दुसरा शनिवार होता. माझा सुट्टीचा दिवस. नवऱ्याला तर सुट्टीच आणि लेक पण शनिवारी डबा न घेता जातो. मला थोडी विश्रांती आणि त्याला पण रोजच्या पोळीभाजीमधून सुटका, काहीतरी वेगळं चमचमीत खायला!
उशिराच उठले थोडी. आमचा सगळ्यांचा चहा केला. चार माणसं आम्ही, त्यातही चार पंथ! आबांना बिनसाखरेचा अन् कमी दुधाचा. नवऱ्याला ग्रीन टी, मला आपला दुधाचा, गोड चहा आणि लेकाला कॉफी.
हे सगळं करून, पोहे फोडणीस टाकून पेपर चाळत असतानाच आबा आले. सकाळी फिरायला जाऊन, मित्रांशी गप्पाटप्पा करून, पूजेसाठी फुलं खुडून, आबा निवांत परत यायचे. मग आंघोळ, न्याहारी, पूजा आटोपून निवांत पेपर वाचन असं साग्रसंगीत बेत.
आज आल्यावर जरा वेगळेच वागत होते. अस्वस्थ वाटत होते, येरझाऱ्या सुरू होत्या नुसत्या. मी काहीच न बोलता शांतपणे बघत होते. मला ठाऊक होतं, शेवटी माझ्यापाशीच बोलणार ते मनातलं. सून नव्हे, लेक म्हणायचे आणि मानायचे मला.
येरझाऱ्या थांबल्या आणि ते येऊन बसले. हातांची जुळवाजुळव, मधेच चोरून माझ्याकडे बघणं. मला मनातून खूप हसावसं वाटत होतं, पण मी शांत राहिले, स्थितप्रज्ञतेचा बुरखा पांघरून.
शेवटी त्यांनाच ती शांतता नकोशी झाली असावी बहुतेक. चाचरत मला म्हणाले, “उद्या आहेस तू घरी?”
मी म्हणाले, “हो आहे की. काही खास आहे का उद्या?”
“नाही गं, काही खास नाही. सहज विचारलं.”
“आबा, काय आहे मनात ते सांगा पटकन. का चाचरताय एवढे?”
“रागावू नकोस, पण तुला न विचारता मी माझ्या पाच-सहा मित्रांना घरी बोलावलंय, चहापाण्याला. तुझी सुट्टी, धावपळ आणि त्यात ही माझी लुडबूड, आगंतुक…”
हेही वाचा – आमचे आबा आणि त्यांची कुंभकर्णी झोप…
मी विचारात पडले. रविवारी आम्ही शाळेतल्या मैत्रिणींनी, सिनेमा आणि मग हॉटेलात जाऊन मनसोक्त हादडणे असा बेत ठरवला होता. आठवडाभर आधीपासून त्याची तयारी चालली होती आमची. सगळ्यांनी जीन्स आणि टॉप असा ड्रेसकोड ठरवला होता. हॉटेलात टेबल सांगून ठेवलं होतं. मस्त मैफल जमणार होती, बऱ्याच दिवसांनी! आता आबांची, ही न विचारता केलेली घुसखोरी. त्यांना नाही म्हटलं तर, लहान मुलासारखे फुरंगटून बसणार… मैत्रिणींना नाही म्हटलं तर त्या रुसणार. ‘नेहमीच तुझं असं काहीतरी असतं, जरा घरापलीकडे पण पाहायला शिक’ वगैरे सल्ले येणार आणि माझाही हिरमोड होणार.
या इकडे आड तिकडे विहीर परिस्थितीला देवा, कशी जाऊ मी सामोरी?
थेट नाही म्हणून, आबांना दुखवायचं फार जीवावर आलं होतं माझ्या. सुवर्णमध्य तर काढायलाच हवा होता. आबांना म्हणाले, “आबा अहो उद्या सकाळी ना, आमच्या मैत्रिणींचा बेत ठरलाय आधीच, बऱ्याच दिवसांपासून.”
आबांचा चेहरा उतरला… “माझीच चूक, तुला आधी विचारायला हवं होतं मी. सुचलंच नाही गं मला. जाऊदे, कळवतो सगळ्यांना नाही म्हणून. बघू नंतर कधीतरी.”
मी हसत म्हणाले, “मी नाही कुठे म्हणालेय? सकाळच्या ऐवजी संध्याकाळी, एवढाच बदल करू, चालेल?”
आबांचा उतरलेला चेहरा, एकदम ‘फूल खिले’वाल्या ‘तब्बसूम’सारखा हसरा झाला… “चालेल काय, धावेल. निरोप पाठवतो सगळ्यांना!!” त्यांनी लगेच फोन काढलासुद्धा खिशातून.
“काय करशील खायला?”
“रगडा पॅटीस करू? आवडेल सगळ्यांना आणि नंतर कॉफी.”
“यादी दे, संध्याकाळी सगळं साहित्य आणून देतो.”
आबांचा उत्साह अगदी तरुणांना लाजवणारा. सगळं आणून ठेवलं संध्याकाळी.
दुसऱ्यादिवशी सकाळी, जायच्या आधी सगळी तयारी करून गेले.
चार वाजता घरी आल्यावर थोडी पडले आणि मग चटचट आवरून रगडा, पॅटीस, चटण्या आदी सगळी जय्यत तयारी केली.
सहाला जमली मंडळी, हास्यविनोद, गप्पा, गॉसिप यांना ऊत आला. साडेसात वाजत आले आणि मी ताटल्या भरून बाहेर आणल्या.
हेही वाचा – पॉवर बँक… अविस्मरणीय विमानप्रवास
निम्मी जनता ‘दंताजीचं ठाणं’ उठलेली, त्यांच्यासाठी हा बेत म्हणजे सोने पे सुहागा. पथ्यपाणी विसरून सगळ्यांनी आडवा हात मारला. आवडला त्यांना हा चटपटीत बेत.
“बयो, आम्ही लाजणार नाही, पोटभर खाऊ, म्हणजे आज रात्रीच्या जेवणाला सुट्टी.”
त्यांनी दिलेली दाद म्हणजे मूठभर मांस माझ्या अंगावर… केल्याचं चीज.
मनसोक्त खाऊन, कॉफी पिऊन, माझ्या पाठीवर शाबासकीचे हात ठेवून आणि मुख्य म्हणजे, आबांची स्तुती करून सगळे पांगले. सुखावलेले आबा आणि त्यांची नजरच सगळं सांगून जात होती.
“धन्यवाद पोरी,” असं आबा म्हणाले आणि मी उत्तर दिलं, “अहो आबा, माझे बाबा असते तर जे मी केलं असतं तेच आत्ता केलं. त्यात विशेष काही नाही. धन्यवाद नाही म्हणायचं, माझं कर्तव्य आहे ते!!”
गहिवरले आबा… “पोरी मी नशीबवान. सगळ्यांच्या नशिबात नाही येत असं सुख.”
मला तोंडभरून आशीर्वाद देत ते गेले त्यांच्या खोलीत आणि मी आवरासावर करायला लागले.
फार मोठी नाही, छोटीशीच गोष्ट केली मी, पण त्यामुळं पुन्हा एकदा मला माझे बाबा भेटले, खचितच!!


