भाग – 41
आराध्या शांतपणे उठून उभी राहिली. ती समोरच्या खिडकीजवळ गेली. मनात नवनवीन गुंतागुंतीचं काहूर होतं…
शर्वाय तिच्याजवळ येत हलक्या स्वरात म्हणाला,
“माझ्या आयुष्यात जर कोणाला मी माझ्या पत्नीचा दर्जा देईन, तर ती फक्त एकच व्यक्ती आहे — आणि ती माझ्या समोर उभी आहे.”
दिवाकर त्या दोघांनाही जवळ घेत ते म्हणाले,
“तुमचा पुढचा काळ युद्धाचा आहे. या रणभूमीवर दोघांनी एकमेकांच्या साथीने लढायचं आहे. एकमेकांच्या वरचा विश्वास कधी कुठे डळमळला, तर सावरून घ्यायचं आणि पुढे जात रहायचं आहे…”
त्यांनी त्या दोघांसमोर एक योजना मांडली…
दिवाकर यांनी थोडं थांबून, दोघांकडे पाहत गंभीरपणे बोलायला सुरुवात केली, “शर्वाय, आराध्या… तुम्ही दोघं जसं मला सगळं प्रामाणिकपणे सांगितलंत, तसंच मलाही तुमच्यासमोर एक गोष्ट ठेवायची आहे.”
शर्वाय शांतपणे ऐकत होता, पण आराध्याच्या चेहऱ्यावर हलकी चिंता स्पष्ट दिसत होती.
“आपण गुरुजींची भेट लवकरच घेणार आहोतच, पण त्याआधी मला वाटतं की, आपण एक गोष्ट सार्वजनिक करायला हवी.”
“सार्वजनिक?” शर्वाय चकित झाला. “कोणती गोष्ट?”
दिवाकर यांनी आराध्याकडे पाहिलं…
“आराध्या, क्षितिज-9 प्रकल्पाच्या प्रकरणामुळे कंपनीवर सावट आलंय. माधव आपल्याला आतून पोखरत आहे, आणि त्याला काहीसं नैतिक बळ मिळतंय. कारण अजूनपर्यंत तुझा आणि शर्वायच्या संबंधा ला आपण जाहीर केलेलं नाही. मला वाटतं, आपण हा अर्धवटपणा इथेच संपवला पाहिजे.”
हेही वाचा – माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार
आराध्याचं श्वास थांबला.
“क… काय म्हणताय तुम्ही?” तिचा आवाज हलकासा थरथरला.
“मी म्हणतो, तुम्ही दोघं लगेच साखरपुडा जाहीर करा. घरातल्या लोकांच्या आशीर्वादाने, गुरुजींच्या साक्षीने. मग या नात्याच्या मागे कोणतंही राजकीय किंवा व्यावसायिक षड्यंत्र लपलेलं नाही, हे जगाला ठासून सांगता येईल.”
शर्वायने काही क्षण आराध्याकडे पाहिलं — तिच्या डोळ्यांत काहीसं धास्तावलेपण होतं.
“दिवाकर काका… हे अचानक…” ती कुजबुजली.
“अगं आराध्या,” दिवाकर सौम्य पण ठाम स्वरात म्हणाले, “हा वेळ विचार करण्याचा नाही. ही वेळ परिस्थिती हातात घेण्याची आहे. तुमचं नातं खरं आहे, पवित्र आहे… आता ते सिद्ध करण्याची गरज आहे.”
आराध्या एकदम कावरीबावरी झाली. तिच्या मनात एकाच वेळी हजार गोष्टी धावत होत्या — माधव आणि निशा काकीचे षडयंत्र, प्रोजेक्ट क्षितिज 9, शर्वायच्या ओळखीमागचं गूढ आणि आता हा निर्णय…
“काय आणि कसं घडून येईल. पुढे कोणतं संकट… नाही नाही…” तिने याच विचारात मान नकारात्मक हलवली. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
“शर्वाय… मी… मी… थोडा वेळ हवाय मला.”
