गेल्या आठवड्यात रोजच्या सारखं सकाळी वॉकसाठी बाहेर पडलो. वळणावरच्या एका सोसायटीच्या आवारातील बंद मेन गेटच्या गजांमधून एक आजी-आजोबा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला हात हलवून काहीतरी बोलत होते. हे रोजचंच दृश्य होते माझ्यासाठी. आज मात्र न राहवून मी सोसायटीच्या सिक्युरिटीवाल्याकडे त्या आजी-आजोबांची चौकशी केली. त्याच्या बोलण्यातून थोडी माहिती समजली, पण त्याचे काही शब्द मात्र धक्कादायक होते.
“क्या बोलू साब बुढ्ढा, बुढ्ढी कबसे वेटिंग लिस्ट पर हैं, पर उनका टिकट भगवान कन्फर्म नहीं करता…”
आजोबांचे वय 95 आणि आजीचे 90. वृद्धत्वाव्यतिरिक्त कसलाही आजार नाही. चार-चार खोल्यांच्या दोन फ्लॅटमध्ये आजोबांची दोन मुलं, सुना नातवंडे असा मोठा परिवार रहातो. घरात दोन-तीन नोकर मंडळी. सगळे आपापल्या जगात व्यग्र. आजोबा, आजींशी बोलायला पुरेसा वेळ नाही कोणाकडे! बिचारे दोघेही दिवसातला बहुतेक वेळ मेन गेटच्या आसपास उभं राहून किंवा खुर्चीवर बसून घालवतात.
आज रविवार आहे. थोडा निवांत होतो मी. तिथून चालत जाताना काय मनात आलं कोणास ठाऊक, पण सरळ गेटच्या ग्रिलमधून हात आत टाकला आणि आजोबांशी हस्तांदोलन केले.
हेही वाचा – सदूकाका अन् मानाचा गणपती…
“जुग जुग जियो मेरे लाल…”
डोळे पुसत आजोबांनी आशीर्वाद दिला आणि मीच रडवेला झालो.
“ओ विद्याबेन, देखो आ डिकरा आ गया हैं बात करने…”
चार शब्द ऐकण्यासाठी आसुसलेल्या विद्याबेन लगोलग खुर्चीवरून उठून आल्या.
आजोबांशी बोलताना कळलं की, मुळचे भावनगरचे असणारे आजोबा लग्न झाल्यावर व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत आले आणि मग इथलेच झाले. नामवंत जवाहिर म्हणून हिरे बाजारात नाव मिळवलं. मोठं बस्तान बसवलं. हिरे निर्यातीतील एक अग्रगण्य संस्था, अशी त्यांच्या कंपनीची ख्याती झाली. आजोबांचे दोन्ही मुले आज त्यांचा हिऱ्याचा व्यवसाय सांभाळतात. घरात सगळी सुखं दिमतीला आहेत, पण चार आपुलकीचे शब्द बोलायला मात्र वेळ नाही कोणाकडे! आजकाल घरोघरी दिसतं तेच चित्र आजोबांकडे देखील आहे…
आई-वडिलांच्या रुपात असलेल्या या कोहिनूर हिऱ्यांची देवाकडे निर्यात मात्र अद्याप होत नाही, याचा खेद आजोबांच्या मुलांना कदाचित होत असावा, जो त्या सिक्युरिटीवाल्याच्या तोंडून मी ऐकला होता.
आजोबांना जगण्याचं बळ देण्यासाठी, मी म्हणालो की, “येणं जाणं कोणाच्याच हातात नसते हे ठाऊक असूनही आपण आपल्याच माणसांपासून दुरावत जातो, ते त्यांची आवश्यकता आणि उपयुक्तता कमी झाली म्हणून? का त्यांनी खस्ता खाऊन मोठं केल्यानंतर आपल्या जगात त्यांना आता कोपऱ्यात सुद्धा जागा नाही म्हणून? उंच डेरेदार वाढलेल्या आणि सुख समृद्धीच्या फळांनी लगडलेल्या वृक्षाने हे विसरू नये कधीच की, आपण आज जे काही आहोत,, ते आपल्या मुळांमुळेच! जी मुळे अजूनही वादळवाऱ्याची तमा न बाळगता खोलवर जमिनीत रूजून आपलं संरक्षण करीत आहेत…”
हेही वाचा – काका मला वाचवा!
आजोबा डोळे पुसत म्हणाले की, “तू समझ गया लेकिन मेरे अपने यह बात कब समझेंगे?”
मी नि:शब्द झालो. आजोबांच्या जखमेवरची खपली उगाच काढली, असं मला वाटलं क्षणभर… पण अचानक काय झालं कोणास ठाऊक वातावरणात एकदम उत्साह आला… आमचं संभाषण आजोबांच्या नातवाने घरातून ऐकले, तो धावत बाहेर आला आणि माझे हात हातात घेऊन म्हणाला,
“मैं आजतक जिस चीज़ को ढुंढता था, वो चीज़ मेरी अपनी हैं और मेरे जनम से मेरे ही घर में हैं इसका अहसास आपने आज मुझे दिया. कल से नया सूरज आएगा दादा, दादी के जिंदगी के आसमान में… यह मेरा वादा है आपसे. सिक्युरिटी गार्ड जो आप से बोला था, वह भी मैंने सुना था… अब इन दोनों का टिकट और कई साल वेटिंग लिस्ट में ही रखने के लिये मैं हर तरह प्रयास करूंगा क्योंकि उनके प्यार, ममता और आशीर्वाद के स्टेशन से ही मेरे जीवन की बुलेट ट्रेन गुजरे, बस यही चाहता हूं मैं!”


