गायत्री वैशंपायन
साधारणतः कुठल्याही लेखाची सुरुवात ही catchy, attractive अशा शीर्षकाने करतात, तरच पुढला लेख वाचला जाईल, ही शक्यता वाढते. पण आज ज्या जगात मी तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे, तिथे चमचमणारं, झगमगीत असं काहीच नव्हतं. म्हणूनच साधं शीर्षक ‘आमच्या मराठी शाळा’…
माझी शाळा एक व्यक्ती असती तर कशी असती? फार make-up न करणारी, बडेजाव नसणारी, स्वच्छ नीटनेटकी रहाणारी, चटपटीत, आपला विषय शिकवण्यात तरबेज, ठामपणे मतं मांडणारी एखादी पन्नाशीची प्रौढा असावी, अशा रुपात शाळा माझ्यासमोर येते. कदाचित खूप शिक्षकांना (बाईंना) मी तसं पाहिल्यामुळे शाळेची अशी इमेज माझ्या मनात ठसली असेल.
अर्थात, हे माझे अनुभव साधारण 80-90च्या दशकातील शहरी भागातील शाळेचे आहेत. बहुतांश मराठी शाळांमधील वातावरण सारखेच होते. मराठी शाळांमधील पहिला तास जवळपास प्रार्थना, श्लोक यामधे जायचा. सुरुवात व्हायची ‘वंदे मातरम्’पासून. त्यानंतर ‘या कुन्देन्दुतुषारहारधवला’ ही सरस्वती वंदना व्हायची. तेव्हा ‘निःशेष ‘जाड्या’ पहा’ला प्रत्येकाने वर्गातल्या लठ्ठ मुलांकडे बघणं mandatory होतं. सागितलेलचं होतं ना ‘जाड्या पहा’. माझ्या शाळेत (ऊत्कर्ष मंदिर, मालाड) शनिवारी भीमरूपी, मंगळवारी अथर्वशीर्ष असे दिवस ठरलेले होते. ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा रोज म्हणावी लागायची. पुढच्या बाकावरच्या विद्यार्थ्याच्या खांद्याला टकटक केल्याशिवाय ती सफल व्हायची नाही.
प्रार्थना म्हणणारी मुलं बरा आवाज असणारी, गाऊ शकणारी आणि हुशार तसेच आगाऊ असल्याने पुढेपुढे करणारी अशी दोन प्रकारची असायची. दुसर्या गटात मुलींचा भरणा जास्त.
पोरं शाळेत शिरायची ती शिशुवर्गात ऊर्फ बालवाडीत. हल्ली pre-primary हे प्रकरण तब्बल चार वर्षं चालतं. मराठी शाळेत छोटा आणि मोठा गट असायचा. आमच्या बालवाडीच्या वर्गात सतरंज्या घातलेल्या असायच्या. वर्गाच्या बाहेर चपला काढायचा stand होता. दर शुक्रवारी आम्हाला शाळेत वेफर्स खायला मिळायचे. रडारड थांबवायला शाळेनी केलेली युक्ती होती ती. आईने दिलेला डबा संपवणे आणि निसर्गाचा कॉल आलेला मावशींना / ताईंना सांगणे ही मुख्य दोन वर्षांतली “targets” होती. या गटाला शिशुवर्गाइतके समर्पक नाव शोधून सापडणे अशक्य आहे.
हेही वाचा – गेले ते दिन गेले…
शिशुवर्गातून प्राथमिकमध्ये मुलं आली की, पाटीची संगत सुटायची आणि वह्या पेन्सिलींचा शिरकाव व्हायचा. गणिताला चौकोनाची वही (फुली गोळा खेळायला सोपी) आणि बाकी तीनरेघी असा थाट होता. पेन्सिलीला टोक करणे हा शिक्षणाच्या बरोबरचा जोडधंदा या चार वर्षांत बरा करता यायचा. काही कलाकार मंडळी या पेन्सिलीच्या कातरणापासून greetings वगैरे बनवायची.
चौथी संपताना साधारण तीसपर्यंत पाढे, वर्ग आणि दहापर्यंत घन रोज घोकून पाठ व्हायचे (पंचवीसच्या पुढील पाढे लडखडत). बालभारतीची पुस्तके आजही हातात धरली तर वाचाविशी वाटतील इतकी छान होती. तिसरीत आपल्या जिल्ह्याचा भूगोल आणि चौथीत महाराष्ट्राचा. अनेकांच्या मनात लहानपणीच शिवप्रेमाचं बीज रुजलं, त्यात चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा मोलाचा वाटा आहे. रायरेश्वराची शपथ, महाराजांनी कोंढाणा घेतला… या धड्यांनी कितीतरी कोवळी मने थरारून उठली असतील.
प्राथमिकमध्ये एका इयत्तेत एका वर्गाला एकच शिक्षक सगळे विषय शिकवत असल्यामुळे मुलांची इत्थंभूत ओळख शिक्षकांना झालेली असायची. कोणाला बरं नाही, कोणी अभ्यास चुकवलेला आहे, एका नजरेत सगळं लक्षात यायचं. आमच्या चौथीपर्यंतच्या सगळ्या बाई घरी केलेला तिळगूळ संक्रातीला सगळ्या वर्गासाठी घेऊन यायच्या. कोवळ्या वयात हा जिव्हाळा फार महत्त्वाचा असतो.
