ओढत, कधीतरी तल्लफ आली की, ओढतो,” म्हणत त्याने तिचं समाधान केलं. सिगरेट काय, बरीच मुलं ओढतात. हल्ली तर मुलीही ओढतात म्हणून तिने कानाडोळा केला. एवढी छोटीशी गोष्ट काय मनावर घ्यायची, अशी स्वतःची समजूत घालून घेतली तिने.

एकदा बोलताबोलता तिने विचारलं, “दारू पण पितोस?”

“हो, कधीतरी पार्टीत वगैरे पितो. एवढी नको काळजी करूस.”

शंकेची पाल चुकचुकली तिच्या मनात, घरी आईबाबांशी बोलली ती. बाबा म्हणाले, “अगं, हल्ली कॉर्पोरेटमध्ये असलेल्या मुलांना हे करावं लागतं. पर्याय नसतो. लोकं नाहीतर सामावून नाही घेत त्यांच्यात. काळजी करण्यासारखं काही नाही त्यात. सगळीकडे असंच असतं. तू उगाच पराचा कावळा करतेयस!”

तो नोकरी करत असलेल्या कंपनीत बाबांच्या ओळखीचे होते एक दोन जण… त्यांच्याकडे त्यांनी चौकशी केली आणि चांगला आहे मुलगा, असं आश्वस्त करणारं उत्तर मिळाल्यावर, बाबा  निश्चिंत झाले.

एकदा मॉलमध्ये दोघे फिरायला गेले असताना, तिच्या पसंतीने त्याची कपड्यांची खरेदी झाली आणि माझ्या अकाऊंटमध्ये पैसे नाहीत, जरा तुझं क्रेडिट कार्ड दे, नंतर पैसे परत करतो या बोलीवर, तिच्या कार्डावरून पेमेंट झालं, तब्बल पाच हजाराचं!

नंतर एकदोनदा, संकोचत तिने आठवण करून दिली पण, ‘अगं आपलं लग्न होणार आहे आता, काय एवढ्याशा पैशांचा हिशोब करतेस, तुझं आणि माझं काही वेगळं आहे का?’  म्हणून विषय बदलला त्याने आणि ऋचानं नाईलाजाने पाच हजारांवर पाणी सोडलं…

सालस, सरळ स्वभावाच्या ऋचाला संकेत कळलेच नाहीत आणि ते लवकरच लग्न बंधनात अडकले.

कोकणात कुलदैवतेच्या दर्शनाला आणि मग सासरी दोन दिवस राहून, सत्यनारायणाची पूजा आटोपून दोघेही चिंचवडला परतले. लग्न झाल्यावर फिरायला कुठे जायचं, या विषयावर दोघांच्या चर्चा व्हायच्या, पण बाबांच्या आजारपणात खर्च झालाय, जवळच कुठेतरी जाऊ चार दिवस, म्हणून दोघे माथेरानला गेले आणि दोनच दिवसात कंटाळून परत आले. तिथे जमलंच नाही त्यांचं. हिरमुसल्या ऋचानं इथेही मनाला मुरड घातली…

हेही वाचा – निर्णय… योग्य की अयोग्य?

त्याचा प्रणय म्हणजे फक्त ओरबाडणं, स्वतःच्या सुखाचा विचार आणि तिला गृहीत धरणं. स्वप्नील वृत्तीच्या ऋचाचा फार मोठा अपेक्षाभंग होता. प्रणय नव्हताच, व्यवहार झाला होता तो. तिला न मानवणारा!

घरात दोघेच, वडीलधारं कोणी नाही, त्यामुळे तो अगदी स्वैर. घरातच सिगरेट ओढणं सुरू झालं. हळूहळू, दोनचार मित्रांना घरी बोलावून पार्ट्या सुरू झाल्या वीकएंडला. ‘हे करून दे…’, ‘ते करून दे…,’ या फर्माईशी पुऱ्या करणं अवघड जाऊ लागलं तिला. वाटेल तसं बोलणं, शिव्या, माहेरचा उद्धार यात होरपळू लागली ऋचा. अशा संसाराचा, त्या भाबड्या मुलीने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता!

आईपाशी बोलावं हे सगळं असं फार वाटायचं, पण होईल सगळं ठीक, आईबाबांना का उगाच त्रास द्यायचा? अशी स्वतःचीच समजूत घालत टाळत राहिली ती, एकएक दिवस ढकलत… सगळं ठीक चाललंय, असं भासवत होती.

असाच एकदा तो गोडगोड बोलायला लागला. दुपारी हॉटेलमध्ये जेवायला गेले दोघे आणि तिथे बोलताबोलता त्याने काही फॉर्म्स ठेवले तिच्यासमोर आणि म्हणाला, “सह्या कर यावर.” भोळसट ऋचा लगेच सह्या करेल, असं वाटलं त्याला, पण ती सावध होती…

“कसले आहेत फॉर्म्स?”