शर्वाय तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, “ठीक आहे, आराध्या. मी तुझ्यासोबत आहे… जो काहीही निर्णय घ्यायचा असेल, तर तो आपण एकत्र घेऊ. कुठलाही दबाव नाही.”
शर्वाय काही क्षण शांत राहिला. वीज लखलखावी तशी एक कल्पना त्याच्या डोक्यात चमकून गेली. म्हटलं तर ही कल्पना खूपच प्रभावी ठरेल, पण सगळ्यांनी तशी साथ द्यायला हवी…
आराध्या अजूनही विचारमग्न होती. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला —
“आराध्या, जर आपल्याला माधवला उघडं पाडायचं असेल, तर त्याच्या खेळात थोडा वेळ का होईना, आपल्याला सामील व्हायला लागेल.”
आराध्याने भुवया उंचावल्या, “म्हणजे?”
“म्हणजे,” शर्वाय पुढे म्हणाला, “आता माधव एक नवा डाव टाकतोय — माझ्यासाठी अन्वीचं स्थळ सुचवून. या प्रस्तावात त्याचा हेतू आहे — आपल्याला वेगळं करणं आणि मलाच एकटं करून गोंधळात ढकलणं.”
आराध्याच्या डोळ्यांत आता धूर्तपणा दिसला…
“म्हणजे, तुम्ही म्हणताय की, आपण तसं दाखवायचं की, तुम्ही अन्वीच्या स्थळाचा विचार करीत आहात?”
“हो. काही दिवस आपण माधवच्या सूचनेला नकार न देता, उलट थोडी अनिश्चितता दाखवू. त्याच्या गोंधळात तो अधिकच बिनधास्त होईल, आणि तिथेच आपल्याला त्याच्या पायाखालची जमीन सरकवायची आहे…”
आराध्या थोडावेळ गप्प राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता पुन्हा ती ओळखीची जिद्द दिसू लागली.
“शर्वाय मी तयार आहे. पण एक अट आहे — या खेळात मी तुम्हाला नुसता पाठिंबा देणार नाही किंवा मागे राहणार नाही. तुम्हाला जे करायचं ते दोघांनी मिळून करू.”
शर्वाय हसला, काहीसा शांत, पण धूर्त. त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं.
“हेच मला हवं होतं, आराध्या. आपण त्याला त्याच्या डावातच हरवणार.”
शर्वाय नी मांडलेली कल्पना छान होती, पण माधव धूर्त आणि कपटी होता. तो कधी काय करेल याची शाश्वती देणं शक्य नव्हतं. त्यामुळे अगदी डोळ्यांत तेल घालून जागरूक राहणं गरजेचं होत.
आराध्यासमोर शर्वाय, दिवाकर यांनी सगळं नियोजन मांडलेलं होतं… डाव आखले गेले होते, सुरक्षा रचली गेली होती, आणि माधवसारख्या शत्रूला त्याच्याच पद्धतीने उत्तर द्यायचं ठरलं…
शर्वायची नजर तिच्यावर स्थिर होती — पण तिच्या डोळ्यांत, काहीतरी विचार सुरू असल्याचे दिसत होते… ती फारसं काही बोलली नाही… फक्त मान हलवली.
दिवाकर उठले, “ठरलं तर… आपण उद्या गुरुजींना भेटू. पुढचं त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे.”
ते आत निघून गेले आणि मग शर्वायने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
“आराध्या, तुला काही अडचण आहे का? मी तुझ्या डोळ्यांत स्पष्टपणे बघतोय… मनात काही दडलंय, असं वाटतंय.”
आराध्याने हलकेच सुटकेचा श्वास सोडला. काही क्षण गप्प राहून मग हळू आवाजात म्हणाली — “मी तुमच्या सोबत आहे, शर्वाय. पण…”
“पण?”
