Tuesday, November 18, 2025

banner 468x60

Homeललितलग्नाची बेडी अन् स्वच्छंद आयुष्य!

लग्नाची बेडी अन् स्वच्छंद आयुष्य!

विमल ऑफिसमधून बाहेर पडली. स्टेशनच्या दिशेने जात असताना डोक्यात अनेक विचार होते.. त्यातील मुख्य विचार होता, जागृतीचा… जागृती, तिची लाडकी लेक. अजितच्या मागे लाडाने वाढवलेली जागृती. आता मराठी सीरिअल्समध्ये काम करू लागली आहे. अवघे एकवीस वर्षे वय… म्हणून काळजी! हे वय म्हणजे…

विमल गाडीत बसली. चर्चगेट टू बोरिवली.. नेहेमीचा लेडीज ग्रुप… विमल जोगेश्वरीला उतरायची. तिची जवळची मैत्रीण संपदा… गेली वीस वर्षे संध्याकाळी याच गाडीत, याच डब्यातून प्रवास. संपदा लवकर आली तर, विमलसाठी सीट ठेवायची… विमल लवकर चढली तर संपदासाठी जागा राखून ठेवायची. संपदाला विमलच्या बारीकसारीक गोष्टी माहीत असायच्या आणि विमलला संपदाच्या!

विमल शेजारी बसताच संपदा बोलू लागली…

“मग जागृती खूश आहे का आपल्या भूमिकेमध्ये?”

“सुरुवातीला खूश नव्हती… पण एकदम तिला नायिकेची भूमिका कशी मिळेल सांग? त्या मालिकेत मृण्मयी आहे… शेवटी ती अनुभवी आहेच… तिने दोन मालिका हिट दिल्यात… हे विसरून कसे चालेल? चॅनलचा तिच्यावर विश्वास आहे. पण आता जागृती रमलीय… रोज वेळेत बाहेर पडते आणि…”

“आणि काय ग?”

“आणि… वेळेत येत नाही गं… तीच मला काळजी लागलीय!”

“कुठं तिचं… काय…?”

“असावं बहुतेक.. पण माझ्याजवळ आलं नाही अजून… पण असावं… असणारं…”

“मग तू विचारत का नाहीस तिला?”

“कसं विचारू? शेवटी, आई तू काय केलंस त्या वेळेस, असं विचारलं तर?”

“तू त्यावेळी अजितबरोबर पळून गेलेलीस हे खरे… पण, आता तू आई आहेस ना जागृतीची? तिची काळजी तुला वाटणारच…”

‘संपदा.. तू जशी तूझ्या मुलीला जाब विचारू शकतेस… तशी मी नाही विचारू शकत; कारण संपदा, तू तूझ्या आईवडिलांनी ठरवलं त्या पुरुषाशी लग्न केलंस.. आणि मी?”

विमल आणि संपदा दोघी गप्प झाल्या… खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. गाडी दादर स्टेशनमध्ये शिरत होती. गाडी दादर प्लॅटफॉर्म वर थांबत असताना थोडी स्लो झाली होती… बायकांचा फर्स्ट क्लासचा डबा जवळ येत असताना विमलला जागृती दिसली. तिने हात दाखवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी बरीच पुढे आली. जागृतीला खेटून एक मुलगा उभा होता.. असा तिला भास झाला.

“काय झाल विमल? कुणाला हात दाखवत होतीस?”

“मला जागृती प्लॅटफॉर्मवार दिसली गं… तीच की दुसरी? कोण जाणे…”

“अग जागृती कशी असेल? तुच्या मनात तिचेच विचार आहेत ना… म्हणून प्रत्येक मुलगी तुला जागृती वाटते… आज ती कुठे गेली आहे शूटिंगला?”

“आज मढला…”

“मग इकडे कशी येईल ती? थोडी शांत राहा.”

विमल शांत बसली… ‘आपली मुलगी आजकाल थोडी उशिरा येतेय तर, आपण बेचैन होतो आणि आपण अजितबरोबर पळून गेलो त्याकाळी… लग्न न करता तसेच रिलेशनमध्ये राहात होतो पाच वर्षं… मुलगी झाली तरी… अगदी अजितच्या मृत्यूपर्यत… तर आपल्या आईबाबांना काय वाटलं असेल?’

