Sunday, July 20, 2025
Homeअवांतरस्वयंपाकघर अन् अर्थशास्त्र, समाजशास्त्राचे नियम

स्वयंपाकघर अन् अर्थशास्त्र, समाजशास्त्राचे नियम

गायत्री वैशंपायन

स्वयंपाकघर ही प्रयोगशाळा… आणि स्वयंपाक करणे ही रोजची साधी गोष्ट वाटली तरी, ते एक शास्त्र आहे. अनेक प्रसिद्ध आहारतज्ज्ञांनी त्यावर अनेकदा लिहिले आहे. आपला आजचा विषय तो नाही. अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांचेही अनेक नियम स्वयंपाकघराला लागू पडतात. आज आपण त्याचा अभ्यास करू.

Product Life Cycle

कोणतेही नवीन product बाजारात आले की, साधारण त्याच्या salesचा जो ग्राफ असतो, तो साधारण डोंगरासारखा असतो. म्हणजे, सेल हळूहळू वाढत जातो, peak येतो, काही काळ स्थिरावतो आणि मग तो खाली येतो.

आपल्या मार्केटमध्ये परिस्थिती त्याच्याबरोबर उलट आहे. लाडू, चिवडा, चकली हे पदार्थ ताजे बनवले गेल्यावर त्याला सुरुवातीला प्रचंड खप असतो. दोनच्या वर चकल्या खायच्या नाहीत, याचा अर्थ ‘एका वेळेला दोन’ असा घेतला जातो. दिवसातून अशा अनेक वेळा येतात. जोडीने लाडू गट्टम होतात. असे पाच-सहा दिवस गेले की, कुठल्यातरी नवीन मालाला उठाव येतो. लाडवांचा डबा मागे ठेवला गेला कपाटात की, तो मागेच राहतो. गृहिणीचा जिन्नस वाया जाऊ नये, हा कटाक्ष असतो. वास वगैरे यायच्या आत पदार्थ संपवायला म्हणून ती तो खात बसते. (त्यात संपते तिची एकेकाळची फिगर!)

अचानक आठ-दहा दिवसांनी घरात कोणालातरी आठवण होते. ‘अगं, लाडू आहेत का शिल्लक?’ आता लाडवांनी डब्याचा तळ गाठलेला असतो. खप एकदम वाढून चढाओढ चालू होते. ‘तू कायम कमीच करतेस,’ हे बाईला ऐकून घ्यावे लागते. या सगळ्या खेळातली ती मुरलेली खिलाडी असल्यामुळे तिला करायचे तेच ती करते.

या सगळ्यात आपल्याला उलट्या डोंगरासारखा ग्राफ काढता येतो.

हेही वाचा – एक पाटी… पॅटिस संपले!

FOMO – Fear of Missing Out

आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण ‘फोमो’ मुळे करतो. फोमो म्हणजे एखादी गोष्ट दुसरा करतोय आणि आपण एकटेच राहून जाऊ म्हणून करायला धावणे. या फोमोचा स्वयंपाकघरात छान उपयोग करून घेता येतो. एखादा पदार्थ घरात केलेला किंवा बाहेरून आणलेला कोणाला आवडलेला नसतो. ‘यावेळी तुझी भट्टी नेहमीसारखी जमली नाही गं’, किंवा ‘अमक्यातमक्या बाकरवडीची मधली दांडी कडक आहे’, असे शेरे मारले जातात. अशा वेळी तो पदार्थ बशीत घालून न झाकता मधोमध टेबलावर ठेवावा. अधूनमधून बशीतल्या खाऊचे बकाणे भरावे. एका शब्दानेही बोलू नये. सगळेजण खाताना आपल्याला बघत आहेत, एवढी मात्र खात्री करून घ्यावी. संध्याकाळपर्यंत बशी रिकामी. काम फत्ते.

Thanks to the FOMO.

Law of diminishing utility

हा एक अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. तहान लागलेली असताना पाण्याच्या पहिल्या ग्लासाला जी किंमत असते, ती दुसऱ्या ग्लासाला नसते, तिसऱ्या ग्लासाला त्याहून कमी… असा साधारणपणे हा सिद्धांत आहे. आपण ‘थोडक्यात गोडी असते’, ‘अति झाले आणि हसू आले’, ‘अति तिथे माती’, अशा म्हणी वापरतो त्याचेच सॉफिस्टिकेटेड भावंड.

हा law साधारण हिवाळ्यामध्ये आपल्या स्वयंपाकघराला लागू पडतो आणि बायका कळत नकळत या lawला बळी पडतात.

