भाग – 43
शर्वाय आणि आराध्या — आता केवळ प्रेमात नव्हते, ते दोघं आता एका खऱ्याखुऱ्या लढाईत उतरले होते. त्यांची ही लढाई त्यांना आता फक्त लढायची नव्हती तर ती जिंकायचीही होती… आपल्या शत्रूचा… व्यक्तीपेक्षा त्या विचारांचा खात्मा करायचा होता. तेही एकमेकांना उत्तम साथ सोबत करत…
ठरल्याप्रमाणे पहाटे लवकरच सगळे तयार झाले. शर्वाय आणि दिवाकर तयार होऊन हॉलमध्ये आलेच होते, तो समोरून येणाऱ्या आराध्याने त्यांचं लक्ष वेधलं…
शर्वाय काही क्षणांसाठी थबकला. आराध्याचं ते रूप — क्रीम आणि लाल रंगात नटलेलं — इतकं नाजूक, तरीही विलक्षण प्रभावी होतं. तिच्या साडीतल्या लाल काठावर सुरेख नक्षी होती… केस हलकेसे मोकळे ठेवले होते आणि कपाळावर एक लहानसा कुंकवाचा ठिपका, तिच्या सौंदर्यात आणखीच भर टाकत होता — साऱ्या गोंधळातही तिच्या डोळ्यांत आज एक विलक्षण निर्धार होता.
दिवाकर यांनी हसत म्हटलं, “शर्वाय, आता समजतंय का? मी का म्हणतो, की काही निर्णय तत्काळ घ्यावे लागतात?”
शर्वायने हलकंसं हसत नजरेनेच उत्तर दिलं. पण आराध्याकडे बघताना त्याच्या नजरेत सौम्यता आणि आदर स्पष्ट दिसत होता. तो फक्त एवढंच म्हणाला, “आज तू माझ्या निर्णयाला आत्मा दिलास… आराध्या.”
ती हळूच खाली मान घालून म्हणाली, “एका कार्यासाठी आपण दादांचा आशीर्वाद घ्यायला निघालो आहे, मग असं व्यवस्थित निघावं अस वाटलं…”
दिवाकर थोडे गंभीर होत म्हणाले, “आज जे घडणार आहे, त्याने फक्त माधव नाही, तर त्याचं संपूर्ण जाळं उघडं पडेल. तुम्हा दोघांवर हे सगळं फार अवलंबून आहे.”
शर्वायने आराध्याच्या दिशेने हात पुढे केला.
“चल, आरंभ करूया… आज जे घडणार आहे ते आपल्यासाठी सत्याचा आरंभ ठरणार आहे.”
तिने नजरेनेच होकार दिला आणि ते तिघे गुरुजींकडे जायला निघाले…
मुंबईहून दिवाकर, शर्वाय आणि आराध्या पहाटे लवकर निघाल्याने अगदी ठरल्या वेळेत गुरुजींच्या आश्रमात पोहोचले होते. आत्ताच कुठे सूर्याची कोवळी किरणं पसरू लागली होती…
हेही वाचा – शर्वायचा माधवविरुद्ध नवा डाव
गाडीतून उतरून ते आश्रमात शिरत होते, तोच समोरून सुमित्रा आजी, सुशांत, प्राजक्ता (आराध्याचे आई-वडील) आणि आजी शांताबाई सामोरे आले. त्यांना पाहून आराध्या आश्चर्यचकित झाली. हसतमुख आराध्या क्षणभर दचकलीच!
“आई… बाबा… आणि आजी… इथे?” ती थोडी गारीमोरी झाली. सुमित्रा आजींच्या डोळ्यांत नेहमीसारखी गंभीर, पण आश्वासक चमक होती. विशेष म्हणजे, शांताबाईंच्या चेहऱ्यावर सौम्य समाधान दिसत होतं.
प्राजक्ता तर आराध्याकडे पाहून हलकेच हसली — डोळ्यांतून आनंद ओसंडून वाहत होता. सुशांत नेहमीप्रमाणे संयत, पण त्याच्या चेहऱ्यावरही एक प्रसन्नतेचा भाव स्पष्ट जाणवत होता.