हेही वाचा – बनिया आणि मराठी कस्टमर

विमल जोगेश्वरीला उतरली… तिने स्टेशनजवळ भाजी, ब्रेड घेतला आणि ती कॉलनीत जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिला आज विन्डो सीट मिळाली… डोळे मिटून तिने मागे सीटवर डोके टेकवले… पुन्हा तिच्या डोळयांसमोर आई आली… बाबा आले…

कॉलेजपासून आपण एकांकिका… नाटकें करू लागलेलो… ग्रॅज्युएट झालो आणि नोकरीच्या शोधात होतो… वेळ जात नव्हता… त्याचवेळी एका स्पर्धेच्या नाटकाची ऑफर आली. घरून परवानगी मिळाली आणि एका ग्रुपमध्ये जॉइन झालो… तिथे भेटला अजित.. भरभर सिगरेट्स ओढणारा आणि मधाळ बोलणारा… स्पर्धेत आपल्याला आणि अजितला पहिले पारितोषिक मिळाले… आणि मग आपण सुसाट सुटलो…

रोज ठराविक हॉटेलमध्ये ग्रुपमधील मेंबर्स जमायचे… नवीन नाटकावर चर्चा… कधी नुसती भंकस… कधी सिनेमा, कधी नाट्यवाचन… नाट्यवाचन करण्यात अजित माहीर होता… बुलंद आवाज आणि चेहेऱ्यावरचे एक्सप्रेशन्स खिळवून ठेवायचे.. आपल्याला कधी आवडायला लागला कळलेच नाही…

नोकरी मिळतं नव्हती… अनेक ठिकाणी अर्ज करून थकायला झाले. त्यामुळे तिचे नाट्यग्रुपमध्ये रोज जाणे होऊ लागले. अजित रोजच भेटू लागला. अजितचे वाचन अफाट होते… तो जेफ्री केंडलं, अल्काझी या थोर नाट्यदिग्दर्शकांचे दाखले द्यायचा. मुंबईतील इंग्लिश नाटकें करणारा अदी मर्झबान यांच्या नाटकाच्या तालमींना जायचा. पृथ्वी थिएटरमध्ये नेऊन तिला इंग्लिश नाटकें दाखवायचा. मकरंद देशपांडे याच्या हिंग्लिश (मराठी.. इंग्लिश) ग्रुपमध्ये अजित सामील झाला. अजित पाठोपाठ विमल पण या ग्रुपमध्ये आली… पृथ्वीमध्ये देशातील अनेक मुलेमुली येत असत, मुंबई या मायानगरीत प्रवेश मिळविण्यासाठी… सर्व प्रकारची तडजोड करणारी…!

विमलची आई तिच्या लग्नाची काळजी करत होती. पण तिला नोकरी नसल्याने तिचे लग्न जमत नव्हते… या काळात हिंदी नाट्यवर्तुळात लग्न न करता रिलेशनमध्ये राहण्याची टूम आली होती… ‘लग्न केले की अनोळखी माणसाबरोबर आयुष्य काढायचे? त्याच्याशी नाही जमले तरी? तो आणि त्याचे कुटुंब पारंपरिक विचाराचे असले तरी? छे छे… कोण मग कोर्टात जाऊन डिव्होर्स घेणार? त्यापेक्षा लग्न न करता तसेच एकत्र रहाणे चांगले… नाही पटले दिले सोडून!

अजित विमलला रिलेशनमध्ये एकत्र राहू असे सुचवू लागला… मग आपण दोघे स्वतःचा नाट्यग्रुप सुरू करू… मकरंद देशपांडेसारखे देशभर हिंदी, इंग्लिश नाटके करू… त्यातूनच मग हिंदी मालिका आणि सिनेमा… फारसे दूर नाही.

विमल आपल्या बसस्टॉप वर उतरली आणि आपल्या बिल्डिंगच्या दिशेने चालू लागली. तिने लॅच-कीने दार उघडले आणि हुश्य करत ती कोचावर बसली. जागृती अजून आली नव्हती. पूर्वी ती सातला येत असे. आजकाल साडेनऊ-दहा वाजतात तिला… विचारले तर पॅकअप व्हायला उशीर लागतो… असे सांगत असते. मघा दादर स्टेशनवर दिसलेली जागृती का दुसरी मुलगी? त्या मुलीचा टॉप गुलाबी होता आणि आज जागृती निळा फ्रॉक घालून गेली होती… म्हणजे स्टेशनवर कुणा तरुणाला खेटून उभी असलेली ती जागृती नव्हे… विमलला हायसे वाटले. आपण जागृतीची एवढी काळजी करतो.. मग पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या आईवडिलांनी आपली किती काळजी केली असेल?

विमल पुन्हा भूतकाळात गेली… आपण अजितच्या साथीने वाहवत चाललो होतो. नाट्यग्रुपमधील बरीच मुलंमुली अशीच रिलेशनमध्ये राहत होती… मजा करत होती… त्या काळात आपल्याला त्त्यांचा हेवा वाटतं होता. कसली तरी धुंदी डोळयांवर आली होती आणि मागचा पुढचा विचार न करता आपण आईबाबांचे घर सोडले आणि अजितसोबत राहू लागलो… धड जागा कुठे होती? कुणाच्या तरी घरी पेईंगगेस्ट म्हणून…!

