भाग – 2
लोढा शेठला सिक्युरिटी एकनाथचा मुलगा दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करायचा होता. सोसायटीत राहणाऱ्या प्रत्येकाने दोन हजार जरी जमा केले तरी, दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करता येणार होता आणि सोसायटीतला कुणी नाही म्हणेल असंही त्यांना वाटत नव्हतं; कारण सगळेच पैसेवाले होते आणि महत्त्वाचं म्हणजे दिनू होताच तसा. सदोदित उत्साहाने फसफसलेला. हाक मारली की, कुणाच्याही मदतीला धावून जाणारा. कोणतंही काम सांगा दिनूने ते केलं नाही, असं नाही. बरं या कामाचा कुणी मोबदला देईल, अशीही अपेक्षाही नाही. पण लोढा शेठच्या या प्रस्तावाला सोसायटीत फारसा कुणी दुजोरा दिला नाही. मीटिंगमध्ये 48पैकी 12 सदस्य आले होते. त्यातील सहाजणांचा विरोध होता.
दुसऱ्या दिवशी शेठजींनी बाकीच्या छत्तीस परिवारांना मेसेज पाठवला. दिनूचा वाढदिवस साजरा करण्यामागची आपली भूमिका सविस्तर मांडून प्रस्तावाच्या बाजूने मत द्यायचं आवाहन केलं. तीनचार दिवस तर कुणाचीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर लोकांनी “कशासाठी हा उपद्व्याप करताय? अशा अनिष्ट प्रथा पाडू नका, इतका खर्च का येतोय, त्याचा हिशोब द्या, दोन हजार फार होतात, शंभरदोनशेत जे करायचं ते करा,” अशा संतापजनक प्रतिक्रिया नोंदवल्या. प्रस्तावाच्या बाजूने फक्त आठ तर विरोधात सोळा मतं पडली. बाकीच्या बारा जणांनी ‘सर्वसहमतीने जे ठरेल त्याला आम्ही राजी आहोत,’ असं तटस्थ मत नोंदवलं. या तटस्थ लोकांचा शेठजींना भयंकर राग आला. हे तटस्थ लोकच चांगल्या कृत्यांच्या बाजूला उभं न रहाता वाईट कृत्यांना एक प्रकारे समर्थनच देतात, हे त्यांच्या लक्षात आलं.
त्यांनी परत एकदा या लोकांना मेसेज पाठवून, “फक्त हो किंवा नाही एवढंच कळवावे,” अशी विनंती केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा लोकांना कुणाच्याच नजरेत वाईट व्हायचं नसतं किंवा उघडपणे कोणतीही भूमिका घ्यायचं धैर्य त्यांच्यात नसतं. शेवटी सात दिवस वाट बघून शेठजींनी मतांची गणना केली. चौदा विरुद्ध चोविस मतांनी ते हरले होते. त्यांना खूप वाईट वाटलं. दिनू फुकट सर्वांची कामं करत होता, त्याची लोकांनी शून्य किंमत केली होती. याच कामाकरिता जर नोकर ठेवला असता तर, महिन्याला तीनचार हजार त्याने सहज घेतले असते आणि या लोकांनी न कुरकुरता ते दिले असते. एकदम त्यांच्या डोक्यात सणक आली आणि त्यांना वाटलं, जावं आणि दिनूला सांगावं की, “तुझ्या उपकाराची या लोकांना जाण नाही. यापुढे कुणाचंही काम करणं बंद कर.” पण त्यांनी मन आवरलं. शेवटी ते सोसायटीचे सेक्रेटरी आणि प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यांना असं करणं शोभणारं नव्हतं.
दोनतीन दिवसांनी अध्यक्ष पाटील साहेबांचा फोन आला, “मग ठरलं का दिनूचा वाढदिवस साजरा करायचं?”
त्यांना काय उत्तर द्यावं ते शेठजींना कळेना. शेवटी त्यांनी खरं सांगायचं ठरवलं, “प्रस्तावाच्या बाजूने फक्त चौदा मतं पडली साहेब. त्यामुळे वाढदिवस कॅन्सल करावा लागणार.”
