पूर्वार्ध
साईनाथ नाट्यमंडळाची वार्षिक बैठक. ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ. बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता. मंडळाचा दिग्दर्शक सुदर्शन याच्यासह मनोज, अरुणा, ज्योती, उदय, वासंतीबाई, सदानंद हजर होते. संस्था संगीत नाटकं करण्यात प्रसिद्ध होती. दरवर्षी शासनाच्या संगीत नाट्यस्पर्धेत भाग घेऊन मग त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी होत असत. संस्थेने अनेक नाटके सादर केली आणि बक्षिसे मिळविली.
यंदा कुठले संगीत नाटक करावे, यासाठी बैठक होती. सुदर्शनने मागच्या काही वर्षांतील संस्थेने केलेल्या नाटकंचा आढावा घेतला, दरवर्षी आपली संस्था प्राथमिक स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर मिळविते, पण अंतिम स्पर्धेत आपण पहिला नंबर मिळवत नाही, ही सल सुदर्शनने बोलून दाखवली.
याबाबत काही मेंबर्सनी आपापली मते मांडली.
अरुणा – संगीत नाट्य स्पर्धा असल्याने आपण ज्यात संगीताला भरपूर वाव आहें, असे नाटक निवडावे. सुदैवाने यावर्षी ज्योती, तिचं शिक्षण संपवून पुन्हा ग्रुपमध्ये आली आहे.
मनोज – आपले संगीत साथीदार बदलावे लागतील. कारण, आपण स्पर्धेच्या वेळी पहातो, इतर ग्रुप्स दर्जेदार साथीदार घेऊन येतात.
अरुणा – हे खरे आहे, परीक्षक संगीत साथीकडं बारकाईने लक्ष ठेऊन असतात.
सुदर्शन – मग नाटक कुठलं निवडावं? ज्याला उत्तम लेखन आणि संगीत आहे? आणि आपण ते इतक्यात केलेलं नसावं?
मनोज – यंदा ज्योती सारखी देखणी आणि उत्तम गळा असलेली स्त्री कलावंत आहे, सुदर्शन सारखा दर्जेदार कलावंत पण आहेच… आणि मनोज पण उत्तम गातो, म्हणून आपण ‘संगीत मत्स्यगंधा’ करावं, असं मला वाटतं.
हेही वाचा – हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!
सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. सुदर्शनला पटले. अरुणा, ज्योती यांनी पण मान हलवली. मनोजने पण हो म्हटलं. यंदा स्पर्धेसाठी ‘संगीत मत्स्यगंधा’ करायचे ठरले. सुदर्शन आणि अरुणा संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना भेटले. त्यांनी पण मान्यता दिली. नाटकासाठी खर्चाची तजवीज केली.
नाटकाचे दिग्दर्शन दरवर्षीप्रमाणे सुदर्शन करणार होता.
‘मत्स्यगंधा’ नाटक करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. सत्यवतीच्या भूमिकेसाठी उत्तम गाणारी आणि देखणी कलाकार हवी होती, त्यामुळे ज्योती सत्यवती करणार हे निश्चित झाले. पराशरसाठी पण चांगला गाणारा माणूस हवा होता, मनोज हा अनेक वर्षे काम केलेला आणि खड्या आवाजाचा ग्रुप मेंबर होता, त्याला पराशरची भूमिका मिळाली, देवव्रतच्या भूमिकेला मोठमोठी वाक्ये होती, ती पेलणारा कलवंत हवा होता. सुदर्शन तसा होता. त्याचे पाठांतर उत्तम होते आणि शब्दफेक सुरेख होती. त्यालाच ही भूमिका मिळाली, अरुणला चंडोलची भूमिका… याखेरीज अन्य भूमिका इतर ग्रुप मेंबर्समध्ये वाटल्या गेल्या आणि सुदर्शनने मुहूर्त काढून तालमी सुरू केल्या.
