Sunday, July 20, 2025
Homeललितएक पाटी... पॅटिस संपले!

एक पाटी… पॅटिस संपले!

गायत्री वैशंपायन

पुणे शहरात गेली वीस वर्षे वास्तव्य असल्यामुळे दुकानाच्या समोरील पाटी किंवा बोर्ड या प्रकाराची मला चांगलीच सवय झालेली आहे. तरी नीट विचार केला तर, जास्तीत जास्त वेळा मी पाहिलेली पाटी म्हणजे ‘पॅटिस संपले’.

त्याचं असं आहे की, माझ्या दररोज जायच्या, यायच्या रस्त्यावर एक प्रसिद्ध बेकरी आहे. ती सकाळी साडेसातला उघडते आणि साधारण सकाळी अकराच्या सुमारास बंद करतात, संध्याकाळी परत पाच ते आठ… असे त्यांचे जबरदस्त working hours आहेत. सकाळी उघडल्यावर ‘गरम पॅटिस तयार आहेत’ असा बोर्ड ते दुकानाच्या बाहेर आणून ठेवतात. त्याच बोर्डाच्या उलट्या बाजूला ‘पॅटिस संपले’ असे दोन ठसठशीत शब्द छापलेले आहेत.

सकाळी दहाच्या पुढे तो बोर्ड उलटा केला जातो. संध्याकाळी हा शुभयोग साधारण साडेसहा सातच्या आसपास जुळून येतो. म्हणजे एक लक्षात घ्या की, बोर्ड हा दुकानासमोर कायमच असतो. सुलटा किंवा उलटा. बेकरी उघडून पॅटिस तयार असल्याचा बोर्ड लावताना बेकरीवाल्याचा चेहरा निर्विकार असला तरी ‘पॅटिस संपले’, हे लावताना कर्तव्यपूर्तीचा एक आनंद कायम चेहर्‍यावर असतो.

शनिवार, रविवार तर कधीकधी सकाळी जास्त माल येऊनसुद्धा तो दीड-दोन तासांत संपतो. (काही अनाकलनीय कारणाने पुण्यात weekendला नाश्त्याला पॅटिस चापण्याची पद्धत आहे.) मग नंतर माल येतही नाही आणि मग बेकरीवाल्यांना दिवसभर गिर्‍हाईकाना पायरीही चढायला न लावल्याचे समाधान दिवसभर उपभोगता येते.

मार्केटिंगचं कुठलं तत्व या मंडळींना लागू पडतं देव जाणे. Philip kotlerचं बारसं जेवलेली ही माणसं आहेत. एकतर कितीही demand असली तरी supply हा तेवढाच रहातो आणि किंमतही दिवसेंदिवस वाढत असली तरी तशी आटोक्यात असते. बरं, नाशवंत मालाखेरीजही biscuit, नानकटाई, cream roll असा टिकाऊ मालही बेकरीत असतो. पॅटिस घ्यायला आलेलं गिर्‍हाईक ते संपलं असलं तरी समोर दिसले असं काहीतरी घेऊन जाईल. अगदी खालूनच घालवून देण्यात काय हशील आहे?

‘पॅटिस संपले’ ही एक वृत्ती आहे आणि या वृत्तीचा प्रत्यय पुण्यात जागोजागी येतो.

  • आमची कुठेही शाखा नाही.
  • मंगल कार्यालय तीनला सोडायचं असेल तर पावणेतीन वाजल्यापासून दिवे, पंखे बंद करायला घेणे, खुर्च्या उचलणे.
  • जास्त पोळ्यांची order घ्यायला पोळी भाजी केंद्राने नकार देणे.
  • पाहुण्यांपैकी तीन-चार जण गळल्यावर 20 माणसांच्या वरतीच order घेतो सांगून घरगुती caterer बाईने जमणार नाही, असे सांगणे.
  • तुळशीबागेत एकच्या ऐवजी एक वाजून पाच मिनिटांनी दुकानात गेलो असताना, “संध्याकाळी या” असे सांगून आपल्या डोळ्यासमोर शटर ओढणे.

अशी या वृत्तीची नानाविध रूपं आहेत.

याच वृत्तीची एक दुसरी बाजू आहे आणि ती तितकीच लखलखीत आहे, ती आहे गुणवत्ता आणि दर्जा. मंगल कार्यालयवाला आपल्याला वेळेच्या पुढे दहा मिनिटेही थांबून देणार नाही कारण पुढल्या कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय अगदी नीट, स्वच्छ करून ठेवतील.

चुकून म्हणजे चुकून ही शिळी भाजी पॅटिसमधे घुसडली जाणार नाही. सगळा कच्चा माल उत्तमच qualityचा असेल. आदल्या दिवशीची पॅटिस कधीही ताजी म्हणून विकणार नाहीत. (ती उरतच नाहीत म्हणा.) अगदी कोविड काळात सुद्धा यांचा खप नेहमीप्रमाणेच होता. दुकानात फक्त एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश होता, इतकाच काय तो फरक.
असो. लेख आवरता घेते. आता सकाळ… नाश्त्याची वेळ झाली. लवकर बेकरीत जायला हवं. नाहीतर पाटी दिसेल,

‘पॅटिस संपले’

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!