सुमित्रा आजी थेट पुढे आल्या, आराध्याकडे पाहत म्हणाल्या, “आम्ही आलो, कारण ही वेळ फक्त तुमची नाही, आराध्या… ही वेळ तुमचं खरं नातं स्वीकारायची आहे आणि नातं जेव्हा खरं वाटतं, तेव्हा घरचे मागे नसतात — समोर असतात.”
शर्वाय थोडा मागे सरकला. दिवाकर यांनी नजरेने आश्वस्त करताच तो पुढे सरसावला.
“मी हे सगळं ठरवलं, तेव्हा तुमची परवानगी नव्हती,” तो म्हणाला, “पण तुमचा आशीर्वाद मिळवण्यासाठीच ही भेट आहे. आज गुरुजींच्या साक्षीने, मी आणि आराध्या — आमचं एकत्र असणं खऱ्या अर्थानं स्वीकारलं जावं म्हणून आलो आहोत.”
आराध्या पुढे आली. तिच्या डोळ्यांत ओलावा दिसत होता, पण ओठांवर एक हलकं हास्य होतं. ती प्राजक्ताकडे पाहत म्हणाली, “आई, हे सगळं मी विचारपूर्वक केलं आहे. शर्वाय माझ्यासाठी फक्त सुरक्षेचा भास नव्हता, तो माझं आत्मभान, माझा खरा मित्र… आणि आज माझं भविष्य ठरतो आहे.”
शांताबाईंनी तिच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवला… त्यांचं हसू खरंच जिव्हाळ्यानं ओथंबलेलं होतं…
“बरं केलं पोरी, स्वतः ठाम उभी राहिली. नात्याची सुरुवात विश्वासानं झाली तर बाकी प्रश्नच रहात नाहीत,” त्यांनी म्हटलं.
गुरुजी आतून बाहेर आले. सगळ्यांनी त्यांना वंदन केलं. गुरुजी सौम्य स्वरात म्हणाले,
“जे नातं काळाच्या वादळातूनही टिकतं, तेच चिरंतन होतं. आज केवळ एक कबुली नको — समर्पण, विश्वास आणि कृतज्ञता ही त्या नात्याची खरी सुरुवात ठरू दे.”
शांताबाई, प्राजक्ता, आणि सुशांत — तिघांच्याही चेहऱ्यावर आता पूर्ण समाधान होतं. आपल्या नजरेतलं सुख जणू ते आराध्यावर उधळत होते.
गुरुजींनी आश्रमातल्या त्या शांत सभागृहात पाय ठेवताच शर्वाय, दिवाकर आणि आराध्या यांनी नकळतच डोकं झुकवलं. त्या ठिकाणी एक भारदस्त आणि तरीही प्रसन्न असा वातावरणाचा स्पर्श होता — जणू या ठिकाणी केवळ शब्द नव्हते, तर प्रत्येक भावनेला स्थान होतं.
गुरुजींनी स्वतः पुढे येऊन सर्वांचं मनःपूर्वक स्वागत केलं. त्यांचा पोशाख साधा होता — पांढऱ्या शुभ्र वस्त्रात त्यांचं तेज अधिकच उठून दिसत होतं. त्यांनी एकेकाच्या डोळ्यांत पाहून जणू अंतःकरण वाचलं.
“या शर्वाय, या दिवाकर… आणि या आराध्या,” त्यांनी सौम्य, पण प्रभावी आवाजात म्हटलं.
“आज जे पाऊल तुम्ही उचलत आहात, ते केवळ आयुष्याच्या प्रवासातले नाही, तर सत्याच्या दिशेने टाकलेले एक जबाबदारीचे पाऊल आहे.”
शर्वाय आणि दिवाकर गुरुजींच्या पायांपाशी वाकले. गुरुजींनी त्यांचं डोकं हलक्याने स्पर्शून आशीर्वाद दिला.
आराध्या थोडी घाईघाईनं पुढे आली… तिनेही वाकून गुरुजींना नमस्कार केला.
गुरुजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवत शांतपणे विचारलं,
“मुली, मनात काही दडलेलं नाही ना? नात्याची सुरुवात शुद्ध भावनेतून होणं महत्त्वाचं आहे.”
आराध्या क्षणभर डोळे मिटून शांत राहिली. तिच्या डोळ्यातून एक थेंब ओघळला, पण ओठांवर विश्वासाचं हास्य होतं…
“नाही गुरुजी… आता काही दडलेलं नाही. जे काही होतं, ते काळाच्या सावलीत मागे पडलं… पण आता, ही वेळ — ही संधी — माझ्यासाठी नवी वाट आहे.”