“काही नाही गं, तुझ्या नावावर थोडं पर्सनल लोन घेतोय. गावाला घराचं काम करायचंय…”

“ठेवून दे. घरी गेल्यावर वाचून मग ठरवते…” ऋचा शांतपणे म्हणाली.

“अगं करून टाक ना, विश्वास नाहीये का माझ्यावर?”

“विश्वासाचा प्रश्न नाही, पण पैशांचा मामला आहे, व्यवहार आहे. आधी नीट वाचते आणि मग करते सह्या. एवढी का घाई करतोयस?”

जेवण झालं कसंबसं आणि दोघं घरी पोहोचले, अवाक्षर न बोलता.

घरात शिरताच तो म्हणाला, “सह्या कर मुकाट्याने, नाहीतर तुझ्या बापाला सांग दहा लाख रुपये द्यायला.” सरड्याने रंग बदलला, अपेक्षेप्रमाणे! हात उगारून तिच्या अंगावर धावून आला आणि दरडावून सह्या करायला भाग पाडलं तिला. फॉर्म्स घेऊन दार ओढून तो घराबाहेर पडला.

पर्याय नव्हताच तिच्याकडे सह्या करण्यावाचून, पण या प्रसंगाने मात्र ती पार पेटून उठली. पाणी डोक्यावरून चाललं होतं. गुदमरायच्या आत हालचाल करणं भाग होतं. वकील असलेल्या जिवलग मैत्रिणीला फोन केला, सगळी परिस्थिती आणि आजचा प्रसंग सांगितला… कर्जाच्या कोऱ्या फॉर्मसवर सह्या घेतल्या हे सांगितलं. कुठल्या बँकेचे फॉर्म्स होते तेही सांगितलं!     

मैत्रीण म्हणाली, “आधी घरच्यांशी बोल आणि पोलिसात तक्रार करायची का ते ठरवा. आपण हे कर्जही थांबवू लगेच. या बँकेत ओळखी आहेत माझ्या. पण तू पटापट हालचाली कर…”

घरी फोन केला आणि सगळी परिस्थिती सांगितली. आई तर रडायलाच लागली. बाबा म्हणाले, “लगोलग घरी निघून ये. बघू काय करायचं ते!”

चार कपडे, घरात असलेले दागदागिने आणि स्वत:चे पैसे घेऊन ती तडक घरी पोहोचली. आईच्या गळ्यात पडून रडल्यावर मोकळं वाटलं आणि आईच्या कुशीत पुढच्या संघर्षाची ऊर्जाही मिळाली. मैत्रिणीने, कर्ज थांबेल असा दिलासा दिला आणि तीही ऋचाच्या घरी पोहोचली. ऋचा आणि आईबाबा ठाम होते. हे इथेच संपवलं पाहिजे, यावर! चार शब्द ऋचाला पण ऐकावे लागले, इतके दिवस सहन केल्याबद्दल…

हेही वाचा – सुख म्हणजे नक्की काय असतं?

त्याच्या घरी फोन करून, त्याच्या आई-वडिलांना कल्पना दिल्यावर ते तर पार कोलमडूनच पडले. आपल्या लेकाचं हे बीभत्स रूप त्यांना अगदीच अपरिचित होतं. “आम्ही उद्याच पुण्यात येतो, तोवर काही करू नका, हात जोडतो तुमच्यासमोर…” म्हणत त्यांनी फोन ठेवला.

ते येऊन काही विशेष फरक पडणार होता, अशातला भाग नव्हता, पण त्यांना मान देऊन ऋचाच्या घरचे थांबले.

दुसऱ्या दिवशी त्याचे आईबाबा थेट ऋचाच्या घरी आले. सुनेशी बोलल्यावर, आपलंच नाणं खोटं आहे, हे त्यांना कळून चुकलं… पण काही तडजोड झाली तर, बघावी या हेतूने ते आले होते. पण ऋचाचा निर्णय ठाम होता. हळव्या, भाबड्या मुलीचं मन कणखर झालं होतं आणि त्यात ती एक पाऊलही मागे येणार नव्हती!

“पोलिसांत जाऊ नका, त्याचं आणि आमचं आयुष्य पार उद्ध्वस्त होईल,” या धाय मोकलून केलेल्या विनंतीवर मात्र ती विरघळली आणि वकील मैत्रिणीचा सल्ला नाकारून, पोलिसांत न जाण्याचं तिनं मान्य केलं. 

खाल मानेनं, तिचे सासू-सासरे घराबाहेर पडले आणि आत्तापर्यंत राखलेला तिचा आवेश गळून पडला. अश्रू मुक्तपणे पाझरू लागले… पण डोळे पुसतच, तिने मैत्रिणीला पुढची कारवाई सुरू करण्याची सूचना केली. आयुष्याचा डाव नव्याने मांडायला ती पुन्हा सिद्ध होत होती, मागच्या सगळ्या खुणा पुसून, पाटी पुसायचा प्रयत्न करत…!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!