माझे माहेर आणि सासर हे दोन्ही विदर्भातील अकोल्याचे. आमचे शालेय आणि महविद्यालयीन शिक्षण सर्व अकोल्यातून झाले. त्या काळात जीवाची चैन करणे हे सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे नव्हते. माझे वडील भिकमचंद खंडेलवाल या त्यावेळच्या नावाजलेल्या शाळेत शिक्षक होते, त्यामुळे घरी शिस्तीचे वातावरण असल्याने सिनेमा पाहणे, बाहेर जाऊन भेळपुरी, पाणीपुरी खाणे असले प्रकार नव्हते. त्याकरिता आठ-आठ दिवस आधीपासून वडिलांची परमिशन कशी काढायची आणि कोणी काढायची, हा मोठा प्रश्न असे. अगदीच ते काही ‘नाही’ म्हणायचे नाहीत, परंतु ही परवानगी आम्हाला दोन तीन महिन्यांतून एकदा मिळत असे. बरं, ते स्वतः चोखंदळ असल्याने बऱ्याच वेळेस तेच स्वतः घरी आईला विविध पदार्थ करायला लावत असत. सगळ्यांच्याच घरी त्या काळात बहुदा असंच होत असावं.
आमच्या अकोल्यात त्या वेळेस हॉटेल्स फारशी नव्हती, मात्र नगर परिषदेसमोर भेळपुरी, पाणीपुरीवाल्यांच्या गाड्या होत्या. त्या काळात चायनीज किंवा मोमोजसारखे पदार्थ कोणाला माहीतही नव्हते. मॅगीदेखील फारशी कोणाला माहीत नव्हती. अकोल्यात आम्हाला माहीत असलेले चविष्ट आणि चटकदार चाटचे दुकान म्हणजे ‘राजस्थान दहीबडा हाऊस’! हे दुकान जुन्या शहराच्या जयहिंद चौकात अजूनही आहे. त्यावेळेस हे दुकान जे चालवायचे त्यांना सगळेच मामा म्हणायचे. आम्ही तर ‘मामा दहीबडा हाऊस’च म्हणायचो. ‘राजस्थान दहीबडा’ या नावाकडे आमचे लक्षही जात नसे, इतका हा मामा जवळचा झाला होता…
मला आठवतं की, या दुकानामध्ये एक म्हातारा आचारी होता, जो कचोरी, मुगाचे वडे, भेळ आणि त्यांचा फेमस दहीवडा तयार करायचा. हे पदार्थ तयार करण्यात त्याचा हातखंडा होता. मुगाच्या सालीसह असलेले तसेच लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घातलेले ते छोटे छोटे गोलसर वडे, त्यावर चिंच गुळाची चटणी, पुदीना चटणी अन् दही… त्यावरून लाल तिखट, धणे-जिरे पावडर, मीठ, कांदा आणि हिरवीगार कोथिंबीर हे सर्व जेव्हा द्रोणातून समोर यायचं न तेव्हा ती एक प्लेट कधी संपवतो, असे असायचे. कारण नंतर दहीवडापण खायचा असायचा नं! त्यांचा तो एकदम सॉफ्ट स्पंजी दहीवडा देखील असाच स्वादिष्ट होता. मग आमचा मोर्चा भेळेकडे वळायचा…
हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!
तिथे गेलो तर, काय खावे आणि काय नको, असे व्हायचे. गरम गरम राजस्थानी प्याज कचोरी, दाल कचोरी देखील मनाला भुरळ पाडायचे! आम्हीच नाही तर, तिथे येणारे बहुतेक सर्वच स्पेशली मूगवडा आणि दहीवडा तिथेच खाणे पसंत करायचे; कारण तो घरी नेता यायचा नाही, त्या काळात पार्सल सुविधा म्हणजे न्यूजपेपरच्या तुकड्यात पदार्थ बांधून न्यावे लागायचे… तेदेखील कोरडे असतील तरच नेता येत होते! इतकं खाऊन झाले की, मग पेपरमध्ये बांधलेले कचोरीचे पार्सल घेऊन आम्ही घरचा रस्ता पकडायचो.
