सकाळी सकाळी कॉलेज मैत्रीण छायाचा फोन आला – “अरे, आज काय खास आहे, ते विसरला का? दरवर्षी तुझा या दिवशी मला पहिला फोन असतो आणि आपण जोरदार हसत सुटतो.”
मी : विसरलो मुळीच नाही. आज मे महिन्याचा पहिला रविवार आहे आणि पहिला रविवार म्हणजे ‘जागतिक हास्य दिन’. मी तुला फोन करणार एवढ्यात शाळेतल्या एका मैत्रिणीचा जागतिक हास्य दिन म्हणून फोन आला. मग बराच वेळ आमचे हसणे आणि बोलणे सुरू होते. तो फोन संपला आणि मी तुला फोन लावणार तेवढ्यात तुझा फोन आला…
छाया : ठीक आहे. पण पुढच्या वर्षी पहिला फोन आणि पहिलं बोलणं माझ्याशीच झालं पाहिजे. चलो, let us start laughing…
आणि आमचे हसणे आणि गप्पा सुरू झाल्या…
मंडळी, जागतिक हास्य दिवस म्हणून एकच दिवस न हसता, आपण रोजच काहीतरी कारण शोधून, निमित्त शोधून, हसायलाच पाहिजे!
हेही वाचा – आनंदी जगायला काय लागतं?
असं म्हणतात –
- Life is worth living as long as there is laugh in it
- A day without laughter is a day wasted
- laughter is good for health and it is one of the best medicines in the world
- एवढे सगळे फायदे असूनही लोक हसत नाहीत, यावर मुंबईचे डॉक्टर कटारिया यांनी 1998 साली एक सोपा तोडगा काढला आणि तो म्हणजे दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिवस साजरा करायचा. त्यांनी असा विचार केला की, एक दिवस हसल्यामुळे सगळ्यांना त्यामध्ये मिळणारा आनंद समजेल आणि लोक हळूहळू रोजच हसायला लागतील. जगामधल्या जवळजवळ 70 देशांमध्ये याच दिवशी हास्य दिन साजरा केला जातो.
हसण्यामुळे —
- मनावरचा ताण कमी होतो
- आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते
- हार्ट अटॅकचा धोका कमी होतो
- चेहऱ्यावर चमक येते
- आणखीन एक खूप छान महत्त्वाचा फायदा म्हणजे – smile is a spiritual perfume you spray on others.
आता तुम्ही म्हणाल – नुसत्या हसण्यामुळे एवढे फायदे होतात तरी कसे?
मेडिकल सायन्स याचे उत्तर देते ते असे –
आपण हसायला लागलो की, आपल्या मेंदूमधून डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे फील गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे मन प्रसन्न होते. तसेच हसण्यामुळे मेंदूमधून एंडोर्फिन्स हे हार्मोन्स पण रिलीज होतात, आणि हे नॅचरल पेन किलरचे काम करतात. त्यामुळे स्ट्रेस कमी होते.
हे विचार जर पटले तर कोणीही हे पॅकेज फक्त एक दिवस म्हणजे हास्य दिनाच्या दिवशी घेऊन थांबणार नाही, हे नक्की! …आणि हे फ्री पॅकेज रोजच मिळवण्याकरिता सगळीच मंडळी रोजच हसणार हे पण तेवढेच नक्की.
हेही वाचा – असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?
काही जणांकडून एक प्रश्न असाही येऊ शकतो की, आजकाल घरामध्ये काय, किंवा ऑफिसमध्ये काय, किंवा मित्रांबरोबर काय, जेवढ्यास तेवढे बोलणे / कामापुरते बोलणे, एवढेच होत असते. अघळपघळ गप्पा आणि हसणे, हे कधीच होत नाही. नेपोलियन यांच्या डिक्शनरीमधून जसा त्यांनी अशक्य शब्द बाद केला होता, तसाच आपल्या डिक्शनरीमधून ‘हसणे’ हा शब्द बाद होत चालला आहे आणि त्यामुळे हसायला कारणच मिळत नाही, तर काय करू?
यावर पण सोपे उत्तर आहे, ते असे –
विनोद ऐकून हसता येतं (युट्यूब, फेसबुक वगैरेंची मदत सहजपणे मिळू शकते), विनोदी वाचन करून हसता येतं, विनोदी सिनेमा बघून हसता येतं, लहान मुलांशी खेळताना हसता येतं, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताना मनसोक्त हसता येतं (माझं रोजचं भरपूर हसणं याच माध्यमातून होत असतं)… माझी तीन पुस्तके ‘म्हैस’ आणि ‘काही आहे का? काही आहे का?’ आणि ‘हसती खेळती बायको’ ही ॲमेझॉनवर प्रकाशित झाली आहेत. त्यातल्या गोष्टी वाचून भरपूर हसता येईल. मला फोन करा आणि ही पुस्तके ॲमेझॉनकडून कुरियरने तुमच्या घरी दोन दिवसांमध्ये हजर होतील.
…आणि अगदीच नाही तर आरशामध्ये स्वतःकडे बघून पण हसता येतं… ते पण जमत नसेल तर मला फोन करा, आपण भरपूर हसू.
चला तर मग, आता कुठलेही कारण न शोधता…
Start 1..2…3… & 4…
हा हा हा हा
हा हा हा हा हा
हा हा हा हा हा


