सिद्धांत सावंत
आईवर हजारो कविता लिहिल्या गेल्या. आईवर गाणी लिहिली गेली. कथा, चित्रपट, लेख, भाषणं… सगळीकडे आईच्या प्रेमाचं वर्णन सापडतं… आणि ते असायलाच हवं. पण बाबांबद्दल फार कमी लिहिलं जातं. कारण आईचं प्रेम आपल्याला दिसतं आणि त्यांचं प्रेम बोलत नाही. पण त्यांचं प्रेम ठायी-ठायी असतं… ते सकाळी लवकर उठून कुटुंबासाठी कामात मग्न होण्यात असतं… ते थकून भागूनही पुन्हा उभं राहण्यात असतं. ते घरातील प्रत्येकाला काही कमी पडू नये, याची काळजी घेण्यात असतं… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते अनेकदा स्वतःच्या वाट्याचं काहीतरी शांतपणे सोडून देण्यात असतं…
लहानपणी आपण एखादी गोष्ट मागतो अन् काही दिवसांनी ती मिळते. आपल्यासाठी ती एक साधी घटना असते. पण मोठं झाल्यावर समजायला लागतं की, त्या एका गोष्टीमागे कितीतरी न दिसणाऱ्या गोष्टी असतात! त्यांनी कुठेतरी एखादी इच्छा पुढे ढकललेली असते… कुठेतरी स्वतःसाठी घ्यायची गोष्ट टाळलेली असते… कुठेतरी एखादं स्वप्न थोडं थांबलेलं असतं… फक्त मुलांच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून!
हेही वाचा – रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!
मला वाटतं, मोठं होण्याचा एक भाग म्हणजे आपल्या आई-वडिलांकडे नव्या नजरेने पाहायला शिकणं. कारण लहानपणी ते आपल्याला Superheroes वाटतात. मग एक काळ येतो, जेव्हा त्यांच्या चुका दिसायला लागतात… आणि त्यानंतर जर आपण खरोखर प्रगल्भ झालो, तर आणखी एक गोष्ट समजते, आपल्या आई-वडिलांचंही स्वतंत्र आयुष्य असतं. तेही असं पहिल्यांदाच जगत असतात. त्यांनाही भीती वाटते. त्यांच्याही हातून चुका होतात. त्यांनाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीत नसतात. फरक एवढाच असतो की, ते त्यांच्या भीतीपेक्षा आपल्या भविष्याची जास्त काळजी करत असतात.
आपण अनेकदा त्यांच्या निर्णयांशी असहमत होऊ शकतो, त्यांच्यावर रागावू शकतो. त्यांच्याशी वाद घालू शकतो. पण एक गोष्ट मात्र निर्विवाद असते ती म्हणजे, आपल्याबद्दल त्यांचा हेतू कधीच चुकीचा नसतो.
जगात खूप लोक आपल्यावर प्रेम करतील… खूप लोक आपल्याला साथ देतील… पण आपलं भलं व्हावं म्हणून नि:स्वार्थपणे विचार करणारे लोक मोजकेच असतात आणि त्यात सर्वात पहिले आई-वडील असतात!
मोठं झाल्यावर मला बाबांबद्दल अजून एक गोष्ट समजली. ते फक्त आपल्या आयुष्याचे आधारस्तंभ नसतात तर, कधी कधी ते आपले मित्रही बनतात. असा मित्र, ज्याच्याशी आपण रोजच्या क्षुल्लक गप्पांपासून ते आयुष्यातल्या सर्वात कठीण प्रसंगांपर्यंत काहीही बोलू शकतो! काही गोष्टी त्यांना कदाचित पूर्णपणे समजत नसतीलही…
पिढ्या बदलतात. जग बदलतं. प्रश्न बदलतात. पण ऐकून घेण्याची त्यांची तयारी कायम राहते… आजकाल लोक “being heard” बद्दल खूप बोलतात. पण मनापासून ऐकून घेणारा माणूस आपल्या घरातच असतो, याची जाणीव अनेकदा उशिरा होते… आणि मग आयुष्यात एक सुंदर बदल घडतो.
लहानपणी आपण बाबांकडे मागत असतो. मोठं झाल्यावर कधीतरी बाबा आपल्याकडे काही मागू लागतात… आणि त्या क्षणी जाणवतं की, आयुष्याने एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. ज्यांच्या आधारावर आपण उभे राहिलो, त्यांच्यासाठी आता आपण आधार बनू शकतो!
हेही वाचा – आबा आणि मित्रमंडळींची पार्टी
कदाचित हाच मोठं होण्याचा सर्वात सुंदर क्षण असतो.
आणखी एक गोष्ट मला नेहमी विचार करायला लावते… आपल्या अनेक यशांमध्ये आपल्या आई-वडिलांची काही न जगलेली स्वप्नं मिसळलेली असतात. आपण जिंकतो तेव्हा त्यांचे डोळे चमकतात… आपण प्रगती करतो तेव्हा त्यांना आनंद होतो… आपण आयुष्याचा अनुभव घेतो, तेव्हा तेही कुठेतरी तो अनुभव आपल्यासोबत जगत असतात. आपल्या आयुष्याचा एक भाग त्यांचाही असतो… आणि म्हणूनच आपल्या यशाची व्याख्या केवळ स्वतःपुरती रहात नाही. ती आपल्या लोकांच्या आनंदाशी जोडली जाते.
मला जर कुणी विचारलं की, बाबांकडून सर्वात मोठी गोष्ट काय शिकायला मिळाली, तर माझं उत्तर यश, पैसा किंवा महत्त्वाकांक्षा हे नसेल… मी म्हणेन – माणुसकी!
दुसऱ्यांसाठी उभं राहणं. लोकांशी आपुलकीने वागणं. नाती जपणं. स्वतःपेक्षा आपल्या माणसांचा विचार करणं… कारण अशा गोष्टी शिकवल्या जात नाहीत. त्या जगून दाखवल्या जातात आणि बहुतांश वडील हेच करत असतात… शांतपणे. कुठल्याही अपेक्षेशिवाय. कुठल्याही कौतुकाशिवाय. कुठल्याही गौरवाशिवाय.
म्हणून कदाचित बाबांबद्दल अधिक लिहिलं जायला हवं… त्यांच्या त्यागांबद्दल नाही, कारण त्यांना त्यागांची मोजदादही नको असते. तर त्यांच्या त्या अबोल प्रेमाबद्दल, जे अनेकदा शब्दांमध्ये व्यक्त होत नाही!
आणि कदाचित प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक दिवस असा येतो, जेव्हा त्याला जाणवतं लहानपणी माझ्या प्रत्येक इच्छेमागे बाबा उभे होते. आता उरलेल्या आयुष्यात त्यांच्या प्रत्येक आनंदामागे मी उभं राहायला हवं.
आणि कदाचित…
मोठं होणं म्हणजे नेमकं हेच.