“पण जे काही आपण करतोय, ते कसं होईल… सगळ्यांच्या नजरेत ते योग्य असेल ना? आपल्यामुळे कोणाला काही त्रास झाला तर…”
शर्वाय क्षणभर शांत होता. त्यानं तिचं म्हणणं पूर्ण लक्ष देऊन ऐकलं…
“किती विचार करतेस आराध्या? आणि कोणाबाबत? ज्यांनी आजवर तुला, मला त्रास दिला त्यांच्याबाबत? त्यांनी कधी केला का गं तुझा विचार? तुझी हेटाळणी करताना तुझ्या मनावर किती ओरखडे पडत आहेत, तुला कसं वाटतंय, याची साधी जाणीवही नव्हती त्यांना! तुझ्याशी असं वागून त्यांना आनंदच होत होता. त्यांच्या वागण्या-बोलण्याचा जो काही परिणाम होत असेल, त्याबद्दल कधी त्यांनी माफी तरी मागितली का गं… सांग ना? तुझे ते दिवस विसरलीस? तूच होतीस ना ती, जी जंगलात पळून आली होती? आत्महत्येचे विचार होते तेव्हा तुझ्या डोक्यात… विचार कर त्यावेळेस मी भेटलो नसतो किंवा त्या गुंडानी तुझ्यासोबत काही केलं असतं तर…? तू जीव दिला असतास तर…? काय वाटलं असतं गं तुझ्या आई बाबांना? कसे जगू शकले असते तुझ्याशिवाय सांग?
हेही वाचा – शर्वायच्या आयुष्यात माधवची लुडबूड
आपण कोणाही सोबत असं काहीच वाईट करणार नाही आहोत… माधवचा हा जो काही खेळ माझ्याबाबत सुरू आहे आणि तुझ्याबाबत तुझी काकी जी काही त्याला मदत करतेय, ते सगळं त्यांच्याच गळ्यात बांधायचं आहे. मी तुला वचन देतो – कोणाच्याही जीवाचं बरं-वाईट माझ्या हातून होणार नाही… बाकी जे काही होईल ती परमेश्वर इच्छा…!”
ती उठली, खिडकीपाशी गेली. बाहेर अंधार दाटत चालला होता.
शर्वाय उठला, तिच्याजवळ आला. तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला,
“आराध्या, सत्यासाठी उभं राहणं, हीच खरी तयारी असते. मी तुझ्या मनातलं हे वादळ समजून घेतोय. मी तुला वेळ देईन. पण एकच विचार — तू माझ्या पाठीशी आहेस, हे जाणून मी ही लढाई लढू शकतो. माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे.”
आराध्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. ती हलकंच हसली…
“हो शर्वाय. मी आहे तुमच्यासोबत… पण आता मला स्वतःशीही प्रामाणिक रहावं लागणार आहे.”
ते दोघं एकमेकांच्या शेजारी उभे होते… बाहेर अंधार, आत खोल शांतता… पण त्या शांततेच्या तळाशी अजूनही एक गूढ भूकंप दबा धरून बसला होता.
उद्यापासून नव्या योजनेला प्रारंभ करायचा होता आणि त्याआधी गुरुजींना भेटणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं होतं…
“आपण पहाटे लवकरच गुरुजींना भेटायला निघतोय… आज इथेच रहा, इथूनच एकत्र निघू…”
“पण माझ्याजवळ दुसरे कपडे नाहीत… मी ऑफिसमधून इथेच आलेय…” आराध्याच्या चेहऱ्यावर तो अवघडलेपणा आणि प्रश्न होताच…
“बस इतकंच ना… नंदिनीला सांग ती तयार करून ठेवेल… आपला माणूस जाऊन घेऊन येईल…” क्षणात त्याने प्रश्न सोडवला.
आराध्याला आता यावेळी घरी पाठवणे आणि उद्या तिच्या राहत्या घरातून सोबत घेणे त्याला योग्य वाटले नाही… न जाणो कोणाची पाळत असेल तर… त्याला सध्या कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती…


