लोढा शेठच्या गाडीचा हॉर्न वाजला तसा एकनाथच्या ऐवजी दिनू सिक्युरिटी रुममधून बाहेर आला. त्याने लगबगीनं फाटक उघडलं. गाडी जशी गेटच्या बाहेर पडू लागली, तसा त्याने आपला बाप जसा ठोकतो तसा सॅल्यूट लोढा शेठला पाहून ठोकला. लोढा शेठच्या चेहऱ्यावर त्याला बघून एक प्रसन्न हास्य झळकलं. “पोरगा खरंच स्मार्ट आहे,” ते मनातल्या मनात म्हणाले. गाडी पुढे रस्त्याला लागली, तसा कालचा प्रसंग त्यांना आठवला. काल त्यांच्या मुलाचा पंधरावा वाढदिवस त्यांनी सोसायटीच्या क्लबहाऊसमध्ये जोरदार साजरा केला. त्यांचा मुलगा सनी दहावीच्या परीक्षेत 99% घेऊन पास झाला होता, हे खरं वाढदिवस साजरा करण्यामागचं मुख्य कारण होतं. सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड कम केअरटेकर एकनाथचा मुलगा दिनू वाढदिवसाला आपल्या आई-बहिणीसोबत हजर होता. लोढा शेठ सगळ्या पाहुण्यांची चौकशी करत करत दिनूजवळ पोहचले. दिनू त्यांचाच नाही तर, पूर्ण सोसायटीचा आवडता मुलगा. त्याला पाहून लोढा शेठ थांबले. त्याच्या उत्साहाने भरलेल्या चेहऱ्याकडे पहात त्यांनी विचारलं,
“काय दिनू कशी वाटली पार्टी?”
“लई झकास!” दिनूनं त्याच्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिलं, “पुढच्या महिन्यात माझा पण वाढदिवस आहे आणि माझे पप्पा पण अशीच सगळ्यांना पार्टी देणार आहेत.”
ते ऐकून लोढा शेठ जोरात हसले. या पार्टीकरता त्यांना दीड लाख खर्च आला होता. एक सिक्युरिटी गार्ड एवढा खर्च करणं शक्यच नव्हतं. एकनाथने त्याला नको ते स्वप्न दाखवलं होतं. दिनूच्या भाबडेपणाची त्यांना गंमत वाटली, पण त्यांना त्याचं मन मोडायचं नव्हतं म्हणून ते म्हणाले,
“अरे वा! आम्हाला बोलावणार आहे ना?”
“हो मग! सोसायटीतल्या सगळ्यांना बोलावणार आहे…” दिनू उत्साहाने म्हणाला.
शेठजी हसत हसतच पुढे गेले होते.
ते आठवून आताही शेठजींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एकदम त्यांना जाणवलं की, एकनाथची एवढा खर्च करण्याची ऐपत नक्कीच नाही. महिन्याला दहा हजार कमावणारा माणूस एक-दीड लाख फक्त वाढदिवसाला खर्च करणार नाही. मात्र, सोसायटीत रहाणारे सगळे मिळून तर करू शकतात. या विचाराने त्यांना एकदम उत्साह वाटायला लागला. काय हरकत आहे? प्रत्येकाने दोन हजार जरी जमा केले तरी, दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करता येणार होता आणि सोसायटीतला कुणी नाही म्हणेल असंही त्यांना वाटत नव्हतं; कारण सगळेच पैसेवाले होते आणि महत्त्वाचं म्हणजे दिनू होताच तसा. सदोदित उत्साहाने फसफसलेला. हाक मारली की, कुणाच्याही मदतीला धावून जाणारा. कोणतंही काम सांगा दिनूने ते केलं नाही, असं नाही. बरं या कामाचा कुणी मोबदला देईल, अशीही अपेक्षाही नाही. तो शाळेतून आला की, सारखा सोसायटीतल्या रहिवाशांच्या कामासाठी वर-खाली करायचा. कधी कंटाळा नाही की, ‘नाही’ म्हणणं नाही.
“दिनू मला भाजी आणून दे…” “दिनू जरा रूम साफ करायचीय. येतोस का मदतीला?” “दिनू आजीला जरा फिरवून आणतोस का बागेत?” “दिनू कोपऱ्यावरच्या मेडिकलमधून औषधं आणून दे बरं…” “दिनू बाळ रडतोय. त्याला फिरवून आण जरा…” अशी शेकडो कामं रोजच दिनूला सांगितली जायची आणि दिनू ती उत्साहाने करायचा. कधी कुणी त्याच्यावर चिडलं, रागावलं तरी दिनूने कधीही उलटून उत्तर दिलंय, असं होत नव्हतं.