पाटील साहेब जोरजोरात हसले…
“मी म्हटलं होतं ना तुम्हाला आपल्या सोसायटीत एकूण एक नमूने आहेत म्हणून. तुम्ही त्यादिवशी म्हटला होतात की, कुणी नाही केला तरी मी करणारच, मग कॅन्सल का करताय? जे तयार आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या, उरलेले तुम्ही टाका आणि करून टाका वाढदिवस!”
“तसं करता येईल, पण ते योग्य दिसणार नाही. ठीक आहे बघतो मी काय करायचं ते,” असं म्हणून त्यांनी पाटील साहेब काही म्हणायच्या आत फोन कट केला.
एकेक दिवस निघायला लागला तशी शेठजींच्या मनाची घालमेल वाढली. “कुणी नाही दिले पैसे तर, मी माझ्या पैशाने वाढदिवस करीन,” असे ते जोशात म्हणून तर गेले होते. पण आता त्यांना तेवढे पैसे खर्च करणं जीवावर येत होतं. चौदा जणांनी पैसे दिले तरी उरलेले सत्तर बहात्तर हजार पदरचे खर्च करायला त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती. काय दुर्बुद्धी सुचली आणि आपण ते बोलून गेलो, याचा त्यांना पश्चात्ताप होऊ लागला.
हेही वाचा – दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय
एक दिवस एक गडबड झाली. संध्याकाळच्या वेळेस जोशींचा मुलगा आपली महागडी बाइक सोसायटीच्या बाहेर लावून घरात गेला. पाचच मिनिटांत परत येऊन त्याला बाहेर जायचं होतं. दुर्दैवाने तो गाडीची चावी गाडीलाच विसरून गेला. घरात गेल्याबरोबर त्याच्या मैत्रीणीचा फोन आला. तिच्याशी गप्पा मारतामारता आपण गाडी बाहेरच लावलीय, हे तो विसरला. त्याच सुमारास एक बाइक चोर तिथं आला. बाइकला लागलेली चावी पाहून त्याला आनंदाचं भरतंच आलं. सिक्युरिटीच्या केबिनमध्ये तेव्हा राम नावाच्या सिक्युरिटी गार्डसोबत दिनूही बसला होता. त्याने बाईक स्टार्ट झाल्याचा आवाज ऐकला आणि तो ताडकन उठला. जोशींच्या मुलाला त्याने मघाशीच बिल्डिंगमध्ये वर जाताना पाहिलं होतं. एका सेकंदात तो गेटच्या बाहेर आला. बाईकवर दुसरा माणूस पाहून सगळा मामला त्याच्या लक्षात येऊन तो त्या बाइकस्वारावर जोरात ओरडला. बाइकचोराने बाइक वळवून मेन रोडवर जशी घातली दिनू जीवाच्या आकांताने त्याच्या मागे पळाला. बाइक आपल्या हातात लागणार नाही, हे पाहून त्याने एक झेप घेऊन तिची मागची बाजू पकडली आणि तिला तो खेचू लागला. बाइकचोराने बाइकचा वेग वाढवला. दिनूने ते पाहून पायात घातलेल्या चपला रोडवर ताकदीने दाबून धरल्या. बाइकचा स्पीड कमी झाला, पण दिनू आता फरपटत पुढे जाऊ लागला. सुदैवानं समोरून येणाऱ्या दोन बाइकस्वारांचं लक्ष या प्रकाराकडे गेलं. त्यांना यात काहीतरी गडबड आहे, हे लक्षात आलं. एकाने आपली बाइक सरळ बाइकचोराच्या समोर उभी केली. दुसऱ्याने चपळाईने खाली उतरून बाईकचोराच्या बाइकची चावीच हस्तगत केली.
“हा चोर आहे. गाडी चोरून घेऊन चाललाय…” दिनू ओरडला तसा एका बाइकस्वाराने त्या बाइकचोराच्या मुस्काटात दोन थपडा मारल्या. आता बरेच लोक जमा झाले. सिक्युरिटी गार्डही धावत आला. कुणीतरी पोलिसांना फोन लावला. बाईकचोराला लोकांनी पकडून ठेवलं.