गुरुजींनी डोळे मिटून तिच्या पाठीवर आशीर्वादाचा स्पर्श केला.
“ठीक आहे… मग आता हे नातं नुसतं कबूल नव्हे — पूज्य ठरू दे.”
सुमित्रा आजी, शांताबाई, प्राजक्ता आणि सुशांत — सगळे हे दृश्य पाहून भारावून गेले होते. दडपण गेलं होतं… डोळ्यांतल्या पाण्यातून प्रेम गहिवरून आलं.
दिवाकर यांनी गुरुजींच्या कानात हळू आवाजात काही सांगितलं. गुरुजींनी त्यावर डोळ्यांनीच संमती दिली.
गुरुजींचा गंभीर पण सौम्य आवाज त्या शांत वातावरणात भार निर्माण करत होता.
“आज अमृतसिद्धी योग आहे,” त्यांनी सर्वांकडे पाहात सांगितलं, “हा योग फार दुर्मीळ… आणि विशेषतः शुभकार्यांसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. जे काही आज सुरू होईल — ते फक्त यशस्वीच नव्हे, तर दीर्घकाळ टिकणारे, आनंद आणि समाधान देणारं ठरेल.”
सर्वांच्या डोळ्यांत आश्चर्य, कौतुक आणि अनपेक्षित आनंद दिसू लागला.
गुरुजी पुढे म्हणाले —
“दिवाकर, सुमित्रा, शांता, सुशांत आणि प्राजक्ता… तुमच्यासमोर आज दोन जीव एका विश्वासाच्या आणि प्रेमाच्या बंधनात अडकणार आहेत. परिस्थिती, वेळ, संकटं यांना पार करत, शर्वाय आणि आराध्या आज एकमेकांसाठी उभे राहिले आहेत. मग या योगावर त्यांच्या एकत्र जीवनाची सुरुवात का करू नये?”
एक क्षणभर शांताबाई आणि सुमित्रा आजीच्या डोळ्यांत पाणी आलं. आराध्याला जेव्हा त्यांनी पाहिलं होतं, तेव्हाच त्यांनी तिला आपल्या शर्वायसाठी पसंत केलं होतं… प्राजक्ता आणि सुशांत यांनी एकमेकांकडे पाहत हळूच मान डोलावली… दिवाकर यांनी डोळे मिटून शांत स्मित करत गुरुजींना मान्यतेचा होकार दिला.
शर्वायच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा, गोंधळलेला पण हळूवार भाव होता. त्याने आराध्याकडे पाहिलं… आराध्या स्तब्ध होती, तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं… पण चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती. ती फक्त हलकंसं “हो” म्हणाली.
गुरुजी मंद हसत होते…
“मग आज या अमृतसिद्धी योगावर, अग्नीला साक्ष ठेऊन, प्रेम, निष्ठा आणि सत्याच्या साक्षीने तुम्ही दोघे एकत्र होणार आहात.”
हेही वाचा – शर्वाय आणि आराध्याला प्रतीक्षा उद्याची
सुमित्रा आजी लगेच उठून म्हणाल्या — “माझा नातू आज लग्न करतोय, यापेक्षा मोठा योग दुसरा नाही!”
शांताबाईंनी आराध्याचा हात पकडला, ओठांवर मंद हास्य होतं आणि डोळ्यांतून ओघळणारे अश्रू घेऊन त्या म्हणाल्या… “आज माझी नात खऱ्या अर्थाने माझी शान ठरतेय!”
शर्वाय पुढे आला, त्याने आराध्याचा हात हलकेच धरला. ते दोघे गुरुजींसमोर उभे राहिले — गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू आणि आशीर्वादाचं मिश्रण होतं.
प्रेम… विश्वास… आणि नियतीचा स्वीकार करत… आज अमृतसिद्धी योगाने त्या दोघांना अनंत प्रवासासाठी जोडलं होतं.
आज कमी होती ती फक्त शर्वायच्या आईची! आपल्या मुलाच्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या घटनेपासून ती अनभिज्ञ होती… आणि या क्षणाला शर्वायला त्याची जाणीव होत होती.


