काल खूप दिवसांनी संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेलो होतो. बाकावर बसून शांतपणे मावळतीच्या सूर्याचं लोभसवाणे दृश्य डोळ्यांत साठवून ठेवत असताना अचानक समोर एक फुगेवाला येऊन उभा राहिला. एका हातात गॅस भरलेले अंदाजे 20-25 फुगे आणि दुसऱ्या कडेवर एक छोटा मुलगा.
त्याने हात पुढे करत मला फुगे घेण्याची विनंती केली. त्याच्या चेहऱ्यावरील व्याकुळता आणि नजरेतलं आर्जव का कोण जाणे, माझ्या मनाला क्षणभर बोचलं. काही उपयोग नसताना देखील मी दोन फुगे द्यायला सांगितले आणि त्या क्षणी त्या लहानग्याच्या ओठांवर निरागस हसू फुलले. फुगे हातात घेऊन मी पैसे किती ते विचारले.
“चालीस रुपया.”
मी खुशीने 50ची नोट त्याच्या हातात ठेवून उरलेले 10 रुपये देऊ नकोस, असं बजावलं. त्याने मला वाकून नमस्कार करून तो नजरेसमोरून दूर जाऊन उभा राहिला. क्षणभर मनांत विचार येऊन गेला की त्याच्या आनंदाच्या फुग्याचा दोर माझ्या हातात आहे. मी सुखाने हसलो…
हेही वाचा – सदूकाका अन् मानाचा गणपती…
फुगे चटकन् हवेत सोडून द्यायला मन धजावत नव्हते. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा वेध घेत असताना मी दोर खाली वर करत फुग्यांशी खेळत होतो. दूर उभं राहून तो फुगेवाला माझा फुग्यांसोबतचा खेळ बघत होता.
अचानकपणे परत तो फुगेवाला माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, “क्या साब, दिल नहीं करता हैं ना, इन को आसमान में छोड़ने को? चंद पलों के लिये सही, पर आप को इन गुब्बारों ने खुशी दी. ज़िंदगी भी ऐसी ही हैं. कब कौन किसको खुशी देगा, ये कोई नहीं बता सकता. आपने मुझे खुश किया, ये गुब्बारे लेके और इन गुब्बारों ने आपको खुशी दी. जरूरी नहीं है कि, हर बार खुशी पानें के लिए, या देने के लिए पैसों की जरूरत हो. आपकी अच्छी सोच और अच्छा काम खुशी बांटने के लिये काफ़ी है… अच्छा साब निकलता हूं मैं.” असं म्हणून तो फुगेवाला निघून गेला.
जाता जाता त्याने खरंच चांगला विचार दिला मला.
हेही वाचा – बॅक स्टेज… हाच योग्य निर्णय!
इतरांच्या आयुष्यात आनंदाचे फुगे उडवण्यासाठी आपल्या चांगल्या विचारांची, कृतीची आणि आपल्यातील माणुसकीची फक्त गरज असते. तसं पाहिलं तर सगळं कसं एकदम सोपं असतं. पण आपल्यातील राग, लोभ, मत्सर, स्वार्थ, अहंकार, शत्रूत्व, मीपणा या गोष्टींमुळे आपण ते अधिकाधिक कठीण करत असतो.
त्या फुगेवाल्याला जे समजले ते तुम्हा-आम्हा सर्वांना समजलं, तर खरंच दुःख नावाची गोष्ट सगळ्यांच्या आयुष्यात बऱ्यापैकी कमी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचाच हातभार लागेल. मी म्हणतोय ते पटत असेल तर, आपल्यात हळूहळू का होईना पण बदल करायला काय हरकत आहे?