“कुणाची गाडी आहे रे ही?” सिक्युरिटी गार्ड रामने दिनूला विचारलं.
“त्या जोशीसाहेबांची आहे,” दिनू म्हणाला. तेवढ्यात जोशींचा मुलगा धावत आला. बाइक पाहून त्याला हायसं वाटलं. घरी जाऊन जोशींच्या मुलाने झालेला सगळा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला.
“बाबा त्या दिनूची कमाल म्हटली पाहिजे. त्याची चप्पल तुटली, पँट फाटली तरी त्याने गाडी सोडली नाही. बाबा दिनूला काहीतरी बक्षीस दिलंच पाहिजे!”
“पाचशे रुपये देऊन टाक…”
“बाबा, आपली सव्वा लाखाची गाडी त्याने चोरी जाण्यापासून वाचवली आणि फक्त पाचशे रुपये द्यायचे?”
“अरे, गाडी नेली असती तरी आपण चोवीस तासात शोधून आणली असती. पोलीस खात्यात आपल्या ओळखीच आहेत तशा…” जोशी अभिमानाने म्हणाले.
“हो… ते ठिक आहे, पण पोलिसांनाही तुम्हाला एक-दीड हजार बक्षीस म्हणून द्यावेच लागले असते ना?”
पोरगा ऐकत नाही, हे पाहून जोशींचं डोकं तापलं, “हे बघ चूक तुझी आहे. तुला गाडीची चावी काढता येत नव्हती? आता मला उगीच मनस्ताप देऊ नकोस, नाहीतर तुझी गाडीच मी विकून टाकेन!” बापाने दम भरल्यावर पोरगा चूप बसला, पण कुठेतरी त्याच्या मनाला ते पटलं नव्हतं.
दोनतीन दिवसांनी अजून एक घटना सोसायटीत घडली. सुलक्षणेबाईंची गावातच रहाणारी मुलगी माहेरी आईवडिलांना भेटायला आली होती. संध्याकाळी ती आपल्या घरी निघून गेली. रात्री दहा वाजता तिचा सुलक्षणे बाईंना फोन आला.
“आई एक गडबड झालीये. माझं एक कानातलं सापडतच नाहीये. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते. आता मात्र डाव्या कानातच आहे…” ती रडकुंडीला येऊन बोलत होती
“अरे बापरे! ते डायमंडचे कानातले ना? हो बरोबर. तू इथे आलीस तेव्हा तुझ्या कानात होते. पण घरातच शोध ना. तिथंच कुठतरी पडलं असेल!”
“आई दोन तासांपासून शोधतेय. घराचा सगळा कानाकोपरा शोधून झालाय…” ती आता रडायला लागली होती.
“विश्वासरावांना कळवलं का? त्यांनीच तुझ्या वाढदिवसाला घेऊन दिले होते ना?”
हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!
“हो. पण ते आता चेन्नईत आहेत. त्यांना कळवायचा धीर होत नाहीये. कळलं तर चिडतीलच ते माझ्यावर. अडीच लाखांचे होते आई ते कानातले! एक गेलं म्हणजे सव्वा लाखाचं नुकसान…” तिला पुढे बोलवेना…
“जाऊ दे, रडू नकोस. मी शोधते इथे. सापडलं तर तुला कळवते.”
सुलक्षणेबाईंनी दोन तास घरात शोधाशोध केली, पण काही तपास लागेना.
सकाळी उठल्या उठल्या त्यांनी सिक्युरिटीला फोन केला. झालेल्या घटनेची माहिती देऊन सोसायटीच्या आवारात शोध घ्यायला सांगितलं. घरातही त्यांनी परत शोधायचा प्रयत्न केला. या दरम्यान मुलीचे चारपाच फोन येऊन गेले. कानातलं सापडत नाही म्हणून ती कासावीस झाली होती. पोलिसात तक्रार देऊ या का, असं सुलक्षणेबाईंना विचारत होती. सुलक्षणेबाई आणि त्यांच्या मिस्टरांनी तिला धीर धरायला सांगितलं, कारण तक्रार केली की, सोसायटीत पोलीस चौकशीला येणार. त्याचा सगळ्यांनाच मनस्ताप होणार होता!