सोसायटीला तीन सिक्युरिटी गार्ड होते. त्यातले दोन गावातच रहायचे. एकनाथ मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातून आलेला. एक्स-सर्व्हिसमॅन. सोसायटीच्या अगोदरच्या अध्यक्षांनी त्याला आणलं होतं. सोसायटीच्या बेसमेंटमध्ये बांधलेल्या दोन छोट्या रूममध्ये कुटुंबासह रहायचा. सिक्युरिटी गार्ड कम केअर टेकर अशा दोन्ही भूमिका तो निभवायचा. दिनू हा त्याचा छोटा मुलगा… तेरा वर्षांचा… गोरागोमटा आणि चुणचुणीत… एकनाथची बायको आणि मोठी मुलगीही सोसायटीतल्या रहिवाशांची गरज पडली तर, बऱ्याचदा धुण्याभांड्याची कामं करायची. एकंदरीत या पूर्णच कुटुंबाची सोसायटीला बरीच मदत व्हायची, पण खरा हीरो होता तो दिनू! सर्वांच्या मदतीला ताबडतोब धावून जाणारा…
लोढा शेठ सोसायटीचे सेक्रेटरी होते. त्यांनी ठरवलं सोसायटीच्या मेंबर्सची मीटिंग बोलवायची आणि हा मुद्दा मांडायचा. बारा मजली सोसायटीत 48 फ्लॅट होते आणि त्यात राहाणारे जवळजवळ सगळेच सधन होते. दोन-तीन हजार काढून द्यायला कुणी नाही म्हणणार नव्हतं.
रात्री ते घरी परतले तेव्हा एकनाथ ड्युटीवर होता. त्याला त्यांनी विचारलं,
“एकनाथ आपल्या दिनूचा वाढदिवस कधी असतो?”
“16 ऑक्टोबर. का बरं साहेब?”
“अरे, काल तो म्हणत होता माझे पप्पा पण माझा वाढदिवस सनीसारखाच साजरा करणार आहेत. खरंय का?”
एकनाथ जोरात हसला…
“अहो साहेब, आपली काय ऐपत असा वाढदिवस साजरा करण्याची. पण काल सनीबाबाचा वाढदिवस पाहून तो माझ्या मागे लागला की, माझाही वाढदिवस असाच करायचा. मी त्याला खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण ऐकेचना म्हणून म्हटलं, ठीक आहे करू… तर तो सगळ्यांना तेच सांगत सुटलाय. अर्थात, त्याच्यावर कोण विश्वास ठेवायलाय?”
हेही वाचा – आमची ही नववी फॉरेन टूर, असे पाठक म्हणताच…
“आम्ही करू त्याचा वाढदिवस,” असं सांगायचं शेठजींच्या अगदी ओठांवर आलं होतं, पण दिनूला सरप्राइज द्यायला पाहिजे, या विचाराने ते काही बोलले नाहीत.
जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना फोन लावला.
“पाटील साहेब, एक विचार मनात आलाय. आपला सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनूचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की, दिनू किती कामाचा मुलगा आहे ते. तेव्हा मला असं वाटतं की, आपण सगळ्या सोसायटीने मिळून त्याचा वाढदिवस साजरा करावा.”
“कल्पना चांगली आहे. पण साजरा करायचा म्हणजे कसा?”
“सोसायटीतल्या प्रत्येक परिवाराने दोन हजार जमा करायचे. साधारण शहाण्णव हजार जमतील. त्यात केक कापणं, सगळ्यांचं जेवण आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करू. त्यानिमित्ताने एक गेटटुगेदर होऊन जाईल!”
“गेटटुगेदर ठीक आहे, पण एका सिक्युरिटी गार्डच्या मुलाचा वाढदिवस साजरा करणं आपल्यासारख्या उच्चभ्रू लोकांना शोभेल का? सोसायटीत असे अनेक जण आहेत, ज्यांना आपल्या मुलांचे वाढदिवससुद्धा घरातच साजरे केलेले आवडतात, मग दिनूच्या वाढदिवसाला ते तयार होतील का? अजून एक प्रॉब्लेम आहे. हा वाढदिवस आपण आपल्या खर्चाने साजरा केला तर बाकीचे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्या मुलांनी काय घोडं मारलंय? दिनूचा केला तर आमच्याही मुलांचे करा. मग तेव्हा काय उत्तर द्यायचं?”