माध्यमिक शाळेत हे सगळं चित्र बदलायचं. एक शिक्षक आपला विषय शिकवून अर्ध्या तासाने निघून जायचा आणि नवीन शिक्षक येऊन फळा पुसून टाकायचा. इकडे अनेकांचं पहिलंच उतरवून घ्यायचं राहिलेलं असायचं. आता शिक्षक ‘वंदे भारत’च्या स्पीडने शिकवायला लागलेले असायचे, पण मुलांची पॅसेंजरची सवय अजून सुटलेली नसल्यामुळे पाचवीत सुरवातीला तारांबळ उडायची.
हेही वाचा – शाळेचा पहिला दिवस
त्यातून English सुरू व्हायचं आणि स्पेलिंगं पाठ करायला पर्याय नसायचा. गोपाळ, सीता, अहमद या मंडळींशी दोस्ती व्हायची. पाचवी आणि सहावीच्या पुस्तकात यांच्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. English grammar अगदी तर्खडकरी पद्धतीने शिकवलं जायचं. एकूण ‘syllabus’ किती ‘vast’ आहे, त्यापेक्षा अभ्यासाचा पाया पक्का करण्याकडे कल होता. आठवीपासून संस्कृतही सुरू व्हायचं आणि देव, माला हे शब्द वर्गावर्गातनं चालवले जायचे.
माध्यमिक शाळेत खूप आंतरशालेय स्पर्धा असायच्या, एकांकिका सादर केल्या जायच्या. कलागुण तुमच्यात असल्यास त्याला वाव मिळायचा.
बालभारतीची कुमारभारती झाली की, कुमारअवस्थेला अनुसरून वेगळे धुमारेही काही कुमारांना आणि कुमारीना फुटायचे. पण शिक्षकांचं बारीक लक्ष असायचे. करत करत नववीमधे मुलं यायची आणि पुढलं वर्ष दहावीचं हे येता-जाता कानावर पडायचं. ‘Merit list’मध्ये मुलं येणं हा शाळेसाठी अतिशय अभिमानाचा विषय होता. त्यावरून शाळांमध्ये चुरस असायची.
‘Send off’ परीक्षेच्या काही दिवस आधी व्हायचा. मुली ढसाढसा रडायच्या आणि अगदी टारगट मुलांचेही डोळे ओले व्हायचे… असा असायचा आमचा मराठी शाळेतला प्रवास.
आजच्या शाळांपेक्षा व्यावसायिकता कमी होती, शाळा आणि शिक्षक संबंध घरगुती होते. एकूण समाजाचं वातावरण तसं असेल. आमच्या शाळांनी कधी ‘mode of transport’ काय? हा प्रश्नच विचारला नाही. सगळी मुलं शाळेत चालतच यायची. पोळीभाजी आणणे, ही बर्याच शाळांची डब्याची शिस्त होती. त्याने फार फार तर पूर्ण आहार होत नसेल, पण जंक फूड तरी खाल्लं जात नव्हतं… आणि आज डब्यात ‘rice dish’ द्या, उद्या ‘sprout,’परवा ‘fermented ‘असली कटकट आयांच्या डोक्याला नव्हती.
मराठीत शाळांची फी पाचवीला पाच, सहावीला सहा ते दहावीला दहा रुपये अशी असायची. मुलींना तर फुकटच. सगळ्या शाळा पूर्णपणे सरकारी अनुदानावर अवलंबून असायच्या. आजच्या हजारात आणि लाखात फी घेणाऱ्या आणि तरीही काही प्रमाणात अभ्यास आणि projects पालकांच्या माथी मारणाऱ्या (projects हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे). शाळा पाहिल्या की, कमी पैशात उत्तम शिक्षण देणाऱ्या आमच्या शाळांचा अभिमान वाटल्याशिवाय रहात नाही.
अर्थात, असं नाहीये की, मराठी शाळांमध्ये सगळे रामराज्य होते आणि आता सगळेच नीट न शिकवणारे शिक्षक आहेत. मानवी प्रवृत्ती कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे सारखीच असते. पण तळमळ कुठेतरी कमी झाली आहे. एक मात्र नक्की, मराठी शाळेत शिकल्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. जो तो आपापल्या कुवतीनुसार आणि कष्टानुसार नोकरी, व्यवसायात स्थिरावला. आपण शाळा सोडतो, पण शाळा मनातून कधीच जात नाही. साधी आकड्याची सरस्वती पाहिली तरी मन वर्गात जाऊन बसतं (शक्यतो मागच्या बाकावर).
अशा या मुलांना घडवणाऱ्या, संस्कार करणार्या जाहिरातबाजी न करणाऱ्या शाळा लुप्त झाल्या आहेत. काळाची गरज असेल कदाचित. पण वाईट तर वाटतंच. माझा हा लेख तमाम मराठी शाळाचालकांना, शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सादर अर्पण.
अतिशय सुंदर.मार्गदर्शनपर विचार अनुभव यातून आले अलौकीक विचार.धन्यवाद
अतिशय सुंदर मार्गदर्शनपर विचार व अनुभव यातून आले अलौकीक विचार खूपच धन्यवाद.
धन्यवाद