स्पर्धेचा फॉर्म भरला. रोज सायंकाळी कलाकार जमू लागले… प्रथम गद्य तालीम सुरू झाली… वाक्ये तोंडात बसली, मग व्यक्तिरेखांच्या हालचाली दिग्दर्शकाने बांधल्या, मग संगीत साथ करणारे यायला लागले, गाण्याच्या तालमी सुरू झाल्या. हळूहळू प्रकाश योजना करणारा येऊ लागला. दृश्य परिणाम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग सुरू झाला. नाटक हळूहळू बसू लागले… पाठांतरे झाली… गाणी व्यवस्थित बसली…
स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले. या ग्रुपचे नाटक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी होते आणि आश्चर्य म्हणजे या ग्रुपचा प्रमुख प्रतिस्पर्धी नटराज ग्रुप, जो दुसऱ्या शहरातील होता, त्यांनी पण यंदा ‘मत्स्यगंधा’ हेच नाटक स्पर्धेत उतरविले होते.
ही बातमी कळली मात्र, सुदर्शन खवळला. तालमीच्या वेळी ग्रुप मंडळी भेटली, तेव्हा सर्वांचीच हीच चर्चा.
सुदर्शन – मला वाटते, नटराजची मंडळी दरवर्षी असेच करतात, आपण हे नाटक बसवतोय, हे अनिलला कळले असेल, म्हणून मुद्दाम तो हे नाटक करतोय.
अरुणा – अरे, गेली दोन वर्षे प्राथमिकला आपण पहिले दुसरे असतो ना, म्हणून ते आपल्याला त्रास देतात, आणि ती तन्वी काही कमी नाही. तीच करत असणार सत्यवती… दुष्ट मेली…
ज्योती – अरे ते करेनात, आपण उत्तम प्रयोग करायचा! आपला प्रयोग तिसऱ्या दिवशी आहे ना, तो करू आणि अन्याचा केव्हा आहे, आठव्या दिवशी आहें ना, तो पहायला सर्वजण जाऊ…
ज्योतीच्या या बोलण्याने सर्व गप्प झाले. पण सुदर्शनला अन्याचा राग आला होता, “साला आपल्याशी स्पर्धा करतो, तरी बरं हा स्टेज वर फापलतो…. देवव्रताची भूमिका म्हणजे काय खाऊ वाटला काय याला? मोठी मोठी वाक्ये आहेत, आणि हा अन्या जाडा किती झालाय, दारू मारत असणार आणि बिड्यापण ओढत असतो…
सुदर्शनने तीन रंगीत तालमी आयोजित केल्या. व्यक्तिरेखांचे कपडे, मेकअप करून, नेपथ्य रचून आणि प्रकाश योजना आणि संगीत साथीसह तीन प्रयोग. त्याच्या ओळखीच्या आणि नाट्यशास्त्र जाणणाऱ्या लोकांना बोलावून त्यांची मते घेतली. चर्चा केल्या. काही सुधारणा केल्या.
तीन रंगीत तालमी झाल्यामुळे कलाकारांना विश्वास वाटू लागला. ज्योती आता उठताना, झोपताना, जेवताना, बोलताना सत्यवतीची भूमिका जगू लागली. सुदर्शन देवव्रताचे संवाद मोठया मोठ्याने आरशात पाहून म्हणू लागला. मनोज, अरुण यांच्या पण अंगात व्यक्तिरेखा शिरल्या होत्या.
स्पर्धा सुरू झाली आणि तिसऱ्या दिवशी ग्रुप बसने स्पर्धेच्या गावात पोहोचला. दुपारपासून स्टेज मांडणी, लाइट जोडणे, पेटी- तबल्याचे सूर मिळविणे, मग मेकअप, कपडे…
परीक्षक आले, आत सर्वाना भेटून गेले. या वर्षीचे परीक्षक नाट्यकला जाणणारे, संगीत उत्तम समजणारे होते, त्यामुळे सुदर्शन खूश होता.
मित्रमंडळी, अनेक ओळखीचे आत येऊन शुभेच्छा देत होते, नाटक वेळेत सुरू झाले. पहिला अंक संपला. पुन्हा बाहेरून मित्र परिवार आत आला, ज्योतीचे, मनोजचे कौतुक करून गेला.
दुसरा अंक संपता संपता देवव्रत स्टेजवर आला आणि नाटकाने स्पीड पकडला. मग तिसरा अंक देवव्रत आणि सत्यवती, अंबा यांचा… नाटक संपलं, लोकांनी खूप कौतुक केलं.