“अहो साहेब, त्यांची फँमिली इथं रहात नाही. सिक्युरिटीशिवाय इतर कोणतंही काम ते किंवा त्यांची फॅमिली करत नाही. शिवाय, तुम्ही पाहाता तो पोरगा शाळेतून आला की, सोसायटीतल्या लोकांची वैयक्तिक कामं करत असतो, तीही फुकट! कधी त्याने कामाचे पैसे मागितले नाहीत की, कामाला नाही म्हटलं नाही. सोसायटीतले लोक त्याला आपल्या स्वार्थाकरिता वापरून घेतात. मग एक दिवस त्याच्यासाठी खर्च केला तर बिघडलं कुठं?”
“ठीक आहे. माझी काही हरकत नाही. ठेवा मीटिंग. बोलावून घ्या सगळ्यांना. पण मला नाही वाटत लोक तयार होतील. एकेक नमुने आहेत सगळे…”
“पण मला खात्री आहे, दिनूसाठी ते नक्कीच पैसे देतील आणि त्यांनी नाही दिले तरी, मी एकटा करेन त्याचा वाढदिवस,” लोढा शेठ जिद्दीने बोलून गेले.
“मग तर प्रॉब्लेमच नाही… व्हा पुढे.”
सोसायटीतल्या सगळ्या परिवारांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप होता. त्यावर शेठजींनी येत्या रविवारी पाच वाजता मीटिंग आयोजित केल्याचा मेसेज टाकला. मीटिंगचा विषय त्यांनी मुद्दामच टाकला नाही. विषय पाहून बरेच जण मीटिंगला यायचेच नाहीत, असं व्हायला नको होतं.
रविवार उजाडला. लोढा शेठ पाच वाजताच मीटिंग हॉलमध्ये जाऊन बसले. कुणीही आलं नव्हतं. हे नेहमीचंच होतं. कोणत्याही विषयावर मीटिंग असो, येणारे फार कमी. जे यायचे तेही आपल्या फुरसतीने सेक्रेटरीवर उपकार केल्यासारखे डुलत डुलत यायचे.
सहा वाजले तेव्हा अध्यक्ष पाटील उगवले.
“अरे! अजून कुणीच आलं नाही? तुम्ही मेसेज पाठवला होता ना सगळ्यांना?” त्यांनी विचारलं
“हो तर. प्रत्येकाला वैयक्तिकही मेसेज पाठवलाय…”
“मग असं कसं झालं? मेसेजऐवजी तुम्ही फोनच करायला हवे होते. मेसेज वाचलाच नसेल तर त्यांना कळणार कसं?”
“अहो साहेब, सगळ्यांनी मेसेज वाचलाय. मी चेक केलंय…”
तेवढ्यात तीन-चार जण आले. मग परत तीन-चार जण आले. शेवटी सव्वासहा वाजता बारा जणांची उपस्थिती झाली. विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून लोढा शेठनी दहा-पंधरा मिनिटं थांबायचं ठरवलं.
“लोढा शेठ मीटिंगचा विषय नाही कळवला तुम्ही?” लोखंडे जरा रागातच म्हणाले.
“साहेब, ही ऑफिशिअल मीटिंग नाहिये. पण एक पाच मिनिटं थांबा सगळा विषय क्लीअर होईल.”
“शेठजी लवकर आटपा. आम्हाला शॉपिंगला जायचंय…” गव्हाणे मावशी घाई करत म्हणाल्या.
शेवटी आहे ती मंडळीही निघून जाऊ नये म्हणून शेठजींनी सुरुवात केली…
“माननीय सदस्यांचं मी स्वागत करतो. आज सोसायटीच्या प्रश्नांव्यतिरिक्त एका वेगळ्याच विषयावर चर्चा करण्याकरिता आपण जमलो आहोत. विषय असा आहे की, आपण सर्वच जण आपल्या सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनेश ऊर्फ दिनूला जाणता. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, कसलीही अपेक्षा न करता सगळ्यांची काम चोख करणारा, सदोदित हसतमुख असणारा असा हा मुलगा आपल्या सर्वांचाच लाडका आहे. या दिनूचा वाढदिवस 16 ऑक्टोबरला आहे. माझा असा विचार आहे की, दिनूच्या या कामाबद्दल, त्याच्या आपल्या सर्वांना असलेल्या सहकार्याबद्दल यावेळेचा त्याचा वाढदिवस आपण सर्वांनी मिळून साजरा करावा…”
शेठ थांबले. कुणी काही प्रतिक्रिया देतंय का, याचा त्यांनी अंदाज घेतला. दोन मिनिटं शांतता पसरली मग कुलकर्णी म्हणाले,
“खरंच, दिनू आपली खूप कामं करतो. आपण त्याचा वाढदिवस साजरा केला तर त्याला, त्याच्या आईवडिलांना खूप आनंद होईल. पण वाढदिवस साजरा कसा करणार?”