साधारण डिसेंबर उजाडला की, बाजारात मोठ्या प्रमाणावर मटार यायला लागतो. ‘मटार येणे’ ही अजूनही पुण्यात एक घटना आहे. बायका लगेच उपमा, पोहे, पुलाव, मसालेभात जे सुचेल त्यात मटार घालायला सुरुवात करतात. मटार पराठा, मटार सूप, मटार उसळ, मटार बर्फी या सगळ्या सॉलिड, लिक्विड, सेमी-सॉलिड, सेमी-लिक्विड या प्रकारात मटार वापरला जातो. मग जास्त मटार खाऊन वायू निर्माण होतो आणि टरटर होते, तो भाग वेगळा! बाहेरून मग त्यात मटार करंजी, मटार कचोरी, मटार पॅटिस अशी भर पडते. काही अनाकलनीय कारणामुळे पुण्यात मटार उसळ आणि पाव ही हिट जोडी आहे. असे काही दिवस बरे जातात. फ्रीजमध्ये पाचएक किलो मटार साठवला जातो.

एक दिवस मटारमय नाश्ता समोर आल्यावर घरचे आता मटार खाणार नाही म्हणून फतवा काढतात. फ्रीजमधल्या मटारांना पावभाजीमध्ये तोंड लपवावं लागते. ते संपायला पुढचा डिसेंबर उजाडतो. रोजगारनिर्मिती आणि चार लोकांना कर्तृत्व सांगणे या पलीकडे मटारांचा उपयोग होत नाही. हाच प्रकार कोथिंबीर स्वस्त झाल्यावर होतो. चारी दिशांनी कोथिंबीरीचा मारा सुरू होतो. शेवटी नको ती कोथिंबीर वडी म्हणायची वेळ येते. तुरीच्या शेंगा आणि हरभऱ्याचे सोलाणे याच कॅटेगरीमध्ये.

घरच्यांची अशी कारण नसताना नाराजी पत्करावी लागते, कारण law of diminishing utility विचारात घेतला जात नाही म्हणून! अर्थात, प्रत्येक नियमाला अपवाद असतात, तसे आंबा, चॉकलेट, आइसक्रीम असे अपवाद या नियमाला आहेत.

हेही वाचा – आमच्या मराठी शाळा

FIFO – First in First Out

हे तत्व आचरणात आणले तर बरेच नुकसान टाळता येते. FIFO म्हणजे जो जिन्नस आपण आधी विकत आणलाय, तोच आधी संपवायचा. नाशिवंत फळ आणि भाज्यांना हे जास्त लागू पडते.

फ्रीजमध्ये एखादी पालेभाजीची जुडी निवडून ठेवलेली असते. बाजारात एक पालकाची हिरवीगार जुडी दिसते. पालक पनीर या रूपात ती पोटात जाते. भाजीच एवढी होते की, दोन दिवस संपवत बसावी लागते. आपण डिच (दुर्लक्ष) केलेली फ्रीजमधली निम्मी जुडी फेकायची वेळ येते. भाजीवाल्याने पाणी जास्त मारले म्हणून बिल फाडायला आपण मोकळे होतो. हे सगळे घडते कारण FIFO विचारात घेतले जात नाही.

बिल फाडण्यावरून आठवले. स्वयंपाक बिघडला की, बायकांना बळीचा बकरा करायला एक फॅक्टर असतो तो म्हणजे हवा. पोहे कडक झाले, हवेवर ढकल. लाडवांचा पाक कमीजास्त झाला, तर पावसाळा, उन्हाळा, जो सीझन असेल त्याचा संबंध जोड. हवेला स्वतःला डिफेंड करता येत नाही आणि बाईला आपल नाक वर ठेवता येते.

अशी आहे स्वयंपाकघरातील गंमत जंमत. हे काही रॉकेट सायन्स नाही की, इथे कुठली कठीण प्रवेश परीक्षा द्यायची नाही. थोडा कॉमन सेन्स वापरला, पंचेंद्रिये जागृत ठेवली तर इथले रूटीन काम तितके नीरस आणि कंटाळवाणे वाटत नाही.

कोणे एके काळी बायकांना घराबाहेर पाऊल टाकता येत नव्हते, शाळा तर पूर्ण लांबच राहिली. अशा या आधुनिक शिक्षणाचा गंधही नसणाऱ्या निरक्षर (अडाणी नव्हे) बायकांनी स्वयंपाकघरातली गणिते बरोबर सोडवली. ‘मॅनेजमेंट’ हे नावही न ऐकता अन्नाचा कणही वाया घालवला नाही. सगळी हुशारी चुलीपाशी वापरायला लागल्यामुळे आपल्यासाठी आजीबाईंचे बटवे/ किचन हॅक तयार झाले.

अशा या आज्या, पणज्या, खापरपणज्यांना माझा आजचा लेख समर्पित.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!