परीक्षक सुद्धा आत येऊन भेटून गेले. दुसऱ्या दिवशीच्या सर्व पेपरमध्ये कौतुक केलं गेलं. विशेष करून, सत्यवतीची भूमिका साकारणाऱ्या ज्योतीची प्रशंसा झाली. तिला खूप गाणी आणि संवाद होते. स्पर्धेतील प्रयोग उत्तम झाला, पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खूश नव्हता. आपण यापेक्षा कितीतरी चांगली भीष्माची भूमिका करायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. भूमिका अत्यंत ताकदीने कानेटकरांनी लिहिली होती, पण आपल्याला सूर लागला नाही…
कदाचित दिग्दर्शक असल्याने एका माणसावर खूप लोड पडतो, प्रत्येक गोष्टीत त्याला लक्ष घालावे लागते. त्यामुळे स्वतःच्या भूमिकेकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही, हेही कारण असेल किंवा स्पर्धा नुकतीच सुरू झाल्याने प्रेक्षक सुद्धा कमी आले असतील. काही तरी कारण झाले, पण भीष्म मनासारखा उभा राहिला नाही, हे खरे.
ग्रुप आपल्या शहरात परत आला आणि आपापल्या कामात मग्न झाला.
नटराज नाट्यग्रुपचा ‘मत्स्यगंधा’चा प्रयोग होणार होता, त्याला जायचे ठरले होते. पुन्हा मंडळी जमा झाली आणि एक ट्रॅव्हलर घेऊन नटराज ग्रुपचा ‘मत्स्यगंधा’ बघायला निघाली.
मनोज – अनिल देवव्रत कसा करतो बघू. पण सुदर्शन, तुझ्याजवळ पण जाणार नाही देवव्रत…
सुदर्शन – पण माझंही त्या दिवशी काम बरं झालं नाही रे, मूडच आला नाही.
हेही वाचा – पाप आणि पुण्य
ज्योती – असं तुला उगाच वाटतं सुदर्शन, तू मस्त काम केलंस, भीष्मला केवढे मोठे आणि कठीण डायलॉग्ज लिहिलेत वसंतरावांनी. मास्तर दत्ताराम ही भूमिका करायचे म्हणे!
मनोज – हो, आणि मत्स्यगंधा आशालता. गाजवली तिने ही भूमिका आणि गाणी. गाणी काय सुरेख आहेत ना यातली. पंडित अभिषेकींचे संगीत… खूप प्रयोग झाले या नाटकाचे.
ग्रुपची गाडी स्पर्धा चालू असलेल्या गावात पोहोचली, सर्व मंडळी एका हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश झाली आणि नाटक सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे साडेसहाला नाट्यगृहाजवळ पोहोचली.
सुदर्शन आणि ग्रुपमधील बाकीचे आत गेले, नटराजच्या ग्रुपला भेटायला. अनिल जो नाटकात देवव्रत म्हणजे भीष्म करणार होता, तो मेकअप करून तयार होता. त्याने सुदर्शन, ज्योती यांना पाहिले आणि जवळ येऊन सुदर्शनला मिठी मारली.
सुदर्शन – अन्या, जाडा झालास की रे, व्यायाम करत नाहीस काय?
अनिल – नाही रे, वेळच मिळत नाही, चालणं पण होत नाही.
ज्योती – अनिल, तुझी तब्येत बरी नाही की काय, धापा टाकतोस!
अनिल – हो गं, आज थकवा आलाय… प्रयोग झाला की, उद्या डॉक्टरला तब्येत दाखवतो.
सुदर्शन – हो बाबा, रोज चालणं महत्त्वाचे आहेच आणि तपासून घे बऱ्या डॉक्टरकडून.
एवढ्यात सत्यवतीची भूमिका करणारी तन्वी आणि बाकी कलाकार, लाइटचे काम पाहणारा उमेश जवळ आले. सर्वाना प्रयोगासाठी शुभेच्छा देऊन सुदर्शन आणि ग्रुपची लोकं बाहेर आली. तोपर्यंत नाटकाची पहिली घंटा दिली होती.