“सोपं आहे. आपण सर्वांनी दोन हजार रुपये जमा करायचे. 48 घरांचे 96 हजार जमा होतील. त्यात केक, दिनूला गिफ्ट, सगळ्या परिवारांचं एकत्र जेवण आणि मनोरंजनाचा हलकाफुलका कार्यक्रम करता येईल!”
“बापरे, दोन हजार? खूप जास्त होतात…” सुलक्षणेबाई म्हणाल्या.
“अहो मॅडम, आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्या चार-पाच जणांचंच बिल तीन-चार हजार होतं. ते आपण भरतोच ना?” शेठजी कळवळून म्हणाले.
“पण काहो शेठजी, दिनू आपल्यासाठी जे काही करतो त्याचा काही ना काही मोबदला आपण देतोच ना! परवा त्याने माझ्या बाइकचं पंक्चर जोडून आणलं, तेव्हा मी त्याला दहा रुपये खुशीने दिलेच होते. मग वेगळा वाढदिवस साजरा करायची गरज काय?” महाजन मधेच उठून म्हणाले.
“हो बरोबर आहे…” पवारांनी त्यांची री ओढली, “आम्हीसुद्धा त्याने गहू वगैरे दळून आणले की, खुशीने पाच-दहा रुपये देतोच… आणि शेठजी या लोकांचे असे वाढदिवस साजरे करून त्यांना मातवू नका. आज तुम्ही दिनूचा वाढदिवस साजरा करताय उद्या त्याच्या बहिणीचा करावा लागेल. मग दुसरे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्याही मुलांचे करा. मग प्रत्येक वेळी आम्ही असेच दोन दोन हजार द्यायचे का?”
शेठजींना शंका आली की, पवार दारू पिऊनच आले असावेत, कारण त्यांचे डोळेही तारवटलेले होते. पवार सरकारी अधिकारी होते. दाबून वरकमाई करत होते आणि खर्चही तसाच करायचे. प्यायला बसले की, पाच-पाच हजारांची दारू ते पिऊन जातात, असं शेठजींच्या कानावर आलं होतं आणि आता एका चांगल्या कामासाठी दोन हजार द्यायला खळखळ करत होते.
“मी पवार साहेबांशी सहमत आहे,” पारेख उठून म्हणाले, “गरीबांना अशा गोष्टींची सवय लावायचीच कशाला? अशाने ते शेफारतात. एकदा सेलिब्रेट केल्यावर पुढच्या वर्षीही त्याची तीच अपेक्षा राहिल.”
“तसं काही होणार नाही पारेख साहेब. पुढच्या वर्षी तो मोठा होईल त्याला आपोआपच जाणीव होईल,” शेठजी ठामपणे म्हणाले
“मला वाटतं आपण करावा वाढदिवस,” वानखेडे उठून म्हणाले, “आपण सगळेच सधन आहोत. काय हरकत आहे दोन-दोन हजार द्यायला. अहो, तेवढ्या रकमेचं तर आपण जेवणच करणार आहोत. शेठजी बरोबर म्हणताहेत.”
आता चर्चा रंगू लागली. प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात बोलणारे तावातावाने आपली बाजू मांडू लागले. आपल्या प्रस्तावाला थोडाही विरोध होणार नाही, अशी अपेक्षा घेऊन आलेले लोढा शेठ समोरचे वादविवाद पाहून क्षुब्ध झाले. माणूस इतका स्वार्थी कसा होऊ शकतो याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं.
“शेठजी मी निघू का? मला शॉपिंगला जायला उशीर होतोय,” गव्हाणेबाई अस्वस्थ होऊन म्हणाल्या तसे अध्यक्ष पाटील उठले आणि म्हणाले,
“दोन मिनिटं थांबा गव्हाणे मॅडम. एकमत न झाल्यामुळे आपण मतदान घेऊ. दिनूचा वाढदिवस साजरा करावा, असं किती जणांचं मत आहे त्यांनी हात वर करावा.”
