अध्याय तेरावा
तरी आकाशीं कवणें । केलीं मेघाचीं भरणें । अंतरिक्षी तारांगणें । धरी कवण ॥54॥ गगनाचा तडवा । कोणें वोढिला केधवां । वारा हिंडतु असावा । हें कवणाचें मत ॥55॥ रोमां कवण पेरी । कोण समुद्र भरी । पर्जन्याचिया करी । धारा कवण ॥56॥ तैसें क्षेत्र हें स्वभावें । हे वृत्ती कवणाची नव्हे । हें वाहे तया फावे । येरां तुटे ॥57॥ तंव आणिकें एकें । क्षोभें म्हणितलें निकें । तरी भोगिजे एकें । काळें केवीं ॥58॥ हें जाणों मृत्यु रागिटा । सिंहाडयाचा दरकुटा । परी काय वांजटा । पूरीजत असे ॥59॥ तरि याचा मारु । देखताति अनिवारु । परी स्वमतीं भरु । अभिमानियां ॥60॥ महाकल्पापरौतीं । कव घालुनि अवचितीं । सत्यलोकभद्रजाती । आंगीं वाजे ॥61॥ लोकपाळ नीच नवे । दिग्गज मेळावे । स्वर्गींचिये आडवे । रिगोनि मोडी ॥62॥ येर याचेनि अंगवातें । जन्ममृत्यूचिये गर्तें । निर्जीवें होऊनि भ्रमतें । जीवमृगें ॥63॥ न्याहाळीं पां केव्हडा । पसरलासे चवडा । जो करूनियां माजिवडा । आकारगजु ॥64॥ म्हणोनि काळाची सत्ता । हा बोलु निरुता । ऐसे वादु पांडुसुता । क्षेत्रालागीं ॥65॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रचूनि महत्तत्त्वाचें खळें, मळी एके काळुगेनि पोळें
अर्थ
तर आकाशामधे मेघांमध्ये पाणी कोणी भरले ? पोकळीत तार्यांचे समूहास कोणी धारण केले? ॥54॥ आकाशाचे छत कोणी व कधी उभारविले? वार्याने नेहेमी हिंडत असावे ही कोणाची आज्ञा आहे? ॥55॥ (शरीरावरील) केसांची पेरणी कोण करतो? समुद्र कोण भरतो ? पावसाच्या धारा कोण करतो? ॥56॥ त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावत:च झाले असून हे कोणाचेही वतन नाही. याची जो वाहतूक करील (त्याला जो नीटनेटके जपेल) त्यासच हे उपभोगास मिळते व इतरांना उपभोगावयास मिळत नाही ॥57॥ असे स्वभाववादी बोलले, तेव्हा (येथून काळवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात) आणखी एक (काळवादी) रागाने म्हणाले की, “हे तुमचे बोलणे फार चांगले आहे बुवा! तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळ या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो? ॥58॥ मृत्युरूपी रागीट सिंहाची (क्षेत्र) ही दरी आहे असे आम्हास वाटते, पण या निरनिराळ्या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पुरे पडवेल काय? ॥59॥ तर या काळाचा अनिवार तडाखा पाहतात, परंतु स्वमताभिमानी लोकांचा आपल्या मतावरच भर असतो ॥60॥ या काळाने महाकल्पापलीकडे अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रह्मदेवाचा राहण्याचा जो सत्यलोक त्या सत्यलोकरूपी हत्तीवरसुद्धा या काळाचा चपेट घात वाजतो ॥61॥ हा (काळरूपी सिंह) स्वर्गरूपी अरण्यात शिरून रोज नवे लोकपालांचे व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो ॥62॥ याच्या (काळरूपी सिंहाच्या) अंगच्या वार्याने इतर जीवरूप पशु निर्जीव होऊन (नि:सत्व होऊन) जन्ममृत्यूच्या खळग्यात भ्रमत राहतात ॥63॥ सर्व आकारमात्र पदार्थ हाच कोणी हत्ती, तो ज्या चवड्यामध्ये धरला गेला आहे, तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे? पहा ॥64॥ म्हणून सर्व काळाची सत्ता आहे हे बोलणे खरे आहे.” (असे काळवादी म्हणतात. येथे काळवाद्यांचे मत संपले). अर्जुना असे हे क्षेत्राविषयी वाद आहेत ॥65॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माकर्माचे गुंडे, बांध घातले दोहींकडे