प्रेमाची धुंदी होती… नाटकाची नशा होती… मित्रमैत्रिणी आजूबाजूला होते… आईबाबांना काय वाटले असेल याची पर्वा केली नाही. आईबाबांचे घर आपल्यासाठी बंद झाले… पण आपल्याला त्याची पर्वा नव्हती. पण महिना झाला आणि हे एकत्र राहाणे काय असते, हे लक्षात येऊ लागले. खिशात पैसे नाहीत… खर्च भरपूर.. अजितला सगळी व्यसने… सतत तोंडात सिगरेट्स.. संध्याकाळी तीन पेग व्हिस्की… हॉटेलमध्ये महागडे जेवण… यासाठी पैसे?

दोन हिंदी नाटकें सुरू होती. पण त्त्यांचे प्रयोग अधूनमधून व्हायचे. त्त्यांचे मानधन मिळायचे… पण भाडे होते, दूध, गाडीत पेट्रोल, सिगरेट्स… अजित म्हणू लागला, ‘तू नोकरी कर… माझे जीवन नोकरी करण्यासाठी नाही. मी हाडाचा कलाकार आहे, आज न उद्या हिंदी सिनेमा डायरेक्ट करणार. फक्त माझे दिवस येऊ दे…’ पण त्याचे दिवस कधी आलेच नाहीत…

मला मात्र त्याच्या मित्राच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. अजितचा कॉलेजमधील मित्र, जयंत भोसले. आर्किटेक्ट… अतिसज्जन माणूस. त्याची अनेक कामे सुरू होती. त्याचे हिशेब विमल सांभाळू लागली. महिन्याला पगार घरी येऊ लागला आणि अजित अनिर्बंध वागू लागला… सकाळी दारू… दुपारी दारू… रात्री दारू… त्याच्या दारू पिऊन गोंधळ घालण्यावरून जागेच्या मालकाने त्याना बाहेर काढले… यावेळी परत जयंत भोसले मदतीला आला… त्याचा जोगेश्वरीचा छोटा फ्लॅट त्याने अजित विमलला वापरायला दिला… जागृतीचा जन्म याच जागेतला…

विमल अजितच्या व्यसनांना कंटाळली होती. ऑफिसमध्ये तिला जयंत भोसले रोजच भेटत. ती टेन्शनमध्ये दिसली की जयंत विचारायचा… “काय झाले विमल? काही काळजी करण्यासारखे?”

“होय सर, तुमच्या मित्राने हद्द केलीय… हातात काम नाही, पण पैसे उधळणे सुरू आहे. आता जागृती लहान आहे… या ऑफिसमधील माझा पगार कुठे पुरायला…”

“ठीक आहे… तू या महिन्यात पाच हजार जास्त घे, पण जागृतीचे हाल होता कामा नये…”

जयंत भोसले असा दर महिन्याला जास्त पैसे देत होता… पण कधीच परत घेत नव्हता. विमलला माहीत होतं… जयंतला मुल नाही, त्यामुळे ऑफिसमधील सर्व स्टाफच्या मुलांना तो असाच मदत करत असे. जयंतने अजितला अनेक डॉक्टर्सना दाखवले, जेणेकरून तो व्यसन सोडेल… पण काहीच उपयोग होत नव्हता…

हेही वाचा – आपली माती, आपली माणसं…

विमलला सर्व आठवत होतं… मग ती उठली, तिने कपडे बदलले आणि ती रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. तिने जागृतीला फोन लावायचा प्रयत्न केला.. पण फोन स्विचऑफ़ होता.

विमलने भात केला, भाजी केली आणि ती जागृतीची वाट पहात राहिली… कोचावर बसल्या बसल्या तिला झोप लागली… बेल वाजली, तशी तिने दार उघडले… दारात जागृती आणि एक पुरुष… विमल दचकली.. एवढ्या रात्री जागृतीसोबत एक पुरुष?!

“ये रे, आत ये… आई, हा अरमान. आमच्या सीरिअलचा असिस्टंट डायरेक्टर आहे.”

ती दोघे आत आली…

“अग वाजले किती? साडेअकरा.. एवढ्या रात्री परक्या पुरुषाबरोबर…”

“अग आम्ही जेवायला गेलेलो गजालीमध्ये… काय जेवण मिळतं! अरमान म्हणाला, एकदा गजालीमध्ये जेऊन बघ.. तू पण चल आई एकदा गजालीमध्ये.“

“पण आता तू जेवणार आहेस का?”

“अग पोट भरलंय माझं… तू जेव…”

“पण फोन पण करता आला नाही तुला?”