आजही ते दुकान जयहिंद चौकात आहे, परंतु आता मामा नाही आणि तो म्हातारबाबा पण नाही. त्यांची मुलं ते दुकान चालवतात. ते दुकान अजूनही तसचं आहे, जसं आम्ही 1990 किंवा त्याआधीपण पाहिलेले होते.
अकोल्यातील दुसरे आमचे आवडते ठिकाण म्हणजे नगर परिषदे समोरच्या मोकळ्या जागेत असलेली अम्माची गाडी! ती एक म्हातारी बाई होती आणि आपल्या पोरांच्या मदतीने भेळपुरीची गाडी चालवायची. तिच्याकडचे पिवळे मूग डाळीचे पकोडे मला खूप आवडायचे. तसेच तिच्याकडे भेळेपेक्षा खस्ता चाट खायला मजा यायची. आमच्या घरापासून ते ठिकाण बरेच लांब होते, त्यामुळे संध्याकाळी आमची आई आम्हाला ‘एकीकडून पायी चालत जायचे आणि येताना रिक्षाने आणेन’ या अटीवर अम्माच्या दुकानात न्यायला तयार असायची; कारण दोन्ही वेळेस रिक्षेचा खर्च तिला परवडायचा नाही. यातून काटकसरीची शिस्त लावणे, हा तिचा उद्देश असायचा.
अम्माच्या गाडीच्या बाजुलाच त्यानंतर दोन गुजराथी मुलांनी फक्त साबुदाणा वड्याची गाडी लावली होती. आईचा जेव्हा उपास असायचा त्या दिवशी नगर परिषदेसमोर भेळपुरी किंवा पकोडा चाट वगैरे खायला आम्हाला बरोबर न्यायची. त्यामुळे तिला देखील त्या गुजराथी मुलांकडील साबुदाणा वड्यांचा स्वाद चाखायला मिळायचा. त्या काळात साबुदाणा हा फक्त उपासालाच खायचा असतो, ही भावना मनामध्ये ठाम होती तरीही आईने तो साबुदाणा वडा घेतला की, तो आम्हीही खाणार हे समीकरण निश्चित होते. त्यामुळे मग अम्माच्या गाडीवरील एखादा पदार्थ कमी करायचा किंवा त्या दिवशी फक्त साबुदाणा वडाच खायचा, हे घरीच ठरवलेलं असायचं.
याचप्रमाणे माझे वडील घरी जर कोणी पाहुणे आले आणि त्यांचा पाहुणचार करायचा असेल तर, अकोल्यातील टिळक रोडवर असलेल्या ‘बद्री’च्या दुकानातून जिलेबी, ईमरती आणि मसाल्याची जाडी शेव (जी अगदी करंगळीइतकी जाड असायची) ती आणायचे. या शेवेची मग आई मसाल्याचा रस्सा असलेली तर्रीची भाजी करायची… भन्नाट चवीची ती भाजी आई जेव्हा करायची, तेव्हा तो सुगंध सर्वत्र पसरलेला असायचा. मला तर अजूनही तो गंध आठवला की, नॅास्टॅल्जिक व्हायला होतं. तसेच, त्याच रोडवर ‘छाया कोल्डड्रिंक्स’ म्हणून एक लहानसे रेस्टॅारन्ट होते, ते फक्त लस्सीकरता प्रसिद्ध होते… आज त्यांच्या अकोल्यात तीन-चार ठिकाणी ब्रॅन्चेस आहेत. त्यांच्याकडील रबडी आणि बासुंदी आता अकोल्यात फेमस होत आहे.