समोरच्या बारा जणातून फक्त कुलकर्णी, वानखेडे, चव्हाण, गव्हाणेबाई यांनी हात वर केले. पवार, महाजन, जोशी, पारेख, लोखंडे, सुलक्षणेबाई यांनी हात वर केला नाही. फक्त चार हात वर आलेले पाहून लोढा शेठ चिंतीत झाले.
“चार जण! अध्यक्ष आणि मी आमचं मत धरून सहा जण होताहेत. म्हणजे सहा विरुद्ध सहा असा बिकट मामला झालाय.”
“आता यावर उपाय काय?” सुलक्षणे बाईंनी विचारलं.
“सोपं आहे. आज जे आले नाहीत, त्यांना मी मेसेज पाठवून निर्णय विचारतो. नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त झाली तर मी स्वतः सगळा खर्च करून त्या मुलाचा वाढदिवस करेन…” शेठजी थोडेसे चिडूनच दृढनिश्चयाने म्हणाले. तसे पवार उठून म्हणाले,
“जर तुम्हाला वाढदिवस करायचाच होता तर, आम्हाला बोलावलं कशासाठी? फालतू आमचा वेळ घालवला…” आणि ते उठून बाहेर चालायला लागणार तेवढ्यात शेठजी म्हणाले,
“एक मिनिट. माझी सर्वांना विनंती आहे की, निर्णय काहीही होवो, या विषयाचा उल्लेख दिनू किंवा एकनाथजवळ करू नका. आपल्याला त्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचंय!”
“ठीक आहे,” सर्व म्हणाले आणि पवारांच्या मागे सर्वजण निघून गेले.
“बघा मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की, सगळे नमुने आहेत. पैसे देणार नाहीत… ठीक आहे. मेसेज पाठवून बघा सगळ्यांचा काय निर्णय होतो ते आणि मला कळवा,” पाटीलसाहेब उद्वेगाने म्हणाले.
हेही वाचा – जगदीश महाजनना जाणवलं, पाठकच खरे हितचिंतक…
शेठजींना काय बोलावं ते कळेना. त्यांनी फक्त मान डोलावली.
घरी येऊन हा विषय त्यांनी बायकोला सांगितला. बायको रागाने मारवाडी भाषेत म्हणाली,
“तुम्हांलाही नको त्या उचापत्या सुचतात. खरंच, काय गरज आहे त्या पोराचा वाढदिवस करायची. असा कोणता तो मंत्रीसंत्री लागून गेलाय? मान्य आहे तो मेहनती आहे, प्रामाणिक आहे, विशेष म्हणजे तो कुणाच्याही मदतीला धावून जातो… पण या लोकांना असं डोक्यावर चढवायचं नसतं, हे माझ्यापेक्षाही तुम्हाला चांगलं समजतं, कारण एवढं मोठं सुपरशॉप तुम्ही चालवता ते उगाच नाही आणि तुम्हाला एवढं त्याच्याबद्दल वाटतंच आहे तर, त्याला घरी बोलवा. एखादा ड्रेस आणि मिठाईचा बॉक्स त्याच्या हातात द्या, बस झालं. पूर्ण सोसायटीच्या लोकांना बोलावून आपल्या सनीसारखा वाढदिवस साजरा करायची काहीच गरज नाही. दुसरं, तुम्ही प्रत्येकाकडून दोन हजार घ्यायचं म्हणताय. अहो गणेशोत्सवासाठी आणि नवरात्राच्यावेळी वर्गणीचे साधे पाचशे रुपये द्यायलासुद्धा हे लोक त्रास देतात, ते तुम्हाला काय दोन हजार काढून देणारेत?”
“वर्गणीची गोष्ट वेगळी आहे. तिथे भावना नसतात. पण इथे हा मुलगा सगळ्या कुटुंबांशी जोडला गेलाय. तू म्हणते तसा त्याचा वाढदिवस तर आपण कधीही करू शकतो. पण त्या पोराने जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करावं, असं मला मनापासून वाटतंय…”
“तुम्ही पण ना! एकदा काही ठरवलं की, त्याच्यावरच अडून बसता…” असं म्हणत ती तणतणत किचनमध्ये निघून गेली.


