अध्याय तेरावा
यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजंगमम् । क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ ॥26॥
तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें । तुज आपणपें जें दाविलें । आणि क्षेत्रही सांगितलें । आघवें जें ॥1050॥ तया येरयेरांच्या मेळीं । होईजे भूतीं सकळीं । अनिलसंगें सलिलीं । कल्लोळ जैसे ॥1051॥ कां तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा । मृगजळाचिया पूरा । रूप होय ॥1052॥ नाना धाराधरधारीं । झळंबलिया वसुंधरी । उठिजे जेवीं अंकुरीं । नानाविधीं ॥1053॥ तैसें चराचर आघवें । जें कांहीं जीवु नावें । तें तों उभययोगें संभवे । ऐसें जाण ॥1054॥ इयालागीं अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना- । पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ती ॥1055॥
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् । विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥27॥
पैं पटत्व तंतु नव्हे । तरी तंतूसीचि तें आहे । ऐसां खोलीं डोळां पाहें । ऐक्य हें गा ॥1056॥ भूतें आघवींचि होती । एकाचीं एक आहाती । परी पैं भूतप्रतीती । वेगळीक असे ॥1057॥ यांचीं नामेंही आनानें । अनारिसीं वर्तनें । वेषही सिनाने । आघवेयांचे ॥1058॥ ऐसें देखोनि किरीटी । भेद सूसी हन पोटीं । तरी जन्माचिया कोटी । न लाहसी निघों ॥1059॥ पैं नानाप्रयोजनशीळें । दीर्घें वक्रें वर्तुळें । होती एकाचींच फळें । तुंबिणीयेचीं ॥1060॥ होतु कां उजू वांकुडें । परि बोरीचे हें न मोडे । तैसी भूतें अवघडें । वस्तु उजू ॥1061॥ अंगारकणीं बहुवसीं । उष्णता समान जैशी । तैसा नाना जीवराशीं । परेशु असे ॥1062॥ गगनभरी धारा । परी पाणी एकचि वीरा । तैसा या भूताकारा । सर्वांगीं तो ॥1063॥ हें भूतग्राम विषम । परी वस्तू ते एथ सम । घटमठीं व्योम । जियापरी ॥1064॥ हा नाशतां भूताभासु । एथ आत्मा तो अविनाशु । जैसा केयूरादिकीं कसु । सुवर्णाचा ॥1065॥ एवं जीवधर्महीनु । जो जीवेंसीं अभिन्नु । देख तो सुनयनु । ज्ञानियांमाजीं ॥1066॥ ज्ञानाचा डोळा डोळसां- । माजीं डोळसु तो वीरेशा । हे स्तुति नोहे बहुवसा । भाग्याचा तो ॥1069॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये
अर्थ
हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो, तो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो, असे जाण. ॥26॥
तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखविले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले ॥1050॥ वार्याच्या संबंधाने पाण्यावर जशा लाटा येतात, त्याप्रमाणे या क्षेत्रक्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात (संबंधात) सर्व प्राणी उत्पन्न होतात. ॥1051॥ अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध आला म्हणजे अर्जुना, मृगजळ हा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो ॥1052॥ अथवा पर्जन्याचा धारांनी भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात ॥1053॥ त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्व चराचर आहे ते तर उभयतांच्या (क्षेत्रक्षेत्रज्ञांच्या) मिलाफाने उत्पन्न होते असे समज. ॥1054॥ अर्जुना, याकरिता, आकाराला आलेले सर्व पदार्थ, हे पुरुष व प्रकृति यांच्यापासून भिन्न नाहीत ॥1055॥
सर्व भूतांच्या ठिकाणी एकसारखा असणार्या व नाश पावणार्या भूतांमधे अविनाश असलेल्या, अशा परमेश्वरास जो जाणतो, तोच (खरे) पाहतो. ॥27॥
वस्त्रपणा जे जरी सूत नाही, तरी पण वस्त्रपणा हा सुतावरच आहे. अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. ॥1056॥ सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पाहणारास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. ॥1057॥ या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत व या सर्वांचे वेषही वेगवेगळे आहेत. ॥1058॥ अर्जुना, असे पाहून तू जर आपल्या पोटात द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील, तर कोट्यावधी जन्म गेले तरी, तुला या जन्मातून बाहेर पडता यावयाचे नाही ॥1059॥ अनेक कारणांमुळे लांब, वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात. ॥1060॥ बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे असेना का ? पण बोरीचे यात अन्यथा होत नाही. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी (त्यांना व्यापून असणारी) ब्रह्मवस्तु सरळ आहे. ॥1061॥ निखार्याच्या पुष्कळ ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे. ॥1062॥ अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या, तरी पण त्या सर्वांतून जसे पाणी एकच आहे; त्याप्रमाणे या भूतकारांच्या सर्वांगात तो परमात्मा आहे; ॥1063॥ ज्याप्रमाणे घागरीत व माठात आकाश एकच असते, त्याप्रमाणे हे भूतसमुदाय जरी वेगवेगळे आहेत, तरी यांना व्यापून असणारी जी वस्तू, ती एकसारखीच आहे. ॥1064॥ ज्याप्रमाणे बाहुभूषणादिक निरनिराळ्या अलंकारांतून सोन्याचा कस एकच असतो, (आणि त्या केयूरादिक अलंकारांची वाटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे) हा भूतभास नाश पावणारा आहे; पण या भूताभासांत असणारा आत्मा अविनाशी आहे ॥1065॥ याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्मरहित आहे व तो सर्व जीवांना व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो, तो ज्ञानांमध्ये चांगला डोळस आहे ॥1066॥ अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत, त्यांमध्ये तो डोळस आहे. ही त्याची स्तुती नसून तो मोठा भाग्यवान आहे ॥1067॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद


