पूर्वार्ध
“सर नमस्कार. मी चेतन शेलार, माळी सरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय,” दारात उभा असलेला तरुण म्हणाला.
“ये ये बैस…” सुधाकरराव शिर्केनी त्याला आत बोलावलं.
चेतन आत येऊन अवघडून बसला. सुधाकररावांनी त्याचं निरीक्षण केलं. साधारण 24-25 वर्षांचा तरुण दिसत होता. प्रथमदर्शनी चेतनबद्दल त्यांचं मत काही फारसं चांगलं झालं नाही.
“हं बोल, कशाकरिता येणं केलसं?” खरं तर तो कशासाठी आलाय हे त्यांना चांगलंच माहीत होतं. माळी सरांनी त्यांना चेतनबद्दल सर्व कल्पना देऊन ठेवली होती.
“सर, मी काही कथा लिहिल्या आहेत, त्यांचा कथासंग्रह करायचा विचार आहे. आपली प्रस्तावना हवी होती मला त्यासाठी…”
“अगोदरचं काही साहित्य प्रकाशित झालंय?”
“नाही सर. हा पहिलाच कथासंग्रह आहे.”
सुधाकररावांनी तोंड वाकडं केलं…
“म्हणजे अगदीच नवोदित आहेस तर! काय आहे, मी नवोदित साहित्यिकांना प्रस्तावना देत नाही; कारण त्यांच्या लिखाणातली वाक्यरचना योग्य नसते. प्रसंग योग्य तसे जोडलेले नसतात आणि व्याकरण तर अतिशय वाईट असतं. त्यांना काय लिहायचंय, हेच समजत नाही आणि वाचणाऱ्यांना काय लिहिलंय, ते समजत नाही. अशा पुस्तकांना प्रस्तावना लिहून देणं म्हणजे स्वतःचा अपमान करुन घेणं आहे. आज 30-35 वर्षांची माझी साहित्यसाधना आहे. ज्ञानपीठ सोडला तर, साहित्यातले जवळजवळ सर्वच पुरस्कार मला मिळाले आहेत. अशा स्थितीत मला सांग, एका नवोदित लेखकाला प्रस्तावना कशी द्यायची? अनुभवी लेखक म्हणजे ज्याची 2-3 पुस्तकं तरी प्रकाशित झाली असतील, अशा लेखकांच्या साहित्याला प्रस्तावना देणं बरंही वाटतं”
चेतनचा चेहरा पडला. खरंतर, सुधाकरराव शिर्केसारख्या नामवंत साहित्यिकाकडे जायची त्याची हिंमतच नव्हती. माळी सरांनी आग्रह केला म्हणून तो आला होता.
“सर, माळी सरांना मी सर्व कल्पना दिली होती. त्यांनी आपल्याला काहीच सांगितलं नाही?”
हेही वाचा – चांगली बोहनी…
त्याने असं म्हटल्याबरोबर त्याला उत्तर न देता सुधाकररावांनी मोबाइल उचलून पांडुरंग माळींना फोन लावला. चेतनची छाती धडधडू लागली…
“अरे पांडुरंग, हा चेतन इथे येऊन बसलाय. पण हा अगदीच नवोदित लेखक आहे. तुला माहिती आहे, मी कोणत्या दर्जाचा साहित्यिक आहे आणि तरीही तू त्याला…! बरं ठीक आहे. तू म्हणतोस तर मी वाचेन. पण मला आवडलं नाही तर, प्रस्तावना देणार नाही. ठीक आहे ना?… ओके.”
त्यांनी मोबाईल बंद केला. चेतनकडे थोडं रागानेच बघत ते म्हणाले, “माळी सर म्हणताहेत एकदा वाचून पहा. इथे कुणाला वेळ आहे, असं वाचून पहायला!”
चेतन अजूनच अवघडला. काय बोलावं ते त्याला कळेना.
“ठीक आहे,” सुधाकररावच मग म्हणाले, “माळी सर म्हणताहेत तर वाचून पहातो. तू मला पंधरा दिवसांनी फोन कर.”
“धन्यवाद सर. बरं सर, येतो मी…”
नमस्कार करून तो पटकन बाहेर पडला.
सुधाकररावांच्या पत्नी मालतीताई पाण्याचे ग्लास घेऊन नेमक्या त्याचवेळी बाहेर आल्या…
“अरे, गेला वाटतं तो मुलगा. अहो, चहाचं तरी विचारायचं त्याला!”
“जाऊ दे, असे कितीतरी नवोदित कवी, लेखक येत असतात. कुणाकुणाला चहा पाजणार?”
मालतीताई काही बोलल्या नाही.
सुधाकररावांचं असं वागणं त्यांना नवीन नव्हतं. गेल्या 25-30 वर्षांपासून सुधाकरराव साहित्य क्षेत्रात तळपत होते. 16 कादंबऱ्या, 35 कथासंग्रह, 44 काव्यसंग्रह, 40 नाटकं याबरोबरच शेकडो लेख… अशी सुधाकररावांची जबरदस्त साहित्य साधना. साहजिकच सुधाकररावांना याचा अहंकार होता. हा अहंकार त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून यायचा. पद्मश्री, साहित्य अकादमी यासारखे बहुतेक सर्व पुरस्कार त्यांना मिळालेले. त्यांना पुरस्कार मिळाला की, त्या पुरस्काराचाच सन्मान होतो, असं त्यांच्याबाबतीत सन्मानाने बोललं जायचं. दोन-तीन साहित्य संमेलनाचे अध्यक्षही ते राहिले होते. एखाद्या लेखकाच्या पुस्तकाला त्यांची प्रस्तावना असली की, त्या पुस्तकाचा आणि त्या लेखकाचाही दर्जा कैकपटीने वाढायचा. त्यामुळेच सुधाकरराव कुणाही ऐऱ्यागैऱ्या लेखकाला प्रस्तावना देत नसत. शिक्षकी पेशात असतानाच ते कडक शिस्तीचे होते. आता निवृत्त झाल्यानंतरही ती शिस्तही थोड्याफार प्रमाणात शिल्लक होतीच.
पांडुरंग माळी त्यांचे बालपणीचे जिवलग मित्र. सुधाकररावांसारखे चतुरस्त्र साहित्यिक नसले तरी, कवी म्हणून प्रसिद्ध होतेच. त्यांनी पाठवलेल्या लेखकाला सुधाकररावांनी प्रस्तावना दिली नाही, असं कधीही झालं नव्हतं. आजमात्र पांडुरंगाने एका पंचवीशीच्या नवोदित लेखकाला प्रस्तावनेसाठी पाठवून आपला अपमान केलाय, असं त्यांना राहून राहून वाटत होतं.
आठवडा उलटून गेला तरी सुधाकररावांनी चेतनच्या कथांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. नवख्या लेखकाच्या कथा कचऱ्यात टाकायच्या लायकीच्याच असतात, असं त्यांना वाटत होतं.
आठव्या दिवशी त्यांच्या दारावर एक आलिशान गाडी उभी राहिली. उत्सुकतेने त्यांनी दार उघडलं तर, समोर एक पस्तीशीची देखणी बाई उभी होती. “नमस्कार सर… मी आरती छाबरीया, छाबरीया इंडस्ट्रीजची चेअरमन!”
“नमस्कार! या या बसा,” सुधाकरराव आदराने त्यांना आत घेऊन गेले. छाबरीया इंडस्ट्रीज शहरातली मोठी आणि नावाजलेली कंपनी होती.
“आज काय काम काढलंत आमच्याकडे?”
त्याचवेळी मालतीताई पाणी घेऊन आल्या. आरतीबाईंनी पाण्याचा एक घोट घेऊन ग्लास ठेवून दिला. मग पर्समधून एक फाइल काढली. सुधाकररावांपुढे ठेवत म्हणाली,
“सर मी एक छोटीशी कवयित्री आहे. वेळ मिळेल, तशा कविता करते. या कवितांचं एक पुस्तक प्रकाशित करायचा विचार आहे. त्याला आपण प्रस्तावना द्यावी, अशी विनंती आहे.”
बाईंच्या व्यक्तिमत्वाने सुधाकरराव अगोदरच भारावून गेले होते. त्यांनी फाइल हातात घेतली आणि म्हणाले,
“मॅडम, मी नवोदित कवींना प्रस्तावना…”
“देत नाही, हे मलाही माहीत आहे आणि तुमच्याइतक्या महान साहित्यिकांनी ती का द्यावी? पण माझ्या पुस्तकाला तुमचीच प्रस्तावना असावी, हे माझं स्वप्न होतं सर. तेव्हा प्लीज नाही म्हणू नका सर. मी तुमचं मानधनही द्यायला तयार आहे!”
असं बोलून तिने पर्समधून चेकबुक काढलं. चेकवर सही करून चेक सुधाकररावांच्या हातात दिला…
“पंचवीस हजार आहेत सर. कमी वाटत असतील तर सांगा. आणखी देते…”
सुधाकररावांनी चेक हातात घेऊन त्याकडे पाहिलं. आजपर्यंत प्रस्तावना लिहून द्यायचे त्यांना कुणी पैसे दिले नव्हते, त्यांनीही कधी मागितले नव्हते.
“पण सर मला घाई आहे. माझ्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला ते पुस्तक प्रकाशित करायचंय. त्याचंही निमंत्रण तुम्हाला आताच देऊन ठेवते… पत्रिका येईलच! तेव्हा दोन दिवसांत जमेल सर?”
“प्रयत्न करतो.”
” प्लीज सर… आणि हो, प्रकाशनाला मुख्यमंत्री येणार आहेत. त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार करायचा विचार आहे.”
सुधाकररावांचा चेहरा आनंद आणि समाधानाने फुलला.
“धन्यवाद मॅडम!”
“अहो, धन्यवाद कसले! हे तर आमचं भाग्य आहे की, तुम्ही प्रस्तावना द्यायला आणि आमच्या ॲनिव्हर्सरीला यायचं कबूल केलंत. बरं सर येऊ? दोन दिवसांनी कुणाला तरी पाठवते प्रस्तावना घ्यायला.”
सुधाकररावांनी तिला नमस्कार केल्यावर ती बाहेर पडली.
हेही वाचा – बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!
रात्री जेवण झाल्यावर सुधाकररावांनी उत्सुकतेने ती कवितांची फाइल काढून एकेक कविता वाचायला सुरुवात केली. दोन-तीन कविता वाचूनच त्यांच्या लक्षात आलं की, कवितांचा दर्जा अतिशय सुमार आहे. नुसतं यमक जुळवलं म्हणजे कविता झाली, असा बाईंचा गैरसमज झाला होता. अगदी एखाद्या शाळकरी मुलीने कविता लिहाव्यात, अशा त्या कविता होत्या. फक्त अर्ध्या तासात त्यांनी त्या 56 कविता वाचून पूर्ण केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की, त्या सर्वच कविता रद्दीत फेकून देण्यासारख्या आहेत. त्यांना त्या बाईचा आणि स्वतःचाही संताप आला. अशा फालतू पुस्तकाला आपल्यासारख्या एका ‘पद्मश्री’ प्राप्त लेखकाने प्रस्तावना द्यावी, हे काही त्यांना पटेना. पण प्रश्न व्यवहाराचा होता. बाईंनी दोन पानाच्या प्रस्तावनेला पंचवीस हजार मोजून त्यांचा स्वाभिमान आणि त्यांची तत्वं विकत घेतली होती. वर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्काराचं गाजरही दाखवलं होतं. आता हा व्यवहार पूर्ण करणं भाग होतं. त्यांनी नाईलाजाने लॅपटॉप पुढे ओढला. मोठ्या अनिच्छेने त्या रद्दी कवितांची आणि मोठी उद्योजिका असूनही कवीमन जपणाऱ्या आरती छाबरीयाची तारीफ करणारी प्रस्तावना त्यांनी तयार केली.
दोन दिवसांनी आरतीबाईंचा एक माणूस येऊन ती प्रस्तावना घेऊन गेला. झाल्या प्रकाराने सुधाकरराव स्वतःवरच नाराज होते. नवख्या लेखकांना आता कोणत्याही परिस्थितीत प्रस्तावना लिहून द्यायची नाही, हे त्यांनी ठरवून टाकलं!
चार-पाच दिवसांनी पांडुरंग माळींचा फोन आला. चेतनच्या कथा वाचल्या की, नाही हे विचारत होते.