“झाली खरी चूक…”

तेवढ्यात अरमानने तिच्याकडे फ्लाइंग किस दिला आणि तो म्हणाला…

”जागुती… चलता हूं… गुड नाईट. कल मिलेंगे…”

त्याला पोहोचवायला जागृती त्याच्या पाठीमागे धावत गेली…

विमलचा तीळपापड झाला… अवघी वीस वर्षांची आपली पोर… रात्री साडेअकराला एका परपुरुषाबरोबर घरी येते आणि त्याला पोहोचवायला परत खाली जाते…

विमलने जेवण झाकून ठेवले आणि ती ओटा धुऊ लागली. तेवढ्यात जागृती घरात शिरली… आईने न जेवता ओटा आवरायला घेतला हे पाहून ती म्हणाली,

“जेवली नाहीस? माझा राग त्या जेवणावर का काढतेस?”

“जागृती, मला तुझं वागण आवडलेले नाही… रात्री अपरात्री परपुरुषाबरोबर?”

“अगं, आमची एंटरटेनमेंट लाइन तशीच आहे… जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर, कुणाचा तरी हात धरावाच लागेल. नाहीतर तुम्ही कुठल्याकुथे फेकले जाल… तू नाहीतर दुसरी. इथे माझी गरजच नाही… माझी जागा घ्यायला दुसरी लाइनमध्ये उभी आहे… अरमानला एक मोठी सीरिअल मिळतेय… प्रसिद्ध हाऊसची. म्हणून मी त्याला पकडून आहे. कोणत्याही परिस्थितीत मला मुख्य नायिकेची भूमिका मिळायला हवी… आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.”

“काहीही म्हणजे? काय करणार आहेस तू?”

“मी त्याच्यासोबत राहीन!”

“म्हणजे अशीच…”

“मग काय लग्न करून? अरमान मॅरिड आहे आई…”

“अरे बापरे, मी केलेली चूक तू पुन्हा करणार?”

“नाही… यात फरक आहे! तू बाबांसोबत तशीच राहिलीस, कारण तू मूर्ख होतीस. तू बाबांच्या प्रेमाखातर आपले आईबाबा लाथाडलेस आणि आयुष्यभर नोकरी करत राहिलीस.. बाबा दारू पिऊन गेल्यावर सतीसावित्रीसारखी प्रामाणिक राहिलीस.. दुसऱ्या कुणा पुरुषाला जवळ केले नाहीस… पण माझे तसे नाही… अरमान ही फक्त शिडी आहे माझी! त्या शिडीचे काम झाले की, ती शिडी सोडणार आणि दुसरी शिडी पकडणार…”

“कमाल आहे तुझी जागृती! असं किती दिवस करशील? आकाशात उडणाऱ्या पाखराला सायंकाळी कुठे तरी घरटे शोधावे लागतेच. ही तुझी लाइन अशीच असेल जागृती तर, ती सोड मी भोसलेंना सांगते, तुझ्यासाठी जॉब ठेवा म्हणून…”

“तू नोकरी केलीस म्हणून मी नाही करू शकणार.. एकदा चिकन बिर्याणीची सवय झाली की, वरण-भात कसा घशाखाली जाईल?”

“अग पण आज हा अरमान, उदया दुसरा… तिसरा… काय हे? जग काय म्हणेल?”

“जग काही म्हणत नाही आई आणि म्हणणारही नाही… माझे मित्रमंडळी म्हणतात तुझ्यासाठी तूझ्या आईने वाट मळून ठेवली आहे, पंचवीस वर्षांपूर्वी! तुझी आई लग्नाशिवाय तूझ्या बाबा बरोबर राहिली… त्यामुळे तुला विशेष काही वाटायला नको.”

विमल चिडली, रागाने बेभान झाली…

“मला म्हणतेस? मी वाट मळून ठेवली.. पण मी चोरटेपणा नाही केला… तुला जन्म दिला…”

“का जन्म दिलास मला? अजूनही लग्नाशिवाय दिलेला जन्म मान्य करत नाही समाज… us तुला माहीत आहे आई! माझ्याकडे माझे सहकारी याच नजरेने पाहातात.. हिच्या आईला चारित्र्य नव्हते तसे हिला पण नसणार…”

“जागृती, खूप बोललीस… तुझा बाबा दारू पिऊन मेला… पण नोकरी करून तुला वाढवलं मी. पण तूच परत याच सीरिअल्समध्ये घुसलीस… यात माझी काय चूक? चल… चालती हो…

चालती हो, माझ्या घरातून…”

“हो, जाते ना! नाहीतरी दोन दिवसांत घर सोडणार होते… आत्ता सोडते!”

जागृतीने अरमानला फोन लावला… ती आईला म्हणाली,

“जाते मी… अरमानने राधा लॉजमध्ये रूम बुक केली आहे… तो पोहोचतोय तिकडे. मी निघाले.”

पर्स घेऊन जागृती बाहेर पडली.. आणि विमल कॉटवर कोसळली…


मोबाइल – 9307521152 / 9422381299

प्रदीप केळुस्कर
प्रदीप केळुस्कर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!