बद्रीकडील दहीभल्ला देखील असाच चविष्ट होता. ज्यामधे वड्याचा आकार मोठा आणि चपटा असे. त्यामध्ये काजू, किसमीस टाकलेला असायचा. आमच्या घरी माझा भाऊ स्टीलच्या डब्यातून या दहीभल्ल्यांचे पार्सल घेऊन यायचा. अकोल्यातील आरएलटी सायन्स कॉलेजसमोरील ‘मधुचा तर्रीवाला आलुबोंडा’ तर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आमच्या एरियामध्ये उन्हाळ्यात सायकलवर एक माणूस गारेगार आइस्क्रीम विकायला यायचा. त्याच्याकडील एकाच फ्लेवरचे आइस्क्रीम वाटीत घेऊन खाण्याची मजा काही औरच होती. सिमला कुल्फीवाला मामूदेखील उन्हाळ्यात रात्री साडेदहा, अकरा वाजेपर्यंत आमच्या एरियात त्याच्या गाडीला असलेली घंटा वाजवत कुल्फी विकत फिरायचा. त्या वेळेस ती कुल्फी 25 पैसे, 50 पैसे आणि एक रुपया अशा भावाने मिळायची. किमती प्रमाणे कुल्फीचा आकार असायचा.
त्याचप्रमाणे अकोल्यातील पाणीपुरीसारखी पाणीपुरी जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही, असा अकोलेकरांचा ठाम विश्वास आहे. 1990पासून पाणीपुरीची जी टेस्ट आम्ही चाखली आहे, ती आजही तशीच आहे! आता तु्म्ही याला आमची मानसिकता म्हणा किंवा आमचे आमच्या अकोल्यावरील प्रेम म्हणा… परंतु ही बाब 100 टक्क् खरी आहे.
हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!
अकोल्यातील काही बेकरी देखील प्रसिद्ध आहेत. ‘आनंद बेकरी’सारखी छोट्या बो-टायसारखा आकार असलेल्या खारीची टेस्ट मला दुसरीकडे कुठेच चाखायला मिळाली नाही. अकोल्यातील या बेकरीचे प्रॉडक्ट प्रसिद्ध उद्योगपती बिर्ला यांच्या कोलकात्यातील घरी जातात. कारण त्यांच्या एका सुनेचे माहेर अकोल्याचे आहे. त्यांच्या लग्नात त्यांनी ही खारी आणि बिस्किट्स, कुकीज पाहुण्यांच्या चहापानात ठेवले होते, तेव्हापासून बिर्ला कुटुंब या ‘आनंद बेकरी’च्या प्रेमात पडले आणि आमच्या अकोल्यातील त्यांच्या व्याह्यांनी बिर्ला कुटुंबाकडे घरी ‘आनंद बेकरी’चे हे पदार्थ पाठवण्याची परंपरा आजतागायत कायम ठेवली आहे.
अकोल्यातील 90च्या दशकातील अजून एक आठवण म्हणजे ‘राशा ब्रेड’! राशा म्हणजे राष्ट्रीय शाळेत तयार होणारा ब्रेड. या शाळेमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून मुलं शिकायला यायचे. ती मुलं हे मऊसूत आणि लुसलुशीत ब्रेड तयार करायचे. हे ब्रेड म्हणजे, त्या शाळेच्या बेकिंग युनिटचे वैशिष्ट्य होते. तसेच, गांधीग्रामची अस्सल गुळाची आणि भरपूर शेंगदाणे असलेली गुळपट्टी अप्रतिम होती. आजही ती मिळते!
ही सगळी खाद्यपदार्थांची दुकानं आजही अकोल्यात अस्तित्वात आहेत. थोडेफार बाह्यस्वरूप बदललेले असेल किंवा खाद्यपदार्थांच्या चवीत बदल झला असेल…, परंतु अकोलेकर अजूनही तसेच दिलदार मनाचे आहेत. चवीने खाणार आणि खाऊ घालणार… हा अकोलेकरांचा मूलमंत्र आहे. कधी अकोल्याला गेलात तर, मी, नमूद केलेल्या या ठिकाणांवर जाऊन तेथील प्रसिद्ध पदार्थांचा अवश्य आस्वाद घ्या, ही माझी आग्रहाची विनंती! एकदा का तुम्ही या पदार्थांचा आस्वाद घेतलात तर, तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल ही खात्री मला आहे. पाहा जमलं तर… पण मला सांगायला विसरू नका बरं!!


